सध्या ऋतू कसा गमतीशीर आहे नाही? क्षणात थंडी, क्षणात ऊन, मध्येच ढग आणि मग नकळत पाऊस. सध्याचा हा ऋतू थेट ‘वर्ल्ड म्युझिक’सारखा-विश्वसंगीतासारखा मला वाटतो आहे. त्या संगीतामध्येही बघता बघता सतार आणि ड्रम्स फेर धरतात; आफ्रिकेच्या तालावर फ्रेंच गाणं वाजतं; आइसलॅण्डिक संगीतासोबत ऋग्वेदामधल्या ऋचांचं पठण होतं. विश्वसंगीत हे जगामधल्या अनेक संगीतांना जोडणारं संगीत आहे. त्यामुळेच ते गोंधळात टाकणारंदेखील आहे. रसिकतेची रूढ परिमाणं बदलणं त्या संगीताला अपेक्षितच आहे. आपण ‘सवाई गंधर्व’ला जातो आणि तिथलं अभिजात संगीत तिथल्या वातावरणामध्ये समरस होऊन ऐकतो. आणि दुसऱ्याच दिवशी क्लबमध्ये जाऊन एखादा इंडी-रॉक कंपू काय गातो-वाजवतो आहे हेदेखील बघू शकतो. जागतिकीकरणानं एका दिवशी मोदक खाऊन दुसऱ्या दिवशी पिझ्झा खायची सवय आपल्याला लावलेली आहे. पण एकाच ताटात मोदक आणि मासे आले तर कसं होईल, तसं विश्वसंगीत ऐकताना वाटू शकतं. मूळात विश्वसंगीत म्हणजे काय, हा गोंधळाचा विषय आहे. ‘क्रॉसवर्ड’, ‘लॅण्डमार्क’, ‘रिदम हाऊस’सारख्या दुकानांमध्ये एका कोपऱ्यात ‘वर्ल्ड म्युझिक’ अशा शीर्षकाखाली काही सीडीज् असतात. तिथे गर्दी नसतेच. आपण सीडीवरची अगम्य नावं आणि चित्र बघतो. प्रचंड महाग अशी किंमत वाचतो. सीडी रॅकमध्ये पुन्हा ठेवतो आणि दुसरीकडे मोर्चा वळवतो. ‘गुगल’वर घरी येऊन पाहिलं तर गुगल सांगतं- a traditional music from developing world, Sometimes incorporating elements of western popular music. (दुसऱ्या/ तिसऱ्या जगातलं पारंपरिक संगीत- जे कधी कधी पाश्चात्त्य जनसंगीताचे गुणविशेष उपयोजतं.) आता ही व्याख्या किती अपुरी आहे, हे क्षणात कळतं. वर ‘पारंपरिक संगीत’ म्हणजे काय, हाही एक प्रश्नच!
भारताचं पारंपरिक संगीत हे केवढं व्यापक आहे! ती एकजिनसी गोष्ट नाही; जी पाश्चात्त्य संगीताला सहज जोडता येईल. पण संगीत क्षेत्रातल्या निर्मात्यांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. त्यांच्या लेखी हे एक नवं, मोठ्ठं ‘मार्केट’ होतं. २९ जून १९८७ रोजी भरलेली ती प्रख्यात ‘वर्ल्ड म्युझिक मीटिंग’ मला स्मरते आहे. पीटर गॅब्रिएलनं नुसरत फतेह अली खानसोबत एकत्र केलेलं काम जसं पश्चिमेनं स्वीकारलं, तसे चतुर व्यावसायिक निर्मात्यांचे कान सजग झाले. त्यांना नवी बाजारपेठ दिसू लागली. रॉजर आर्मस्ट्राँगनं मग त्या बैठकीत निर्मात्यांसमोर अडचण मांडली. हे जे नव्या स्वरूपाचं संगीत तयार होऊ लागलं होतं, त्याची विक्री मर्यादित होत होती. त्याचं प्रमुख कारण हे होतं की, मोठय़ा दुकानदारांना हे संगीत दुकानातल्या कुठल्या खणात ठेवावं, हे कळत नव्हतं. मग कधी ‘फोक’ संगीताच्या खणात, कधी ‘एशिया’ नावाच्या खणात या रेकॉर्डस् जायच्या. बैठकीअंती नव्या खणाचं नाव पक्कं झालं- वर्ल्ड म्युझिक.. विश्वसंगीत. इतिहासात कधीच तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ नव्या संज्ञांना जन्म देत नाहीत. निदान ज्याची विक्री होते अशा गोष्टींना तर नाहीच. तोच नियम इथे सिद्ध झाला. आता नाव तर ठरलं होतं; पण खण बराच रिकामा होता. जागतिकीकरणामुळे तो आस्ते आस्ते भरत आला. आणि आता तर तो भरभरून ओसंडतो आहे. इंटरनेटवरच्या साऊंडक्लाऊड, यू-टय़ूबसारख्या खणांमध्ये विश्वसंगीत मोठय़ा संख्येनं वाजतं आहे.
