‘विद्वत्ता विद्वानांपुरतीच मर्यादित राहिली तर तिचा उपयोग काय?’ हे सूत्र मानून ‘सेपिअन्स’, ‘होमो डेअस’ आदी वाचकप्रिय पुस्तकं लिहिणारे मानवी जगण्याचे भाष्यकार युवाल नोआ हरारी ‘नेक्सस’ या नव्या पुस्तकाच्या निमित्तानं भारतात आले. ‘नेक्सस’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराचे आणि फैलावाचे धोके सांगणारं पुस्तक. ‘‘एआय’मुळे मानवी संवादाचा अंतच जवळ येऊ शकतो’ असं सांगणाऱ्या हरारी यांची ही खास ‘लोकसत्ता’साठी झालेली मुलाखत; इतिहासापासून भविष्यापर्यंत, अनेक विषयांना नेमकं चिमटीत पकडणारी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदाच्या जूनच्या अखेरीस एका नंबरवरनं सारखा फोन येत होता. माहितीतला नंबर नसल्यामुळे मी काही तो घेत नव्हतो. त्यात तो नंबर परदेशी. शेवटी त्यावरनं एक मेसेज आला- युवाल नोआ हरारी यांच्या मुंबईभेटीसंदर्भात. तो वाचला आणि मग मी त्या नंबरला उलटा फोन केला. पेंग्विन प्रकाशन संस्थेतनं तो फोन होता. ‘‘डिसेंबरात हरारी मुंबईला येतायत… भेटायला, मुलाखत घ्यायला आवडेल का?’’ हा प्रश्न. उत्तरात होकाराशिवाय अन्य काही असण्याची शक्यताच नव्हती. फक्त एक सांगितलं… भेट एकेकटी असेल तर आवडेल. ‘‘ऑफ कोर्स.’’ या उत्तरानं निश्चिंत झालो. मधला काळ धामधुमीचा. त्यात तो विषय अगदीच मागे पडला. निवडणुका वगैरे संपल्या. तिघांचा का असेना; पण सरकारचा शपथविधी झाला आणि ‘पेंग्विन’मधनं फोन… ‘‘या रविवारी सकाळी १० वाजता…’’ वर्तमानातल्या दलदलीतनं एकदम ‘सेपियन’पर्यंत मागे जात जात ‘नेक्सस’पर्यंत येऊन थांबलो.
इंद्रधनुष्य कसं क्षितिजाच्या दोन टोकांना जोडतं, तसं हरारी अनेक विषयांचे, तपशिलांचे सांधे सहज जोडतात. आणि ते जोडताना असे काही सिद्धांत मांडतात की वाचणारा एकदम चमकून जातो. उदाहरणार्थ : ‘‘अज्ञान, मूर्खपणा हे काही तितके वाईट नाहीत. फक्त अज्ञान आणि सत्ताधिकार एकत्र आले तर मात्र परिस्थिती गंभीर बनते.’’, ‘‘मेल्यानंतर स्वर्गात टोपलीभर केळी तुला देईन या आश्वासनावर तुम्ही वर्तमानात समोरच्या माकडाच्या हातातील केळं काढून घेऊ शकत नाही.’’, ‘‘माणसाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे तो स्वरचित कथांवर विश्वास ठेवतो… अन्य प्राणी प्रत्यक्षावर विश्वास ठेवतात.’’, ‘‘नैतिकता म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवणे नव्हे.’’, ‘‘मला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अजिबात काळजी नाही. मला काळजी आहे मानवी मूर्खपणाची.’’, ‘‘धर्म हा एक व्यवहार असतो, तर अध्यात्म म्हणजे प्रवास.’’, ‘‘धर्मासमोर खरं आव्हान कोणतं असेल तर ते आहे अध्यात्माचं.’’… अशी सुवचनं कितीही सांगता येतील. गेली काही वर्षं जगभरातल्या वाचकांवर हरारीचं गारूड आहे. जो वाचकवर्ग ‘व्हॉट्सप’च्या फारसा पुढे जात नाही, त्यानंही ‘सेपियन्स’ वाचलेलं असतं. हरारी त्यामुळे एखाद्या ‘कल्ट फिगर’सारखे बनलेत. हजारोंनी त्यांना ऐकायला, पाहायला गर्दी भरते जगभर. हे ‘हरारी-पंथीय’ सर्व भाषांत आढळतात. तेव्हा अशा लेखकाशी संवाद साधायला मिळणार… ही हरखून जावी अशीच बाब.
