प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com
जगातला सर्वात मोठा क्रीडामहोत्सव म्हणजे ऑलिम्पिक! प्रत्येक लीप वर्षांत येणाऱ्या या महोत्सवाची जगभरातले खेळाडू आणि प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. दुर्दैवाने यंदा या लीप वर्षांत नेमका करोना नावाचा ‘धोंडा महिना’ आल्याने सगळेच आपापल्या घरात निमूटपणे बसले आणि कमालीची रंगत आणणाऱ्या या खेळांचा अगदी बेरंग झाला. तथापि एरवी महिनाभर चालणाऱ्या या क्रीडाउत्सवाच्या निमित्ताने अनेक इतर गोष्टींनाही चालना मिळते. अनेक क्रीडाविषयक पुस्तकं प्रकाशित होतात. ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या अनेक खेळांची चित्तथरारक अशी छायाचित्रांची पुस्तकं प्रकाशित होतात. त्याचबरोबर यानिमित्ताने व्यंगचित्रांची पुस्तकंसुद्धा प्रकाशित होतात. या पुस्तकांमध्ये जगभरातल्या हौशी आणि व्यावसायिक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रं प्रसिद्ध होतात. अक्षरश: प्रचंड विविधता या व्यंगचित्रांतून दिसून येते. ‘दि कार्टून अॅंड ऑलिम्पिक बुक’ या इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात ही व्यंगचित्रं पाहायला मिळतात. वेगवेगळे खेळ, त्या अनुषंगाने निर्माण होणारे चित्रमय विनोद, रेखाटनाच्या विविध शैली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नेमके कोणत्या विषयावर भाष्य करत आहोत याचं एक आंतरराष्ट्रीय भान यातील अनेक चित्रांतून दिसते. यानिमित्ताने काही अफलातून असे वेगळ्या पद्धतीने विचार करणारे व्यंगचित्रकारही दिसतात.
अगदी साधा विषय घ्यायचा म्हणजे ऑलिम्पिकची ज्योत.. जी एका गावातून दुसऱ्या गावात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात; इतकेच नव्हे तर एका खंडातून दुसऱ्या खंडात कितीतरी महिने जात असते. या अनुषंगाने अनेक व्यंगचित्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारे ‘ज्योत’ या विषयाकडे पाहिले आहे. उदाहरणार्थ ऑलिम्पिक ज्योत घेऊन येणारा खेळाडू जंगलातून शहरात धावत येतोय आणि पाठीमागे त्या जंगलाला भीषण आग लागते अन् त्यामुळे होणारी धावपळ वगैरे वगैरे. किंवा ज्योत घेऊन जाणाऱ्या खेळाडूचं नाक तिच्या चटक्याने भाजलं आहे, किंवा एका खेळाडूला ज्योतीच्या प्रदूषणाचा त्रास होतोय, वगैरे. एका चित्रात तर पाऊस पडत असल्यामुळे ज्योत घेऊन धावणारा खेळाडू हा एका हातात ज्योत आणि दुसऱ्या हातात छत्री घेऊन धावतोय असेही गमतीशीर चित्र आहे. पण हे सोबतचं चित्र फारच अफलातून कल्पनाशक्तीचं उदाहरण आहे. ज्योत घेऊन जात असतानाचं चित्र काढताना त्या ज्योतीमुळे व्यंगचित्राच्या कागदालाच आग लागली तर..? व्यंगचित्रकाराला खरोखरच सलाम केला पाहिजे!
ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे असंख्य मैदानी खेळ या चित्रांमध्ये चितारलेले आहेत. उदाहरणार्थ भालाफेक, जलतरण, बॉक्सिंग, फुटबॉल, धावणे, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, तलवारबाजी, सायकलिंग, कुस्ती, हॉकी, शूटिंग इत्यादी अनेक खेळांवर अनेक प्रकारची व्यंगचित्रं या संग्रहात आहेत. यातील काही उदाहरणं पाहता येतील.
पाश्चिमात्य देशांत धावपटू जिंकल्यानंतर त्यांना प्रचंड बक्षिसं, सवलती वगैरे दिल्या जातात. हे दाखवताना धावण्याच्या ट्रॅकवर डॉलरच्या नोटा आच्छादून एका व्यंगचित्रकाराने प्रभावी भाष्य केलं आहे. दुसऱ्या एका चित्रात बॉक्सर्स प्रॅक्टिस करताना जी पंचिंग बॅग वापरतात तिलाच दोन हात फुटले असून त्या बॅगनेही या खेळाडूला दोन-चार ठोसे लगावून चांगलंच जखमी केलंय अशी फॅन्टसी एका व्यंगचित्रात दाखवली आहे. मानवाची उत्क्रांती दाखवणारं एक चित्र आहे. त्यात जिथे बक्षिसं प्रदान करतात त्या मंचावर तिसऱ्या क्रमांकावर आदिमानव, दुसऱ्या क्रमांकावर मानव आणि पहिल्या क्रमांकावर रोबो दाखवलेला आहे. याचा अर्थ काही वर्षांनी होणारं ऑलिम्पिक हे फक्त रोबोंमध्येच खेळलं जाईल असं भयसूचक भाष्य व्यंगचित्रकाराने केलं आहे. (अर्थात सध्याही रोबोंच्या स्पर्धा होतातच.)
