न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सव्वाशेव्या स्मृतिवर्षानिमित्त साधना प्रकाशनाने ‘भारतीय अर्थकारणावरील निबंध’, ‘धार्मिक व सामाजिक सुधारणा’ आणि ‘संकीर्ण निबंध’ असे तीन ग्रंथ नुकतेच उपलब्ध करून दिले आहेत. रानडे यांची सर्वस्पर्शी प्रतिभा आणि विविध विषयांचा व्यासंग यांचा प्रत्यय देणाऱ्या या ग्रंथांविषयी…
ज्यांना महात्मा गांधी गुरू मानत त्या गोपाळ कृष्ण गोखलेंचे गुरू म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महाराष्ट्रात अठराव्या शतकात जे प्रबोधनयुग अवतरले त्याचे हे एक महत्त्वाचे प्रवर्तक. अशा विद्वानाच्या १८९८, १९०२ आणि १९१५ मध्ये प्रकाशित झालेल्या तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचा आजवर मराठीत अनुवाद झालेला नसावा; आणि विशेष म्हणजे त्यांची मूळ इंग्रजी आवृत्तीही आज उपलब्ध नसावी याचे आश्चर्य वाटते. सुदैवाने ही एक मोठी उणीव साधना प्रकाशनाने नुकतीच भरून काढली आहे. अवधूत डोंगरे यांनी ‘भारतीय अर्थकारणावरील निबंध’, ‘धार्मिक व सामाजिक सुधारणा’ आणि ‘संकीर्ण निबंध’ या शीर्षकांखाली या तीन पुस्तकांचा अनुवाद केला असून, त्यांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी आणि अभय टिळक यांच्या विवेचक प्रस्तावना लाभल्या आहेत. रानडे यांच्या सव्वाशेव्या स्मृतिवर्षानिमित्त आखलेल्या या प्रकल्पाची विनोद शिरसाठ यांनी लिहिलेली पार्श्वभूमी तिन्ही पुस्तकांत सुरुवातीला समाविष्ट केली आहे. त्यात जर्मन भाषेच्या अभ्यासक नीती बडवे आणि रसायनशास्त्रज्ञ सुरेश गोरे यांनी प्रकल्पासाठी आर्थिक मदत कशी केली हेही सांगितले आहे. चांगल्या साहित्यिक कामासाठी पुरेशी आर्थिक मदत देणारे आज समाजाच्या मध्यमवर्गातूनही उभे राहत आहेत ही मोठी आश्वासक घटना आहे.
दणकट शरीरयष्टीच्या रानडे यांना १८४२ ते १९०१ असे जेमतेम ५९ वर्षांचे आयुष्य लाभले. तत्कालीन ब्रिटिश राजवटीत न्यायाधीशपदी असल्याने त्यांच्या सामाजिक सहभागावर साहजिकच मर्यादा होती; पण तरीही त्यांनी केलेले कार्य थक्क करणारे आहे. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते. प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक होते. भारतीय सामाजिक परिषद, ग्रंथोत्तेजक सभा आणि इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया यांचे संस्थापक होते. पुणे येथे १८७८ साली भरलेल्या पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आजच्या मराठी साहित्य संमेलनाचे हे आद्या रूप. आपली उच्चपदावरील नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी या साऱ्या भूमिका बजावल्या. त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता. त्यांना दररोज वीसहून अधिक पत्रे येत आणि सर्वांना ते उत्तरे देत. त्याच वेळी त्यांनी चौफेर वाचन व अभ्यासपूर्ण लेखनही केले. सार्वजनिक सभेचे त्रैमासिक सतरा वर्षे सुरू होते, त्या काळात त्रैमासिकातले दोनतृतीयांश लेख रानडे यांनी लिहिलेले होते.