हेही वाचा >>> सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
हरारी मुंबईत येत होते ते ‘नेक्सस’च्या निमित्तानं. ते पुस्तक प्रकाशित होऊन तसे तीन-चार महिने झालेत. पण त्याच्या प्रसिद्धीसाठी हा दौरा होता. खरं तर पुस्तकाला वेगळ्या प्रसिद्धीची काहीही गरज नव्हती. नाहीही. सिर्फ नामही काफी है… तसं हरारीचं नवं पुस्तक आलंय इतकं एक विधान पुरे. त्याच्या प्रती लाखांनी नव्हे तर कोटींनी खपतात. ‘पेंग्विन’नं मला म्हणून पुस्तकाचा एक कच्चा खर्डा कधीच पाठवलेला होता. आता प्रतीक्षा होती ती प्रत्यक्ष मुलाखतीची. त्यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमात इतके बदल झाले होते की ही मुलाखत खरोखरच होतीये की नाही… अशी भीती होती. पण ती झाली… ती अशी…
प्रश्न : तुम्ही सातत्यानं ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या (एआय) नियमनाची मागणी करताय. ‘नेक्सस’ त्याची गरज दाखवून देतं. तुमचं पुस्तक प्रकाशित झालं आणि अमेरिकेत ट्रम्प निवडून आलेत. ट्रम्प आणि एलॉन मस्क ही युती ‘एआय’चं नियमन कसं काय करू देणार?
हरारी : खरं सांगायचं तर निवडणुकीच्या आधीही ‘एआय’ नियमनाचे कायदे होतील याची शक्यता तशी नव्हतीच. पण निवडणुकीनंतर तर ते अशक्यच वाटतंय, या नव्या प्रशासनाचा नियमनाला… आणि त्यातही ‘एआय’च्या नियमनाला विरोध आहे. अमेरिका तर ‘एआय’च्या क्षेत्रातली जागतिक महासत्ता. तिला ‘एआय’ नियमनाचा जागतिक करार, सहकार्य वगैरे नको असेल तर…
प्रश्न : म्हणजे जगातल्या अनेकांनी आता अमेरिकेशी जुळवून घ्यायचं? मग आता पुढे काय? तुमचं पुस्तक ‘डिजिटल पडदा’ वगैरेची चर्चा करतं. हा पडदा प्रत्यक्षात येत असेल तर मग भारतासारख्या देशानं करायचं काय?
हरारी : ‘एआय’च्या क्षेत्रात महासत्तापदासाठी सध्या दोनच दावेदार आहेत हे अमान्य करता येणार नाही. एक अर्थातच अमेरिका आणि दुसरा चीन. जगातले अन्य देश फार म्हणजे फार मागे आहेत. त्यांच्याकडे अमेरिका, चीनशी स्पर्धा करण्याइतकी साधनसंपत्ती नाही. अगदी भारताचं उदाहरण घ्या. सर्वाधिक लोकसंख्येचा आणि आर्थिक क्षेत्रात स्वत:चा प्रभाव निर्माण करू पाहणारा हा देश. पण भारत नाही निर्माण करू शकला आपली स्वत:ची ‘सिलिकॉन व्हॅली’. मग अन्य लहान देशांचा प्रश्नच येत नाही. मग ते श्रीलंका, बांगलादेश असोत वा पोर्तुगाल, ग्रीस असोत. हे देश डिजिटल स्पर्धेत तितके सक्षम नाहीत. एखाद्या देशाला ‘एआय’ महासत्ता होण्यापासून रोखायचं असेल तर या देशांना एकत्र येण्याखेरीज पर्याय नाही. म्हणजे भारतानं समजा युरोपशी हातमिळवणी केली, त्यांना ब्राझीलसारखा देश येऊन मिळाला तर त्यांना एकत्र येऊन काही करता येईल. अन्यथा या बड्या देशांचं (डिजिटल मांडलिकत्व) पत्करण्याखेरीज पर्याय नाही. जगाचा इतिहास हेच सांगतो. कोणत्याही महासत्तेचं तत्त्व ‘डिव्हाइड अँड रूल’ हेच असतं. ‘एआय’बाबतही तेच होईल. औद्याोगिक क्रांतीच्या काळात आपण हेच अनुभवलं. त्या वेळी लहान देश बड्यांना रोखू शकले नाहीत. मग नंतर या बड्यांनी शतकभर राज्य केलं जगावर. तेव्हा ‘एआय’च्या मुद्द्यावरही बड्या देशांना रोखण्यासाठी सहकार्य हा एकमेव मार्ग आहे.
प्रश्न : पण समजा ते झालं नाही… तर पूर्वीप्रमाणे जग दोघांत विभागलं जाणार का? तेव्हा सोविएत रशिया आणि अमेरिका होती, आता अमेरिका आणि चीन…
हेही वाचा >>> बुकमार्क : हरारीच्या पुस्तकात नवं काय?
