डॉ. मृदुला बेळे – mrudulabele@gmail.com
‘औषधं किंवा शरीरक्रियाशास्त्र’ या विषयातलं मानाचं नोबेल पारितोषिक डॉ. हार्वे आल्टर, डॉ. मायकेल हॉटन आणि डॉ. चार्लस् राइस यांना ‘हिपॅटायटिस सी’ विषाणूच्या शोधासाठी अलीकडेच देण्यात आलं. या तिन्ही संशोधकांनी ‘हिपॅटायटिस सी’च्या संशोधनाची पताका अक्षरश: आपल्या खांद्यावर वाहिली आहे.
नुकतंच ‘औषधं किंवा शरीरक्रियाशास्त्र’ या विषयातलं मानाचं नोबेल पारितोषिक डॉ. हार्वे आल्टर, डॉ. मायकेल हॉटन आणि डॉ. चार्लस् राइस यांना ‘हिपॅटायटिस सी’ विषाणूच्या शोधासाठी देण्यात आलं. डॉ. हार्वे आल्टर हे अमेरिकेतल्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’मध्ये रक्तविषयक काम करणारे संशोधक आहेत. आणि त्यांचं वय आहे तब्बल ८५ र्वष! डॉ. मायकेल हॉटन हे कॅनडातल्या अल्बर्टा विद्यापीठातले ब्रिटिश विषाणूतज्ज्ञ आहेत ७१ वर्षांचे! तर डॉ. चार्लस् राइस हे रॉकफेलर विद्यापीठात काम करणारे यकृततज्ज्ञ आहेत ६८ वर्षांचे! या तिन्ही संशोधकांनी ‘हिपॅटायटिस सी’ या आजाराच्या संशोधनाची पताका अक्षरश: आपल्या खांद्यावर वाहिली आहे. हे तिन्ही शास्त्रज्ञ विज्ञानपंढरीचे वारकरीच. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाल्याने त्यांची ही वारी आता सुफळ संपूर्ण झाली आहे.
१९७४-७५ सालातली गोष्ट आहे ही. अमेरिकेतल्या बेथेस्डा इथं ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ या अमेरिकेतील आरोग्यविषयक सर्वात मोठय़ा संस्थेची एक मोठी रक्तपेढी आहे. इथं जमा होणारं रक्त दिल्याने अनेक रुग्णांना यकृतदाह (हिपॅटायटीस) होतो आहे असं आढळलं. जवळजवळ ३०% रुग्णांत हा यकृतदाह दिसून येत होता. त्यावर संशोधन करत असलेल्या ‘एनआयएच’मधील संशोधनाचा निष्कर्ष असा होता की, पैसे मिळावेत म्हणून वारंवार रक्तदान करणारे व्यावसायिक रक्तदाते हे या यकृतदाहाचे प्रमुख कारण असावेत. मग ‘एनआयएच’ने अशा रक्तदात्यांकडून रक्त स्वीकारणं बंद करण्याचा निर्णय घेतला. आता ही रक्तपेढी केवळ स्वयंसेवकांकडून रक्त स्वीकारणार होती. या बदलाचा परिणाम काय होतो आहे याचा अभ्यास करण्याची जबाबदारी एका तरुण हिमॅटॉलॉजिस्टवर सोपवण्यात आली. त्याचं नाव होतं डॉ. हार्वे आल्टर.
