अजित देशमुख
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या भूमिहीन आणि दारिद्रय़रेषेखालील जीवन जगणाऱ्यांच्या लोकवर्गणीतून एक डॉक्युमेण्ट्री तयार झाली. त्यावेळी नवख्या आणि स्वतंत्रपणे पहिल्यांदाच काम करणाऱ्या दिग्दर्शकाच्या प्रयोगाची ही कहाणी. तंत्रज्ञानाच्या सुलभतेमुळे या माध्यमाच्या सुवर्णकाळाबाबतही सांगणारी..
मी ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून नाटय़शास्त्रात एम. ए. केले. २००० साली अभ्यासक्रम पूर्ण करून मी मुंबईच्या नाटय़-चित्रपट वर्तुळात उमेदवारी करू लागलो. मी चित्रपट-माहितीपट निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेतले नाही. मात्र सुरुवातीच्या काळात एक-दोन चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यामुळे पटकथा ते अंतिम चित्रपट असे चित्रपट निर्मितीचे सर्व टप्पे जवळून पाहता आले. स्वतंत्रपणे निर्मिती-दिग्दर्शन करून पाहिले पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली. मग त्याबाबत मला लवकरच संधी मिळाली.
‘स्वच्छ ऊर्जा – गलिच्छ कारवाया’ (२००९) हा मी दिग्दर्शित केलेला पहिला माहितीपट होय. हा माहितीपट निर्माण करताना, हा माहितीपट एखाद्या राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय महोत्सवात पाठविला जावा, तिथे तो निवडला जावा, तिथे त्याला पुरस्कार मिळावा, इत्यादी उद्देश नव्हते. कोणत्याही प्रसिद्ध चॅनेलने वा निर्मिती संस्थेने वा प्रख्यात फंिडग एजन्सीने या माहितीपटाच्या निर्मितीला अनुदान दिलेले नव्हते.
या माहितीपटाची निर्मिती, ‘सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा’ या संघटनेच्या, त्या वेळी सुरू असलेल्या संघर्षांचा एक भाग म्हणून करण्यात आली होती. त्यावेळी ही संघटना जंगल खाते, पोलीस प्रशासन आणि खासगी पवनऊर्जा कंपन्या या तीन विभागांशी संघर्ष करत होती. २००७ साली या संघटनेचा संघर्ष तीव्र झाला आणि अत्यंत निर्णायक टप्प्यावर आला होता. १४ जुलै २००७ साली पांगण या गावात ‘स.ग्रा.क.स.’चे आदिवासी सभासद आणि ‘पोलीस व पवनऊर्जा कंपन्यांच्या पाठिंब्याने’ बाहेरून आलेले ४०० आदिवासी लोक यांच्यात दंगल झाली. तुफान दगडफेक झाली. पोलिसांकडून अश्रूधूर फोडण्यात आले. लवकरच सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे नेते कॉ. किशोर ढमाले यांना धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक आणि नगर या पाच जिल्ह्यांतून हद्दपार करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. त्यांच्या पाठोपाठ आणखी १५ ते २० प्रमुख कार्यकर्त्यांनादेखील असेच हद्दपार केले जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे तातडीने या बाबतीत काहीतरी करणे आवश्यक होते.
‘श्रमराज्य’ इत्यादी स्थानिक वर्तमानपत्रांनी याबाबत संघटनेची बाजू घेतली होती. कॉ. आंनद तेलतुंबडे यांनी भेट देऊन, पाहणी करून अहवाल सादर केला होता. २००७ साली सोशल मीडिया आजसारखा प्रभावी नव्हता. असे असले तरी त्या काळच्या ‘ऑर्कुट’ या माध्यमावर कॉ. किशोर ढमाले यांच्या हद्दपारी विरोधासाठी पेज तयार करण्यात आले होते. पण यापेक्षा प्रभावीपणे संघटनेची बाजू मांडण्याची गरज होती. जेणेकरून प्रशासनाला संघटनेची बाजू कळेल आणि त्याचबरोबर संघटनेत व संघटनेबाहेर असलेल्या अल्पशिक्षित आदिवासी जनतेचे प्रबोधन होईल, त्यांच्या समस्या त्यांना कळतील, १९७० सालापासून सुरू असलेल्या ‘आदिवासी जमीन हक्क चळवळी’च्या इतिहासाची त्यांना माहिती होईल. हे सगळे शक्य करण्यासाठी माहितीपटाची निर्मिती करण्यात आली.