हरारी : ती एक शक्यता. जग डिजिटल डिव्हाइड अनुभवेल आणि एका बाजूला असेल अमेरिका आणि दुसरीकडे चीन. या दोन ध्रुवांत जग विभागलं जाईल आणि ‘एआय’ हा सगळ्याचा आधार असेल. ‘एआय’ आपलं जगणं नियंत्रित करेल. वैयक्तिक आर्थिक निर्णय असोत किंवा देशाच्या संरक्षणाचा मुद्दा असो. सर्व काही ‘एआय’ करेल. आताचं तंत्रज्ञान कालबाह्य ठरेल. उद्या सर्व लढाऊ जहाजांवरची क्षेपणास्त्रं ‘एआय’ नियंत्रित करेल. विमानं ‘एआय’च्या आधारे चालतील. मोटारी आताच तशा धावू लागलेल्या आहेत. उद्या सगळीच क्षेत्रं ‘एआय’च्या हाती जातील. या तंत्रज्ञानाच्या वाढीचा वेग इतका प्रचंड आहे की जगाला लवकर भान आलं नाही आणि त्यांच्यात याबाबत जागतिक स्तरावर काही करार-मदार झाले नाहीत तर चीन आणि अमेरिका यांच्या भोवतीच सगळ्यांना फिरावं लागेल.
प्रश्न : हा झाला एक भाग. पण दुसरं असं की ‘एआय’ची दंतकथा निर्माण करण्याची, फेक न्यूज पसरवण्याची क्षमता प्रचंड आहे. ‘ब्रेग्झिट’ हे त्याचं एक उदाहरण. ‘एआय’च्या या क्षमतेचा फायदा अर्थातच सत्ताधाऱ्यांना होतो. तेव्हा ‘एआय’ नियंत्रण करावं असं यांना कधीतरी वाटेल का?
हरारी : तेच तर खरं गंभीर आव्हान आहे. लोकशाहीला सर्वात मोठा धोका कोणता असेल तर तो आहे या ‘एआय’चा. संवाद हा लोकशाहीचा कणा. माणसांचा माणसांशी मुक्त संवाद त्यासाठी महत्त्चाचा. लोकशाहीत मोठमोठा जनसमुदाय एकमेकांशी बोलत असतो. संवाद साधत असतो. त्यात देशाबाबत, आपल्या समाजाबाबत निर्णय घेतले जातात. हा मानवी संवाद काही एक भाषेतून होत असतो. पूर्वी या मानवी भाषेत बोलणारं अन्य कोणी नव्हतं. त्या काळी माणसाचा संवाद फक्त माणसाशीच व्हायचा. आता ‘एआय’ या भाषेत बोलू शकतो. इतकंच काय, माणसापेक्षा अधिक चमकदार, विश्वासार्ह दावे-प्रतिदावे करू शकतो. या संवादाचं नियंत्रण आताच काही प्रमाणात ‘एआय’कडे जाऊ लागलेलं आहे. इतके दिवस एखाद्या चौकात, सभागृहात माणसं संवादासाठी जमायची. आता बहुसंख्येनं ती समाजमाध्यमातनं एकमेकांशी संवाद साधतात. यातला बराच संवाद हा ‘एआय’कडून होत असतो. म्हणजे माणसांना माहीतच नसतं की संवाद साधतायत ती जिवंत व्यक्ती आहे की बॉट आहे ते. आता पुढचा टप्पा आलाय यात. आता मूळ मजकूरही ‘एआय’ तयार करणार आणि त्याच्यावरचा संवादही तोच घडवून आणणार. याला आळा घालण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जायला हवीत. कारण तसं केलं नाही तर लोकशाहीचा विनाश अटळ असेल. कारण त्या वेळी मानवी संवाद संपुष्टात आलेला असेल. संवादात मोठा वाटा असेल तो यंत्रमानवांचा. कल्पना करा की, दहा-पंधरा जण कशावर तरी काही बोलतायत. पण उद्या त्यात काही माणसांच्या ऐवजी माणसांसारखेच दिसणारे हाडामासांचे रोबो सहभागी झाले आणि मोठमोठ्यांदा, अगदी पटवून देणारे युक्तिवाद करू लागले तर तुम्ही काय कराल? म्हणजे मानवी संवादाचा तो अंत असेल. आताही समाजमाध्यमांतून मानवी संवाद गायब होऊ लागलेला आहेच… म्हणजे पाहा, तुम्ही ट्विटरवर जाता आणि दिसतं एखाद्या मजकुराला खूप लाइक्स मिळालेत. इतक्या जणांना हे आवडलंय तर आपणही वाचायला हवं असं तुम्हाला वाटतं. पण तुम्हाला हे माहीत नसतं की यातले किती बॉट्स आहेत आणि किती ‘खरी’ माणसं आहेत. कधी कधी तर सर्व ते ट्राफिकच बॉट्सने घडवून आणलेलं असतं. मग तुम्ही त्यात सहभागी होता. फॉरवर्ड करता आणि नकळतपणे त्याचा भाग बनून जाता. म्हणून मग तुम्हाला पाहून आणखी काही त्यात सहभागी होतात. म्हणजे प्रत्यक्षात हे सारं केलेलं असतं बॉट्सनी. म्हणजेच लोकांनी काय वाचावं, कशावर चर्चा करावी हे सारं आताच बॉट्स ठरवू लागलेत. हे सारं सध्या समाजमाध्यमात होतंय. उद्या प्रत्यक्ष जीवनातही तसं होईल. मानवी संवाद संपुष्टात येईल आणि मग लोकशाहीवरचंच ते संकट असेल. ते टाळायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ‘एआय’ नियमनाचा विचार करावा लागेल. एक साधा नियम जरी जागतिक पातळीवर सर्वांनी केला तरी फरक पडेल. तो नियम म्हणजे-‘‘‘एआय’नी माणूस असल्याचं नाटक करू नये.’’ ट्विटरवर एखाद्या बॉट्नं काही रीट्वीट केलं असेल तर ते लोकांना कळायला हवं… हा बॉट आहे… माणूस नाही.
