‘राणी बाग – १५० वर्षे’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत होत आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचे संपादन शुभदा निखार्गे व हुतोक्षी रुस्तमफ्राम यांनी केले असून मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त द. म. सुकथनकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातील हा संपादित अंश.
राणीच्या बागेवरील या उत्कृष्ट व माहितीपूर्ण पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याचे काम माझ्याकडे यावे हा मी एक दुर्लभ योग समजतो. हे विस्तीर्ण उद्यान मुंबई शहराच्या गजबजलेल्या भागात तब्बल ५३ एकरांवर पसरलेले आहे. मुंबईतील काँक्रीटच्या जंगलातील, सर्वात मोठे, हिरवाईने समृद्ध असे हे सार्वजनिक प्रांगण वनस्पतिवैविध्याचा अमूल्य ठेवा आहे. या उद्यानामध्ये झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. हे उद्यान १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी उद्घाटन केल्यानंतर लोकांसाठी खुले करण्यात आले होते. उद्यानाच्या १५० व्या वर्धापन वर्षांत या वेधक आणि अप्रतिम (मूळ इंग्रजी) पुस्तकाचे प्रकाशन होत आहे हे औचित्यपूर्ण आहे.
राणीच्या बागेवरील या पुस्तकात अनेक मान्यवर आणि अभ्यासू लेखकांनी मुंबईचे वारसास्थान असलेल्या या एकमेव, समृद्ध वनस्पती उद्यानाच्या ऐतिहासिक, रचनात्मक, वनस्पतिशास्त्रीय आणि सामाजिक पलूंवर लेख लिहिले आहेत. हे उद्यान तब्बल २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. या वनस्पती उद्यानाची अभिजात अक्षीय मांडणी, तेथील प्रमुख अक्ष, नागमोडी पदपथ आणि आकर्षक अंतर्गत लहान-मोठय़ा बागा या गोष्टी या उद्यानाची शोभा वृिद्धगत करतात. याशिवाय अभ्यागतांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या अनेक वैशिष्टय़पूर्ण आकर्षणांनी हे उद्यान परिपूर्ण होते. निसर्गदत्त हरित-वारसा आणि मानवनिर्मित वास्तुवारसा यांची उत्तम सरमिसळ असलेल्या या राणीच्या बागेचे वर्णन मुंबई शहराचे भूषण असेच करावे लागेल. राणीची बाग ही मुंबईतील सगळ्यात मोठी, हिरवाईने नटलेली, शहरासाठी (किंवा शहराच्या आरोग्यासाठी) अत्यंत गरजेची अशी प्रदूषणविरहित जागा आहे.
भारतीय संविधानात केल्या गेलेल्या ७४ व्या सुधारणेशी सुसंगत असण्याकरता मुंबई महानगरपालिका कायद्यात १९९४ साली बदल करण्यात आला; यामुळे ‘शहरी वनीकरण, पर्यावरण रक्षण आणि परिस्थिती विज्ञानविषयक जनजागृती’ यांचा महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या अत्यावश्यक जबाबदाऱ्यांत समावेश झाला. खरे तर शतकभरापूर्वी, १८८८ मध्ये मुंबई महानगरपालिका कायदा जेव्हा पहिल्यांदा अधिनियमित झाला, तेव्हा ‘शहरी उद्याने, सार्वजनिक बागा आणि मदाने यांची निर्मिती व देखभाल’ यांचा उल्लेख महानगरपालिकेच्या स्वेच्छाधीन कर्तव्यांमध्ये करण्यात आला होता. मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या कवेत घेणाऱ्या महानगराकरता उद्याने, बागा आणि मोकळी मदाने अतिशय महत्त्वाची आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मुंबई शहरातील मोकळ्या जागा आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर जगात सर्वात कमी म्हणजे दर हजार व्यक्तींकरता ०.०३ एकर, इतके कमी आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणित मानांकनानुसार हे गुणोत्तर दर हजार व्यक्तींकरता किमान चार एकर इतके असले पाहिजे. तब्बल ५३ एकरांवर विस्तारलेली हिरवाईयुक्त राणीची बाग म्हणजे केवळ मुंबईतले सगळ्यात मोठे उद्यानच नाही तर शहरातल्या आम नागरिकांकरता, विशेषत गोरगरिबांकरता ते एक विश्रामाचे ठिकाण आहे. दररोज सरासरी ८,००० नागरिक राणीच्या बागेला भेट देतात, तर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३०,००० पर्यंत पोहोचतो. विश्रांती, विरंगुळा, मनोरंजन व निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद यांसाठी राणीची बाग साऱ्यांना आकर्षून घेते. शिवाय शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे उद्यान वनस्पती संपदेने समृद्ध असल्याने वनस्पतिशास्त्राच्या अभ्यास-संशोधनासाठी राणीच्या बागेला पर्याय नाही.
तपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन ‘ हॉर्टकिल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ने १८४० मध्ये शिवडी येथे स्थापन केलेले ‘बोटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे’ ही नंतर आकाराला आलेल्या राणीच्या बागेतील (पूर्वाश्रमीचे ‘व्हिक्टोरिया गार्डन्स’) वनस्पती उद्यानाची नांदी होती. १८६०च्या दशकाच्या पूर्वार्धात, सोसायटीने आजच्या भायखळा येथील जागेवर शिवडीमधील वनस्पती उद्यानाचे स्थलांतर केले. त्यानंतर १८७३ मध्ये सोसायटी दिवाळखोरीत गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेली. सरकारने तत्कालीन मुंबई महापालिकेकडे या उद्यानाचे हस्तांतरण केले आणि तेव्हापासून महापालिकाच या सार्वजनिक उद्यानाची देखभाल करते आहे. दरम्यान १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत ‘प्राणिसंग्रहालया’चा जन्म झाला. प्राणिसंग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आजपावेतो राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच नांदत आहेत. इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे, जागेच्या वाटणीमुळे आणि आधी उल्लेखलेल्या ऐतिहासिक पुराव्यांमुळेदेखील!
शतकभरापेक्षा अधिक काळ, वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय राणीच्या बागेमध्ये एकत्र नांदले, मात्र जेव्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने २००७ साली राणीच्या बागेतल्या प्राणिसंग्रहालयाचे तथाकथित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भपकेबाज प्राणिसंग्रहालयात रूपांतर करण्याचा घाट घातला तेव्हा धोक्याची घंटा वाजली. कारण महानगरपालिकेने ४३३ कोटी रुपयांच्या अवाढव्य खर्चाचा प्रस्तावित आराखडा सादर केला होता. या आराखडय़ाचा खर्च हा महाराष्ट्रातील, तुलनेने लहान असलेल्या अनेक नगरपालिकांच्या वार्षकि अंदाजपत्रकांइतका मोठा होता. हा प्रस्तावित आराखडा जितका भव्यदिव्य होता, तितकाच तो अविचारी आणि खर्चीकदेखील होता. या योजनेनुसार उद्यानातील सध्याचे प्राण्यांचे िपजरे, तळी, अंतर्गत बागा आणि पायवाटा जमीनदोस्त करून त्यांची नव्याने बांधणी केली जाणार होती. याशिवाय या आराखडय़ात अनाकलनीय आणि उरफाटय़ा अशा सुविधा सुचवल्या गेल्या; उदाहरणार्थ संपूर्ण काचेचे पारदर्शक उपाहारगृह, िहदी महासागराची कृत्रिम प्रतिकृती, उंचावर बांधलेले पादचारी पूल इत्यादी. या हास्यास्पद आराखडय़ातील प्रस्तावित योजनांसाठी मोठय़ा प्रमाणावर कराव्या लागणाऱ्या खोदकाम, बांधकाम आणि सोयी-सुविधा यांच्या उभारणीपायी या उद्यानातील वनस्पती व वृक्ष, शिवाय इतक्या मोठय़ा कालावधीत विस्तारलेली व एकमेकांमध्ये गुंतलेली त्यांची मुळे यांवरही घाला पडला असता. साहजिकच या अघोरी योजनेला पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि सजग नागरिकांनी कडाडून विरोध केला.