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या सभासदांनी- जे भूमिहीन होते, जे दारिद्रय़रेषेखालील जीवन जगत होते- केलेल्या लोकवर्गणीतून या माहितीपटाची निर्मिती केली गेली होती. हे माझे पहिलेवहिले स्वतंत्र काम होते. त्यामुळे संघटनेकडून मिळालेल्या रकमेचे माझ्यावर दुहेरी दडपण होते. एक म्हणजे आपण भूमिहीन-कष्टकरी वर्गाकडून पैसे घेत आहोत याचे नैतिक दडपण येत होते आणि मिळालेल्या पैशात यशस्वीपणे माहितीपट निर्माण व्हायला हवा, पैसे वाया जाता कामा नये, वाढीव खर्च करावा लागू नये, याचे व्यावहारिक दडपण येत होते.
माहितीपट तयार करून पुढे काय करायचे हे आधीच ठरलेले होते. माहितीपटाच्या १००० व्हीसीडी प्रती तयार करून, त्या धुळे-नंदुरबार तालुक्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सभासदांमध्ये वितरित केल्या जाणार होत्या. व्हीसीडी प्लेअरवर त्याचे प्रदर्शन केले जाणार होते. त्याच माध्यमातून वितरण केले जाणार असल्यामुळे माहितीपटाला काळाचे बंधन होते. व्हीसीडीमध्ये ७५ मिनिटांचा व्हिडीओ मावू शकत होता, त्यामुळे ७५ मिनिटांत १८५४ साली झालेल्या ‘जंगल खात्याच्या स्थापने’पासून ते २००६ च्या ‘आदिवासी जमीन हक्क कायद्या’च्या निर्मितीपर्यंतचा इतिहास मांडायचा होता.
२००७ ते २००९ या काळात मी या माहितीपटासाठी चित्रीकरण केले. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत जोरदार आंदोलन सुरू होते. साक्री, दहीवेल, पांगण, पाचमावली, वाल्ह्वे, ब्राह्मणवेल, विसरवाडी, नवापुर, नंदुरबार, धुळे या ठिकाणी होत असलेले मोर्चे, आणि सभा मी चित्रित केल्या. या बरोबरच प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. स.ग्रा.क.स.च्या सभांचे एक वैशिष्टय़ होते. प्रमुख वक्त्यांच्या आधी अनेक आदिवासी कार्यकर्ते, सभासद, स्त्री-पुरुष भाषणे करीत असत. मराठी, अहिराणी, मावची, भिलोरी अशा अनेक भाषा कानांवर पडत होत्या. शिकलेले तरुण आदिवासी कार्यकर्ते उत्तम मराठीत भाषण करत, तर पन्नाशीकडे झुकलेले कार्यकर्ते स्थनिक बोलीभाषेचा वापर करत. एखादा वयोवृद्ध कार्यकर्ता भाषण करायला उभा राहिला तर एकदम जुन्या वळणाची भाषा ऐकायला मिळे. कॉ. किशोर ढमाले, कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. रामसिंगभाऊ गावित, कॉ. वंजीभाऊ गायकवाड हे प्रमुख लोक समोर कोणता जमाव आहे यानुसार कधी मराठीत तर कधी मावची तर कधी अहिराणी भाषेत बोलत असत. सुरुवातीला भाषणे ऐकणे अवघड वाटे, पण एडिटिंगचा टप्पा येईपर्यंत भाषणांचा आशय कळू लागला होता.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आदिवासींचे वनहक्क मान्य करा, कसलेल्या वनजमिनीचा ७/१२ द्यावा, संबंधित कायद्याची अंमलबजावणी करा, जंगल खात्याला विरोध, पवनऊर्जा कंपन्यांना विरोध आणि कॉ. किशोर ढमाले यांच्या हद्दपारीला विरोध, इत्यादी होत्या. या मागण्यांच्या अनुषंगाने भाषणे होत. कॉ. गोविंद पानसरे, कॉ. एन. डी. पाटील, भाई वैद्य, असे महत्त्वाचे नेते मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. एकापेक्षा एक प्रभावी भाषणे होत होती. मोर्चे आणि सभा गाजत होत्या. उत्तरोत्तर अधिकाधिक लोक जोडले जात होते.