प्रश्न : म्हणजे एखाद्या डिस्क्लेमरसारखं काही…
हरारी : बरोबर. याचा अर्थ ‘एआय’ला आपल्या आयुष्यातनं काढूनच टाकायचं असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे, ‘एआय’ कुठे आहे ते आम्हाला सांगा.
प्रश्न : म्हणजे मग आपण तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर येतो. इंटेलिजन्स विरुद्ध कॉन्शन्स. बुद्धिमत्ता विरुद्ध संवेदना. मग प्रश्न असा की अशा संवेदना मिळण्यापासून ‘एआय’ किती लांब आहे…
हरारी : यावर बोलण्याआधी आपण इंटेलिजन्स आणि कॉन्शन्स यातला फरक समजून सांगू या. अनेकांचा याबाबत गोंधळ असतो. ‘एआय’ खूप बुद्धिमान आहे म्हणून अनेकांना वाटतं त्याला संवेदनाही येतील. पण तसं नाही. कूट समस्यांची उकल करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. उदाहरणार्थ, ‘एआय’ बुद्धिबळात जगज्जेता होईल किंवा मोटारही चालवू लागेल. पण संवेदना म्हणजे ‘अॅबिलिटी टू फील थिंग्ज’. ‘एआय’ला बुद्धिबळात ना विजयाचा आनंद असेल ना पराजयाचं दु:ख. आनंद, प्रेम, वेदना वगैरे काही त्याला नसेल. माणूस आणि अन्य प्राण्यांत इंटेलिजन्स आणि कॉन्शन्स या गोष्टी हातात हात घालून जातात. आपल्याला भावना असतात म्हणून आपण काही कामगिरी करतो. त्यातल्या यशापयशानं हुरळतो वा खट्टू होतो. ‘एआय’मध्ये इंटेलिजन्स आणि कॉन्शन्स यांना एकत्र आणणं अजून तरी शक्य झालेलं नाही. भविष्यात ‘एआय’मध्ये कॉन्शन्सनेस विकसित करता येईल का? आपल्याला माहीत नाही. अजूनही आपल्याला भावना येतात कुठून हे माहीत नाही. मेंदूतले हजारो न्युरॉन्स एकाच वेळी संदेश पाठवतात आणि आपण दु:खी होतो, आनंदी होतो, प्रेमभावना जागृत होते. हे कसं होतं हे आपल्याला अजूनही उमगलेलं नाही. म्हणून हा कॉन्शन्सनेस ‘एआय’मध्ये विकसित करता येईल अथवा नाही यावर ठामपणे काही आताच सांगता येणार नाही. पण एक गोष्ट आपण नक्की, अगदी ठामपणे सांगू शकतो. ती म्हणजे ‘एआय’ भावनांची नक्कल, भावना असल्याचा अभिनय नक्कीच करू शकेल. आताच ‘एआय’च्या प्रेमात व्यक्ती पडल्याच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. ‘एआय’शी नातेसंबंध निर्माण होऊ लागले आहेत. ते होतायत कारण ते तसे व्हावेत यात संबंधित कंपन्यांचे हितसंबंध आहेत. हळूहळू ‘एआय’चा हा अभिनय इतका सुधारत जाईल की त्याला खरोखरच भावना आहेत असं वाटू लागेल. म्हणजे मी ‘एआय’ला विचारलं, ‘तुला प्रेम माहीत आहे का?’ तो म्हणेल ‘हो.’ पण माझा त्यावर विश्वास बसणार नाही. मग मी तसा अविश्वास दाखवला की एआय जगातलं उत्तम प्रेमकाव्य म्हणून दाखवेल. प्रेमिक कितीही बुद्धिमान असला तरी तो प्रियतमासाठी जगातलं सगळंच प्रेमकाव्य काही मुखोद्गत करू शकणार नाही. पण एआय ते करू शकेल. प्रेम म्हणजे काय, प्रेमात पडणं म्हणजे काय हे तो इतक्या उत्तमपणे समजावून सांगेल की आपणही चकित होऊ. एव्हाना त्याचं भाषेवर प्रभुत्व निर्माण झालेलं आहेच. त्यामुळे भावनेचं नाटक तो उत्तम करू शकेल. प्रेम ‘जाणवलं’ नाही तरी प्रेमाचा अभिनय ‘एआय’ उत्कृष्टपणे वठवेल. म्हणजे कॉन्शन्सनेसचा ‘एआय’चा अभिनय उत्तरोत्तर सुधारतच जाईल आणि तेव्हा ती गंभीर समस्या बनलेली असेल. आपल्याला खरं काय, खोटं काय हे कळणारही नाही अशी ती अवस्था असेल. यातून आपण पुढच्या खऱ्या गंभीर समस्येपर्यंत पोहोचू.