कावीळ हा आजार आपल्याला नवा नाही. कावीळ बऱ्याचदा यकृताचा दाह झाल्यामुळे होते हे माणसाच्या लक्षात आलं १९१२ मध्ये आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं ‘हिपॅटायटिस’ किंवा यकृतदाह. १९६० च्या आसपास शास्त्रज्ञांना समजलं की, हा यकृतदाह बऱ्याचदा विषाणू संसर्गामुळे होतो. यकृतदाह घडवून आणणारे दोन वेगवेगळे विषाणू शास्त्रज्ञांना सापडले. त्यांची नावं ठेवण्यात आली- हिपॅटायटीस ए व्हायरस (एचएव्ही) आणि हिपॅटायटीस बी व्हायरस (एचबीव्ही). ‘एचएव्ही’ हा ‘आरएनए’ विषाणू आहे आणि त्याचा संसर्ग दूषित अन्न व पाण्यावाटे होतो. तर ‘एचबीव्ही’ हा ‘डीएनए’ विषाणू आहे व त्याचा संसर्ग रक्तावाटे होतो. नंतर हिपॅटायटीस ए आणि बीचं निदान करणाऱ्या चाचण्या तयार करण्यात आल्या. रक्तदान करताना एकाच्या रक्तातून दुसऱ्याला हिपॅटायटिस बीचा विषाणू- संसर्ग होणं सहज शक्य असल्याने रक्त देण्यापूर्वी त्याची हिपॅटायटीस सीसाठी चाचणी केली जात असे. तर बेथेस्डाच्या रक्तपेढीतलं रक्त घेतल्यानं ज्यांना यकृतदाह झाला त्यांच्या हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस बीच्या चाचण्या केल्या गेल्या. पण त्यातल्या कित्येक रुग्णांत या चाचण्या निगेटिव्ह आल्या व हे संशोधक बुचकळ्यात पडले. कारण रुग्णांत हिपॅटायटीसची सगळी लक्षणं दिसत होती, पण दोन्ही प्रकारच्या चाचण्या तर निगेटिव्ह! म्हणजे कदाचित या रुग्णांना आणखी तिसऱ्याच कुठल्या तरी प्रकारच्या विषाणूमुळे हा आजार झालेला असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला. याला सध्या तरी ‘नॉन ए- नॉन बी हिपॅटायटीस’ म्हणू या असं त्यांनी ठरवलं. खरं तर याला ‘हिपॅटायटीस सी’ असं नाव द्यावं असं त्यांना वाटलं होतं. पण हा रोग विषाणूमुळेच होत असेल याचा काही पुरावा तोवर त्यांच्याकडे नव्हता. हा आजार नक्की कशामुळे होतोय हे आपण लवकरच शोधून काढू याची त्यांना खात्री वाटत होती. पण हा विषाणू आपल्याला पुढची पंधरा र्वष हुलकावण्या देणार आहे असे तेव्हा त्यांना वाटलं नव्हतं.
सर्वप्रथम हा हिपॅटायटीस संक्रमणशील आहे की नाही हे शोधण्यासाठी डॉ. आल्टर यांच्या गटाने या नव्या हिपॅटायटीसने आजारी असलेल्या रुग्णांचं रक्त पाच सुदृढ चिम्पांझी माकडांना टोचलं आणि पाचही माकडांत हिपॅटायटीसची लक्षणं दिसायला लागली. म्हणजे हा आजार नक्की संक्रमणशील आहे आणि त्याचं संक्रमण रक्तातून होतं, हे सिद्ध झालं. या रुग्णांच्या रक्तात विषाणूंत आढळणारा एक विशिष्ट प्रकारचा तेलकट चिकट पदार्थ (लिपिड) आढळला. यावरून हा विषाणू असावा असा अंदाज बांधता आला. अनेक प्रकारच्या गाळण्याच्या प्रक्रिया करून हेही सिद्ध झालं की, या विषाणूचा आकार ३० ते ६० नॅनोमीटरच्या आसपास असावा. कुठलंही जिनोम सीक्वेंसिंग न करता, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकासारखी आधुनिक उपकरणं नसतानाही ही माहिती संशोधकांनी गोळा केली होती. पण तरी हा नव्या प्रकारचा यकृतदाह घडवून आणणारा जंतू नक्की कोणता आहे, याचे काही ठोस पुरावे त्यांना मिळत नव्हते.