या सगळय़ा प्रक्रियेत मी मला दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा ‘निकष’ ठरवला. मी ठरवले की, हा भावी माहितीपट एखाद्या ‘यशस्वी सभेसारखा’ असला पाहिजे, त्याचा प्रत्येक प्रदर्शनाने एकेका लहान सभेचे काम केले पाहिजे. प्रत्येक प्रदर्शनात लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे आणि लोक संघटनेला जोडले गेले पाहिजेत. ही स्पष्टता आल्यानंतर पुढच्या सर्व प्रक्रिया सुसूत्रपणे पार पडत गेल्या. आधी कागदावर पटकथा निर्माण झाली, मग एडिटिंग सुरू झाले आणि लवकरच माहितीपट निर्माण झाला. २००९ साली निळू फुले यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे माहितीपटाचे प्रकाशन झाले. त्यानंतर संघटनेचे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे, नंदुरबारमध्ये व्हीसीडी-डीव्हीडी वितरित झाल्या. अनेक प्रदर्शने झाली. याशिवाय पुणे, औरंगाबाद, मालेगाव, कणकवली, मुंबई अशा अनेक ठिकाणी माहितीपटांची अनेक जाहीर प्रदर्शने झाली.
मला प्रतिक्रिया मिळाल्या की लोकांना माहितीपट आवडला. त्याआधी, विशेषत: आदिवासी भागातील लोकांना, २००७ च्या सुमारास फक्त हिंदी-मराठी चित्रपट व मालिका पाहायला मिळत होत्या. आता त्यांना त्यांच्या समस्या समजून सांगणारा माहितीपट पाहायला मिळाला. त्यात त्यांचे नेते, त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते पाहायला मिळाले याचा आनंद होता. त्याचबरोबर आदिवासी जमीन हक्कांशी निगडित अनेक बाबींना माहितीपटात जागा दिलेली होती. त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती असल्यामुळे लोक शांतपणे आणि काळजीपूर्वक माहितीपट पाहात होते. लोक त्यांच्या हिताच्या गोष्टी वेळात वेळ काढून बघतात. २०१६ पासून हा माहितीपट युटय़ूबवर उपलब्ध आहे. २००८ साली मी संघटनेच्या नेत्यांना सांगितले होते की, जर आंदोलन यशस्वी झाले आणि लोकांना ७/१२ मिळू लागला, तर आपण त्याचा वापर त्या वेळच्या माहितीपटात करू. त्यानुसार २०२२ मध्ये आलेल्या ‘साजुबाई गावित – सत्यशोधक आदिमाय’ या माहितीपटात वन हक्क दावेदारांना मिळालेल्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला.
एकेकाळी चित्रपट-माहितीपट निर्मिती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होती. जसजसे संगणक तंत्रज्ञान प्रगत झाले, तसतसे चित्रपट-माहितीपट निर्मितीशी संबंधित उपकरणे आणि तंत्रज्ञान स्वस्त झाले आणि हे क्षेत्र सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले.
उदा. २००० साली मी उमेदवारी करत होतो, तेव्हा बीटा रेकॉर्डर असलेल्या एडिटिंग सेटअपची किंमत दीड कोटी होती. आता अवघ्या काही लाखांत उतम एडिटिंग सेटअप मिळतो. यामुळे देशातील अनेक ठिकाणांहून निर्माते-दिग्दर्शक उदयाला येत आहेत. ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. अर्थात यामुळे कमी-अधिक गुणवत्ता असलेली निर्मिती होत आहे. त्याला दोष मानण्यासारखे काही नाही. कारण ज्या काळात चित्रपट-माहितीपट निर्मिती हे क्षेत्र देशातील मूठभरांची मिरासदारी होती, त्या काळातदेखील उतम, बरी, वाईट आणि भिकार निर्मिती होतच होती. त्याला पर्याय नाही. २०२२ साली माझ्याकडे एका सहव्यावसायिक मान्यवरांनी तक्रार केली की लोकांचा ‘अटेन्शन स्पॅन’ कमी झालेला आहे. लोक आता लहान व्हिडीओ पाहणे पसंत करतात. मला हे आजिबात मान्य नाही. कारण हीच तक्रार मी २००३ साली दुसऱ्या एका सहव्यावसायिक मान्यवरांकडून ऐकली होती. २००३ साली युटय़ूब-रील्स-टिकटॉक इत्यादी माध्यमे नव्हती. तरीदेखील लोकांचा ‘अटेन्शन स्पॅन’ कमी झालेला आहे, लोक वाचत नाहीत, लोक उतम कलाकृती पाहत नाहीत, लोक प्रतिक्रिया देत नाहीत.. अशा तक्रारी केल्या जात असत. माझ्या मते वस्तुस्थिती याच्या उलट आहे. लोक वाचत आहेत, पाहत आहेत आणि प्रतिक्रियादेखील देत आहेत.
