लोकेश शेवडे lokeshshevade@gmail.com

गांधीजींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला हिंसक वळण लागून उत्तर भारतातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा या गावात आंदोलकांनी पोलिसांना जाळून मारले. या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी आपले आंदोलन मागे घेतले. जनता आणि अन्य नेत्यांचा विरोध असतानाही गांधीजींनी मागे घेतलेले हे पाऊल नैतिकदृष्टय़ा एक मोठीच झेप होती. आज ‘अनीती म्हणजेच राजनीती’ हे समीकरण रूढ झालेल्या जमान्यात गांधीजींचे हे नैतिक धैर्य वादातीत होय. या घटनेच्या शंभरीनिमित्ताने..

dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Uttar Pradesh Sambhal Excavation
Uttar Pradesh Sambhal Excavation : उत्तर प्रदेशातील संभलमध्‍ये उत्खननावेळी आढळली १५० वर्षे जुनी पायऱ्या असलेली विहीर
Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
Girish Mahajan Radhakrishna Vikhe-Patil Dhananjay Munde Dada Bhuse have less important cabinet post
ज्येष्ठ मंत्र्यांना धक्का! महाजन, विखे-पाटील, मुंडे यांचे पंख छाटले
Onion auction in Solapur stalled for four days due to Mathadi protest
माथाडींच्या आंदोलनामुळे सोलापुरात चार दिवस कांदा लिलाव ठप्प

जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळवून ऐन भरात येत असलेलं ‘असहकार आंदोलन’ गांधीजींनी अचानक मागे घेतलं आणि पाच दिवसांचा उपवास सुरू केला, या घटनेला १२ फेब्रुवारी २०२२ रोजी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. अर्थात एखादं आंदोलन मागे घेणं ही जगभरात काही साजरी करण्याची बाब मानली जात नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारीला या आंदोलन मागे घेण्याची शताब्दी साजरी होण्याची शक्यता नाही. तथापि ज्या घटनेमुळे गांधीजींनी हे अत्यंत यशस्वी होत चाललेलं आंदोलन मागे घेतलं, ज्या घटनेपोटी गांधींजींना पाच दिवसांचा उपास घडला, त्या घटनेची शताब्दी मात्र साजरी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.    

स्वराज्याच्या दिशेनं गतिशील वाटचाल साधण्यासाठी लो. टिळक, बॅ. जिना, जोसेफ बाप्टिस्टा, अ‍ॅनी बेझंट इ. प्रभृतींनी १९१६ साली ‘इंडियन होम रुल लीग’ स्थापन केली. १ ऑगस्ट १९२० रोजी लो. टिळकांचं निधन झाल्यावर पोरकी झालेली ही लीग त्यांच्या पश्चात गांधीजींच्या ‘हिंद स्वराज’ आंदोलनाशी एकरूप होऊन काँग्रेसमध्ये विलीन झाली. आतापर्यंत चंपारण्य आणि खेडा सत्याग्रहांच्या यशामुळे गांधीजींच्या अहिंसा-सत्याग्रह या स्वरूपाच्या आंदोलनाची ओळख जनतेला झाली होती. त्यात जनतेचा सहभाग वाढवून आंदोलन तीव्र करण्यासाठी गांधीजींनी ‘असहकार आंदोलन’ छेडलं. या आंदोलनाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आणि ते वेगानं भारतभर पसरू लागलं. नेहरू, पटेल, सुभाषबाबू आणि अन्य अनेक नेते तुरुंगात डांबले गेले तरी जागोजाग उत्स्फूर्त हरताळ होऊ लागले. आझाद-भगतसिंहांचे पूर्वसुरी सशस्त्र क्रांतिकारक व ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’चे कवी रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक उल्लादेखील या आंदोलनाने प्रभावित झाले. एकुणात आंदोलनाची धग वाढतच गेली. आणि.. अचानक उत्तर भारतातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा या लहानशा गावात पोलीस आणि आंदोलक यांच्यातला संघर्ष उग्र होऊन पोलिसांच्या गोळीबारात तीन आंदोलक मृत्युमुखी पडले. यावर चिडून जाऊन आंदोलकांनी पोलिसांना चौकीत कोंडून चौकी पेटवून दिली आणि त्यात २२ पोलीस होरपळून मेले! ही तारीख होती ४ फेब्रुवारी १९२२!