या सगळ्या घटनाक्रमाकडे मागे वळून पाहता मला असे वाटते की राणीच्या बागेसंदर्भातल्या या अत्यंत विनाशकारी योजनेचा स्वागतार्ह परिणाम म्हणजे ‘सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन कमिटी’ची स्थापना! ही समिती म्हणजे उत्कट निसर्गप्रेमी आणि वनस्पतिशोस्त्राच्या उत्साही अभ्यासक मत्रिणींचा एक लहानसा गट. त्यांनी सर्वप्रथम या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन शोध घ्यायचे ठरवले आणि लवकरच त्यांनी हेरले की त्यांच्या आवडत्या उद्यानाच्या संरक्षणाकरता संघर्षांला सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यानंतर एक समिती स्थापून या साऱ्यांनी राणीच्या बागेतील वनस्पती उद्यानाचा वारसा वाचवण्याकरता लढा उभारला. प्रतिकूल परिस्थितीत अतिशय निष्ठेने आणि धाडसाने पुढे नेलेल्या या प्रदीर्घ लढय़ाचे अत्यंत तपशीलवार, प्रत्येक घटनेची नोंद ठेवत लिहिलेले प्रकरण प्रस्तुत पुस्तकात नसते तर या पुस्तकाचा आत्माच हिरावून घेतल्यासारखे झाले असते. जवळजवळ पाच वर्षांनंतर मुंबई वारसा जतन समिती आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण या दोन संस्थांनी राणीच्या बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी सादर केलेला पुनर्वकिासाचा तथाकथित आराखडा संपूर्णपणे नामंजूर केला तेव्हा या प्रेरणादायी संघर्षगाथेचे रूपांतर यशोगाथेमध्ये झाले. महानगरपालिकेच्या पुनर्वकिासाच्या आराखडय़ाला या दोन्ही संस्थांची परवानगी अत्यावश्यक होती. माझ्या मते या यशाचे सारे श्रेय पूर्णाशाने ‘सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन कमिटी’कडे जाते. बाह्य आíथक मदतीशिवाय, स्वखर्चातून यशस्वीपणे चालवलेल्या अथक संघर्षांसाठी या समितीच्या बहादूर स्त्रियांचे त्रिवार अभिनंदन!
जरी राणीच्या बागेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय बांधण्याचा प्रस्ताव व त्याचा विवेकशून्य आराखडा नामंजूर झालेला असला, प्रस्तावित पुनर्बाधणीची योजना नाकारली गेलेली असली, शिवाय बागेतील विद्यमान वाटा ‘जैसे-थे’ राहाव्यात आणि सध्या असलेल्या प्राण्यांच्या िपजऱ्यांच्या संख्येत वाढ करू नये अशी अटदेखील घातलेली असली तरीही यापूर्वीचे अनुभव पाहता आपणास गाफील राहता येणार नाही. या प्रकरणाशी संबंधित अनेक संधिसाधू व स्वार्थी मंडळी अजूनही विविध क्लृप्त्या आणि पळवाटा वापरत हे प्रकरण त्यांच्या बाजूने वळवू शकतात. अतिक्रमण करून किंवा वनस्पती उद्यानाचे विभाजन करून सफाईने उद्यानाचा काही भाग प्राणिसंग्रहालयासाठी किंवा िभती, इमारती वा तत्सम बांधकामासाठी वापरला जाऊ शकतो, ज्यायोगे या वनस्पती उद्यानाचा समृद्ध वारसा धोक्यात येऊ शकतो. यामुळेच मुंबई वारसा जतन समिती, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, ‘सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन कमिटी’ आणि इतर संबंधितांनी सदैव दक्ष राहणे आवश्यक आहे. हे मात्र मान्य करायला हवे की केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राण्यांच्या निवासांमध्ये किंवा िपजऱ्यामध्ये आवश्यक ते बदल केले गेले पाहिजेत, मात्र हे करताना वनस्पतींची तोड, पदपथांच्या रचनेत बदल किंवा वनस्पती उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण होता कामा नये. दीर्घकालीन आणि प्रभावी उपायांची दूरदृष्टी दाखवायची असेल तर शहराच्या सीमेवर योग्य ठिकाणी, मोठय़ा क्षेत्रावर एक परिपूर्ण प्राणिसंग्रहालय उभारण्याची मागणी मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाने लावून धरली पाहिजे.
‘‘वनस्पती उद्याने नागरिकांना निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी मदत करतात, अधिक शाश्वत जीवनपद्धती अंगीकारण्यासाठी प्रेरणा देतात, विद्यार्थाना निसर्गशिक्षणासाठी आवश्यक ते वातावरण उपलब्ध करून देतात, तर वनस्पती अभ्यासक आणि निसर्गप्रेमी नागरिकांसाठी जितीजागती संग्रहालये आणि निसर्ग निरीक्षणाचे शिकवणी-वर्ग बनतात,’’ असे अत्यंत अचूक निरीक्षण ‘सिंगापूर बोटॅनिक गार्डन्स’चे संचालक डॉ. नायगेल टेलर नोंदवतात. आपल्या शहराच्या नियोजनकर्त्यांनी या निरीक्षणाचे मर्म लक्षात घेऊन हा वारसा जतन करण्यासाठी निष्ठेने प्रयत्न करायला हवेत.
राणी बागेचा इतिहास आणि वर्तमान
‘राणी बाग - १५० वर्षे’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत होत आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचे संपादन शुभदा निखार्गे व हुतोक्षी रुस्तमफ्राम यांनी केले असून मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त द. म. सुकथनकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातील हा संपादित अंश.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 24-11-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New upcomeing books