१९८० चं संपूर्ण दशक डॉ. आल्टर ज्यांना रक्त दिलं गेलेलं आहे अशा रुग्णांवर लक्ष ठेवणं, त्यातल्या कुणात हिपॅटायटीस आढळतो का याचा शोध घेणं, तो टाळण्यासाठी उपाय सुचवणं इत्यादी गोष्टी करत राहिले. रक्तदात्याच्या रक्तात ‘अॅलानिन अमायनोट्रान्सफरेज’ (आल्ट) या विकराची मात्रा वाढलेली असेल तर त्याला हिपॅटायटीस असण्याची शक्यता असते, हे लक्षात आल्यावर रक्तदानापूर्वी दात्याची ही चाचणी करावी असं आल्टर यांनी सुचवलं. त्यानुसार अमेरिकेत चाचण्या करणं सुरू झालं. त्यानं रक्तदानातून उद्भवणाऱ्या हिपॅटायटीसचं प्रमाण तब्बल तीस टक्के इतकं कमी झालं. पण त्याचा कर्ताकरविता मात्र अजूनही सापडत नव्हता.
१९८८ सालातल्याच एका दिवशी आल्टर यांना कायरॉन कॉर्पोरेशन या औषध कंपनीतून फोन आला. तिथले शास्त्रज्ञ डॉ. मायकेल हॉटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ‘नॉन ए- नॉन बी हिपॅटायटीस’ घडवून आणणाऱ्या जंतूचा क्लोन बनवला होता. तो एक विषाणूच होता आणि त्याला ‘हिपॅटायटीस सी’ असं नाव द्यायचं ठरत होतं. कायरॉन एवढंच करून थांबली नव्हती, तर त्यांनी रक्तातला हा विषाणू शोधायला एक प्रतिपिंड चाचणीही शोधून काढली होती. आल्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातातला झेंडा आता मायकेल हॉटन व त्यांच्या सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतला होता.
डॉ. मायकेल हॉटन यांनी या विषयाला हात घातला तो १९८२ सालात. आपले पोस्ट डॉक्टरल संशोधन संपवून हा इंग्लिश शास्त्रज्ञ अमेरिकेत आला होता. नुकत्याच स्थापन झालेल्या कायरॉन कॉर्पोरेशन या जैविक तंत्रज्ञानसंबंधित औषधांवर काम करणाऱ्या कंपनीत त्यांना नोकरी मिळाली होती. आणि तिथलं त्यांचं काम होतं या हुलकावण्या देणाऱ्या ‘नॉन ए- नॉन बी हिपॅटायटीस’च्या विषाणूचा माग काढणं. डॉ. हॉटन आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेत काम करणारे संशोधक डॉ. ब्रॅडली आता जोमाने कामाला लागले. ‘हिपॅटायटीस सी’च्या २५% रुग्णांत ‘हिपॅटायटीस सी’ आपला आपण बरा होत असे. पण इतरांमध्ये मात्र तो एक जुनाट आजार बनून राही. बऱ्याचदा त्याचं रूपांतर यकृताच्या सिऱ्हॉसिसमध्ये होई, तर काहींना त्यामुळे यकृताचा कर्करोग होई. त्यामुळे कितीतरी लोकांना आपले प्राण गमवावे लागत असत. त्यामुळे या रोगाची निदान चाचणी, त्यावर लस व औषधं शोधणं अत्यंत गरजेचं होतं. आणि ती जबाबदारी डॉ. हॉटन व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती.
हिपॅटायटीसने आजारी असलेल्या रुग्णांच्या यकृतातल्या डीएनएमधील केंद्रकीय आम्लांचं जिवाणूमध्ये रोपण करायचं. त्यातली काही केंद्रकीय आम्लं संसर्ग घडवणाऱ्या विषाणूमधून आलेली असतील हे गृहीत धरून मग या विषाणूचा जिनोम सीक्वेन्स शोधायचा प्रयत्न करायचा अशीही युक्ती डॉ. हॉटन वापरून बघत होते. त्यानुसार १९८२ ते ८६ या वर्षांत या संशोधक गटाने सुमारे अडीच कोटी क्लोन शोधून पाहिले.. पण व्यर्थ! मग हॉटन यांनी ‘जेल इलेक्ट्रोफोरेसीस’ नावाचं नवं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. यात रुग्णांच्या यकृतातल्या डीएनएचं वजनानुसार वर्गीकरण होतं. यातले काही डीएनए किंवा आरएनए विषाणूजन्य असतील तर त्यांच्या रेणूंचं वजन जास्त असल्याने ते वेगळे करता येतात. याशिवाय हा विषाणू प्रयोगशाळेत वाढवायचा प्रयत्न करणे, त्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्याचा प्रयत्न करणे असे वेगवेगळे मार्ग अवलंबणं चाललेलं होतं. अशा एकूण तीस वेगवेगळ्या प्रकारांनी या विषाणूला शोधायचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी विषाणूंचे काही कोटी क्लोन अभ्यासले. यात सात-आठ र्वष गेली.