ती म्हणजे इंटेलिजन्स आणि कॉन्शन्सनेस असं दोन्हीही असणाऱ्या ‘एआय’ला मानवी दर्जा द्यायचा का नाही हा प्रश्न न्यायव्यवस्था, सरकार यांच्यासमोर उभा राहील. बुद्धिमत्ता आणि चेतना असेल तर ‘एआय’ची गणना सजीव अशी न करणं अवघड होत जाईल. म्हणजे त्यांना मानवी हक्क द्यावे लागतील. मानवी हक्क हा आताच जगात वादाचा विषय आहे. काही देश मानवी हक्क मानतात; काही नाही मानत. त्यात आता ‘एआय’चे मानवी हक्क हा नवा आयाम मिळेल. कल्पना करून बघा… पुढच्या वीस, पंचवीस किंवा पन्नास वर्षांत काही देशांनी जर ‘एआय’ला मानवी दर्जा दिला तर इतरांपुढे काय समस्या निर्माण होईल. हे नवे द्वंद्व असेल त्यावेळी.
प्रश्न : म्हणजे ‘एआय’ला मतदानाचा हक्क मिळेल?
हरारी : का नाही? एकदा का ‘एआय’ला चेतना आणि बुद्धी दोन्ही आहे यावर एकमत झालं की त्यांना मताचा अधिकार नाकारणार कसा? आणि एकदा का एक ‘एआय’ आकारास आला की त्याच्यापासून कोट्यवधी ‘एआय’ सहज तयार करता येतात. म्हणजे त्यांची संख्याही वाढणार. म्हणजे काही देशांत माणसं कमी आणि एआय जास्त अशी अवस्था येऊ शकते. (हरारी हसतात. इथे त्यांना भारतवर्षात किमान तीन मुले जन्माला घालण्याचा सल्ला याच दूरदृष्टीनं देण्यात आला आहे, हे सांगण्याचा मोह आवरला.)
प्रश्न : तुमच्या सगळ्या लिखाणात ‘गोष्ट ’ या प्रकाराचं महत्त्व अतोनात आहे. गोष्ट इतकी महत्त्वाची असते हे तुम्ही सांगेपर्यंत लक्षातही आलं नव्हतं… आणि या गोष्टी पसरवण्यात ‘एआय’चा वाटा तर मोठा असेल… लवकरच ‘एआय’ स्वत:ची कथानकं… नॅरेटिव्ह्ज हा आजचा लोकप्रिय शब्द… तयार करू शकेल…
हरारी : अॅब्सोल्यूटली. माणसं कथा, कथानकं तयार करू शकली, कारण त्यांना भाषा येऊ लागली. आता ‘एआय’लाही हे कौशल्य प्राप्त झालेलं आहे. मानवी संस्कृतीचा विकास हा गोष्टींमुळेच झालेला आहे. माणूस त्याने स्वत:च निर्माण केलेल्या गोष्टींवरच कमालीचा विश्वास ठेवतो. विसंबतो. देव-देवस्की, भुतंखेतं या सगळ्या गोष्टीच की! आता मी जेव्हा माझ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना काही लिहायला सांगतो, तेव्हा बरेचसे विद्यार्थी ‘एआय’चा आधार घेतात. त्यात सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा अद्याप समावेश नाही. पण ती काही काळाचीच बाब. आगामी काळात उत्कृष्ट गोष्टी, मग त्या कादंबऱ्या असोत, चित्रपट कथा असोत… ‘एआय’ सहज लिहू शकेल. इतकंच काय धार्मिक कहाण्याही ‘एआय’ सहज लिहू शकेल. कारण त्याला धर्मग्रंथ मुखोद्गत असतील. उदाहरणार्थ, ज्युडाइझममध्ये किंवा इस्लामच्या धर्मग्रंथांत कुठे काय लिहून ठेवलंय हे कोणत्याही जिवंत माणसापेक्षा ‘एआय’ला सहज लक्षात राहील. सर्वसाधारणपणे धर्मगुरू वा धर्मभाष्यकार स्वत: काही वाचतात आणि त्याचा अर्थ लावतात. पण त्यांनाही सर्व पाठ असतं असं नाही. ‘एआय’चं तसं असणार नाही. कोणतीही एक व्यक्ती समग्र जुडाईझमचे ग्रंथ वाचून लक्षात ठेवू शकणार नाही. पण ‘एआय’ला ही समस्याच नाही. ‘एआय’ स्वत:च स्वत: वाचून स्वत:चा अर्थ काढू शकेल. त्यावर अविश्वास कसा ठेवणार? तेव्हा सर्व गोष्टींचं नियंत्रण एआयकडे येणार हे निश्चित.