ही पाहा एम. आय. ए. (M. I. A.) ऊर्फ मथांगी ‘माया’ अरुलप्रगासम. ती भडक रंगाचे कपडे घालून युरोपात जे गाणं गाते आहे त्यामध्ये अमेरिकेचं हिप-हॉप आहे; त्यामधली हिंसाही आहे आणि मधेच तमीळ लोकसंगीताचा ठेकाही आहे. या युवतीचं गाणं विश्वसंगीताच्या लेबलमध्ये रूढार्थानं दिसणार नाही; कारण ते राजकीय आहे; भडक आहे आणि मुख्य म्हणजे तिला अमेरिकन व्हिसा द्यायलाही बंदी केली आहे; इतकी तिची विचारधारा आक्रमक आहे. तिच्या मैफलीमध्ये तमीळ ईलमचा ढाण्या वाघ असतोच. स्वत: चित्रकार असल्याने साऱ्या व्यासपीठावर भडक, गडद रंग अमूर्त शैलीमध्ये तिनं खेळवलेले असतात. तिचे वडील हे श्रीलंकेतल्या तमीळ चळवळीत होतेच. पुढे एलटीटीई आणि श्रीलंका सरकारमध्ये मध्यस्थी करण्यासाठी तिच्या वडिलांनी पुढाकार घेतला होता. ती मात्र तेव्हा चेन्नईत होती. मग पुढे इंग्लंडमध्ये. पण सांगीतिकदृष्टय़ा तिचं गाणं हे विश्वसंगीत आहेच. इलेक्ट्रॉनिक नाद, निम्नस्तराचं संगीत असलेलं ‘रेगे’, ‘ब्ल्यूज’ संगीत, तमीळ लोकसंगीत, गँगस्टा रॅप हे सारे नाद तिच्या गाण्यामध्ये एकवटलेले असतात. ती स्वत:ला ‘अँटी-पॉपस्टार’ असंच म्हणते. २००५ साली ‘पिपल’ या प्रतिष्ठित मासिकानं जेव्हा सुंदर स्त्रियांच्या यादीमध्ये तिचं नाव घातलं तेव्हा तिनं त्याचा निषेध केला!
आणि हा दुसऱ्या टोकाला असलेला शांत, निवांत, धीरगंभीर पिअरे फॅचिनी. त्याचं संगीत सूफी संगीत, मिसिसिपी खोऱ्यातलं ‘डेल्टा ब्ल्यूज’ आणि पश्चिम आफ्रिकेचे ठेके घेऊन सिद्ध झालेलं आहे. त्याचं एक गाणं मला फार आवडतं. ‘माय वायल्डरनेस’ नावाचं ते गाणं ऐकताना वाटतं की, पुन्हा कदाचित आपण मर्यादित वाद्यांच्या कालखंडामध्ये शिरणार आहोत. केवळ एक ड्रमवादक सोबतीला घेऊन पिअरे गाऊ लागतो :
”In the silence, I heard my reply
and no one will ever know why…”
(नीरव अशा शांततेत माझा मला कळला ठाव
कसा कळाला, हे मात्र कुणाला कळायला नाही वाव..)
असं तरल काव्य गाणारा पिअरे जर कधी भारतात आला तर मी ‘वर्षेतील संध्येपरी आले मी आवरीत’सारखं इंदिरा संतांचं काव्य त्याच्याकडून गाऊन घेणार आहे!
