रघुनंदन गोखले

ऑलिम्पियाडच्या जवळजवळ १०० वर्षांच्या इतिहासात तुम्हाला एकही खेळाडू सापडणार नाही ज्याने ६ ग्रॅण्डमास्टर्स आणि २ आंतरराष्ट्रीय मास्टर्सना तोंड देऊन सगळे डाव जिंकले आहेत. दोन वर्षांपूर्वी कुणाच्या ध्यानीमनीही नसताना दोमाराजू गुकेश हे नाव बुद्धिबळाच्या पटलावर आले आणि त्याने सर्वाना अवाक केले. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला हरवणारा सर्वात लहान खेळाडू म्हणून त्याने विक्रमही केला. याच आठवडय़ात स्पेनमधील मेनोर्का आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या बुद्धिबळातील या नव्या ताऱ्याबद्दल..

Loksatta vyaktivedh AG Noorani India and China border fence Constitutionalist Expert on Kashmir
व्यक्तिवेध: ए. जी. नूरानी
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Australia’s new cap on number of international students
कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही विद्यार्थ्यांना मोठा धक्का, नवे निर्बंध लागू; भारतीयांवर काय परिणाम होणार?
sensex jump 349 point to settle at an all time high of 82134
Share Market Today : सेन्सेक्स ८२ हजारांच्या पुढे ऐतिहासिक उच्चांकावर
zepto co founder Kaivalya Vohra
Hurun India Rich List: श्रीमंताच्या यादीत अवघ्या २१ वर्ष वयाच्या तरूणाचे नाव; कॉलेज ड्रॉप आऊट झाल्यावर बनला अब्जाधीश
japans tomiko itooka news
Tomiko Itooka : जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती कोण? ‘या’ महिला गिर्यारोहकाने पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब!
Indices rise for seventh consecutive session
निर्देशांकांची सलग सातव्या सत्रात वाढ; पॉवेल यांच्या भाषणापूर्वी मात्र सावध पवित्रा
Pro Kabaddi League Auction 2024 Sold Players List in Marathi
PKL Auction 2024: लिलावाच्या पहिल्याच दिवशी ८ खेळाडूंवर कोट्यवधींची बोली, सचिन तन्वर २.२५ कोटींसह ठरला महागडा खेळाडू

गेल्या ऑलिम्पियाड मधली गोष्ट. कुणीतरी ग्रँडमास्टर सूर्यशेखर गांगुलीला विचारले की, किती फेऱ्या झाल्यात? सूर्याने मिश्कीलपणे उत्तर दिले – ‘‘एक मिनिट थांबा! गुकेशचे किती गुण झालेत ते बघतो आणि तुम्हाला कळेल की किती फेऱ्या झाल्यात.’’ याचे कारण म्हणजे बुद्धिबळामध्ये जिंकणाऱ्याला एक गुण मिळतो. गुकेशच्या झंझावाती खेळामुळे त्याने ८ फेऱ्यात ८ गुण मिळवले होते आणि ते पण बहुतांश सगळे प्रतिस्पर्धी ग्रँडमास्टर दर्जाचे असताना!! ही किमया भल्याभल्यांना जमली नव्हती आणि ती १६ वर्षांच्या गुकेशने साध्य केली होती. गुकेशने पहिल्या पटावरचे सुवर्णपदक जिंकलेच, पण त्याने आपल्या युवा संघाला कांस्य पदकाचा मान मिळवून दिला. या वर्षीच्या आशियाई बुद्धिबळ संघटनेच्या समारंभात भारतीयांनी बक्षिसांची लयलूट केली पण सर्वात मानाच्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवणारा गुकेश चमकून गेला! युक्रेनबरोबरच्या युद्धात गुंतलेल्या रशियन संघटनेने आयत्या वेळी ऑलिम्पियाड घेण्याचे नाकारल्यामुळे भारतीय संघटनेला सुसंधी प्राप्त झाली होती आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी मुख्य प्रायोजक होण्याचे मान्य केले. त्यांना ‘मॅन ऑफ द ईयर’ आणि भारतीय बुद्धिबळ संघटनेला ‘सर्वोत्तम संघटना’ असे मान मिळाले नसते तरच आश्चर्य!
भारतीय महिला बुद्धिबळ संघाला ‘सर्वोत्तम संघाचा पुरस्कार’ आणि या संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रँडमास्टर अभिजित कुंटेला ‘सर्वोत्तम महिला संघाचा प्रशिक्षक’ म्हणून गौरवले गेले. कोनेरू हंपी, द्रोणावली हरिका, वैशाली, तानिया सचदेव आणि गेल्या वर्षीच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराची विजेती भक्ती कुलकर्णी यांच्या संघाला हा योग्य सन्मान मिळाला. कारण या संघाने ऑलिम्पियाडमध्ये कांस्य आणि जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

