काही दिवसांपूर्वीपर्यंत ज्या पद्धतीने मला सकाळ, दुपार, संध्याकाळ भांडी घासावी लागताहेत त्यावरून माझा जन्मच भांडी धुण्याचा लिक्विड साबण संपविण्यासाठी झाला असावा अशी निराश करणारी भावना माझ्या मनात घर करायची. टीव्हीवर ‘जब मिल बैठेंगे तीन यार’ ही एका मद्यानिर्मिती कंपनीची जाहिरात लागायची तेव्हा माझ्या मनात, ‘जब मिल बैठेंगे तीन यार… मी, भांडी आणि विमबार’ हा डायलॉग घोळत असायचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
टेन्शन हे सासुरवाडीच्या पाहुण्यांसारखं असतं. आपल्याला नको असलं तरी ते येतं आणि आपल्याकडेच ठाण मांडून बसतं. त्याने जावं असं आपल्याला मनातून कितीही वाटलं तरी ते काही केल्या जाता जात नाही आणि त्याला उघडपणे ‘जा बाबा जा’ असं म्हणताही येत नाही.
भूतकाळातील क्लेशकारक अनुभव, गैरवर्तन, अनपेक्षित घटना, स्वत:च्या किंवा कुटुंबीयांच्या आरोग्याच्या समस्या, नवीन नोकरी-व्यवसाय, स्थलांतर, लग्न, घटस्फोट अशा नवीन अनुभवाला सामोरे जावे लागणे, व्यवसायातील नुकसान, कामाचा, शिक्षणाचा, डेडलाइन पाळण्याचा ताण, कर्जे, आर्थिक अस्थिरता, नातेसंबंधातील अडचणी, संघर्ष किंवा कौटुंबिक समस्या, असुविधाजनक राहणीमान अशा अनेक कारणांनी माणसाला मानसिक ताण-तणाव येऊ शकतो किंवा असलेला ताण-तणाव वाढू शकतो. ‘टेन्शन लेने का नही देने का!’ हा सिनेमातल्या मुन्नाभाईने सर्किटला दिलेला सल्लावजा मंत्र सगळ्यांनाच ठाऊक असला तरी तो अमलात आणणे फार कमी लोकांना साधते.
आपल्या समवयस्कांच्या, सम-व्यावसायिकांच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या लाजेकाजे खातर काही कृती करण्याचा किंवा न करण्याचा जो दबाव ( Peer Pressure) आपल्यावर येतो त्यामुळेदेखील आयुष्यातील टेन्शन वाढतं. उदाहरणार्थ, किचनच्या प्लॅटफॉर्मवर झुरळांची पिल्लं फिरताहेत, हॉलच्या भिंतीवर पालीची बाळं खेळताहेत, अंगणात कुत्रीची पिल्लं बागडताहेत, परसदारी मांजरीला मातृत्वाचा पान्हा फुटलाय, जिन्यावर कबुतरे आपल्या बाळाला अंगाई गाताहेत, टेरेसवर वटवाघळाने पाळणा हलवलाय अशा परिस्थितीत ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरातच ऑफिस थाटलेल्या घरच्या कर्त्या पुरुषांत काही करून दाखविण्याची जी ऊर्मी उफाळून येते, ज्या शारीरिक-मानसिक-भावनिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्याला म्हणतात पीयर प्रेशर!
हेही वाचा
आजच्या काळात, फोमो ( FOMO = फिअर ऑफ मिसिंग आऊट) किंवा साध्या शब्दात सांगायचं तर ‘आयुष्याच्या शर्यतीत इतरांच्या मागे पडण्याची भीती’ ही बाब प्रामुख्याने सगळ्या तणावाच्या मुळाशी असल्याचे दिसून येते. इतर लोक पार्टी करताहेत, फॉरेन टूर करताहेत म्हणून आपणदेखील पार्ट्या करायला हव्यात, आपणही परदेशी जायला हवे. इतरांकडे आहे म्हणून आपल्याकडेदेखील महागडा फोन, लॅपटॉप, ब्रँडेड पेहराव, गाडी, बंगला असायला हवा. केवळ आपण जगाच्या मागे राहू, या भीतीने गरज नसतानाही नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठी, गॅजेट्स घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करणे आणि ते साध्य न झाल्यास नैराश्यात जाणे हे दृश्य आजकाल खूपच परिचयाचे झाले आहे.