मी नेहमी म्हणतो, मानवाने रचलेली सर्वात मोठी गोष्ट, कथा, कहाणी म्हणजे पैसा. पैसा ही फक्त एक कहाणी आहे. ट्रम्प निवडून आल्या आल्या बिटकॉइनचं काय झालं ते फक्त एकदा पाहा. लाखोपटींनी बिटकॉइनचं मूल्य ट्रम्प विजयामुळे वाढलं. तसं पाहायला गेलं तर बिटकॉइन असं काही अस्तित्वात नाही आणि त्याला काही आकार-उकारही नाही. पण लोकांनी बिटकॉइन आणि ट्रम्प संबंधांचा अर्थ लावला आणि बिटकॉइनची किंमत वाढू लागली. एकदा का ‘एआय’च्या हातात सगळी सूत्रं गेली की अशी अनेक बिटकॉइन-सदृश कूटचलनं (क्रिप्टोकरन्सी) तो सहज तयार करू शकेल. या नव्या कूटचलनांचा अर्थ फक्त ‘एआय’लाच लागेल आणि ‘एआय’ त्यांची परस्पर खरेदी विक्री सुरू करेल. तसं झालं तर काहीही होऊ शकेल.
म्हणजे बघ… हत्ती. तो आपल्यापेक्षा कित्येक पट सामर्थ्यवान असतो हे काही नव्यानं सांगायला नको. तरीही त्याला आपण नियंत्रणात ठेवू शकतो. कसं? कारण आपल्याकडे पैसा आहे आणि हत्तीकडे तो नाही. या पैशापासनं आपण नवनवी साधनं तयार करतो आणि हत्तीला बंधनात ठेवतो. इतकंच काय हत्तीच्या डोळ्यादेखत आपण त्याची मालकीही बदलू शकतो. हत्ती पाहात असतो… कोणीतरी कोणाला तरी काहीतरी दिलंय आणि आपला मालक बदलला गेलाय. हे आज हत्तीच्या बाबत जे होतंय ते उद्या मानवाच्या बाबत ‘एआय’ कूटचलनाच्या साहाय्यानं करू शकेल. आपल्याला कळणारही नाही…
प्रश्न : आता मला वेगळाच मुद्दा मांडायचाय. या सगळ्यापेक्षा वेगळा. तो असा की, मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर अशी जगबुडीची भाकितं केली गेली आहेत. ती सगळी खोटी ठरली. मग आताच्या तुमच्या भाकितावर का विश्वास ठेवायचा…? मानवामध्ये टिकून राहण्याची काही तरी एक क्षमता आहे, मग एआयचा सामना करण्यासाठीही अशी एखादी गोष्ट असेलच ना…
हरारी : एक लक्षात घ्या, मी जे काही सांगतोय ते सगळं तसंच होणार आहे, असा माझा दावा नाही. हे होऊ शकतं… भविष्यात हा धोका आहे इतकंच काय ते मी सांगतोय. हे भविष्य अवलंबून असेल आपण वर्तमानात काय निर्णय घेतोय यावर. मी काही प्रेषित नाही भविष्य सांगायला. हा फक्त इशारा आहे. जगबुडी, प्रलयकारी (अॅपोकॅलिप्टिक) कथांवर माझा विश्वास नाही. माझा प्रयत्न आहे तो आगामी काळातला धोका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. जितका तो जास्त जणांपर्यंत पोहोचेल तितकी त्यावर मार्ग निघण्याची शक्यता अधिक. जास्त माहिती जास्त चांगले निर्णय घ्यायला मदत करेल. आरोग्य, विज्ञान, संशोधन अशा अनेक क्षेत्रांत ‘एआय’चा सकारात्मक उपयोग आहेच की! तो तसा व्हायलाच हवा. प्रश्न आहे या अवांतर धोक्यांचा. तेही लक्षात घ्यायला हवेत.