दोन वर्षांपूर्वी भारतातील लहान खेळाडूंमध्ये प्रज्ञानंद श्रेष्ठ की निहाल सरीन श्रेष्ठ असा वाद बुद्धिबळप्रेमींमध्ये रंगला होता. अचानक त्यामध्ये अर्जुन एरिगेसीचे आगमन झाले. एकापेक्षा एक आंतरराष्ट्रीय पराक्रम करून अर्जुनने थेट भारताच्या पहिल्या पाच जणांत स्थान पटकावले. आता तरुण मुलांमध्ये पुढे जाण्यासाठी लढत तिरंगी झाली होती. अर्जुन, प्रज्ञानंद आणि निहाल हे तिघेही आलटून पालटून पुढे जात होते आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दोमाराजू गुकेश असे एक नाव पुढे आले. एप्रिल २०२० ते मार्च २०२२ अशा दोन वर्षांमध्ये मोजके डाव खेळणाऱ्या गुकेशने पुढल्या ८ महिन्यांत तब्बल १२३ इलो गुणांची कमाई करून भारतीय संघात स्थान मिळवले.

भारताचा ‘ब’ संघ हा ‘अ’ संघापेक्षा चांगली कामगिरी करेल असे मी ‘लोकसत्ता’च्या मुलाखतीमध्ये स्पर्धेआधी म्हणालो होतो आणि त्यामध्ये मी काही खास महान भविष्य वर्तवले होते असे वाटत नाही, कारण गुकेश, प्रज्ञानंद, निहाल सरीन, आधिबान आणि नागपूरचा रौनक साधवानी अशा युवा संघाला कोणतेही दडपण नव्हते. ३० वर्षांचा आधिबान सोडला तर बाकी कोणाही खेळाडूला मतदानाचा अधिकार नाही इतके ते लहान होते. अर्थातच हे सगळे युवक आपली पहिली ऑलिम्पियाड स्पर्धा खेळत होते. त्यांना रमेशसारख्या अनुभवी प्रशिक्षकाचे स्पर्धेच्या काळात मार्गदर्शन होते. रमेश म्हणाला, ‘‘गुकेशने त्याला आधीच सांगितले होते की जमले तर त्याला सगळेच्या सगळे डाव खेळायचे आहेत. गुकेशला विश्रांती नकोच होती.’’
पहिल्या फेरीपासून गुकेशने जी विजयाची मालिका सुरू केली तिला खंडित करण्याचे काम कुणालाही करता आले नाही – कुणाला म्हणजे साक्षात अलेक्सी शिरोव्हलासुद्धा! हाच तो शिरोव्ह ज्याने तेहेरानमध्ये २००० साली आनंदला जगजेतेपदाच्या अंतिम फेरीत कडवी लढत दिली होती.
२६१२ इलो रेटिंग असलेला १५ वर्षांचा गुकेश २७०४ रेटिंगच्या शिरोव्हला हरवतो ही गोष्ट गुकेशला समाधान मिळवून देऊ शकली असती. आणि तेपण काळय़ा मोहऱ्यांकडून! एखादा सामान्य खेळाडू असता तर पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ज्योतिबा वस्तादासारखा आयुष्यभर शिरोव्हवरील विजयाचे वर्णन करून लोकांना वात आणला असता. पण गुकेशला वेळ नव्हता. त्याला इतिहास घडवायचा होता- स्वत:पेक्षा त्याच्या संघासाठी! पुढची लढत होती आर्मेनियाशी! गुकेशचा प्रतिस्पर्धी होता गॅब्रियल सर्गशियन (इलो रेटिंग २६९८). या एकेका डावाचे वर्णन करत राहिलो तर सगळा लेख भरून जाईल. त्यामुळे गुकेशने भारताच्या पराभवातही आपला सर्गशियनविरुद्ध डाव जिंकून आपल्या भावी प्रतिस्पध्र्याना आपण जगाच्या पटावर केवळ एक प्यादे म्हणून आगमन केलेले नसून एक महत्त्वाचा मोहरा असल्याचा इशारा दिला.