या अज्ञात सुखाच्या मागे धावणाऱ्या जगाचे प्रतिबिंब, धडाधड फ्रेम अन् कॅमेरा अँगल बदलणाऱ्या आपल्या हिंदी सिनेमात पडलेलं दिसतं. म्हणजे बघा, सत्तरीच्या दशकातले सिनेमे आवडणाऱ्या मला, हल्लीचे सिनेमे पाहताना त्यांच्या वेगाशी जुळवून घेताना धाप लागते. जुन्या काळातले, फारुख शेख, अमोल पालेकरचे निरागस सिनेमे आणि भाबडी प्रेम-गाणी बघताना असं वाटतं की तेच आपलं खरं जग आहे. आपण वाट चुकून तात्पुरते या एकविसाव्या शतकातल्या भलत्याच आणि बेगडी जगात आलोय आणि आपल्या जगात परत जायचा रस्ता आपल्याला सापडत नाहीये.
स्नायूंचा ताण, डोकेदुखी, थकवा, झोपेच्या समस्या, पचनाच्या समस्या यांसारखी शारीरिक चिन्हे आणि चिंताग्रस्तता, चिडचिडेपणा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, विसराळूपणात वाढ, भावनिक उद्रेक, नैराश्य यासारखी मानसिक चिन्हे मानसिक तणावाची निदर्शक आहेत. असा हा मानसिक तणाव कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांनाच असतो. पण हा तणाव सहन करण्याची क्षमता मात्र व्यक्तिगणिक वेगवेगळी असते. आपल्या आत वाढत जाणारे हे प्रेशर आटोक्यात ठेवणे आणि प्रेशर कुकरप्रमाणे आतील वाफेचे प्रेशर वाढल्यावर योग्य वेळी शिटी वाजून प्रेशर रीलिज होणे महत्त्वाचे!
मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम करणे, योग आणि श्वासाचे व्यायाम करणे, आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करून आपल्या आहाराच्या सवयी सुधारणे, आपल्या वेळेचे व्यवस्थापन करणे, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे आणि गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे हे इलाज सांगितले जातात. कधी आयुष्यात तणावाचे प्रसंग येतात तेव्हा किंवा कधी त्याउलट आयुष्य संथ आणि बोअरिंग वाटू लागतं, एकाकीपणा खायला येतो, जगणं निरस वाटू लागतं तेव्हा आपल्याला खरं तर मानसोपचारतज्ज्ञाची गरज असते. पण सर्वसामान्य माणूस अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञापेक्षा ‘चल बसूया’ म्हणणाऱ्या स्पिरिचुएल मित्रांना जवळ करणे पसंत करतो. त्याचाही अल्पकालीन फायदा होतो. हे जरी खरं असलं तरी काही मर्यादित वेळासाठी टेन्शन विसरण्यापेक्षा, योग्य तो मानसोपचार घेऊन टेन्शनच्या मुळाला हात घालणे हेच अधिक हितकारक!
व्यावसायिक ताणाने आपलं कौटुंबिक आयुष्य गढूळ व्हायला नको. आपल्याला आपल्या नोकरी-धंद्याच्या ठिकाणचा ताण तिथेच ठेवून येता आलं पाहिजे. मध्यंतरी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या दारूबंदी अधिकाऱ्याचाच दारू पिऊन मृत्यू झाल्याची बातमी पेपरात आली. तेव्हा लोकांनी सोशल मीडियावर या घटनेची बऱ्यापैकी टर उडवली. पण ही बातमी वाचल्यावर, मानसिक आरोग्याचा व्हाट्सअप युनिव्हर्सिटी पदवीधारक या नात्याने माझ्या मनात आलं की, आपणा प्रत्येकाला त्या दारूबंदी अधिकाऱ्याप्रमाणे आपलं पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ असं वेगळं-वेगळं ठेवता आलं पाहिजे!
टेन्शन सगळ्यांनाच असतं, पण आपण त्याला कसा प्रतिसाद देतो यावर त्या टेन्शनचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. माझं जेव्हा नुकतंच लग्न झालं होतं त्याच सुमारास, नव्यानेच संसार थाटलेल्या आणि सदैव कसल्यातरी टेन्शनमध्ये दिसणाऱ्या आमच्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याने माझं वैवाहिक आयुष्य कसं चाललंय? म्हणून चौकशी केली. मी म्हटलं, ‘‘देवाच्या कृपेने सगळं छान चाललंय! आम्हा दोघांमध्ये खूपच अंडरस्टँडिंग आहे. सकाळी आम्ही दोघे मिळून नाश्ता बनवतो. प्रेमाच्या गप्पा मारता-मारता मी धुणीभांडी करतो. बऱ्याचदा ती मला कपडे धुवायलासुद्धा मदत करते. जेवणासाठी कधी ती एखाद्या डिशची फर्माईश करते. तर कधी मी माझ्या मर्जीची डिश बनवून तिला सरप्राईझ देतो. तिला साफसफाईची खूपच आवड असल्याने तिला खूश ठेवण्यासाठी घर चकाचक ठेवण्याची जबाबदारी मी स्वत:हून माझ्याकडे घेतली आहे.’’
