प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com
‘‘आपल्या देशातील असहाय, गरीब शेतकरी आणि त्याचा तितकाच असहाय, अस्वस्थ मुलगा यांना केंद्रस्थानी ठेवून मी जग बघतो आणि व्यंगचित्रं रेखाटतो. अमेरिकेतली मुलं- जी हसरी, आनंदी, सुखी असतात- किंवा तिथली सुबत्ता यांच्याशी मी स्वत: जोडला जाऊ शकत नाही. तिथल्या वातावरणाशी निगडित व्यंगचित्रं मी काढूच शकणार नाही, कारण मी तिसऱ्या जगातील व्यंगचित्रकार आहे. आणि माझी खात्री आहे, अमेरिकेतील व्यंगचित्रकार या देशातील भयाण दारिद्रय़ाची कल्पनाही करू शकणार नाहीत.’’
..ज्येष्ठ व्यंगचित्रकार ओ. व्ही. विजयन (१९३०-२००५) यांनी त्यांच्या व्यंगचित्रकलेविषयी जे लेख लिहिले आहेत त्यातील ही काही वाक्यं. विजयन ज्या पद्धतीने व्यंगचित्रं काढतात, त्यात त्वेष आणि राग दिसतो. त्यांची रेषा हिंसक आहे असं म्हटलं तरी चालेल, इतकी ती डोळ्यांत घुसते. ती मोहक, गोड, आकर्षक अजिबातच नाहीये. त्या रेषांमध्ये एक प्रकारचं बंड आहे. व्यवस्थेच्या विरोधात उभ्या असलेल्या एका संतप्त कार्यकर्त्यांसारखी त्यांची रेषा आहे. त्यांची चित्रं बघताना खरं तर ते कागदावर चित्र रेखाटत नसून, जणू काही त्वेषाने दगडावर रेष खोदत आहेत असं वाटतं. आणि त्याला कारणंही आहेत. ते स्वत: कम्युनिस्ट आणि केरळी. (राजकीय व्यंगचित्रकार होण्यासाठी हे एक उत्तम रसायन आहे.) कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांना काही नोकऱ्या मिळाल्या, तर काही गमवाव्या लागल्या. प्राध्यापक म्हणून ते अपयशी ठरले. दरम्यान, त्यांच्या काही कथा प्रकाशित झाल्या.
‘‘मी कम्युनिस्ट कार्ड होल्डर होतो. हे कार्ड साधारण लायब्ररी कार्डसारखं दिसतं. फक्त फरक इतकाच, की लायब्ररी कार्डवर पुस्तक मिळतं आणि कम्युनिस्ट कार्डवर काहीही मिळत नाही!! ’’ विजयन गमतीने लिहून जातात. धडपडीच्या त्या दिवसांत त्यांनी काही कार्टून्स आणि काही राजकीय स्फुटं खरडली आणि ती दिल्लीच्या ‘शंकर्स वीकली’ला पाठवून दिली. ती छापून आली. आणि मुख्य म्हणजे सोबत मानधनाचा चेकही आला!!
दरम्यान इथे केरळमध्ये त्यांची ससेहोलपट चालूच होती. दारिद्रय़रेषेच्या वर-खाली जीवन सुरू होतं. शेवटी त्यांनी अगतिकतेतून ‘शंकर्स वीकली’ला पत्र लिहून, ‘माझे काही उरलेले मानधनाचे पैसे असतील तर ते पाठवावेत,’ असं कळवलं. ‘वीकली’कडून चेक आला नाही; पण पत्र आले, ‘दिल्लीला या.. व्यंगचित्रकार म्हणून!’
आणि १९५८ मध्ये भारतीय व्यंगचित्रकलेमध्ये एका वेगळ्याच रेषेचा जन्म झाला. भारतीय राजकीय व्यंगचित्रकलेचे पितामह शंकर पिल्ले हे त्याकाळी दिल्लीतून ‘शंकर्स वीकली’ हे व्यंगचित्रांना प्राधान्य देणारं साप्ताहिक प्रकाशित करायचे. अनेक नवोदित व्यंगचित्रकारांची सुरुवात तिथूनच झाली आहे. विजयन हे त्यापैकीच एक. विजयन तिथे पाच वर्षे रमले. शंकर यांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं. शंकर यांना त्यांची व्यंगचित्रं फारशी आवडत नसत.. शैली आणि आशय या दोन्ही दृष्टीने; पण तरीही शंकर यांनी विजयन यांचं महत्त्व जाणलं होतं.
नंतर विजयन ‘हिंदू’, ‘ई. पी. डब्ल्यू.’, ‘मातृभूमी’ वगैरेंसारख्या अनेक दर्जेदार नियतकालिकांतून व्यंगचित्रं काढत राहिले. ‘डी. सी. बुक्स’, कोट्टायम आणि ‘अ कार्टूनिस्ट रिमेंबर्स’, रूपा अँड कंपनी, दिल्ली या दोन पुस्तकांत त्यांनी व्यंगचित्रकलेविषयी विपुल वैचारिक लेखन केलं. शिवाय त्यांची निवडक राजकीय व्यंगचित्रंही त्यात आहेत.
