कृष्णात खोत

मी लिहीत नव्हतो तेव्हाची गोष्ट..

मी एकोणीसशे नव्वदला क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या संस्थेच्या वतीने धरणग्रस्तांच्या मुलांसाठी चालवलेल्या वसतिगृहाचा रेक्टर म्हणून नोकरी करीत होतो. त्यावेळी वसतिगृहात असणारी धरणग्रस्तांची मुले आपल्या व्यथा सांगत. अण्णांनी धरणग्रस्तांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय केली होती. यातल्या काही मुलांची गावे धरणात गेलेली. त्याचे पुनर्वसन झालेले, पण काहींची गावे अजून धरणाच्या वरच होती. त्या गावांमध्ये मी बऱ्याचदा गेलेलो होतो. त्यांना बाजारासाठी किमान पंधरा-वीस किलोमीटर चालत बाजाराच्या गावी यायला लागत असे. शनिवारच्या दिवशी या मुलांचे पालक बाजारासाठी आले की मुक्कामाला आणि आपल्या मुलांना भेटण्यासाठी वसतिगृहात येत. त्याशिवाय त्यांना राहण्याचे ठिकाणच नव्हते. एवढया लांबचा पायी प्रवास. त्यांना एक मुक्काम करावाच लागत असे. त्यांच्या बोलण्यात अनेक गोष्टी यायच्या. मी त्यांच्याबरोबर धरण आणि त्यांचे राहणे, याबद्दल बोलायचो. ते मला अनेक गोष्टी सांगत. त्यांचे नातेवाईक लांब कुठल्या तरी गावाला पुनर्वसन होऊन गेलेले. त्यांच्या आठवणी ते काढत. आपल्यालाही गावातनं घालवण्यासाठी अधिकारी कसे दमवतात, ते बोलत. पुनर्वसन झालेल्या नातेवाईकांचे हाल सांगत. म्हाताऱ्या माणसांच्या आपले गाव न सोडण्याच्या गोष्टी बोलत. आपल्याही तेच वाटयाला येणार, अशी भीती त्यांच्या बोलण्यात मला दिसायची. आणि अधिकारी आपल्याला जंगलातल्या वस्तूंसाठी कसे दमवतात, आपल्याशी कसे वागतात, तेही सांगत. माझ्याकडे एक विद्यार्थी होता जो वयाने माझ्यापेक्षाही मोठा. तो मला खूप गोष्टी सांगायचा. आता तो धरणग्रस्त संघटनेचं काम करतो. त्याने मला त्याच्या धनगर वाडयावर एकदा नेले. त्यावेळी अस्वलाने पायाचा लचका तोडलेला एक जण धोतराच्या फडक्याने पाय बांधून बसलेला होता. कोणत्याही औषध उपचाराशिवाय तो जंगलातनं फिरत होता. आपली दररोजची कामे करत होता. त्यानेच मला वाघाच्या, कोल्ह्याच्या अगदी रंजक कथा सांगितलेल्या होत्या.

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
Actress Vidya Balan explanation of the movie Bhulbhulaiyaa 3
डझनावारी चित्रपटांतून नकाराचा अनुभव; ‘भुलभुलैया ३’ चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनचे स्पष्टीकरण
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
Marathi Actress tejaswini pandit sister Poornima Pullan gave birth to a baby girl
“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, अभिनेत्री तेजस्विनी पंडित झाली मावशी; म्हणाली, “लक्ष्मी आली”
diwali muhurat trading
विश्लेषण: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? यंदा कधी? त्याचे महत्त्व काय?

