अॅपलच्या आयपॉडने संगीत उत्तम दर्जाने ऐकण्याची सवय लावली, तर नुकत्याच आलेल्या आयटय़ून्सने ते विकत घेऊन ऐकण्याचीही सवय लावण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे संगीतासंबंधीच्या कॉपीराइट कायद्याचे पालन व्हायला मदत होईल आणि संगीताच्या वापराबद्दल संबंधितांना योग्य मोबदलाही मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.
स्टी व्ह जॉब्जला भविष्याची चांगली चाहूल असे. त्याच्या जगण्याचा किती मोठा भाग संगीताने व्यापला होता, यापेक्षा त्याने निर्माण केलेल्या तंत्रसिद्ध यंत्रांमुळे जगातल्या संगीताला त्याने काय दिले, याचा हिशोब अधिक महत्त्वाचा मानायला हवा. संगीताची बाजारपेठ नव्या स्वरूपात सादर करणारी त्याने निर्माण केलेली ‘आयटय़ून्स’ ही कल्पना आता जगातल्या संगीताचे भविष्य ठरवणार आहे, हेही मान्य करायला हवं. ‘आयटय़ून्स’ या संगीत विक्री करणाऱ्या नव्या व्यवस्थेनं गेल्याच महिन्यात भारतात पाऊल टाकल्यामुळे गेल्या काही दशकात भारतीय संगीतापुढे उभे ठाकलेले अस्तित्वाचे प्रश्न या नव्या व्यवस्थेने अधिक गहिरे केले आहेत. एकीकडे कलावंताला आपली कला सादर करता येईल, अशी व्यासपीठे कमी होत चालली आहेत आणि दुसरीकडे कला हे जगण्याबरोबरच उदरनिर्वाहाचेही साधन होईल, अशी शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. अशा स्थितीत आयटय़ून्समुळे संगीताच्या नव्या बाजारपेठीय संकल्पनेचा उदय झाला आहे. गेली काही वर्षे व्यावसायिक पातळीवर संधिप्रकाशात असलेल्या संगीतक्षेत्राला आयटय़ून्स उपकारक ठरते, की त्याच्यापुढे आणखी नवी प्रश्नचिन्हे निर्माण करते ते पाहायचे आहे.
सगळ्याच प्रयोगशरण कलांच्या प्रांगणात सध्या अस्तित्वाचे वारे घोंघावत आहेत. नाटक, संगीत, नृत्य यासारख्या प्रयोगशरण कलांचा गेल्या काही शतकांमध्ये उत्साहभरीत विकास होत गेला. त्या विकासाने हुरळून जाण्याची ऊर्मी येण्याच्या आतच तंत्रज्ञानाच्या अचाट वेगाने तो उत्साह मावळत चालल्याचा अनुभव आपण घेत आहोत. विशेषत: गेल्या दोन-तीन दशकातील तंत्रक्रांती कलांच्या बाबतीत एकाच वेळी विकासदर्शी आणि मारक ठरते आहे, असे चित्र दिसते. अभिजात कलेचा ध्यास घेतलेल्या कलावंताने जगण्याचे साध्य म्हणून कलेला शरण जात असतानाच त्याकडे साधन म्हणूनही पाहता येईल, अशी स्थिती निदान आजतरी दिसत नाही. संगीताची उपयोजितता कदाचित त्या कलावंताला जगण्यासाठी पुरेसे धन देईल, मात्र त्यामुळे अभिजाततेचे कमालीचे नुकसान होईल. होते आहे.