आठव्या फेरीत गुकेशची गाठ होती ती अग्रमानांकित अमेरिकेच्या सर्वोत्तम खेळाडू फॅबियानो करुआनाशी! गेल्या ऑलिम्पियाडमध्ये करुआनाने विश्वनाथन आनंदला पराभूत केले होते. या जगातील चौथ्या क्रमांकाच्या आणि गुकेशपेक्षा कितीतरी अनुभवी असणाऱ्या खेळाडूपुढे गुकेश काय टिकणार असेच सगळय़ांचे मत होते. पण गुकेशच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अतिशय अटीतटीने खेळल्या गेलेल्या आणि जगभरातून लाखो प्रेक्षकांनी इंटरनेटवर लाइव्ह बघितलेल्या या डावात गुकेशने करुआनावर मात केली आणि नागपूरकर रौनक साधवानीच्या डोिमग्वेज पेरेझवरच्या विजयामुळे भारताच्या युवा संघाने अमेरिकन संघाला ३-१ अशा फरकाने धूळ चारली! ८ पैकी ८ गुण!! तेही पहिल्या पटावर. ऑलिम्पियाडच्या जवळजवळ १०० वर्षांच्या इतिहासात तुम्हाला एकही खेळाडू सापडणार नाही ज्याने ६ ग्रॅण्डमास्टर्स आणि २ आंतरराष्ट्रीय मास्टर्सना तोंड देऊन सगळे डाव जिंकले आहेत. मी ज्या वेळी असे लिहितो त्या वेळी माझ्या डोळय़ापुढे कास्पारोव्ह, कार्पोव्ह, फिशर, आनंद, ताल असे अनेक दिग्गज आहेत.
नाक, कान, घसा तज्ज्ञ वडील आणि मायक्रोबायोलॉजिस्ट आई असलेल्या उच्चशिक्षित घराण्यात जन्मलेला गुकेश वयाच्या ७ व्या वर्षी बुद्धिबळ शिकला आणि अवघ्या दोन वर्षांत त्याने २०१५ सालचे आशियाई ९ वर्षांखालील शालेय अजिंक्यपद पटकावले. पण खरा चमत्कार त्याने त्यानंतर तीन वर्षांनी केला. थायलंडमधील चियांग माई येथील आशियाई १२ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत भाग घेताना गुकेशने पदकांची लयलूट केली. त्याने सुवर्णपदक जिंकलेच पण जलदगती( Rapid ) आणि विद्युत गती ( Blitz)) स्पर्धामध्ये त्याने सुवर्णपदक जिंकताना आपल्या संघांना सांघिक विजेतेपद मिळवून दिले. थोडक्यात, थायलंडमध्ये या पट्ठय़ाने ५ सुवर्णपदके भारतासाठी मिळवून दिली. परत येताना बँकॉकमध्ये दरवर्षी भरणारी बँकॉक ओपन स्पर्धा खेळण्याचे गुकेशने ठरवले.