त्यानंतर १९९३ ला ती नोकरी सोडून मी माझ्या गावाजवळच्या शाळेत आलो. पण त्या भागात मला सतत जावेसे वाटे. ज्या-ज्या वेळी जात असे त्यावेळी मी धरणावर, त्याच्या आत जंगलात जात असे. नंतर या धरणावरच्या जंगलात असणाऱ्या वाडया-पाडयांचा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर त्यांना तिथून उठवलेल्या गोष्टी कळत गेल्या. मी परत अनेकदा या उठवलेल्या गावांना भेटून आलो. त्यांची पडझड बघून अस्वस्थ वाटू लागले. ती मुले- माणसे दिसेनाशी झाली. त्यांची अर्धवट पडलेली घरे, त्यांच्या जगण्याच्या खाणाखुणा दिसू लागल्या. वाडया-पाडयावरची माणसे मी बघितली होती. त्याचे जगणे बघितले होते. मला त्यांच्या जगण्याच्या मागे राहिलेल्या खाणाखुणा बघून हलून जायला व्हायचे. ती माणसे जशीच्या तशी दिसायची. आणि पुढे काही वर्षे माझा हा परिपाठच झाला. प्रत्येक वर्षी एकदा तरी मी या उठलेल्या वाडयापाडयावर जात असे. त्यांची पडझड पाहत असे.

आणखी वाचा-गजराजाचा पहावा प्रताप!

मी लिहू लागल्यानंतरची गोष्ट..

माझी पहिली कादंबरी आली. मी किमान वर्षांतून एकदा तरी या धरणग्रस्त भागात नोकरी सोडून आल्यानंतर अनेकदा मोठया सुट्टीत जात होतो. असाच नेहमीसारखा धरणाच्या वर फिरायला गेलेलो होतो. नेहमीप्रमाणे माझे हे सगळे बघून अस्वस्थ होणे होतेच. दिवसेंदिवस जुन्या वाटा नष्ट होत निघालेल्या दिसत होत्या. नव्याने जंगल खात्याने केलेल्या वाटा दिसत होत्या. पण अगदी त्या मूळ रहिवाशांना आपल्या मोडलेल्या गावाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागत असे. हे सगळे पाहत होतो. वरती एक धनगरवाडा तेवढा शिल्लक होता. त्यांनाही उठवणार आहेत, हे ऐकायला मिळत होते. असाच एकदा फिरत असताना तेथे एक म्हातारा मला भेटलेला. त्याला मी सारखा भेटायला जात असे. तो आता थकला होता. त्याचे कोणीही नातेवाईक आता जंगलात राहिलेले नव्हते. जंगल सगळे रिकामे झाले होते. सगळी कुठल्या कुठे गेली होती. माझे काम झाले की मी संध्याकाळी रोज फिरायला बाहेर पडत असे. कधीकधी धरणाच्या वर असलेल्या जंगलात जाई. माझ्याबरोबर असणारे काही जण मला या धरणाच्या त्यांनी ऐकलेल्या, बघितलेल्या अशा अनेक गोष्टी सांगत. धरणाच्या पाण्यात बुडालेल्या गावाच्या कथा, जंगलातनं उठवलेल्यांच्या गावांच्या कथा, माणसांच्या, जनावरांच्या कथा. प्रत्येक वेळी जुन्यात नवीन भर पडत असे. मला सतत मी वसतिगृहात रेक्टर म्हणून काम करत असताना तिथल्या मुलांनी सांगितलेल्या अनेक ऐकलेल्या गोष्टी नव्याने आठवत. ती मुले, ती माणसे दिसत. त्यांना पुन्हा भेटावे असे वाटे. आता जंगल फार वाढले आहे, असे लोक बोलत. त्याच्यावरचा पहाराही वाढलेला मी बघत होतो.