या तिन्ही पुस्तकांच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे येथे १८ जानेवारी १९४३ रोजी केलेल्या ‘रानडे, गांधी आणि जिना’ या विषयावरील भाषणामधील उद्धृते दिलेली आहेत ती अतिशय मूलगामी आहेत. त्यांतील एकात डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘‘समाजसुधारक समाजाला आव्हान देतात, तेव्हा त्यांना हुतात्मा म्हणून गौरवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यांचा तिरस्कार केला जातो आणि त्यांना टाळले जाते. परंतु राजकीय देशभक्त सरकारला आव्हान देतात, तेव्हा संपूर्ण समाज त्यांना पाठिंबा देतो, त्यांची प्रशंसा केली जाते… त्यामुळेच न्यायमूर्ती रानडे यांनी समाजसुधारणेचे ध्येय उराशी बाळगून अत्युच्च दर्जाचे धाडस दाखवले असे म्हणावे लागेल. कारण ते जगत होते त्या काळामध्ये, सामाजिक व धार्मिक रूढी कितीही हीन व अनैतिक असल्या तरीसुद्धा अत्यंत पवित्र मानल्या जात असत. त्या रूढींच्या दैवी आणि नैतिक आधारांबद्दल कोणी प्रश्न उपस्थित केले तर ते पाखंडीपणाचे ठरत असे, इतकेच नव्हे तर तसे प्रश्न ईश्वरनिंदा करणारे व पावित्र्यभंग करणारे, परिणामी अजिबात सहन करता येणार नाहीत असे मानले जात असे.’’ दुसऱ्या एका उद्धृतात ते म्हणतात, ‘‘भारत हे एकसंध राष्ट्र म्हणून समाधानकारकपणे उभे राहायला हवे. त्याच्या विचारांमध्ये व भावनांमध्ये ऐक्य साधले जायला हवे, त्याला सामायिक नियतीच्या जाणिवेने प्रेरणा मिळायला हवी. मात्र, तसे होण्याआधीच भारत ब्रिटिश साम्राज्यातून बाहेर पडला तर स्वातंत्र्याच्या नावाखाली अनागोंदी व अव्यवस्था निर्माण होईल, असेही रानड्यांचे सांगणे होते.’’ या दोन्ही उद्धृतांमधील दूरदर्शित्व वेगळे सांगायला नको.
आशयाच्या संदर्भात या तिन्ही पुस्तकांचा एकत्रित विचार करणे सोयीचे होईल. अगदी आगळी माहिती यातील अनेक लेखांतून पुढे येते. उदाहरणार्थ, तत्कालीन इंग्रज सरकारने ३१ डिसेंबर १८६४ साली प्रकाशित केलेल्या एका यादीवरील दहापानी टिप्पणी. मराठीतील पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतरच्या चाळीस वर्षांत छापल्या गेलेल्या मराठी पुस्तकांची ही अधिकृत यादी आहे. यात नोंद झालेल्या पुस्तकांची संख्या केवळ ६६१ आहे याचे नवल वाटते. त्यांचे विश्लेषण करताना रानडे लिहितात, ‘‘आपल्या सध्याच्या साहित्याकडे पाहणाऱ्या कोणालाही हे साहित्य बहुतांशाने अंधश्रद्धाळू वा बालिश वाटेल यात काही शंका नाही. ही निंदा पुसून काढण्यासाठी अनेक शतके कळकळीचे प्रयत्न करावे लागतील.’’ ‘अनेक शतके’ हा शब्दप्रयोग रानडे यांच्या दृष्टीचा व्यापक आवाका दर्शवणारा व म्हणून महत्त्वाचा आहे. ‘‘ब्रिटिश राजवटीच्या पहिल्या दहा वर्षांमध्ये, १८१८ ते १८३७ या काळात, केवळ तीन मराठी पुस्तके प्रकाशित झाली होती आणि ती सर्व कर्नल जार्व्हिस यांनी त्यांच्या अधिकाराखालील शाळेत विद्यार्थ्यांच्या वापरासाठी भाषांतरित केली होती,’’ हेही रानडे नोंदवतात. त्यावेळेपावेतो एकूण मराठी साहित्य किती बाल्यावस्थेत होते याचा यावरून अंदाज येतो. पुस्तकांची संख्या हळूहळू वाढत आहे याविषयी समाधान व्यक्त करताना, ‘‘ब्रिटिश राजवटीमधील हे आपले अहोभाग्य आहे,’’ असे रानडे लिहितात आणि त्यातून त्यांचा ब्रिटिश राजवटीबद्दलचा स्वागतशील दृष्टिकोनही उघड होतो.
नैतिकता आणि अध्यात्म यांच्या संदर्भातील आपल्या एका लेखात ‘‘ईश्वरावरील व मानवी मनातील ईश्वरी आवाज म्हणून सदसद्विवेकावरील, श्रद्धा आवश्यक आहे,’’ हे आपले मत ते मांडतात. पुढे ते म्हणतात, ‘‘राष्ट्रमनाला अज्ञेयवादामध्ये स्वस्थता मिळणार नाही. याच नव्हे तर कोणत्याही युगातील सर्वांत थोर नैतिक गुरू ठरणाऱ्या बुद्धाने हा प्रयोग एकदा मोठ्या प्रमाणात करून पाहिला आहे. अशा प्रकारची शिकवण राष्ट्रीय विचारावर पगडा राखू शकत नाही, याचा इशारा बौद्ध धर्माच्या पराभवामधून मिळतो. तरुणांच्या जडणघडणीच्या काळाततरी अज्ञेयवादी व निरीश्वरवादी शिकवण निश्चितपणे कालसुसंगत नाही, अशा शिकवणुकीतून विपर्यस्त समजूत निपजू शकते आणि आपल्या सर्व नैतिक कळकळीचा ऱ्हास होऊ शकतो.’’