केवळ चित्रांमधूनच भाष्य करण्याचा अट्टहास त्यांनी धरला नाही. जरूर तेव्हा सोबत वाक्यंच्या वाक्यं लिहिली आहेत. हवे तसे काळे, करडय़ा रंगाचे ब्रशचे फटकारे मारले आहेत. अर्कचित्रं काढताना अशक्य वाटावीत अशी चेहऱ्याची मोडतोड केली आहे. बराच मजकूर हाताने लिहिला आहे. हे करताना विजयन यांचा सारा भर हा ‘मला हे सांगितलं पाहिजे- आणि तेही आत्ताच!’ या थाटाचा आहे. नेहरूंपासून वाजपेयींपर्यंत अनेक नेते त्यांनी पाहिलेले आहेत. जागतिक पातळीवरच्या अनेक स्थित्यंतरांचे ते साक्षीदार आहेत, हे त्यांच्या चित्रांतून दिसतं. कम्युनिस्ट असले तरी रशियावर परखड टीका त्यांनी जरूर केली आहे. ‘नाही रे’ वर्गाची दु:खं ते चितारत आहेत हे सतत जाणवतं.
त्यांची काही व्यंगचित्रं आपल्याला समजून घेता येतील. मालदीव हा देश म्हणजे एक बेट आहे. त्याचा दौरा आटोपून इंदिराजी परतल्यावर त्यांना एक जण सांगतोय, ‘तुम्ही त्यांना सांगायला हवं होतं की, तुमच्याप्रमाणे आमचाही देश दोन हजार बेटांनी बनलेला आहे. फक्त तो एकाच भूभागावर आहे, इतकंच!!’ भारतातील आर्थिक, सामाजिक, राजकीय विषमतेवर यापेक्षा भेदक भाष्य काय असू शकते!
भारतात ओरिसामधील कालहंडी या भागात अनेकांचे कुपोषणामुळे मृत्यू झाले होते. त्यामुळे देशभर खळबळ उडाली होती. त्याचवेळी ‘बोफोर्स’ प्रकरणही गाजत होतं. त्यावरच्या चित्रात त्यांनी तोफांची प्रतिमा वापरली आहे. म्हणजे कालहंडी नावाची तोफ बोफोर्स या तोफेला विचारतेय, ‘‘तू किती माणसं मारू शकतेस?’’
जनता पक्षाच्या अखेरच्या काळात राजकारण इतकं किळसवाणं आणि अश्लाघ्य झालं होतं की व्यंगचित्रकारांनाच काय, पण सामान्य माणसालाही त्याची शिसारी यावी. त्यावेळी त्यांनी एक फारच भेदक चित्र काढलं होतं. चरणसिंह, जगजीवनराम आणि इंदिराजी हे सत्तालोलुप नेते डुकराच्या रूपात जेवताना दाखवले आहेत आणि कॉमेंटचा आशय आहे की, हे तिघे कधी माणूस म्हणून, तर कधी डुक्कर म्हणून दिसत असतात. पण ते मूळ कोण आहेत, हे सांगणं खूप अवघड आहे.
भारत-पाक संबंध आणि दोन्ही देशांतील निवडणुका यावरील त्यांचं चित्र आणि भाष्य नेमकं आहे. पाकमधील तकलादू लोकशाही आणि भारतातील भावनेवर चालणाऱ्या निवडणुका हे त्यातून अधोरेखित होते.
मध्य भारतात एका भयानक दुष्काळात काही लोक गवत खाऊन जगताहेत, अशी भयंकर बातमी त्याकाळी गाजत होती. त्यावेळचं हे व्यंगचित्र (ग्रासरूटवर केलेली कोटी) म्हणजे समाजवादी व्यवस्थेवरचं जहाल भाष्यच म्हणावं लागेल.
आर्थिक विषमता असलेल्या आपल्या देशाने अणुबॉम्ब निर्माण करण्याची योजना आखल्याचा विषय चर्चेत होता त्यावेळचं हे चित्र. विजयन यांचा हा अस्वस्थ मानसपुत्र आईला (इंदिराजींना) विचारतोय, ‘‘आई, आज जेवायला काय आहे?’’
तथापि विजयन यांची विचार करण्याची पद्धत किती विलक्षण होती हे त्यांच्या केवळ एका भाष्यावरून स्पष्ट होईल. आणीबाणीत अनेक प्रकारचे अत्याचार झाले. त्यानंतर जनता पक्षाचं राज्य आलं आणि त्यांच्या गलिच्छ भांडणांना लोक वैतागले. या पाश्र्वभूमीवर संसदेच्या बाहेर विजयन यांचा असहाय शेतकरी आणि त्याचा अस्वस्थ मुलगा हे भ्रमनिरास होऊन उभे आहेत. तो मुलगा बाबांना सांगतोय, ‘‘आणीबाणीत झालेला सगळ्यात शेवटचा मोठा अत्याचार म्हणजे जनता पार्टी. तो आता बहुतेक संपेल!!’’