यादरम्यान आपल्या घरून प्रयोगशाळेत जायच्या डॉ. हॉटन यांच्या रस्त्यावर नवनव्या हॉटेल्सची बांधकामं सुरू झाली होती. दरवेळी नव्या हॉटेलचं बांधकाम सुरू झालं की डॉ. हॉटन मनातल्या मनात म्हणत, ‘हे बांधकाम आत्ताच सुरू झालेलं दिसतंय. हे पूर्ण होऊन हॉटेल सुरू व्हायच्या आत तरी हा विषाणू नक्की सापडेल.’ पण ते हॉटेल सुरू होऊन जुनं झालं तरी विषाणू सापडायचं नावदेखील नसायचं. अशी तब्बल दहा हॉटेलं बांधून झाली तेव्हा कुठं हा विषाणू सापडला. तो एकदा सापडल्यावर मात्र रक्तात असलेला हा विषाणू शोधायची चाचणी त्यांनी लगेचच शोधून काढली. एव्हाना १९८९ साल उजाडलं होतं आणि ‘हिपॅटायटीस सी’ संशोधनाचा झेंडा तिसऱ्या वारकऱ्याच्या खांद्यावर जायची वेळ झाली होती. हा वारकरी होता डॉ. चार्लस् राइस!
१९८९ सालात डॉ. राइस वॉशिंग्टन विद्यापीठात विषाणूशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक म्हणून काम करत होते. एके दिवशी डॉ. चार्लस् राइसना स्टीफन फेनस्टोन या संशोधकाचा फोन आला. फेनस्टोन अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनात कित्येक र्वष विषाणूजन्य हिपॅटायटीसवर संशोधन करत होते. तर राइस यांनी ते आधी काम करत असलेल्या कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये यलो फिव्हर, एन्सिफॅलायटीस, डेंग्यू ताप यांसारख्या ‘आरएनए’ विषाणूंवर काम केलेलं होतं. तो ‘रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञाना’च्या उदयाचा काळ होता. ‘रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञान’ म्हणजे दोन भिन्न प्रजातींच्या जीवांमधला डीएनए जोडून एका तिसऱ्या यजमान जीवात त्याचं रोपण करणं. यामुळे त्या यजमानाच्या पेशीत एक नवी जनुकीय सामग्री तयार होऊ लागते. हे तंत्रज्ञान विज्ञान, औषधनिर्माण, शेती या सगळ्याच क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाचं ठरू लागलं होतं. अत्यंत नव्या असलेल्या या तंत्राने क्लोनिंग करून किंवा केंद्रकीय आम्लांना शोधून ‘सिंडबिस विषाणू’ या डासातून पसरणाऱ्या विषाणूचा जनुकीय नकाशा राइस यांनी शोधला होता. त्यामुळे या विषाणूची वाढ थोपवणं शक्य झालं होतं. त्यानंतर राइस वॉशिंग्टन विद्यापीठात काम करू लागलेले असताना त्यांना फेनस्टोन यांचा फोन आला. ते फोनवर राइस यांना म्हणाले, ‘तुमचं हे नवं तंत्रज्ञान वापरून येलो फिव्हर विषाणूत जनुकीय बदल करून त्याचा वापर हिपॅटायटीस सीवर लस बनवण्यासाठी करता येतोय का, पाहा. कायरॉन कॉर्पोरेशनमधल्या डॉ. हॉटन यांनी नुकताच हिपॅटायटीस सी विषाणूचा जिनोम सीक्वेन्स शोधून काढला आहे.’
