केरळमध्ये धूमधडाक्यात साजरा होणारा खास मल्याळी लोकांचा सण म्हणजे ‘ओणम’! ओणम म्हटल्यावर आठवतात त्या या दिवसांत केरळमध्ये ठिकठिकाणच्या नद्या व तळ्यांमध्ये होणाऱ्या बोटींच्या शर्यती! ओणम हा कापणीच्या हंगामातील सण. पावसाळा संपत आलेला असतो. बहरलेल्या हिरवाइच्या रूपात निसर्गदेवता ओणमचे स्वागत करायला सज्ज झालेली असते. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही या सणाचे एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते. त्यावर फुलांची रांगोळी काढण्यात मुलेमुली गढून जातात. घराच्या आजूबाजूला सकाळी लवकर फिरून पुक्काळम्साठी विविध रंगांची फुलं गोळा करण्याचा त्यांचा उत्साह दांडगा असतो. पहिल्या दिवशी काढलेल्या फुलांच्या रांगोळीत रोज थोडी थोडी फुलांची भर पडत जाते. दहाव्या दिवशी या फुलांच्या रांगोळीचा भलामोठा आकार बघण्यासारखा असतो.
विष्णूच्या वामन अवताराच्या आणि बळीराजाच्या कल्पित आगमनाप्रीत्यर्थ हा सण मल्याळी लोकांत उत्साहाने साजरा केला जातो. मल्याळी कॅलेंडरमधील चिङ्ग्यम महिन्यातील पहिल्या दिवसापासून दहा दिवस चालणारा हा आनंदोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा सण दहा दिवसांचा असला तरी त्यातील पहिल्या दिवसाला महत्त्व असते. या सणाचा पहिला दिवस गणेश चतुर्थीपासून सुरू होतो. त्याला ‘अत्तम’ म्हणतात. पहिल्या दिवशी केरळमधल्या गावागावांतून या सणाचा म्हणून ध्वज उभारला जातो. हा ध्वज मग ते अॅलेप्पी जिल्ह्याच्या एडत्वा गावातील चर्च असो वा चेरामन येथील भारतातील आद्य मशीद असो- सर्वत्र असतो. ध्वज उभारण्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा केरळमधील सर्व मंदिरांत सारखीच असते.
कोचीनजवळील त्रिक्काक्करा या गावातील मंदिर संकुलात वामनाचे मुख्य मंदिर आहे.या संकुलात विष्णूचीही मंदिरं भरपूर आहेत. सणाच्या पहिल्या दिवशी वामनाची मूर्ती अग्रभागी ठेवून मोठी मिरवणूक काढली जाते. सायंकाळी मंदिराला चोहोबाजूने वेढलेल्या चट्टविळकमध्ये (दिव्यांसाठी योजलेल्या लाकडी कोनाडय़ात) पणत्या लावल्या जातात. या देवळांत ओणसद्या (उत्सवाच्या दिवसांत होणारी मेजवानी) मोठय़ा प्रमाणावर दिली जाते. उत्सवाच्या दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच कथकलीसारखे करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. या सणाची मल्याळी लोकांना एवढी उत्सुकता असते, की अगोदरच्या महिन्यापासूनच म्हणजे मल्याळी कर्केटम महिन्यापासून घरातील साफसफाईला सुरुवात होते. उद वगरे जाळून घरातील किडय़ामुंग्यांना घालवले जाते. जुनाट टाकाऊ वस्तू बांबूच्या परातीत घालून त्यांना घरातील इडा-पीडा समजून नोकराकरवी त्या दूरवर फेकल्या जातात. त्या नोकराकरवी घराबाहेर काढताना वाटेत घरातील कोणी नोकराला आडवे जाणार नाही याची दक्षता घेतली जाते.