अशी घटना कोणत्याही आंदोलनात घडणं, हे तेव्हा (व सध्यादेखील) नेत्यांच्या दृष्टीनं तीव्र जनक्षोभाचं शिखर आणि एका अर्थी आंदोलनाच्या यशाचं लक्षण मानलं जात असे. पण या घटनेनंतर गांधीजींनी ‘ही सर्वस्वी माझी चूक आहे, मी अहिंसा जनतेमध्ये पूर्ण रुजवण्यात कमी पडलो!’ असं जाहीर केलं आणि परिमार्जनार्थ पाच दिवसांचा कडकडीत उपास जाहीर केला. गांधीजींचा आंदोलन मागे घेण्याचा मानस असल्याचं कळताच देशभरचे नेते, कार्यकर्ते त्यास राजी होईनात. तुरुंगात असलेले नेहरू पिता-पुत्र, सुभाषबाबूंसारखे अनेक नेते, बाहेर असलेले रामप्रसाद बिस्मिलसारखे क्रांतिकारक व अनेक कार्यकर्ते आंदोलन चालू ठेवण्याबाबत आग्रही होते. त्या सर्वाशी मतभेद प्रकट करत गांधीजींनी १२ फेब्रुवारीस आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

कोणत्याही नेत्यासाठी जनतेचा पाठिंबा हाच नेतृत्वाचा पाया आणि निकष असतो. जनता शांत व समाधानी असेल तर जनतेला कोणाही नेत्याची आठवणही होत नाही, कारण त्याची गरजच नसते. उलट, जनता जर काही कारणानं असंतुष्ट, असमाधानी, चिडलेली असेल तर मात्र ते कारण नाहीसं करून शांतता व समाधान मिळवण्यासाठी जनतेला कोणा ना कोणा नेत्याची गरज भासते. म्हणून सर्वच नेते जनतेच्या क्षोभाला आपलंसं करून त्यात स्वत:चं नेतृत्व साकारू पाहतात. अन्यथा जनता शांत असेल तर तिच्यात काहीतरी क्षोभ, असंतोष वा द्वेष निर्माण करून त्यात आपलं नेतृत्व रुजवू पाहतात. परिणामत: आंदोलनात जनक्षोभाचा डोंब उसळणं, त्या जनक्षोभामुळे काही हिंसाचार व हानी होणं, विशेषत: शत्रुपक्षाची वित्तीय किंवा मनुष्यहानी होणं, या बाबी पूर्वीपासून आंदोलनाच्या यशाची चिन्हं मानली जातात. शत्रूची कुठलीही हानी होऊ न देता, शत्रूबद्दल द्वेष न पसरवता आंदोलन उभारणं, द्वेष-हिंसा नाकारत राजकारण करणं आणि आपल्याच कार्यकर्त्यांशी मतभेद जाहीर करणं हा जणू नेत्याचा आत्मघातच! एकंदरीत जगात लोकशाहीची रुजुवात झाल्यापासून जनमताच्या राजकारणात विरोधकांबाबत द्वेष-हिंसा पसरवणं आणि स्वकार्यकर्त्यांचं लांगुलचालन करणं या बाबी अपरिहार्य असल्याचं जगभर मानलं जातं. पहिल्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून आजतागायत जगभरात कुठल्याही आंदोलनाचं किंवा नेत्याचं फारसं वेगळं चित्र नाही. अपवाद फक्त ‘असहकार आंदोलन’ आणि म. गांधी ! तथापि हा अपवादाचा किंवा अन्य नेत्यांशी मतभेदाचा प्रसंग गांधीजींच्या आयुष्यात काही एकमेव नाही, कित्येक आहेत. पण त्या साऱ्यांत एक वेगळं, चमत्कृतीपूर्ण वैशिष्टय़ होतं.     