मग एक औपचारिकता म्हणून मी त्याच्या नवीन संसाराची चौकशी केली. तेव्हा तो चेहऱ्यावरील खिन्न भाव तसेच ठेवून म्हणाला, ‘‘मित्रा, परिस्थिती तर माझीदेखील तुझ्या इतकीच बेक्कार आहे. पण मला हे तुझ्यासारखं गुडी-गुडी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन देता येत नाही रे!’’
तुम्हाला सांगतो, सगळेच लोक माझ्यासारखे भांडी विसळण्याचे काम स्वखुशीने करणारे नसतात. घराची साफसफाई अन् धुणीभांडी ही कामं स्त्रियांचीच आहेत असा बऱ्याच लोकांचा ठाम समज असतो. एखाद्या दिवशी, स्त्रियांचं मानलं गेलेलं एखादं काम कुणी, स्वत:ला घरचा कर्ता पुरुष समजणाऱ्याला, करायला सांगितलं की त्यांचा अहं दुखावून त्यांना धक्का बसतो. तुम्हाला म्हणून सांगतो, चारी ठाव स्वयंपाक करून वैतागलेल्या पत्नीने, जेवल्यानंतर भांडी धुण्याची दिलेली आज्ञा ऐकून आमच्या परिचयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला जेवताना चिकन-दम-बिर्याणीचा ठसका लागला… बिचाऱ्याचा खालचा दम खाली राहिला अन् वरचा दम वर गेला! असो.
भांडी घासायचा विषय निघालाय म्हणून सांगतो. भांडी घासायचं म्हटलं की बहुतांश लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवणानंतरची भांडी घासण्याची क्रिया ही तुमचा मानसिक तणाव दूर करू शकते, असं संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालंय. फ्लोरिडा युनिव्हर्सिटीने ५१ विद्यार्थ्यांवर हा अनोखा प्रयोग करून पाहिला. ही मुलं अभ्यासामुळे तणावात होती. त्यामुळे दररोज त्यांना भांडी घासायला सांगितलं आणि या प्रयोगातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला. फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ५१ पैकी २७ विद्यार्थी तणावमुक्त झाले होते. बरं, एवढंच नाही तर त्यांची अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता (फोकस) देखील वाढली होती. त्यांचा पूर्ण तणाव हा खरकट्या पाण्यासोबत निघून गेला होता.
काही दिवसांपूर्वीपर्यंत ज्या पद्धतीने मला सकाळ, दुपार, संध्याकाळ भांडी घासावी लागताहेत त्यावरून माझा जन्मच भांडी धुण्याचा लिक्विड साबण संपविण्यासाठी झाला असावा अशी निराश करणारी भावना माझ्या मनात घर करायची. टीव्हीवर ‘जब मिल बैठेंगे तीन यार’ ही एका मद्यानिर्मिती कंपनीची जाहिरात लागायची तेव्हा माझ्या मनात, ‘जब मिल बैठेंगे तीन यार… मी, भांडी आणि विमबार’ हा डायलॉग घोळत असायचा. पण तुम्हाला सांगतो, फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या संशोधनाची बातमी वाचनात आल्यापासून नियमितपणे भांडी घासणे हेच माझ्या आनंदी आणि सुखी असण्याचे गुपित असल्याचे माझ्या लक्षात आले आहे.
बऱ्याचदा खड्ड्यांनी भरलेले रस्ते, न हलणारं ट्राफिक, ऑफिसातील बॉसची बोलणी, महिनाअखेरची आर्थिक चणचण याला वैतागून ऑफिसातून घरी जातानाच श्रम-परिहार म्हणून माफक अल्पोपाहार करून मी घरी जात असे. अन् टेन्शनचं निमित्त करून घरकाम, विशेषत: रात्रीची जेवणं झाल्यावर भांडी विसळण्याचे काम टाळत असे. पण फ्लोरिडा युनिव्हर्सिटीचे उपरोक्त संशोधन प्रसिद्ध झाल्या दिवसापासून आमच्या गृहखात्याने घरच्या कामवाल्या बाईला नोकरीतून मुक्त करून टाकले आहे. आता रोज संध्याकाळी मी जेव्हा ऑफिसातून थकून-भागून, शारीरिक-मानसिक तणाव घेऊन घरी पोहोचतो. तेव्हा मला टेन्शन-फ्री करण्यासाठी किचनच्या सिंकमध्ये एक भांड्यांचा गोवर्धन पर्वत माझी आतुरतेने वाट पाहत असतो!
sabypereira@gmail. Com