प्रश्न : आता तुमच्यावर होणाऱ्या टीकेविषयी. विशेषत: ‘नेक्सस’च्या नंतर. तुम्ही ‘सेपियन्स’ लिहिल्यानंतर आणि आता ‘नेक्सस’ प्रकाशित झाल्यानंतर तुमचे आणि विद्वतजगाचे संबंध बदलले का? (थोडक्यात, तुम्ही लोकानुनयी झालात असं विद्वानांना वाटतं का?)
हरारी : (हसून…प्रश्नाचा रोख कळला) …पण सांगतो, मी अजूनही विद्यापीठातला एक प्राध्यापक आहे. माझी तीच भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची. पण प्राध्यापक, इतिहास संशोधक म्हणून जे जे काही हाताला लागतं ते सोपं करून सर्वसामान्यांना सांगणं हेही माझं प्राथमिक कर्तव्य नाही का…? पुरातत्त्व, उत्खनन हे काही माझं काम नाही. ते मला जमतही नाही. पण ज्या कोणी ते काम करून संशोधनात्मक असं साक्षीपुराव्याच्या आधारे काही लिहून ठेवलेलं आहे ते वाचून, त्याचा अर्थ लावून सामान्यांना सांगायला हवा. मी स्वत:ला अकेडेमियापासून वेगळं मानतच नाही. पण माझं काम आहे अभ्यास करायचा, आपण मिळवलेलं ज्ञान सिंथेसाईझ करायचं आणि लोकांपर्यंत न्यायचं… ते लोकप्रिय होतं, कारण सर्वसामान्य वाचक पुरातत्त्व खात्याचे अहवाल वगैरे काही वाचायला जाणार नाही. त्याला त्याचा अर्थ लावून द्यायला हवा. अकादमिक जग आणि जनता यांच्यातला मी एक फक्त दुवा! इतिहास फक्त इतिहासाच्या प्राध्यापकांनाच, जीवशास्त्र फक्त जैववैज्ञानिकांनाच ठाऊक असून कसं चालेल? विद्वत्ता विद्वानांपुरतीच मर्यादित राहिली तर तिचा उपयोग काय? ज्ञान ही काय बँक ठेव आहे का कुलूपबंद ठेवायला? बरेचसे विद्वान जडजंबाळ भाषेत लिहितात. सामान्यांना ते कळत नाही. मी ‘पॉप्युलर’ विद्वानांत गणतो स्वत:ला. यातही एक प्रकार असा आहे की ते (‘पॉप्युलर’ विद्वान) वैज्ञानिकतेला किंमतच देत नाहीत. मनाला येईल ते लिहितात. मी तसं करत नाही. मी प्रत्येक शब्द शास्त्र-काट्याच्या कसोटीवर तोलून घेतो. विद्वत्ता आणि जनप्रियता यातला मध्य काढता यायला हवा.
प्रश्न : विद्वान दोन प्रकारचे असतात. एक प्रयोगशाळेत, विद्यापीठांतले घनगंभीर. आणि दुसरे सर्वसामान्यांना समजेल असं सांगणारे… भारतात सोपं लिहिणारा उथळ मानला जातो. तुमची ही मांडणी आईन्स्टाईनला जवळ जाणारी आहे…
हरारी : आईन्स्टाईन हे योग्य उदाहरण याबाबत बहुधा नसावं. कारण भौतिकशास्त्र फारच अवघड विषय आहे. त्यात आईन्स्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धांत किती जणांना कळेल? भौतिकशास्त्र दैनंदिन जीवनात लोकांना प्रत्ययास येत नाही. माझ्या इतिहासाचं तसं नाही. तो तथ्य, पुराव्याच्या आधारे समजावून सहज सांगता येतो.
प्रश्न : मी आईन्स्टाईनचा उल्लेख विज्ञान लोकप्रिय करण्याच्या अनुषंगाने केला… त्याच्या आधी आणि नंतरही अनेक वैज्ञानिक होऊन गेले. आईन्स्टाईनची लोकप्रियता कोणालाच मिळाली नाही.