ज्या लोकप्रिय मोठय़ा नेत्यांशी गांधीजींचे उघड राजकीय मतभेद होते ते सर्वज्ञात आहेतच. याखेरीज बहुतांश सशस्त्र क्रांतिकारकांचेदेखील गांधीजींशी मतभेद होते. भगतसिंह-चंद्रशेखर आझाद, त्यांचे सहकारी, लाहोर-कांडातील क्रांतिकारी पृथ्वीसिंह आझाद आणि सॉंडर्स खून व भुसावळ-कांडातील सहभागी भगवानदास माहौर, सदाशिव मलकापूरकर हे सारे अर्थातच भगतसिंहाप्रमाणेच कट्टर कम्युनिस्ट होते. या साऱ्यांना अहिंसा आणि सत्याग्रहाचे मार्ग निर्थक, निष्फळ वाटत. सबब यांचेही गांधीजींशी तीव्र मतभेद होतेच. गांधीजींचे स्वपक्षांतर्गतदेखील अनेक नेत्यांशी-कार्यकर्त्यांशी, अगदी निकटच्या नेत्यांशीदेखील अनेकदा तीव्र मतभेद झाले होते. गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतल्यामुळे हताश होऊन चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू या ज्येष्ठांनी वेगळा ‘पूर्ण स्वराज’ गट स्थापन केला, तर रामप्रसाद बिस्मिल व सच्चिन्द्रनाथ सन्याल यांनी तरुणांचा ‘हिंदूस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ (पुढे भगतसिंहांनी या नावात बदल करून संघटनेस ‘हिंदूुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ हे नाव दिलं.) हा गट स्थापन केला. असहकार आंदोलन मागे घेण्याविषयी मतभेद असतानाच ‘काँग्रेस सेवा दल’ स्थापन करण्याविषयीदेखील नेहरू-बोस या जोडगोळीशी गांधीजींचे मतभेद झाले होते. नंतरच्या काळात पुन्हा गांधीजींशी मतभेद झाल्यावर सुभाषबाबूंनी  स्वतंत्रपणे फॉरवर्ड ब्लॉक आणि आझाद हिंद सेना स्थापन केली. असे मतभेद सर्वत्र सर्वच नेत्यांचे असतात. त्यात काहीही वेगळेपण, वैशिष्टय़, चमत्कृती नाही. पण मतभेद झालेल्या /असलेल्या सर्व नेत्यांमध्ये एका बाबतीत मात्र ठाम एकमत होतं. त्या सर्वानाच गांधीजी हेच भारताचे एकमेव सर्वोच्च नेते वाटत होते..  हे वेगळं होतं!! त्या सर्वाना ते ‘आपले बापू’ वाटत होते, हे वैशिष्टय़ होतं. बहुतांश सशस्त्र क्रांतिकारकांना काही काळानंतर बापू आणि त्यांचा मार्गच योग्य वाटू लागला, हा तर जणू..

गांधीजींशी मतभेद झाल्यानं १९३९ साली सुभाषबाबू काँग्रेसमधून बाहेर पडत असतानाच त्यांनी कम्युनिस्ट व डाव्यांच्या बरोबर ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची व पुढे २१ ऑक्टोबर १९४३ रोजी ‘आझाद हिंद ’ सरकार व सेनेची स्थापना केली. तथापि ‘आझाद हिंद ’च्या स्थापनेपूर्वी २ ऑक्टोबर रोजी बँकॉक रेडियोवरून त्यांनी गांधीजींना वंदन केलं आणि ‘आझाद हिंद ’साठी काँग्रेसचा चरखांकित ध्वज वापरण्यासाठी गांधीजींची संमतीही मिळवली होती. आझाद हिंद सेनेची पहिली तुकडी रंगूनला १५ मार्च १९४४ रोजी पोहोचली तेव्हा तिचं नाव त्यांनी ‘गांधी ब्रिगेड’ आणि दुसऱ्या तुकडीचं नाव ‘नेहरू ब्रिगेड’ ठेवलं. (वि. स. वाळिंबेलिखित ‘नेताजी’- पृ. ४८३) आणि ही फौज इम्फाळकडे कूच करण्यापूर्वी रंगून रेडियो केंद्रावरून ‘राष्ट्रपिता, हिंदूस्थानच्या मुक्ततेसाठी आम्ही आरंभलेल्या या पवित्र युद्धात आम्हाला आपले आशीर्वाद हवेत!’ (‘नेताजी’- पृ. ४८५) अशी साद घालताना गांधीजींसाठी प्रथमच ‘राष्ट्रपिता’ हे संबोधन सुभाषबाबूंनी वापरलं. (यानंतरच गांधीजींना सर्वत्र ‘राष्ट्रपिता’ संबोधलं जाऊ लागलं.)  लाहोरकांडात शिक्षा झालेले, गांधींच्या मार्गाला फोल मानणाऱ्या चंद्रशेखर आझादांचे सहकारी (मूळ गदर पार्टीचे) पृथ्वीसिंह आझाद, भगतसिंहविरुद्ध साक्ष देणाऱ्या फितुराला कोर्टातच गोळ्या घालताना पकडले गेलेले, गांधीजींच्या मार्गाला व्यर्थ मानणाऱ्या ‘एचएसआरए’चे भगवानदास माहौर आणि सदाशिव मलकापूरकर हे सारे सशस्त्र क्रांतिकारक अंदमानात काळ्या पाण्याची सजा भोगून आल्यावर गांधीजींचे अनुयायी बनले. असहकार आंदोलन मागे घेतल्यामुळे गांधीजींवर रागावून काँग्रेस सोडल्यावर ‘हिंदूस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ स्थापन करून ‘काकोरीकांडात’ दोषी ठरलेल्या रामप्रसाद बिस्मिल या सशस्त्र क्रांतिकारकानं आपल्या ‘आत्मकथा’ या आत्मचरित्राचा अखेरचा भाग ‘अंतिम समय कि बातें’ हा फाशी जाण्यास ७२ तास उरले असताना फाशी कोठडीत लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘क्रांतिकारी दल का संगठन कर के व्यर्थ में नवयुवकों के जीवन को नष्ट करना और शक्ति का दुरुपयोग करना बडी भारी भूल है। नवयुवकों को  मेरा अंतिम संदेश यही है कि वे रिव्हाल्वर या पिस्तोल को अपने पास रखने की इच्छा त्यागकर सच्चे देशसेवक बने।’’ (पृ. १०४)  ‘‘..आज १६ दिसंबर १९२७ को निम्नलिखित पंक्तियों का उल्लेख कर रहा हूं, जबकि १९ दिसंबर १९२७ को साढे छ: बजे प्रात:काल इस शरीर को फांसी पर लटका देना निश्चित हो चुका है। अब देशवासियों से यही प्रार्थना है कि यदि वे हम लोगों के फांसी पर चढम्नेसे जरा भी दु:खित हों, तो उन्हें यही शिक्षा लेनी चाहिए कि सभी हिंदू-मुसलमान तथा सब राजनैतिक दल एक होकर काँग्रेस को अपना प्रतिनिधी मानें। जो काँग्रेस तय करे, उसे सब पूरी तौर से मानें और उस पर अमल करें।’’ (पृ. १११)