या संग्रहात काही राजकीय, सामाजिक भाष्यं करणारी व्यंगचित्रंही आहेत. उदाहरणार्थ, सोबतच्या चित्राकडे पाहता येईल. सर्व खेळाडू धावण्याच्या तयारीत आहेत. परंतु धावपटूंमधल्या एका कृष्णवर्णीय खेळाडूचे दोन्ही पाय मात्र साखळदंडाने बांधलेले दिसतात. जगभरात सर्व क्षेत्रांत समानता असावी आणि मोकळेपणाने स्पर्धा व्हावी असं मानणाऱ्या या युगात वर्णद्वेषावरचं हे अत्यंत प्रभावी भाष्य आहे.
ऑलिम्पिकच्या खालोखाल जगातील सर्वात दुसरा लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल विश्वचषक! एकदा फुटबॉलचे सामने सुरू झाले, की जणू काही सगळं जग त्याभोवतीच फिरतं.. हे सांगणारं सोबतचं हे व्यंगचित्र. ऑलिम्पिकमधले बहुतेक सगळे खेळ हे झटपट संपणारे असतात. तासा-दीड तासात खेळाचा निकाल लागतोच. क्वचित एखादी लांब पल्ल्याची धावण्याची स्पर्धा दहा-बारा तासांनी संपते. कदाचित हेच कारण असावं की, आपण भारतीय लोक ऑलिम्पिकसाठी फारसे उत्सुक नसतो. कारण आपला आवडता क्रिकेट हा खेळ पाच-पाच दिवस चालणारा असतो. आपल्याकडे रिकामा वेळ भरपूर असल्याने आपण तो मनसोक्त एन्जॉय करू शकतो. म्हणूनच ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडू जरी उत्सुक असले तरी प्रेक्षक मात्र रात्री ऑलिम्पिकचे ‘हायलाइट्स’ बघून आपलं प्रेक्षक म्हणून असणारं कर्तव्य (नाइलाजाने) पार पाडतात.
अर्थातच आपल्याकडे क्रिकेट लोकप्रिय आहे म्हटल्यावर त्यावरची व्यंगचित्रंही भरपूर असणं स्वाभाविक आहे. त्यातही अलीकडे आयपीएल आल्यामुळे व्यंगचित्रांच्या विषयांमध्ये विविधता आली आहे. कारण खेळाव्यतिरिक्त आणखी अनेक गोष्टी आयपीएलमध्ये असतात. उदाहरणार्थ खेळाडूंचा लिलाव, चीअर गर्ल्स, अनेक सेलेब्रिटींची उपस्थिती इत्यादी इत्यादी. ‘खेळाडूंचा लिलाव’ हे खेळापेक्षा पैसा श्रेष्ठ यावरचं शिक्कामोर्तबच आहे. यावरच्या माझ्या एका पॉकेट कार्टूनमध्ये- ‘हे असंच चालू राहिलं तर उद्या कदाचित प्रेक्षकांनाही लिलावात विकत घेण्याची वेळ येईल..’ असा धोका व्यक्त केला होता. लहान मुलांना क्रिकेट कोचिंग क्लासला घालण्याची उन्हाळी फॅशन आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर आहे. आपल्या मुलाने किमान वीस-पंचवीस टेस्ट मॅचेस तरी खेळाव्यात किंवा आयपीएलमध्ये तरी खेळावं असं तीन-चार लाख पालकांना दरवर्षी वाटत असतं. म्हणून वेगवेगळ्या शिबिरांमध्ये प्रचंड गर्दी असते. पण काही पालक अतिशय प्रॅक्टिकल असतात. एका व्यंगचित्रात आई आपल्या दुसरीतल्या मुलाला घेऊन बाबांना म्हणते, ‘‘त्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे! करिअरच्या दृष्टीने तंत्रशुद्ध आणि शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी आपण त्याला एखाद्या नावाजलेल्या, अनुभवी बुकीकडे पाठवू या का?’’
थेट संबंध नसलेल्या दोन गोष्टी एकत्र आणून विनोदनिर्मिती करणं ही व्यंगचित्रनिर्मितीतली एक गंमत असते. उदाहरणार्थ, पूर्वी पाच दिवसांचे कसोटी सामने लोकप्रिय होते. नंतर वन डे मॅचेस आल्या आणि सध्या ट्वेंटी-ट्वेंटी. त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्येही फरक पडला. सुरुवातीला मोठा टीव्ही, नंतर कॉम्प्युटर आणि आता मोबाइल आपल्या घरात दिसू लागले. या दोघांची सांगड घालून एक व्यंगचित्र काढलं होतं. त्यात आजोबा, वडील आणि मुलगा अशा तीन पिढय़ा दाखवल्या. त्यात लहान मुलगा वडिलांना म्हणतो, ‘‘आजोबा टीव्हीवर टेस्ट मॅच बघत आहेत. तुम्ही कॉम्प्युटरवर वन-डे बघा! म्हणजे मला मोबाइलवर ट्वेंटी-ट्वेंटी बघता येईल!’’
अर्थात क्रिकेट हाच आपला अघोषित राष्ट्रीय खेळ आहे. संपूर्ण कुटुंब (आणि थोडे शेजारीही) मॅच बघायला एकत्र येणं हे फार विलोभनीय दृश्य असतं. (त्यामुळेच कदाचित भारतातली एकत्र कुटुंब पद्धती थोडीफार शिल्लक राहिली असावी!) यावेळी तावातावाने होणारी चर्चा, पुढच्या बॉलला काय होणार याविषयीची भविष्यवाणी किंवा तीस वर्षांपूर्वीच्या काही शूरवीरांच्या दंतकथा आणि सोबत आकडेवारी या सगळ्यामुळे वातावरण एकदम भारून जातं! त्यामुळेच सोबतच्या चित्रातलं भाष्य एकदम खरं ठरतं!