मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
कृष्णभक्तीचं काहीसं नाटय़पूर्ण प्रदर्शन आम्ही अनुभवलं आणि नंतर आम्हाला असं दिसलं की, ओपी तितकेच निस्सीम रामभक्तदेखील आहेत. त्यांची ही दुहेरी भक्ती सिद्ध करण्यासाठी म्हणून की काय ते अचानक उठले, जवळचं गोदरेजचं कपाट उघडलं आणि त्यातून एक सैलसर बांधणीचा पोथीवजा ग्रंथ बाहेर काढला. (नशीब की तो भूर्जपत्रावर नसून आधुनिक कागदावरच लिहिलेला होता.) त्यांनी मोठय़ा झोकात सांगितलं की तो ग्रंथ म्हणजे तुलसीकृत रामायणाचं उर्दू भाषांतर आहे. अतिशय भक्तीभावाने त्यांनी आपलं मस्तक त्या ग्रंथावर टेकवून त्याला नमस्कार केला.
माझ्या सांगीतिक प्रश्नांना ओपींनी दिलेली उत्तरं
मला पडलेल्या काही सांगीतिक आणि काही अन्य प्रश्नांची एक यादी मी त्यांना आठवडाभर आधी पाठवली होती. त्यांनी अतिशय सहजपणे सांगितलं की, ते प्रश्न त्यांनी वाचलेदेखील नाहीत. मग मला जे प्रश्न जसे जसे आठवत गेले तसे तसे मी त्यांना विचारत गेलो. खाली दिलेल्या प्रश्नोत्तरांमधून तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी सराईतपणे माझ्या प्रश्नांना बगल दिली होती.
सबास्टियन डिसोझा या गोव्यातल्या असामान्य प्रतिभावान म्युझिक अरेंजरला ओपींनी प्रथम संधी दिली हे फार कमी लोकांना माहीत असेल. मी त्यांना विचारलं, ‘‘१९५२ नंतर ते शंकर जयकिशन यांच्याकडे का काम करू लागले?’’ तर ते हसत हसत उद्गारले, ‘‘कदाचित आमच्यापैकी कोणालाही माहीत नसलेली एखादी गोष्ट त्यांना ज्ञात होती- ती म्हणजे शंकर जयकिशन यांच्याकडे जणू अलीबाबाच्या खजिन्याची चावीच होती. (त्या काळात शंकर जयकिशन यांच्या नावावर सर्वाधिक हिट चित्रपट असायचे.) माझा पुढचा प्रश्न ओपींच्या ‘छोटा सा बालमा’ या रागदारीवर आधारलेल्या गाण्याविषयी होता. मी त्यांना विचारलं, ‘‘१९५८ सालच्या ‘रागिनी’ या चित्रपटातील हे गाणं रागेश्री या रागावरच आधारित आहे असं बऱ्याच जाणकारांचं मत आहे, तर ते तसंच आहे का?’’ यावर ते म्हणाले, ‘‘ये रागेश्री किस बला का नाम है?’’ मग मी त्यांना त्यांच्या ‘अकेली हूँ मैं पिया आ’ या १९६९ सालच्या ‘संबंध’ या चित्रपटातील गाण्याबद्दल उस्ताद अमीरखाँ काय म्हणाले होते त्याची नम्रपणे आठवण करून दिली. अमीरखाँसाहेब म्हणाले होते की, या गाण्यात इतक्या रागांच्या छटा त्यांना आढळल्या की, एकाक्षणी त्यांनी राग मोजायचंच सोडून दिलं. यावर ते उत्तरले, ‘‘खाँसाब क्लासिकल संगीत की दुनिया के एक महान फनकार थे और ‘रागिनी’ फिल्म में मेरे लिये गाकर उन्होनें मुझे इज्जत बक्षी है.’’ पुढे मी त्यांना म्हणालो की, त्यांच्या ‘ओ कन्हैया कन्हैया’ या १९६८ सालच्या ‘हमसाया’ या चित्रपटातील गाण्यात उस्ताद रईस खान यांच्या सतारीने गाण्याचा जवळजवळ एकचतुर्थाश भाग व्यापला आहे. कुठल्याही फिल्मी गाण्याच्या संदर्भात इतका वेळ एखाद्या एकल वाद्याला मिळणं ही अद्भुत गोष्ट आहे. माझ्या या निरीक्षणाशी ते सहमत झाले आणि म्हणाले, ‘‘हमारे रईस मियां इस कदर बजा रहे थे की उन्हें ‘कट’ करने को मेरा दिल नहीं हुवा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘कभी कभी साज आवाज पर किस तरहा हावी हो जाती है इसकी ये एक मिसाल है.’’ मग मी त्यांना माझा शेवटचा प्रश्न विचारला. ‘‘१९५८ सालच्या ‘रागिनी’ या चित्रपटातील ‘मन मोरा बावरा’ या गाण्याच्या संदर्भात काही इगो प्रॉब्लेम झाले होते का?’’ कारण हे गाणं प्रत्यक्षात रफीसाहेबांनी गायलं होतं आणि पडद्यावर मात्र किशोरकुमारने ते सादर केलं होतं. ते उत्तरले, ‘‘काहीच प्रॉब्लेम झाले नव्हते.’’ आणि याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे, ‘‘हम तीनों एक दुसरे की इज्जत करते थे.’’ आणि दुसरं म्हणजे, रफी आणि किशोर या दोघांनाही परस्परांबद्दल आदर होता आणि त्यांच्यात कसल्याही प्रकारची असुरक्षिततेची भावना नव्हती.
ओपींच्या गाण्यांना समृद्ध करणारे काही महान वादक
वर सांगितलेल्या आमच्या अनेक वळणांनी जाणाऱ्या प्रश्नोत्तरानंतर ओपींनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. ते म्हणाले, त्यांच्या जमान्यातले आणि त्यांच्या अगोदरच्या पिढीचे संगीतकार भाग्यवान होते. कारण हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील काही महान वादकांनी त्यांच्या गाण्यांमध्ये वाद्यं वाजवली आणि तेही कसंबसं उरकून टाका अशा पद्धतीने नव्हे; तर अगदी उत्साहानं वाजवली. त्यामुळे आमच्या गाण्यांना, आमच्या संगीताला एक नवा आयाम मिळाला आणि ते अधिक समृद्ध झालं. ओपींच्या या विधानाचा पूर्ण आवाका लक्षात येण्यासाठी त्यांच्या ‘फिर मिलोगे कभी इस बात का वादा करलो’ या ‘ये रात फिर ना आयेगी’ या १९६६ सालच्या सिनेमातल्या रफी आणि आशा यांनी गायलेल्या गाण्यात ज्या महान आणि लोकप्रिय वादकांनी वाद्यं वाजवली आहेत त्याच्याकडे एक नजर टाकली तरी हे कळतं. ते सगळे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातले महान वादक असून, एन्ट्रीप्रमाणे त्यांचा क्रम असा : उस्ताद रईस खान (सतार), गांगुली किंवा झरीन दारुवाला (सरोद), दक्षिणारंजन टागोर (तार शहनाई), पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी), पंडित रामनारायण (सारंगी), पंडित शिवकुमार शर्मा (संतूर).
शास्त्रीय संगीतातील दिग्गजांच्या बरोबरच फिल्म इंडस्ट्रीमधील सोलो वादाकांचादेखील त्यांनी अतिशय चपखल वापर करून घेतला. त्यांची काही प्रसिद्ध गाणी अशा कल्पक वापरासाठी नेहमीच आठवतात. आणि त्या गाण्यातील त्यांचे सोलो वादन हे आपल्या मनावर एक अमीट ठसा उमटवतं. ती काही गाणी आणि वादक असे : १) पियानो वादक सनी कॅस्टलीनो – ‘पूछो न हमें हम उन के लिये’ (मिट्टी मे सोना) (२) गिटार वादक सरदार हजारा सिंह- ‘लाखों है यहाँ दिलवाले’ (किस्मत) (३) महान सॅक्सोफोन वादक मनहारी सिंग ‘है दुनिया उसी की’ (कश्मिर की कली) (४) हार्मोनियम वादक बाबू सिंग- ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’ (एक मुसाफिर एक हसीना) (५) अॅकॉर्डियन वादक गुडी सिरवाई- ‘वो बात जिस पे के धडके जिया’ (हम सब चोर है). गाण्यातल्या या सोलोवाद्य वादनाचे तुम्ही जर चाहते असाल तर तुम्हाला अशी आणखी गाणी नक्कीच शोधून पुन्हा ऐकावीशी वाटतील.