दुसऱ्याच फेरीत त्याची भारताच्या माजी राष्ट्रकुल विजेत्या मिताली पाटीलशी बरोबरी झाली. गुकेश हिरमुसला, पण हिंमत सोडली नाही. तिसरी फेरी जिंकल्यावर चौथ्या फेरीचा प्रतिस्पर्धी पाहिल्यावर त्याला धक्का बसला. साक्षात अनातोली कार्पोव्हला हरवून कास्पारोव्हशी जगज्जेतेपदाची अंतिम फेरी खेळणाऱ्या ब्रिटिश ग्रँडमास्टर नायजेल शॉर्टबरोबर त्याची लढत होती. ११ वर्षांचा गुकेश आपल्या आयुष्यात जितके डाव खेळला नसेल त्याहून अधिक स्पर्धा खेळणाऱ्या (आणि किंबहुना जिंकणाऱ्या ) शॉर्टशी त्याची लढत होती.

नायजेल शॉर्टने भारतात येऊन अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत आणि त्यामुळे भारतीयांच्या बुद्धिबळ कसबाविषयी त्याला आदर आहे. त्यामुळे त्याने गुकेशविरुद्ध जराही कमजोर खेळ केला नाही आणि सामना अटीतटीचा झाला. परंतु शेवटच्या क्षणी नायजेलने चूक केलीच आणि गुकेशने बाजी मारली. ग्रँडमास्टर झाल्यावर नायजेल शॉर्टच्या संपूर्ण आयुष्यात त्याला पराभूत करणारा गुकेश हा सर्वात लहान खेळाडू असणार! पुढच्याच महिन्यात गुकेश फ्रान्समधील एका स्पर्धेत सगळे निकष पार करून आंतरराष्ट्रीय मास्टर झाला. त्यावेळी बोलताना गुकेश म्हणाला, ‘‘मला आता लवकरच ग्रँडमास्टर बनले पाहिजे.’’

मी गुकेशला आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये बघत होतो. त्याचा बहरलेला खेळही इंटरनेटवर दिसत होता, पण त्याच्याशी बोलायची वेळ आली जिब्राल्टरमध्ये. त्या स्पर्धेसाठी आलेल्या सर्वाना आयोजकांतर्फे जिब्राल्टरमधील बसचे विनामूल्य पासेस देण्यात येतात. जिब्राल्टर आहे एखाद्या खेडय़ाइतके. गुकेशचे वडील डॉ. रजनीकांत, गुकेश आणि मी एकच बस पकडत असू. त्या वेळी इतका आक्रमक खेळणारा विलक्षण बुद्धिमत्तेचा खेळाडू कमालीचा बुजरा असल्याची मला जाणीव झाली. विचारलेल्या प्रश्नांची जेवढय़ास तेवढी उत्तरे देऊन गुकेश बोलण्याचे काम वडिलांवर सोडून देत असे. किंवा असे म्हणता येईल की बोलण्याचे काम त्याची बुद्धिमत्ता पटावर करत असे.

सप्टेंबर २०२२ मध्ये ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक कांस्य पदके मिळवणारा गुकेश चातकासारखी वाट बघत असावा मॅग्नस कार्लसन भेटण्याची. जागतिक बुद्धिबळाच्या या अनभिषिक्त सम्राटाला हरवणे काही सोपे काम नाही. पण गुकेशच्या ऑलिम्पियाड संघातील निहाल सरीन आणि प्रज्ञानंद यांनी तो चमत्कार केलेला आहे. त्यामुळे एमचेस जलदगती स्पर्धेचे आमंत्रण आल्यावर गुकेश हरखून गेला, कारण स्पर्धेत खेळणार होता साक्षात मॅग्नस! दोघांची गाठ पडली आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये १६ वर्षांच्या गुकेशच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला तो जगज्जेत्या मॅग्नसला हरवणारा सर्वात लहान खेळाडू म्हणून!

२०२२ च्या सुरुवातीस फारसा प्रसिद्ध नसणारा गुकेश एका वर्षांत आशियाई खंडातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस पटकावतो यावरून भारतीय बुद्धिबळाची उंची जाणवते आणि भारतीयांच्या बुद्धय़ांकाची साक्ष पटते.