नरहर कुरुंदकर आपल्या ‘शिवरात्र’ या पुस्तकात लिहितात, ‘गांधींच्या अनुयायांत सर्वात निष्ठावंत सरदार पटेल होते आणि ते कधीच अहिंसावादी नव्हते. त्यांची भाषाही अहिंसक नव्हती. १९३८ पर्यंत सुभाषचंद्र गांधीजींचे अनुयायी होते. तेही अहिंसक नव्हते. जयप्रकाश, लोहिया, पटवर्धन ही समाजवादी मंडळी गांधीजींची अनुयायीच होती; पण त्यांची अहिंसेवर श्रद्धा नव्हती. इ. स. १९४२ पर्यंत कम्युनिस्टांनीही १८ वर्षे गांधींच्या नेतृत्वाखालीच काढली, तेही कधी अहिंसक नव्हते.’’ (पृ. २६) ‘‘इ. स. १९२० नंतरचे जे सशस्त्र क्रांतिकारक होते त्यांनीही आपली संघटना काँग्रेस मानली होती, नेते गांधींनाच मानले होते.’’ (पृ. २७)  सशस्त्र क्रांतीवर विश्वास असणाऱ्या अनेकांची शेवटी गांधीजींच्या नेतृत्वावर किंवा त्यांच्या अहिंसक मार्गावर श्रद्धा बसली होती.. हा जणू चमत्कारच होता!

सगळी जनता आणि जनतेचे सगळे नेते जर गांधीजींना आपला नेता मानत होते, तर मग त्यांचा खून करून टाकण्याइतका त्यांच्याविषयी द्वेष बाळगणारे विरोधक कोण होते? गांधीजींचा खून कोणी केला ?   