माहितीपट निर्मिती आणि वितरण यासाठी सध्याचा काळ सर्वोत्तम आहे. मला आठवते १९९० च्या दशकात जेव्हा मी शिकत होतो, तेव्हा ‘राम के नाम’, ‘पिता, पुत्र और धर्मयुद्ध’ इत्यादी माहितीपट व्ही.एच.एस. कॅसेटवर बघितले होते. पुरोगामी चळवळीसाठी निर्माण केलेले जे काही थोडे माहितीपट होते ते उपलब्ध होणे हे थोडे कठीण होते. त्या काळी माहितीपट निर्माते तक्रार करत की आम्ही निर्माण केलेले माहितीपट लोकांपर्यंत नेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाहीए आणि तशी यंत्रणा खरंच नव्हती. चित्रपट-माहितीपट प्रदर्शनावर प्रस्थापित ‘वितरक व वितरण संस्था’ यांच्या नानाविध गटांचे नियंत्रण होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज प्रत्येकाच्या हातातील मोबाइल, युटय़ूब, व्हिडिओ व इतर ओटीटी माध्यमे यांमुळे माहितीपट निर्मिती आणि वितरण यंसाठी हा सुवर्णकाळ आहे. तसेच माहितीपट निर्मितीसाठी उपयुक्त असलेली चित्रीकरण, संपादन, कृत्रिम चित्रनिर्मिती, कृत्रिम निवेदन, पार्श्वसंगीत निर्मिती अशी अनेक तंत्रे निर्मात्यांना उपलब्ध आहेत. चित्रपट-माहितीपट निर्मिती क्षेत्र समृद्ध होत आहे. प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या सामग्रीचे प्रमाण पाहता हा त्यांच्यासाठीदेखील सुवर्णकाळ आहे.
अत्यंत कठीण अशी वैज्ञानिक माहिती सुलभ करून सांगणारे शैक्षणिक माहितीपट, संगणक आज्ञावली ते संगीत कला यांचे प्रशिक्षण देणारे शैक्षणिक माहितीपट, अनेक वादग्रस्त विषयांवरील राजकीय-सामाजिक माहितीपट वा नानाविध धर्माच्या धर्मग्रंथांची, धर्मश्रद्धांची चिकित्सा करणारे माहितीपट मुक्तपणे निर्माण केले जात आहेत. ते इंटरनेटवर वितरित होत आहेत आणि त्यांना मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकदेखील मिळत आहेत. प्रेक्षकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाददेखील मिळत आहे आणि बदल घडत आहेत. एक मोठे सामाजिक प्रबोधन व परिवर्तन आजूबाजूला सुरू आहे. माझ्या मते, भारतीय निर्माते, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांना आधी कधीही उपलब्ध नसलेली ‘एक आदर्श अवस्था’ सध्या प्राप्त झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या अवकाशाचे स्वागत केले पाहिजे.
नाटककार आणि माहितीपट निर्माते ही ओळख. ‘सुसाट’ या नाटकासाठी ‘महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका’ यांचा २०१५ सालचा नाटय़पुरस्कार. ‘स्वच्छ ऊर्जा गलिच्छ कारवाया ’(२००९), ‘साजुबाई गावित – सत्यशोधक आदीमाय ’ (२०२२), ‘रामसिंग गावित – सत्यशोधक योद्धा ’(२०२४) आदी माहितीपटांची ‘डॉक्युमेण्ट्री वर्तुळात चर्चा.
युटय़ूब चॅनेल : https:// www. youtube.com/ @satyashodhakkisan
Email : deshmukh.ajit.tatyaba@gmail.com