एके दिवशी मी असाच माझे काम संपवून तिकडे या अभयारण्यात गेलो. त्या म्हाताऱ्याला भेटायचे नि यायचे असा बेत होता. मला जाता-येता अनेकदा सोडलेल्या म्हशी दिसायच्या. माझे फारसे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. असतील धरणाच्या खाली असणाऱ्या गावातल्या लोकांच्या चरत आलेल्या, असा माझा समज होता. पण इतक्या आत जंगलात गाववाले आपली जनावरे सोडणार नाहीत. त्या दिवशी मला लांबवर इतर वेळी दिसायच्या तशाच म्हशी दिसल्या. त्या एकसारख्या एकत्र कळप करून, पाठमोऱ्या होत माझ्याकडे एकटक बघत होत्या. या पाळीव म्हशी अशा आपल्याकडे का बघतायत? हा प्रश्न मला पडला. माझ्या नि बरोबरच्या माणसाच्या हालचालींकडे त्यांचे बारीक लक्ष होते. त्यांच्या अंगावरचे केस भरपूर वाढलेले. जवळ जाण्याची भीती वाटत होती. त्यांच्या आमच्यावरच्या नजरा हलत नव्हत्या. या आपल्याकडे अशा का बघतात? या राहतात कोठे? यांना बाकीच्या प्राण्यांचे भय वाटत नसेल? असे अनेक प्रश्न घेऊन मी त्या म्हाताऱ्याला भेटलो. त्याने सांगितले, या म्हशी वरच्या- आता गावे नसलेल्या गावातल्या आहेत. कुठल्या कुठल्या गावातल्या एक जागी आल्यात, का एका गावातल्या आहेत, ते माहीत नाही. पण त्या माणूस नावाच्या जातीला बघितले की अशाच बिथरून जातात आणि अशाच एकसारख्या बघतात. माणसाची सावली पडू देत नाहीत. आणि माणसाने धाडस करायसारखे त्यांचे आता वागणे राहिले नाही. पुनर्वसन झाले त्यावेळी यांची सोय कुठे करायची म्हणून ही भाकड जनावरे माणसे इथेच सोडून परमुलखात गेली. ती भाकड जनावरे आता दूधदुभत्याची झाली. पण आता ती रानटी जनावरागत माणसांना आपल्याजवळ फिरकू देत नाहीत. हे त्या म्हाताऱ्याचे बोलणे आणि त्या जनावरांचे वागणे माझ्या डोक्यात अनेक दिवस घोंगावत होते. मला वाटते हेच बीज माझ्या लिहित्या मनाच्या डोक्यात पडले. मला हा पाळीव प्राण्याचा रानटी होण्याचा उलटा प्रवास खूप महत्त्वाचा वाटायला लागला. आणि पुढे मी या आशयाची एक ‘वसप’ नावाची कथा मौज दिवाळी अंकात लिहिली. ही कथा अनेकांना आवडलेली कळत होते. साहित्य क्षेत्रातले अनेक मननीय लेखक, समीक्षक मला भेटल्यावर हा कादंबरीचा विषय आहे, असे सांगत होते.

आणखी वाचा-धरणग्रस्तांची शोकांतिका!

पण या कथेचा संदर्भ म्हणून विज्ञान लेखक सुबोध जावडेकर आणि डॉक्टर आनंद जोशी (न्यूरो सर्जन) यांनी लिहिलेल्या ‘मेंदूतला माणूस’ या पुस्तकातल्या एका संशोधनपर लेखासाठी त्यांना उपयुक्त वाटला आणि मला त्यांनी फोनवरून संपर्क केला. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला एक वेगळीच दिशा या लेखनासाठी मिळाली. त्यावेळेपासून मी याचा आणखी विचार करायला लागलो. त्यांनी उत्क्रांतीबाबत नव्या दिशेचा शोध घेताना असे लिहिले आहे की, प्राणी जन्माला येताना शरीरात आवश्यक तसे बदल करून जन्माला आला खरा; पण तरीही परिस्थिती बदलली, मूळ पदावर आली तर पूर्ववत होण्याची त्यांच्यात असलेली क्षमता ते प्राणी नेहमी टिकवून धरतात. समजा, काही अघटित घडले, (अगदी पृथ्वीवरून मानवजात नामशेष झाली आणि हे अजिबात अशक्य नाही!) आणि परत जंगलात जावे लागले, तर त्याची तयारी होती! तशी सोय निसर्गाने त्याच्या मेंदूच्या गर्भात गुपचूप करून ठेवलेली आहे.

उत्क्रांत होत असताना प्राणी चार पावले पुढे आलाय खरे, पण आवश्यकता पडली तर दोन पावले मागे जायची पाळी आली, तर ते शक्य असावे, ही सोय निसर्गाने करून ठेवली आहे आणि ती करताना निसर्गाने शोधून काढलेला हा मार्ग खरोखरच अजब आहे. हे रानमांजराबाबत त्यांचे संशोधन होते. त्या संदर्भात त्यांनी मौज अंकातल्या या कथेचा आधार घेतला. ते लिहितात, ‘‘रानमांजराच्या मेंदूमध्ये निसर्गाने करून ठेवलेली ही सोय इतर प्राण्यांमध्येही काही प्रमाणात असते का? शक्य आहे!