भारतात आधुनिक शिक्षणाची रुजवात करणाऱ्यांमध्ये ख्रिाश्चन मिशनरी आघाडीवर होते आणि एकोणिसाव्या शतकातील बहुसंख्य भारतीय विचारवंतांवर त्यांचा आणि एकूणच तत्कालीन पाश्चात्त्य विचारांचा किती प्रचंड प्रभाव होता हे यावरून जाणवते. अनेक भारतीय समाजसुधारकांचा परस्परांमधील पत्रव्यवहार हा बहुतांशी इंग्रजीतच असायचा याची इथे आठवण होते. ‘ईश्वरी योजना’ ( Godl s Plan) यांसारख्या बायबलमधील संकल्पना रानडे यांच्या लेखनात वरचेवर येतात याचेही हेच कारण असावे.
न्यायमूर्ती रानडे यांनी दीडशे वर्षांपूर्वी मांडलेले अनेक विचार आजही समयोचित आहेत. उदाहरणार्थ, एके ठिकाणी ते लिहितात, ‘‘दरवर्षी भारत सोडून गेलेल्यांच्या तुलनेत परतलेल्यांची संख्या कायमच कमी राहिलेली आहे. परतलेल्यांपैकी अनेक जण त्यांच्या कुटुंबासह पुन्हा स्थलांतर करतात. भारतापेक्षा या वसाहतींमध्ये दोन ते तीन पट अधिक वेतन मिळते.’’ आजच्या ब्रेनड्रेनच्या संदर्भातही हे निरीक्षण लागू पडते. दुसरीकडे ते लिहितात, ‘‘परकीयांना स्पर्धेत यश मिळाले यात सामग्रीच्या विपुलतेचा मोठा हातभार आहे यात शंका नाही; पण सामग्रीपेक्षा त्यांच्यातील प्रेरणा व कौशल्य यांचा त्यांच्या यशातील वाटा मोठा आहे. त्याच गुणांच्या आधारे ब्रिटिशांनी बाष्पऊर्जा वापरात यायच्याही बरेच आधी भारतावर विजय मिळवला.’’ आजही लागू पडणारे हे निरीक्षण आहे. पुण्यात १८९० साली झालेल्या पहिल्या औद्याोगिक परिषदेमध्ये केलेले उद्घाटनाचे भाषण (औद्याोगिक परिषद) विशेष उल्लेख करावा असे आहे. राष्ट्रीय चळवळीला औद्याोगिक विकासाचीही साथ हवी ही त्यांची भूमिका होती. या भाषणात त्यांनी मांडलेले बारा मुद्दे आजही आपल्या देशाने आदर्श म्हणून समोर ठेवावे असे आहेत.
मुसलमानांनी या देशात बंदुकीची दारू आणि तोफांपासून मेणबत्त्या आणि काचेपर्यंत तसेच वाद्यासंगीत आणि गायनापासून नवीन फुले आणि फळांपर्यंत कोणकोणत्या उपयुक्त गोष्टी आणल्या याची एक लांबलचक यादी रानडे यांनी दिली आहे आणि त्यानंतर ‘‘या विशाल देशामध्ये हिंदू व मुसलमान यांनी एकमेकांशी हातमिळवणी करेपर्यंत कोणतीही प्रगती शक्य नाही,’’ असा निष्कर्षही त्यांनी नोंदवला आहे. त्याचबरोबर इंग्रज राज्यकर्त्यांपासून आपण शिकण्यासारखे खूप आहे याचीही त्यांना जाणीव होती. एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे, या तिन्ही पुस्तकांत इंग्रजांपासून मिळवायच्या स्वातंत्र्याचा मात्र उल्लेख नाही; सगळा भर आहे तो सामाजिक सुधारणांवर. कारण आपल्यातील विविध सामाजिक दोषांमुळेच आपण परकीयांचे गुलाम झालो याची त्यांना जाणीव आहे व ते दोष दूर करण्याला रानडे प्राधान्य देतात. एक समाज म्हणून आपण आज कुठे आहोत याचे नेमके भान असणे आणि त्याच वेळी समाजाचा तेजोभंग होणार नाही याचे भान राखणे ही विधायक विचार मांडताना करावी लागणारी एक तारेवरची कसरत असते. ते तारतम्य रानडे यांना या लेखनात चांगले साधले आहे असे जाणवते. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम केल्यामुळेही शब्दयोजना काळजीपूर्वक करायची त्यांना सवय लागली असावी.