हे समजलं आणि डॉ. राइस कामाला लागले. हिपॅटायटीस सी विषाणू ते काम करत असलेल्या विषाणूंचा अगदी जवळचा नातेवाईक होता. त्यामुळे ते या नव्या विषाणूचा जिनोम मुळापासून समजून घ्यायच्या मागे लागले. ‘हिपॅटायटीस सी’ निदानाच्या चाचण्या तयार झाल्या तरी शास्त्रज्ञांना अजूनही हा विषाणू प्रयोगशाळेत वाढविण्यात यश मिळालेलं नव्हतं. १९९७ साली राइसना ‘हिपॅटायटीस सी’चा क्लोन वापरून चिम्पांझींना संसर्ग घडवून आणण्यात यश मिळालं. आता या विषाणूला चिम्पांझीमध्ये वाढवून, मग वेगळं करून माणसाच्या यकृतपेशींवर प्रयोगशाळेत वाढवता येणार होतं.
२००१ साली डॉ. राइस न्यूयॉर्कमधील रॉकफेलर विद्यापीठात रुजू झाले. इथंही त्यांच्या संशोधन गटाने ‘हिपॅटायटीस सी’बाबत एकाहून एक महत्त्वाचे शोध लावले. या विषाणूतल्या कुठल्या प्रथिनामुळे त्याला माणसाच्या यकृतपेशीत शिरकाव करून घेता येतो, हे त्यांनी शोधून काढलं. याचा वापर करून मग ‘हिपॅटायटीस सी’वरच्या औषधांच्या चाचण्या प्राण्यांत करता याव्यात म्हणून त्या प्राण्यांमध्ये काही बदल करणे शक्य झालं. (तोवर फक्त चिम्पांझींवर हे प्रयोग करता येत असत. चिम्पांझी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध नसतात आणि त्यांच्या किमतीही प्रचंड असतात. त्यामुळे या चाचण्या करणं जिकिरीचं होतं.)
३ मे १९९० हा ‘हिपॅटायटीस सी’च्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस होता. या दिवशी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने रक्तदानापूर्वी रक्ताची ‘हिपॅटायटीस सी’ चाचणी करणं सक्तीचं केलं. काही वर्षांपूर्वी अशाच एका रक्तपेढीत काम करताना डॉ. आल्टर यांना या नव्या विषाणूच्या शक्यतेनं पछाडलं होतं. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनंतर हा विषाणू डॉ. हॉटन यांना सापडला होता आणि चौदा वर्षांनंतर ही चाचणी आता अमेरिकेत सुरू होणार होती. ही चाचणी डॉ. हॉटन काम करत असलेल्या कायरॉन कॉर्पोरेशनने बनवून बाजारात आणली होती.
विषाणू सापडल्या सापडल्या सुरू झाला तो त्यावरच्या औषधाचा शोध. पण हा शोध अत्यंत कठीण होता. ‘हिपॅटायटीस सी’ विषाणूचे चार वेगवेगळे प्रकार- जीनो टाईप्स आढळत होते आणि ते वेगवेगळ्या औषधांना प्रतिसाद देत होते. १९९१ सालात एक इंटरफेरॉनवर आधारित औषध बाजारात आलं. नंतर आलं ते रिबाव्हेरीन नावाचं औषध. इंटरफेरॉन आणि रिबाव्हेरीन जोडीने दिलं जाऊ लागलं. पण या औषधांचे बरेच दुष्परिणाम होते. शिवाय ही औषधं एखाद्याच