संगीत ही विक्रीयोग्य वस्तू व्हायला बराच काळ लागला. माणसाने उत्क्रांतीच्या अवस्थेत संगीताला जन्म दिला आणि नंतरच्या काळात आपले बुद्धिवैभव संगीताला बहाल करून ते जगण्याचे सुखनिधान बनवले. जगातली प्राचीन संस्कृती म्हणून भारताने संगीताची अतिशय काळजी घेतली. संगीताचा थेट मनाशी संबंध असल्याने ते जगण्याच्या चालीरीतींशी जोडून टाकले. जगण्याच्या हरएक टप्प्यावर संगीताची साथ राहील, याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. भारतीय संस्कृतीएवढय़ाच जुन्या असलेल्या ग्रीक संस्कृतीमध्ये संगीत त्या प्रमाणात टिकले नाही. भारताने तर गेल्या काही हजार वर्षांत अनेक प्रकारची राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणे झेलताना संगीताला नेहमीच पहिल्या दर्जाचे स्थान दिले. तिने या सांस्कृतिक आक्रमणांना अनेक वेळा परतवून लावले. जेव्हा आक्रमक अधिक धिटाईने समोर आले, तेव्हा त्यांच्या संस्कृतीला सामोरे जाण्याची सहिष्णुता भारतीय संगीताने दाखवली. सांस्कृतिक आक्रमण परतवून लावणे अशक्य आहे, असे लक्षात आल्यावर त्याची आपल्या मूळ प्रवाहात अतिशय कलात्मकतेने सरमिसळ करण्याएवढे बुद्धीचे तेज भारतीय संगीतात पहिल्यापासूनच होते. त्यामुळे आपल्या सर्जनाच्या क्षमतेवर अफाट विश्वास असणाऱ्या कलावंतांना आपली कला टिकवण्याची अनेक नवनवी साधने निर्माण करता आली. परिणामी अगदी पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत संगीताने तंत्र क्रांतीलाही नमवून ठेवण्यात यश मिळवले.
संगीतापुरते बोलायचे तर अगदी विसावे शतक येईपर्यंत ते पृथ्वीवरील प्रत्येकाचे आनंदाचे ठिकाण होते. कलावंत आपल्या प्रतिभेला फुटणाऱ्या धुमाऱ्यांना रसिकांपर्यंत नेण्यासाठी आसुसलेले असत आणि त्या असोशीपोटी ते कलेच्या प्रांतात कसलीही प्रतारणा खपवून घेत नसत. जनसंगीत अभिजात होत असताना, त्याला सत्तेचा आश्रय मिळाला आणि ते सत्तेच्या दरबारात सुप्रतिष्ठ झाले. तेथे जगण्याची हमी आणि निश्चिंती होती. कलेच्या प्रगतीसाठी वाटेल ते करण्याची परवानगीही होती. आपले संगीत आपल्याचजवळ राहावे, यासाठी त्याची जी धडपड होती, ती सर्जनाच्या प्रतिकृतीच्या भीतीपोटी होती. एका घराण्याच्या कलावंताला दुसऱ्या घराण्यातील कलावंताचे गाणे ऐकण्याची परवानगी नव्हती आणि ही कडक शिस्त कसोशीने पाळली जात होती. कला सादर करण्याच्या शैलीत सरमिसळ होऊ न देता ती अस्पर्शित राहण्यासाठी फार धडपड केली जात असे. तंत्राच्या अवताराने हे सारेच संपले. नभोवाणीने संगीत बहुश्रुत झाले आणि सर्वांपर्यंत पोहोचणे सोपे झाले. नभोवाणीने घराण्यांच्या भिंती ढासळू लागल्या आणि मग आपली शैली टिकवून ठेवण्याचे नवे प्रयोग सुरू झाले. या सगळ्या घराण्यांच्या शैलींमध्ये सुरू झालेले कलात्मक युद्ध संगीताला उपयोगीच ठरले. दरबारी संगीत मैफलींमध्ये आले आणि सामान्यांना ते ऐकणे सुकर झाले. मैफलींमधून संगीत ऐकणे एवढा एकच मार्ग असल्याने त्याची एक बाजारपेठीय संस्कृती तयार व्हायला लागली. तोपर्यंत कला सादर करणे आणि तिची अनुभूती घेणे या दोन्ही गोष्टी स्वान्त:सुखाय होत्या. ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान संगीतासाठी नवे आव्हान घेऊन आले. विसाव्या शतकाच्या आरंभीच भारतात अवतरलेल्या या तंत्राने संगीताच्या विश्वाला गवसणी घालण्याची प्रतिज्ञा केली. त्या काळातील बिनीच्या कलावंतांनी या तंत्राला आपल्या प्रतिभेने काबूत ठेवले आणि संगीताच्या अभिजाततेचा दर्जा जराही ढळू न देता ते नवोन्मेषी ठेवण्यात यश मिळवले. तीन मिनिटांपासून ते वीस मिनिटांपर्यंतच्या ध्वनिमुद्रिकांनी संगीताचे अर्थशास्त्रही बदलले. मैफली आयोजित करणारे नवे कंत्राटदार याच काळात उदयाला आले. तरीही तिकीट विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नातच सारे गणित आखले जाई. गाणे चांगले जमले पाहिजे, या ध्यासापोटी कलावंतही पैशाच्या बाजूकडे फारसे लक्ष देत नसत.