१९३४ सालापासून गांधीजींच्या खुनाचे एकूण सहा वेळा प्रयत्न झाले. त्यातल्या दोन प्रयत्नांत मारेकरी सापडले नाहीत. उर्वरित चारही प्रयत्न एकाच टोळीने केले होते. जुलै १९४४, सप्टेंबर १९४४ मध्ये या टोळीनं केलेल्या खुनाच्या प्रयत्नांच्या वेळी गांधीजींनी मारेकऱ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला होता. पण मारेकरी पळून गेला. यानंतर गांधीजींना अनेकांनी सुरक्षा व्यवस्था बाळगण्याचं सुचवलं होतं. पण गांधीजींनी त्यास स्पष्ट नकार दिला. याच खुनी टोळक्यानं २० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची प्रार्थना सभा सुरू असताना बॉंब टाकला, पण तो काही अंतरावर फुटल्यामुळे गांधीजी बचावले. तथापि गांधीजींनी न डगमगता लोकांना शांत करून सभा चालू ठेवली. तेव्हा सर्व नेत्यांनी व अनुयायांनी गांधीजींकडे सुरक्षा व्यवस्था घेण्याचा पुन्हा आग्रह धरला. परंतु गांधीजी बधले नाहीत आणि त्यांनी हल्ल्याचा गवगवा करण्यासही मज्जाव केला. चिलखताचा तर प्रश्नच नव्हता. सुरक्षा व्यवस्थादेखील नाकारत ते निधडेपणानं जनतेत वावरत राहिले. अखेर ३० जानेवारी १९४८ रोजी बॉंब-पिस्तुलांनी सज्ज असलेल्या आठ जणांच्या याच टोळीनं सुरक्षाविरहित असलेल्या नि:शस्त्र, उघडय़ा, ७८ वर्षांच्या या वृद्धाचा खून करण्यात यश मिळवलं. या मारेकऱ्यांपैकी कोणीही स्वातंत्र्यासाठी हिंसक किंवा अहिंसक मार्गानं इंग्रजांविरुद्ध लढला दिला नव्हता. मारेकऱ्यांपैकी कोणीही इंग्रजांविरुद्ध कधीही कोणतंही शस्त्र चालवलं नव्हतं. ‘शिवरात्र’मध्ये नरहर कुरुंदकर पुढे लिहितात, ‘‘अहिंसेने असो की हिंसेने असो, जे इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते त्यांचे नेते गांधीजीच होते. जे इंग्रजांविरुद्ध लढत नव्हते, ज्यांना सरहद्द प्रांतात मुस्लीम लीगशी हातमिळवणी करून काँग्रेसचा पाडाव करण्यात कधीच संकोच वाटला नाही, जे जनतेची चळवळही करत नव्हते, लढतही नव्हते, फक्त हिंसेच्या आवश्यकतेवर व्याख्याने देत होते, अशी क्रियारहित माणसे फक्त गांधीजींची विरोधक होती!’’ (पृ. २७) ही खुनी टोळी कुरुंदकर निर्देशित करत असलेल्या इंग्रजांविरुद्ध न लढलेल्या ‘क्रियारहित’ माणसांचीच होती. हिंसेची आवश्यकता त्यांना फक्त एका अहिंसकाला संपवण्यासाठी भासली होती. कुरुंदकर पुढे (पृ. ३३) लिहितात, ‘त्यांच्या पिस्तुलांना कासीम रिझवी दिसला नाही. निजाम व जिना दिसले नाहीत. त्यांच्या पिस्तुलातील गोळी १९२० नंतर इंग्रजांच्याही विरोधी झाडली गेली नाही. जणू ही गोळी फक्त गांधींसाठी होती!’

चौरीचौरा घटनेत जे पोलीस होरपळून मेले त्यात एकही इंग्रज नव्हता. सारे भारतीय होते. त्यात १७ हिंदू आणि ५ मुस्लीम होते. चौकी पेटवून पोलिसांना जाळण्याबद्दल ज्या १९ जणांना फाशी देण्यात आलं, त्यातही कोणी इंग्रज नव्हते, सारे भारतीयच होते. त्यात १६ हिंदू आणि ३ मुस्लीम होते. अशा २२ जीव होरपळून मरण्याच्या भीषण घटनेनंतर उपास घडणं योग्य मानावं की त्या घटनेला ‘आंदोलनाचं यश’ समजणं? १२ फेब्रुवारीला आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयाला मोठं मानावं की ४ फेब्रुवारीला २२ जण होरपळून मेले, या घटनेला? ..या प्रश्नांच्या उत्तरात गांधीजींचं माहात्म्य आहे!  कुरुंदकरांच्या शब्दांत ‘क्रियारहित’ असलेल्या माणसांचे वारसदार कदाचित १२ फेब्रुवारीचं माहात्म्य न उमगल्यामुळे ४ फेब्रुवारीचा शताब्दी ‘इव्हेन्ट’ या वर्षी ‘साजरा’ करतील! भारताच्या स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण झाली म्हणून या वर्षांला ‘आझादी ७५’ म्हणत साजरं केलं जात आहे. ३० जानेवारीला गांधीजींच्या हत्येलाही  ७४ वर्ष पूर्ण होत आहेत. कुणास ठाऊक, इंग्रजांविरुद्ध न लढलेल्या ‘क्रियारहितांचे’ वारसदार कदाचित वर्षभर ‘गांधीहत्या ७५’देखील साजरा करतील!!

Story img Loader