दहाव्या दिवशी म्हणजे तिरूओणमच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यावर नवे कपडे घालून देवदर्शन करण्याची लोकांमध्ये लगबग असते. या सणाचे मुख्य आकर्षण असते मेजवानी. नाश्त्याला केरळमध्ये खास मिळणारी केळी उकडून खायला दिली जातात. त्याबरोबरच पिकलेल्या केळ्यांसह पापडम्चा खासा फराळ असतो. जेवणातील मुख्य पदार्थाबरोबर हेही पदार्थ वाढले जातात. या दिवसांत कोणाही मल्याळी माणसाच्या घरात पाहुणे म्हणून जा- कुरकुरीत खाऱ्या केळ्याच्या चिप्सबरोबर कॉफीच्या कपाने तुमचे मनापासून स्वागत होईल.
पूर्वीच्या काळी गावांत काही ठिकाणी झाडावर झोपाळे बांधले जात. हे झुले सुंदर फुलांनी सजवले जात. नाटकं, संगीत, जलसे यांचा या दिवसांत नुसता जल्लोष असतो. ओणमला चिकणमातीपासून अंडाकृती आकाराच्या विष्णूच्या मूर्ती बनवल्या जातात. तांदळाच्या पिठीचा वापर करून त्यावर नक्षी काढली जाते. माडाच्या काडय़ा या मूर्तीना टोचून त्यावर सुरेख फुलं खोचली जातात. अशा सजवलेल्या मूर्ती अंगणात, फुलांच्या रांगोळीच्या मधे ठेवल्या जातात. त्या दिवशी या देवाला तीन वेळा नवेद्य दाखवला जातो.
ओणम हा सण १९६० पासून केरळ सरकार राज्यपातळीवर साजरा करू लागले आहे. या महिन्यात हा ‘पर्यटन सप्ताह’ आखला जातो. संपूर्ण राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. यानिमित्त विविध क्रीडाप्रकारांचे आयोजन केले जाते. ज्यात धाडसाची गरज असते असे पुरुषांचे खेळ- म्हणजे तळप्पंतू कळी (बलापाठोपाठ त्याचा कासरा धरून वेगाने धावणे), वळ्ळम्कळी (सरोवरे आणि नदीपात्रातील बोटींच्या शर्यती), पुलीकळी (वाघाच्या सोंगांचा खेळ) हे खेळ खेळले जातात. तर महिला कईकोट्टी कळी आणि तुंबी तुल्लाल (एक-दुसरीला टाळ्या देत फेर धरून केले जाणारे नृत्य) खेळतात.
दहाव्या दिवशी मंदिर आवारातील ओणमचा ध्वज उतरवण्यात येतो. ध्वज उतरवण्याचा पहिला मान कोचीपासून १२ कि.मी.वरील त्रिपुण्णित्तुरा येथील देवळाला जातो. त्रिपुण्णितुरा ही पूर्वी केरळची राजधानी होती. येथील मंदिरातील ध्वज खाली आणल्यावरच सर्व ठिकाणचे ध्वज खाली आणले जातात.
या सणाच्या दिवसांत केरळमधील स्त्रिया पारंपरिक वस्त्रांत वावरतात. ओणम हा एकमेकांना भेटवस्तू देण्याचा व घेण्याचा सण समजला जातो. घरातील कुटुंबप्रमुख कुटुंबातील प्रत्येकाला त्या दिवशी नवीन कपडे- ज्याला ओणपुडावा म्हणतात- भेट देतो. घरातल्यांना या भेटी दिल्यावर मग घरातील नोकर व शेतातील मजुरांनाही भेटवस्तू देतात.