दहा-बारा वर्षांपूर्वी तिथे धरण बांधताना काही गावे उठवावी लागली. गावातल्या लोकांनी पाळलेल्या, पण भाकड असणाऱ्या म्हशी गाव सोडताना तिथेच सोडून दिल्या होत्या. काही वर्षांनंतर परत आणायला ते गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्या म्हशी आता पाळीव राहिल्या नव्हत्या. त्यांच्या रानम्हशी झाल्या होत्या. गोलाकार रिंगण करून रेडकांना मध्ये घेऊन त्यांचे संरक्षण करणे, रानकुत्र्यांसारखी वन्य जनावरे आली, तर त्यांच्यावर शिंगांनी हल्ला करून त्यांना पळवून लावणे, अशासारख्या गोष्टींमध्ये त्या तरबेज झाल्या होत्या. त्या पाळीवच्या रानटी होत दोन पावले मागे जाऊन पुन्हा जंगलातले जीवन जगण्यासाठी तयार झाल्या होत्या का?’’

आणखी वाचा-काश्मीर.. ३७० कलम दूर केल्यानंतरचे!

हे वाचून माझा उत्साह वाढला आणि मी या कथेचा कादंबरीच्या अंगाने आणखी जास्त विचार करू लागलो. आपल्या लेखनाचा असा विचार आणि नवउत्क्रांतीवादाच्या या नव्या दिशेने, नव्या अंगाने केला जातो, ही गोष्ट मला फारच महत्त्वाची वाटू लागली. माझ्याकडे बीज होते. त्या म्हाताऱ्याचे बोलणे आणि त्यात अशा एका नव्या विचाराची भर पडलेली आणि मग मी या लेखनाचा कादंबरीच्या अंगाने तपशिलाचा आणि अन्य गोष्टींचा शोध घेऊ लागलो. ही कादंबरी म्हणजे वसतिगृहाचा रेक्टर असतानाचा अनुभव मला या संदर्भात उपयुक्त वाटू लागला.

परत परत मी हा भाग धुंडाळू लागलो. त्या परिसराचं सुनसानपण, याची घालमेल कागदावर येताना आणखीन अशांत होऊ लागलो. या सगळयाचा सारांश काढता येतो का ते बघू लागलो. या सारांशाच्या भयाण शांततेने माझ्यात कोलाहल निर्माण झाला. यातून मी वेगळा होऊच शकलो नाही. एका लोककथेत ‘ग्रिबुय्य’ नावाचे एक पात्र आहे. पावसात भिजून ओलेचिंब होण्याचे टाळण्यासाठी ‘ग्रिबुय्य’ नदीत उडी घेतो! लेखकाच्या लेखनाचे मूळ या ‘ग्रिबुय्य’च्या नदीत उडी मारण्यात आहे. तशी माझी अवस्था झाली. हा माझा पासपोर्ट होता. माझ्या आहे त्या जगातून एका दुसऱ्या जगात, की जे प्रत्येकाच्या आत वसलेले असते त्यात प्रवेश करण्याचा.

आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्याला मोकळी हवा अजूनही हवीहवीशी वाटते. मोकळे आकाश हवे वाटते. आपली माती हवी वाटते. आपल्या मुळांचा शोध घ्यावा वाटतो. आपण या गोष्टींसाठी व्याकूळ होतो. या हरवलेल्या गोष्टींसाठी भावूक होत असतो. हे आपल्या हातातून कधी निसटून गेले आणि आपले विस्थापन कधी झाले, हे कळत नाही.