हरारी : मग बरोबर… पण त्या तुलनेत माझा इतिहास हा विषय सोपा…
प्रश्न : सोपा कसा? भौतिकशास्त्र ठाम उत्तर देतं कशाचंही. पण इतिहासात वाटेल तसा अर्थ लावायची मुभा असते. हे धोकादायक नाही का? मी हा प्रश्न विचारला कारण आमच्याकडे इतिहास नव्यानं घडवण्याची प्रक्रिया सुरू आहे…
हरारी : (माझं वाक्य तोडत…) ती अत्यंत धोकादायक आहे. प्रामाणिक इतिहासकारांनी घटना स्वत:च्या कल्पनेत घडवू नयेत. घडलेल्या घटनांचा अर्थ तेवढा त्यांनी लावावा. प्रतिपादनार्थ पुरावे द्यावेत… ते खरे असावेत… नो वन हॅज राइट टु इन्व्हेण्ट फॅक्ट्स… त्यासाठी पुरावा कसा शोधायचा हे शास्त्र शिकून घ्यायला हवं. इतिहासात कोणी तरी काही तरी लिहून ठेवलंय म्हणून ते लगेच खरं मानायचं कारण नाही. म्हणजे एखादा राजा लिहितो…. त्यानं युद्धात दुसऱ्या राजाचे हजारो सैनिक मारले. आता ते राजानं लिहिलंय म्हणून खरं मानता नये. ते खरं आहे हे सिद्ध करता यायला हवं. तुम्ही कादंबऱ्यांत काहीही लिहा… इतिहास सांगोवांगीवर आधारित असू शकत नाही.
प्रश्न : पण तसं करायचं तर सत्य मांडणं आलं आणि तुम्ही तर म्हणता सत्य हे फार कंटाळवाणं, कष्टप्रद असतं…
हरारी : खरं आहे ते. लोकांना सत्य सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवायचा नसतो. उदाहरणार्थ, गाझा पट्ट्यात नक्की काय सुरू आहे, लोक कसे जगतायत हे समजून घेण्यात ना इस्रायलींना रस आहे ना पॅलेस्टिनी हे इस्रायलची बाजू समजून घ्यायला तयार आहेत. सत्य कोणालाच नको आहे. अशा वातावरणात सत्य ही अत्यंत महाग आणि तितकीच महत्त्वाची चीज आहे.
प्रश्न : हा प्रश्न विचारला कारण असत्य हे एक्सायटिंग असतं. ते ऐकून मजा येते. त्यामुळे लोकांची असत्यकथनावर विश्वास ठेवायची क्षमता आणि त्याला ‘एआय’ची जोड हा मुद्दा भारतीय परिप्रेक्ष्यात फार महत्त्वाचा ठरतो… ही जोडी फारच स्फोटक ठरू शकेल…
हरारी : अगदी बरोबर… म्हणून तू बघितलंस तर लक्षात येईल की, सध्या ‘द वर्ल्ड इज फुल ऑफ एक्साइटमेंट’. सगळे जण जणू उत्साहानं फुरफुरतायत. खरं सांगायचं तर लोकांना एक्साइटमेंटच्या खऱ्या अर्थाचा विसरच पडलाय. एक्साइटमेंट चांगली असते. ओळखीचा मित्र भेटला, आनंद झाला… एक्साइट झालो आपण. ते ठीक. याचा अर्थ असा की या एक्साइटमेंटमुळे आपलं शरीर आणि मन दोन्हीही उद्दीपित झालंय. पण प्राण्यांना उद्दीपित अवस्थेत बराच काळ ठेवलं तर ते मरतात. आणि मनुष्य हादेखील प्राणीच आहे हे लक्षात घ्यायला हवं. एक्साइटमेंट ही ‘जंक फूड’सारखी असते. ती अनेकांना आवडते. पण तेच अन्न खात राहिलो तर आपण जसं लवकर मरू तसंच एक्साइटमेंट सारखी सारखी वाटू लागली तर आपलं होईल. डोनाल्ड ट्रम्प निवडून आले लगेच एक्साइटमेंट. त्यात ट्रम्प तर एक्साइटमेंट तयार करण्यात अतिहुशार. पण आता जगाला एक्साइटमेंटची गरज नाही. आता आपल्याला बोअरिंग राजकारणी हवेत. बोअरिंग राजकारणी, बोअरिंग बातम्या आणि असंच काही बोअरिंग. जग सध्या एक्साइटमेंटमध्ये न्हाऊन निघालंय. आता शांततेची गरज आहे. मौनाची गरज आहे. मेंदूला आराम हवाय.
हाच फरक आहे प्राणी आणि ‘एआय’मध्ये. आपणही प्राणीच आहोत. आणि सर्व प्राणी जैविक असतात. ते जगण्याचं चक्र पाळतात. ते सतत एक्साइट राहात नाहीत. ‘एआय’चं तसं नाही. तो मानवी नाही… म्हणून सदासर्वकाळ तो एक्साइट राहू शकतो आणि आपल्याला एक्साइट करू शकतो… हे सांगितल्यावर बोअरिंग राजकारणी, बोअरिंग बातम्या यांचं महत्त्व लोकांना कळेल.
औपचारिक मुलाखत संपली. सांगितलं गेलं होतं त्यापेक्षा हरारी चांगलेच मोकळे निघाले. मग काही वेळ अनौपचारिक गप्पा झाल्या. त्याविषयी नंतर कधी तरी…
girish.kuber@expressindia.com
@girishkuber
आपल्या प्रतिक्रिया व सूचना देण्यासाठी/ lokrang@expressindia.com