ध्वनिमुद्रिकेमध्ये टिपून ठेवलेले संगीताची झटपट प्रतिकृती करणे शक्य नसल्याने ते सीमितच राहिले. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूरूपाने म्हणजे ध्वनिमुद्रिकेच्या रूपातच जाऊ शकत असे. कॅसेटचे तंत्रज्ञान आले आणि संगीताच्या बाजारपेठेवर खऱ्या अर्थाने परिणाम होऊ लागला. कमी खर्चात कॅसेटच्या प्रती तयार करण्याचे तंत्रही लगेचच निर्माण झाले आणि पाठोपाठ आलेल्या सीडी, डीव्हीडी, एमपी थ्री (अॅनालॉग ते डिजिटल) या तंत्राने संगीताची मक्तेदारीच संपुष्टात आली. इंटरनेटच्या माध्यमातून ते इकडून तिकडे फारच गतिमानतेने प्रवाही होऊ लागले. संगीत ही कलावंताच्या कलात्मकतेची, सर्जनशीलतेची आणि प्रतिभेची खूणगाठ असते, ही वस्तुस्थिती हळूहळू जाऊ लागली आणि संगीताची नवी बाजारपेठ विकसित होऊ लागली. स्टीव्ह जॉब्जने नेमकी हीच गोष्ट हेरली आणि संगीताच्या बाजारपेठेचेही जागतिकीकरण करण्याच्या कल्पनेतून आयटय़ून्स ही कंपनी स्थापन केली. जगात केवळ पायरसीमुळे संगीताच्या बाजारपेठेला कमालीचा दणका बसत असताना असे धाडस करण्याची जिद्द असावी लागते. ध्वनिमुद्रण विकणे हा एकेकाळचा किफायतशीर व्यवसाय पायरसीमुळे ९० च्या दशकानंतर इतका अडचणीत आला, की एचएमव्हीसारख्या कंपनीला गाशा गुंडाळावा लागला. (२००५ मध्ये जागतिक संगीताची बाजारपेठ २०.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स होती. ती २०११ मध्ये १६.२ बिलियनवर आली) या सगळ्याचा परिणाम संगीत प्रत्यक्ष पोहोचण्यावर आणि त्यामुळे कलावंतावर झाला. मैफलीचे अर्थशास्त्र बदलले आणि प्रायोजकत्वाशिवाय मैफलीचे आयोजन अशक्य होऊ लागले. यू टय़ूब सारख्या सोशल नेटवर्किंगमध्ये संगीत फुकट उपलब्ध होऊ लागल्याने त्याची बाजारपेठीय किंमत बदलली. कला सादर करणे आणि त्यातून स्वत:चे आणि रसिकांचे समाधान घडवणे ही घटना दुय्यम स्वरूपाची मानली जाऊ लागली. ज्याला संगीत हेच आपले ध्येय ठरवायचे आहे, अशा नव्या कलावंताची त्यामुळे घुसमट होऊ लागली. प्रायोजक मिळवण्यासाठी प्रसिद्ध कलावंतांनाच मागणी येऊ लागली आणि नव्या कलावंतांवर प्रसिद्ध होण्यासाठी हात पसरण्याची वेळ आली.