ओपी ऱ्हिदम किंग (ठेक्याचा बादशाह) होते का?
मी असं म्हणणार नाही. कारण ऱ्हिदम तुम्हाला डोलायला लावतो, पण गाण्याची चाल तुम्हाला बांधून ठेवून जीवनभर आनंद देते. मला आजही ओपींची जी अनेक गाणी लक्षात राहिली आहेत ती ऱ्हिदमपेक्षा त्यांच्या चालींमुळे. अशा गाण्यांची तीन उदाहरणं १) ‘उधर तुम हसीं हो’ (मिस्टर अॅण्ड मिसेस ५५) (२) ‘सुन सुन सुन सुन जालिमा’ (आर पार) (३) ‘थंडी हवा काली घटा’ (मिस्टर अॅण्ड मिसेस ५५) आणि तरीही ‘ऱ्हिदम किंग’ या उपाधीबद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर तिचे दोन प्रबळ दावेदार म्हणजे शंकर जयकिशन आणि दुसरे आर. डी. बर्मन आहेत हे विसरू नका.
ओपी आणि आशा यांनी एकत्रितपणे केलेलं अखेरचं गाणं
‘चैन से हम को कभी आप ने जिने ना दिया’ हे ते गाणं (१९७३ सालच्या ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ या सिनेमातलं). या गाण्यासाठी आशा भोसले यांना १९७५ सालचा उत्कृष्ट पाश्र्वगायिकेचा पुरस्कार मिळाला होता. आशा भोसले यांनी आतापर्यंत जेवढी उत्कट भावनात्मक गाणी गायलेली आहेत त्यांत या गाण्याचा क्रम खूपच वरचा असेल. या गाण्याची लय संथ असून त्याची चाल बरीचशी रवींद्र संगीतासारखी आहे आणि या दोन गोष्टींमुळे ते जास्त परिणामकारक होतं. भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील संगीत दिग्दर्शक-गायक अशी सर्वात दीर्घकालीन टिकलेली ही एक अभूतपूर्व अशी जोडी होती.
चाणाक्ष वाचकाला हे लक्षात आलंच असेल की, आमचं बोलणं हे काही फार सुसंवादी होतं असं म्हणता येणार नाही. संगीतावर, विशेषत: स्वत:च्या संगीतावर बोलायला ओपी फारसे उत्सुक नसतात, असा इशारा माझा मित्र गौतम राजाध्यक्ष याने मला आधीच दिला होता. पण काही कारणांसाठी मी तो पार धुडकावून लावला हे त्याचं प्रमुख कारण होतं. गौतमनी मला आणखी असं सांगितलं होतं की, ओपींना भविष्य, हस्तरेखा, होमियोपॅथी, आध्यात्म आणि चित्रपट (हॉलीवूड आणि बॉलीवूड या दोन्हीमधले) या विषयांवर बोलायला आवडतं. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक विस्मयकारी सहनशीलतेचा भाव होता. पण माझ्या काही विनोदांनी त्यांच्या चेहेऱ्यावर क्वचित स्मितरेषा उमटली होती. उदाहरणार्थ, ते मला म्हणाले की, ते होमियोपॅथीची प्रॅक्टिस करतात आणि अनेक लोकांसाठी त्यांनी मोफत उपचार केले आहेत. मी त्यांना म्हणालो, कदाचित त्यांच्या संगीताने त्यांच्या रोग्यांना जास्त आराम पडेल. आणि जेव्हा त्यांनी मला विचारलं ‘‘आप ड्रिंक करते हो क्या?’’ तेव्हा मी त्यांना म्हटलं, ‘‘नैयर साहब, हे म्हणजे आपला मित्र गौतमला तू फोटोग्राफी करतोस का असं विचारण्यासारखं आहे.’’ तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जराशी स्मितरेषा उमटली होती.