आणि मला आपण ज्या काळातून जात आहे त्या काळाचे स्थलांतर, विस्थापन हे सर्वात मोठे रूपक आहे, हे हिंदीतील कवी समीक्षक विजयकुमार म्हणतात तेच दिसू लागले. किंबहुना ते जे म्हणतात, माणसाचे त्याच्या स्वत:च्या भूतकाळापासून मुळांपासून परंपरा, परिवेश, भाषा, संस्कृती, नातिगोती, गल्ल्याबोळांतून आणि शहरांतून विस्थापन होतेय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, त्याचे त्याच्या स्मृतींपासून विस्थापन होतेय. आमच्या समकालीन अवस्थेत प्रत्येक असामान्य कलाकृतीमध्ये लेखक प्रामुख्याने एक शरणार्थी आहे. तो दारोदार भटकणारा एक निर्वासित आहे. जो आपल्या संदुकांसह, सामानासह खूप गल्लीबोळांतून / शहरांतून आणि काळाला घेऊन जीवनमूल्यांना आणि असंख्य विश्वासांना आपल्या खांद्यावर वाहून नेतोय. या सगळया गोष्टी त्याला एक सजीव आणि स्पंदनशील माणसाच्या रूपात व्यक्त करत आल्या आहेत. सगळीकडे असत्य, विकृती आणि तोडफोडीच्या विध्वंसक परिस्थितीत तो आपले हे सामान वाचवू पाहातोय. इथल्या शक्तिकेंद्रांचं प्रचारतंत्र एवढं भयावह आहे की ते नाहीशा होणाऱ्या सर्व गोष्टींना एका सहजप्रक्रियेत रूपांतरित करत आहे. प्रत्येक मूलभूत संकट आमच्यासाठी केवळ एक ‘वस्तुस्थिती’ होऊन जातेय. आम्ही सारे काही विस्मृतीत घालवण्यासाठी शापित झालो आहोत. अशा परिस्थितीत जर एखादी कलाकृती आमच्या कुठल्याशा राहून गेलेल्या सामानाकडे, हरवलेल्या वस्तूंकडे निर्देश करत असेल, तर विजेच्या कल्लोळासारखा हा अनुभव असतो आणि आतापर्यंत या जगाच्या पूर्णत्वाचे जे चित्र आम्हाला दाखवले जात होते ते किती खोटे आणि विश्वासघातकी होते याची कल्पना येते. एक असामान्य कलाकृती आम्हाला ढासळलेल्या भग्नावशेषातून सत्याची पुनर्रचना करण्याचे प्रोत्साहन देते. त्यातला आशय नेहमी आठवण करून देतो की, मी कुठून-कुठून कशाप्रकारे विस्थापित होत राहिलोय. आम्हाला या जगाची आपल्या पद्धतीने पुनर्रचना करायची असते. ही जागृत झालेली इच्छा आपल्या जीवनातील एक मूलभूत आणि अनन्यसाधारण गोष्ट असते.

आणि ते म्हणतात, मला बाहेर पडायचेय आणि माझ्या विस्मृतीत गेलेल्या घराकडे परत जायचेय. ‘रिंगाण’ कादंबरीतला देवाप्पा आणि म्हैस हीच गोष्ट अधोरेखित करत गेली. याच आपल्याजवळ असणाऱ्या आदिशक्तीची अंत:प्रेरणा म्हशीला मिळालेली. त्यानेच तिची शक्ती अनेक पटींनी वाढत गेली म्हणूनच ती स्वत:ला पुन:स्थापित करू शकली. हीच नवउत्क्रांतवादाची दिशा आहे. देवाप्पाला या लढाईत उतरावे लागणार आहे, हरला तरी नष्ट झाला तरी परत परत ही लढाई लढत राहण्यातच तो या नव्या दिशेने उत्क्रांत होत जाणार आहे.

मला वाटते, कोणत्याही लेखकाने कोणतीही गोष्ट नष्ट होण्याच्या काळजीपेक्षा ती गोष्ट नष्ट होण्यापर्यंतच्या काळजीचे वर्तमान अधोरेखित करावे. हे काळजीचे वर्तमान अधोरेखित करण्याची क्षमता मला वाढवता येईल का, याचा सातत्याने विचार करावा. आणखीन एक, कादंबरी हा निव्वळ वास्तवाची नव्हे तर अस्तित्वाची तपासणी करणारा श्रेष्ठ साहित्य प्रकार आहे आणि कादंबरीकार हा मानवी अस्तित्वाचा नकाशा तयार करत त्याच्या शक्यतांचा शोध घेणारा शोधक..

krushnatkhot767@gmail.com