संगीत उपलब्ध होणारी कॅसेटची आणि सीडीची चकचकीत दुकाने आता कालबाह्य़ झाली. आपल्या आवडत्या कलावंताचे गाणे पायरसीच्या रूपात स्वस्तात मिळू लागल्याने कलावंतांना नव्या रंगमंचाचा शोध घेण्याची वेळ आली असतानाच आयटय़ून्स ही संकल्पना प्रत्यक्षात आली. इंटरनेटद्वारे संगीत तुमच्या संगणकात उतरवून घेण्याची (डाऊनलोड) ही कल्पना अमेरिकेत यशस्वी झाली. आता तिने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. आज मितीस आयटय़ून्सच्या दुकानात जे भारतीय चित्रपट संगीत आणि अभिजात संगीत उपलब्ध आहे, त्याचे आकारमान फार मोठे नाही. भविष्यात हीच संकल्पना कदाचित संगीताला तारून नेण्यास उपकारकही ठरू शकते. या सगळ्याच्या पलीकडे भारतीय अभिजात संगीताचे म्हणून एक खास वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे त्यातील सर्जनाची अचाट ताकद. ध्वनिमुद्रण म्हणजे एका मैफलीची अनुभूती. कलावंताच्या कलाजीवनात तेवढे एकच सर्जन सर्वोत्तम असेल असे नाही. मात्र काळानुसार बदललेल्या नव्या संकल्पनांना सामोरे जाताना हेही आव्हान स्वीकारण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नाही. आयुष्यभर संगीताचा विचार करणाऱ्या सर्जक कलावंतासाठी रोज नवे संगीत सुचणे हीच खरी ताकद. एकच राग आयुष्यभर तसाच्या तसा गाणारा कलावंत भारतीय संगीतात कमअस्सल मानला जातो. कारण हे संगीत प्रयोगशरण आहे. त्यामुळे ‘माझ्याकडे भीमसेनजींचे पंचवीस यमनकल्याण आहेत’ किंवा ‘कुमारजींचे दहा हमीर आहेत’, यातली श्रींमती काही और आहे. कलेची अभिजातता त्यातच साठवलेली असते, हे रसिकांना कळणे हाच त्यावरील एक उपाय आहे. भारतीय संगीतात सतत नवे सुचण्यालाच महत्त्व आहे, तर पाश्चात्य संगीतात मूळ रचनेबरहुकूम कला सादर करण्याचीच शिस्त अधिक कडक आहे. मैफलीचे व्यासपीठ हेच आजही कलावंतांसाठी महत्त्वाचे साधन असेल, तर ते बाजारपेठीय अर्थशास्त्रात टिकवून ठेवणे हेही मोठे आव्हान आहे. नव्या कलावंतांसाठी तर ते अधिकच आवश्यक आहे. ‘संगीत’ टिकवून ठेवण्यासाठी त्याचा प्रसार अनेक मार्गानी व्हायला हवा. तंत्राचे माध्यम हा त्यातील एक प्रकार आहे. स्टीव्ह जॉब्जच्या आयपॉडने संगीत उत्तम दर्जाने ऐकण्याची सवय लावली. आयटय़ून्सने ते विकत घेऊन ऐकण्याचीही सवय लावण्याचे आव्हान स्वीकारले आहे. अभिजात संगीत ही भारतीय संगीतातील सर्वोच्च पायरी मानली, तर तिच्या अस्तित्वाला आयटय़ून्सने दिलासा मिळणार का, हा खरा प्रश्न आहे.
संगीताची नवी बाजारपेठ
अॅपलच्या आयपॉडने संगीत उत्तम दर्जाने ऐकण्याची सवय लावली, तर नुकत्याच आलेल्या आयटय़ून्सने ते विकत घेऊन ऐकण्याचीही सवय लावण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे संगीतासंबंधीच्या कॉपीराइट कायद्याचे पालन व्हायला मदत होईल आणि संगीताच्या वापराबद्दल संबंधितांना योग्य मोबदलाही मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.
First published on: 03-03-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New market of music