‘माया’च्या हिंसक गाण्यांपेक्षा पिअरेचा रस्ता निराळा आहे. तो रस्ता अभिजाततेकडे झुकणारा आहे. पण याएल नईम (Yael Naim) चं गाणं हे मायाच्या बरोबर विरुद्ध ध्रुवावर वसणारं, शांतीचा संदेश पसरवणारं गाणं आहे. ती फ्रान्समध्ये जन्मलेली असली तरी मुळात इस्राइलची. ई. एम. आय. कंपनीनं तिचा पहिला अल्बमदेखील काढला; पण तो काही गाजला नाही. त्या अपयशातून याएल पुष्कळ शिकली असणार. कारण तिनं पॅरिसमधल्या खोलीत स्वत:ला बंद केलं आणि त्याच खोलीत छोटय़ा संगणकावर स्वत:चं संगीत निर्मिण्यात गुंग झाली. तिला तिच्यासारखेच मित्र-मैत्रिणी भेटले. ती खोली तरुण सर्जकांच्या हास्यविनोदानं भरू लागली. आणि मग त्या जुन्या संगणकावर ‘न्यू सोल’ हा अल्बम तयार झाला. ते गाणं जगातले अनेक संगीतप्रकार एकवटणारं होतं. त्या गाण्याला जेविश वारसा होता. ‘सोल’ संगीत त्यात होतं, अभिजात पाश्चात्त्य संगीतही त्यात होतं. गाण्याची भाषाही हिब्रू, इंग्रजी आणि फ्रेंच अशी तिहेरी होती. जॅझ संगीताचा हलका हात तिच्या संगीतामध्ये आढळतो. तिचे शब्द बघता बघता गूढ होतात. तशा शब्दांपाशी मागचं संगीत थांबतं आणि केवळ तिचा सूर कानावर पडत राहतो..
”This is a happy end; Cause’ you don’t understand”
काय आहे हे, कळत नाही यार! ‘हा आहे आनंदी शेवट; कारण तुला समजत नाही.’
आता मघाचीच मजा चालवत राहायची तर मी म्हणेन, याएल मुंबईत आली तर तिला ग्रेसची कविता गायला द्यावी! तिनं तिच्या संगीतानं साऱ्या भिंती तोडून टाकल्या आहेत असं वाटतं. पुढच्या काळात येणाऱ्या संगीताची मला ती नांदी वाटते. मार्क्सची वर्गविहीनता याएलनं तिच्या गाण्यात उतरवली आहे. त्या गाण्याचं वर्गीकरण करता येत नाही. अनेक संगीत-वर्गाना ते गाणं सामावून घेत जातं. अर्थात, स्टीव्ह जॉब्जला वर्गविहीनतेशी काही घेणंदेणं नसावं. पण याएलच्या गाण्याची ताकद त्यानं ओळखली आणि ‘Macbook Air’ च्या जाहिरातीत ती वापरली! ते उपयोजन अफलातून आहे. पाकिटामधून जगातला सर्वात हलका, बारीक लॅपटॉप बाहेर येतो आणि मागे याएलचं गाणं वाजतं..
” I am a new sow
I came to this strange world
hoping I could learn a bit about how to give n’ take
But since I came here
Felt the joy & the fear
Finding myself making every possible mistake”
(‘आहे एक नवीन जीव मी; वेगळ्या दुनियेत आलोय मी. आशा ठेवून शिकेन म्हणतो; घ्यायचं कसं, द्यायचं कसं.. पण आलोय जसा इथे मी, आनंदात नि काळजीत मी, साऱ्या चुकाच चुका होतायत; सांगा माझं व्हायचं कसं?’)
स्टीव्ह जॉब्जच्या जाहिरातीनं तिला जगभर पोचवलं तरी ती मात्र स्वेच्छेनं स्वत:च्या खोलीतच राहिली आहे. एकप्रकारे मायासारखीच घोषणा न देता तिही ‘अँटी-पॉपस्टार’ राहिली आहे.
संगीत निर्माते या आणि अशा संगीताला ‘विश्वसंगीत’ या शीर्षकाखाली घालताहेत. काही समीक्षक त्याला ‘प्रायोगिक संगीत’ म्हणताहेत. पण मला वाटतं, त्यातलं बरंचसं संगीत हे ‘पर्यायी संगीत’ आहे- ‘अल्टरनेटिव्ह म्युझिक.’ व्यवस्थेला नाना पर्याय देणारं हे गाणं कुणाला रुचेल; कुणाला नाही. पण ते आहे, वाढतं आहे आणि जग बदलण्याचा विश्वास या कलाकारांच्या ठायी आहे. निर्मात्यांच्या मर्जीवर ते चाललेलं नाही. मोठय़ा गायकांची मनधरणी या संगीताला करायला लागत नाही. आपला हक्काचा आतला श्वास आपल्या शैलीत बाहेर सोडत नादनिर्मिती करणारं हे नवं संगीत जाणणं म्हणूनच अगत्याचं आहे.
न्यू सोल..
सध्या ऋतू कसा गमतीशीर आहे नाही? क्षणात थंडी, क्षणात ऊन, मध्येच ढग आणि मग नकळत पाऊस. सध्याचा हा ऋतू थेट ‘वर्ल्ड म्युझिक’सारखा-विश्वसंगीतासारखा मला वाटतो आहे.
First published on: 30-11-2014 at 06:33 IST
मराठीतील सर्व लयपश्चिमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New soul world music