जीनो टाईपवर काम करत. औषधनिर्मितीला खरा वेग आला तो २०११ सालापासून. २०११ मध्ये पहिलं विषाणूरोधक औषध बाजारात आलं. यात आधी आलं प्रोटीएज इन्हिबिटर्स आणि मग आलं पॉलीमरेज इन्हिबिटर्स. पॉलीमरेज इन्हिबिटर्समुळे ‘हिपॅटायटीस सी’च्या उपचार पद्धतीचे सर्व आयाम बदलून टाकले. २०१३ साली आलेल्या जिलियाद या औषध कंपनीच्या सोफोसुबुव्हीर (सोव्हाल्डी) या औषधाने उपचारांत क्रांती घडवली. हे औषध विषाणूच्या चारही जिनो टाईप्सवर परिणामकारक ठरत होतं. केवळ आठ आठवडय़ांत ते रुग्णाला पूर्ण बरं करत होतं. त्यानंतर या प्रकारची अनेक औषधं बाजारात आली आणि हा आजार बरा होण्याचं प्रमाण झपाटय़ाने वाढू लागलं. रुग्णाच्या रक्तातला विषाणू पूर्णपणे नष्ट होऊन १२ ते २४ आठवडय़ांत रुग्ण पूर्णपणे बरा होऊ लागला. आज आणखी तब्बल ७५ नव्या औषधांच्या चाचण्या चालू आहेत. शिवाय ‘हिपॅटायटीस सी’च्या लशीवरदेखील चाचण्या चालू आहेत. या सगळ्या प्रयत्नांमुळे आज ‘हिपॅटायटीस सी’ बरा होण्याचं एकेकाळी केवळ ६% असलेलं प्रमाण ९०% वर येऊन पोहोचलं आहे. यामागे डॉ. आल्टर, डॉ. हॉटन, डॉ. राइस आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांचे अथक प्रयत्न आहेत.
या तीन शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा भारतालाही अर्थातच उपयोग झाला. अमेरिकेनंतर तब्बल ११ वर्षांनी- २००१ साली भारतात रक्तपेढय़ांना हिपॅटायटीस चाचणी करणं सक्तीचं करण्यात आलं. खरं तर सुप्रसिद्ध यकृततज्ज्ञ डॉ. एस. के. सरीन यांनी भारतातल्या अनेक रक्तपेढय़ांचा या संदर्भात १९९० सालापासून अभ्यास करायला सुरुवात केली होती. आणि रक्त देण्याआधी ‘हिपॅटायटीस सी’ची चाचणी केली पाहिजे अशी सूचना केली होती. भारतातल्या रक्तपेढय़ा मात्र ही चाचणी करायला तयार नव्हत्या. पण एका महिलेने तिला एका रुग्णालयात दिल्या गेलेल्या रक्तातून ‘हिपॅटायटीस सी’ झाल्याचं सिद्ध केलं आणि त्या रक्तपेढीवर खटला भरला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे भारतातल्या रक्तपेढय़ा ‘हिपॅटायटीस सी’ चाचण्या करू लागल्या. पण तोवर व्हायचं ते नुकसान झालेलं होतं. ‘हिपॅटायटीस सी’ भारतात पसरू लागलेला होता. या नियमानंतर तो बऱ्यापैकी आटोक्यात आला असला तरी काही राज्यांत आजही बऱ्याच प्रमाणात तो जिवंत आहे. र्निजतुकीकरण केलेल्या सुया, सीरिंज न वापरणं, रक्तपेढय़ांनी चाचण्या न करणं ही त्याची कारणं आहेत. आज भारतात ‘हिपॅटायटीस सी’चे जवळपास ४५ ते ५५ लाख रुग्ण आहेत.