रानडे यांची सर्वस्पर्शी प्रतिभा आणि विविध विषयांचा व्यासंग यांचा प्रत्यय तिन्ही पुस्तकांतील लेखांमधून येतो. विस्ताराने सगळे मांडणे शक्य नाही, पण विविध लेखांच्या शीर्षकांवरूनही आशयाच्या वैविध्याची कल्पना येते. उदाहरणार्थ, ही काही शीर्षके — ‘भारतीयांचे परदेशी स्थलांतर’, ‘लोह उद्याोग – आरंभिक प्रयत्न’, ‘जनगणनेच्या आकडेवारीचे वीस वर्षांसंदर्भातील पुनरावलोकन’, ‘रशियातील दासमुक्ती’, ‘प्रशियातील जमीन कायदा व बंगालमधील कूळ विधेयक’, ‘भारतीय ईश्वरवादाचे तत्त्वज्ञान’, ‘सामाजिक प्रश्नांबाबतचे सरकारी कायदे’, ‘हिंदू प्रोटेस्टंटवाद’, ‘मी हिंदूही नाही अथवा मुसलमानही नाही’, ‘आजकालचे साहित्य’, ‘संमती वय’, ‘हुंड्याची प्रथा’, ‘मराठा राज्यामधील चलने व टाकसाळी’, ‘सामाजिक उत्क्रांती’, ’शंभर वर्षांपूर्वीचा दक्षिण भारत किंवा एक हजार वर्षांपूर्वीचा भारत’.
‘‘रानडे हे सद्याकाळातील सर्वांत मूलगामी भारतीय विचारवंत होते.’’ हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे मत किती सार्थ होते याची साक्ष अशा लेखांवरून पटते. ‘‘महाराष्ट्र एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या तऱ्हेने ऊब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल, याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरता जिवापाड जर कोणी मेहनत केली असेल, तर ती प्रथमत: रानडे यांनीच केली असे म्हटले पाहिजे आणि तेच त्यांच्या थोरवीचे मुख्य चिन्ह होय.’’ लोकमान्य टिळकांनी केलेले हे मूल्यमापनही यथार्थ होते हे या पुस्तकातून जाणवते.
तिन्ही पुस्तकांच्या शेवटी दिलेला संक्षिप्त जीवनपट खूप उपयुक्त आहे. काही किरकोळ त्रुटींचा इथे उल्लेख केला तर ते अनुचित ठरू नये. पार्श्वभूमी आणि भाषांतरकाराची टीप यांच्यानंतर छापलेली अनुक्रमणिका प्रत्येक ग्रंथाच्या अगदी सुरुवातीला छापायला हवी होती. पुस्तकातील अनेक परिच्छेद तीनतीन, चारचार पानांचे आहेत हे खटकते. मुळातच पुस्तकाची भाषा दीडशे वर्षांपूर्वीची आहे व त्यात पुन्हा पुस्तकाचा आशय गंभीर आहे; तो समजून घेणे वाचकाला सुलभ व्हावे या दृष्टीने मोठे-मोठे परिच्छेद टाळायला हवे होते. मूळ लेखनातील नेमकेपणा आणि रसाळपणा अनुवादात आणणे नेहमीच फार कठीण असते. त्या दृष्टीने अनुवादित आशयावर थोडे अधिक भाषिक काम व्हायला हवे होते असे वाटले. सुदैवाने पुढच्या सात-आठ महिन्यांत हे तिन्ही ग्रंथ मूळ इंग्रजी स्वरूपात साधना प्रकाशित करणार आहे ही आनंदाची बाब आहे. पुस्तकाचा अनुवाद वाचण्यापेक्षा (शक्य झाल्यास) मूळ भाषेतील पुस्तकच वाचणे ज्यांना आवडते त्यांची त्यामुळे सोय होणार आहे. रानडे यांची आणखीही तीन पुस्तके प्रकाशित करण्याचा प्रकाशकांचा मानस आहे. त्यामुळे रानडे यांचे समग्र साहित्य अभ्यासकांना उपलब्ध होईल.
bhanukale@gmail.com