जाता-जाता ओपींचा निस्सीम चाहता सोपान मला म्हणाला, त्यांच्या मला आवडणाऱ्या १५ गाण्यांची यादी दे. वैयक्तिक आवडनिवड वेगळी असू शकते याची मला पूर्ण कल्पना आहे, तरीही मी खाली माझ्या आवडीची त्यांची १६ गाणी देतोय. १) ‘हम ने तो दिल को आपके कदमों में रख दिया’ (रफी-आशा – १९६५, मेरे सनम) (२) ‘आओ हुजूर तुमको, सितारों में ले चलूं’ (आशा – १९६८, किस्मत) (३) ‘मेरी जान तुमपे सदके’ (आशा, १९६६, सावन की घटा) (४) ‘इशारो इशारो में दिल लेने वाले’(रफी-आशा, १९६४, कश्मीर की कली) (५) ‘नीले आसमानी बुझो तो ये नैना बाबू’ (गीता दत्त, १९५५, मिस्टर अॅण्ड मिसेस ५५) (६) ‘लाखों हैं यहाँ दिलवाले’(महेंद्र कपूर, १९६८, किस्मत) (७) ‘मेरी नींदों में तुम मेरे ख्वाबों में तुम’ (किशोरकुमार-शमशाद बेगम, १९५६, नया अंदाज) (८) ‘आँचल में सजा लेना कलियाँ’ (रफी, १९६३, फिर वोही दिल लाया हूँ (९) ‘थंडी हवा काली घटा’ (गीता दत्त, १९५५ मिस्टर अॅण्ड मिसेस ५५) (१०) ‘है दुनिया उसी की, जमाना उसी का’ (रफी, १९६४, कश्मीर की कली) (११) ‘बाबूजी धीरे चलना’ (गीता दत्त, १९५४, आर पार) (१२) ‘प्यार पर बस तो नहीं हैं मेरा, लेकिन’ (तलत मेहमूद – आशा, १९५८, सोने की चिडियाँ) (१३) ‘छोटा सा बालमा’(आशा, १९५८, रागिनी) (१४) ‘ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ’ (रफी-गीता दत्त, १९५६, सी. आय. डी.) (१५) ‘चैन से हम को कभी आप ने जीने ना दिया’ (आशा, १९७४, प्राण जाये पर वचन न जाये) (१६) ‘पूछों न हमें हम उनके लिये’ (आशा, १९६०, मिट्टी में सोना). यानंतर सोपानने मला विचारलं, ‘‘आमच्या भेटीत ओपी संगीताशिवाय इतर कुठल्या विषयावर बोलले का?’’ मी म्हणालो, ‘‘हो. बोलले ना. पण मला त्याची जाहीर वाच्यता करायची नाहीये.’’ जेव्हा आमची निरोप घ्यायची वेळ झाली तेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘‘‘अनटचेबल्स’(untouchables) ही हॉलीवूड फिल्म बघितली आहे का?’’ त्यांच्या या प्रश्नाने मला खूपच आश्चर्यचकित केलं. मी म्हणालो, ‘‘मी ती फिल्म बघितली नाहीये.’’ तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, ‘‘ही फिल्म त्यांनी पाच वेळा बघितली आहे.’’(अल कपोन या कुख्यात गुन्हेगाराच्या जीवनावर बेतलेली ही फिल्म मी नंतर बघितली आणि मला ती फारच आवडली. नुकतंच निधन पावलेल्या शॉन कॉनरी यांना यातल्या एका महत्त्वाच्या भूमिकेबद्दल साहाय्यक अभिनेत्याचं ऑस्कर मिळालं आहे.)
(उत्तरार्ध)
शब्दांकन : आनंद थत्ते