२०१३-१४ च्या आसपास पंजाब आणि हरियाणा या राज्यांत मोठय़ा प्रमाणात ‘हिपॅटायटीस सी’ रुग्ण आढळू लागले. काही गावांत तर ८०% लोक ‘हिपॅटायटीस सी’ पॉझिटिव्ह होते. अर्थात त्यातल्या बऱ्याच जणांना क्रॉनिक आजार असल्याने काहीही त्रास होत नव्हता. पण पुढे जाऊन त्यातल्या अनेकांमध्ये तो लिव्हर सिऱ्हॉसिस किंवा हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमासारख्या गंभीर आजाराचं रूप घेणार, हे नक्की होतं. भारतात आढळून येणाऱ्या ‘हिपॅटायटीस सी’वर जिलियाद या अमेरिकन औषध कंपनीने बाजारात आणलेलं सोव्हाल्डी (सोफोस्बुव्हीर) हे औषध अत्यंत प्रभावी ठरणार होतं. पण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत सोव्हाल्डीच्या तीन महिन्यांच्या उपचाराची किंमत होती तब्बल ८० ते ९५ हजार डॉलर (साधारणपणे ५५ ते ६५ लाख रुपये). ही किंमत युरोप आणि अमेरिकेतल्या रुग्णांसाठीच इतकी जास्त होती, की भारतीय रुग्णांना तर ही औषधं परवडणं अशक्यच होतं. याच सुमारास भारताच्या पेटंट कार्यालयानं ‘नेक्साव्हर’ या बायर कंपनीच्या औषधाला किंमत जास्त असल्याने सक्तीचा परवाना मंजूर केला होता. (नेक्साव्हरची किंमत होती तीन लाख वीस हजार रुपये आणि सक्तीचा परवाना दिल्यावर भारतीय जनरिक कंपनी ‘नाटको’ हे औषध साडेआठ हजार रुपयाला विकू लागली होती.) याविरोधात बायरने सुप्रीम कोर्टात केलेलं अपील कोर्टाने नाकारलं होतं आणि औषधावरच्या पेटंटपेक्षा सामान्य भारतीय नागरिकाला औषध स्वस्तात मिळणं भारत सरकार जास्त महत्त्वाचं मानतं, हे खणखणीतपणे जगाला सांगितलं होतं. इतर बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांसाठी ही धोक्याची घंटा होती. ‘जिलियाद’ला या औषधावर भारतात अजून पेटंट मिळालेलं नव्हतं. अशा वेळी नेक्साव्हरवर दिला गेला तसा सक्तीचा परवाना आपल्या औषधावर पेटंट मिळाल्यानंतर दिला जाऊ नये किंवा आपलं पेटंट नाकारलं जाऊ नये म्हणून जिलियादने सहा भारतीय जनरिक औषध कंपन्यांना सोव्हाल्डी बनवून भारतात विकण्याचा परवाना देऊन टाकला होता. त्यामुळे भारतात या औषधाची किंमत वीस-पंचवीस हजार रुपये इतकी कमी झाली होती.
अर्थात पंजाब- हरियाणामधल्या गरीब रुग्णांना ही किंमतसुद्धा परवडणं शक्य नव्हतं. त्यामुळे या दोन राज्यांच्या सरकारांनी ‘जिलियाद’शी बोलणी करून आपल्या राज्यांत या औषधाची किंमत कमी करून घेतली. या राज्यांतल्या सरकारी रुग्णालयांत गरीब रुग्णांना हे औषध विनामूल्य दिलं जाऊ लागलं आणि इतरांना साडेपाच हजार रुपये इतक्या कमी किमतीत. या दोन सरकारांकडून प्रेरणा घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तेव्हाचे आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या पुढाकाराने २०१८ साली नॅशनल व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल प्रोग्रामची निर्मिती केली. याअंतर्गत आता भारतातल्या सर्व सरकारी रुग्णालयांत ‘हिपॅटायटीस सी’च्या चाचण्या विनामूल्य केल्या जातात आणि परदेशांत सोन्याच्या भावाने विकलं जाणारं हे औषध विनामूल्य पुरवलं जातं. त्यामुळे भारतात हिपॅटायटीस रुग्णांत घट व्हायला मोठी मदत झाली आहे. आणि हे अर्थातच डॉ. आल्टर, डॉ. हॉटन आणि डॉ. राइस यांच्या कितीतरी वर्षांच्या संशोधनाचंच फलित आहे.
१९७६ सालात सुरू झालेल्या या कामाला तब्बल ४४ वर्षांनंतर ही फळं मिळाली आहेत आणि अतिशय सन्माननीय असं नोबेल पारितोषिकही देण्यात आलं आहे. पण हे काम अजूनही संपलेलं नाही. जगात ज्या दिवशी ‘हिपॅटायटीस सी’चा एकही रुग्ण उरणार नाही, त्या दिवशी खरं तर या तीन संशोधकांची ही दिंडी पंढरीला पोहोचेल.
( लेखिका औषधनिर्माण शास्त्राच्या प्राध्यापिक आणि बौद्धिक संपदा तज्ज्ञ आहेत.)