हा सण साजरा करण्यामागे केरळीय जनतेच्या मनात एक भावना आहे. असे म्हणतात की, केरळीय जनतेने बळीराजाच्या काळात सुवर्णयुग अनुभवले. त्याकाळी राज्यात सर्वत्र सुख-शांतता नांदत होती. जनता प्रामाणिकपणे व्यवहार करीत असे. सर्वत्र सुबत्ता होती. दानशूरपणाबद्दल तिन्ही लोकांत प्रसिद्ध पावलेल्या बळीराजाला लोक खूप मान देत. त्याच्या दारी आलेला याचक विन्मुख होऊन कधीच माघारी जात नसे. राजाचा सर्वत्र उदोउदो चालला होता. राजाच्या पुण्याईने इंद्राचे आसन डळमळू लागले बळीराजाचे प्रस्थ एवढे वाढलेले पाहून इंद्र व इतर देव घाबरले. इंद्राच्या मनात मत्सर जागृत झाला. बळीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी मग देवांनी विष्णूला साकडे घातले. विष्णूने देवांची ही विनंती मान्य केली. बळीराजाचे महत्त्व कमी करण्यासाठी त्याच्या दानशूरपणाचा फायदा घेण्याची युक्ती विष्णूने योजली. त्याने वामनाचे रूप घेतले आणि तो बळीराजाच्या दारी याचक म्हणून उभा राहिला. राजाने विष्णूला एक साधारण अतिथी समजून त्याची यथासांग पूजा केली. त्यास काय भिक्षा पाहिजे, म्हणून विचारणा केली. बटूच्या रूपातील विष्णूने ‘मला पाय ठेवायला फक्त तीन पावलं जमीन पाहिजे,’ अशी मागणी केली. बळीने जरी वामनरूपातील विष्णूला ओळखले नाही तरी राजाच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या गुरूने- शुक्राचार्याने अंतज्र्ञानाने विष्णूला तात्काळ ओळखले आणि राजाला दानाचे उदक सोडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण राजा आपला धर्म कसा सोडणार? आता तर वचन दिले गेले होते. दानाचे उदक सोडल्यावर मात्र वामनाने आपले भव्य रूप प्रकट केले आणि सहज एका ढांगेत स्वर्गलोक व्यापला, दुसरे पाऊल पृथ्वीवर टाकले. आता आणखी कुठेच जागा न उरल्याने ‘तिसरे पाऊल कोठे ठेवू?’ असा प्रश्न त्याने बळीला केला. कुठेच जागा न उरल्याने बळीने नम्रपणे आपले मस्तक पुढे केले व आपल्या मस्तकावर पाय ठेवण्याची वामनाला विनंती केली. वामनरूपातील विष्णूने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात धाडले.
बळीराजाची भक्ती लक्षात घेऊन विष्णूने त्याला दोन वर दिले. एक- पाताळलोकाचे सार्वभौमपद त्याला बहाल केले. दुसरे- त्याच्या दरबारात द्वारपाल म्हणून स्वत: उभे राहण्याचे काम विष्णूने आनंदाने स्वीकारले. बळीचे त्याच्या जनतेवर असलेले प्रेम लक्षात घेऊन त्याला वर्षांतून एकदा तिरूओणमच्या दिवशी पृथ्वीलोकातील आपल्या प्रिय प्रजेला भेटण्याची परवानगीही दिली. त्या दिवशी बळीराजा आपल्याला भेटायला येतो, या समजुतीने ‘आम्ही तुझ्या राज्यात सुखी, आनंदी आहोत, आमची भरभराट झाली आहे,’ हे दर्शविण्यासाठी हा ओणम उत्सव मल्याळी लोक हर्षोल्हासाने साजरा करतात. शेवटच्या दिवशी घरोघरी मेजवान्या केल्या जातात. या दिवशी गावांत सजवलेल्या हत्तीची मिरवणूक काढली जाते.
आपल्याकडे जसे होळीच्या दिवसांत सोंग घेऊन भिक्षा मागितली जाते, तद्वत केरळमधील काही खेडय़ांत ओणमच्या दिवसांत बळीराजाचे काल्पनिक रूप घेऊन मुलं दारोदारी फिरतात व भिक्षा मिळाल्यावर आशीर्वाद देतात.
असा हा आनंदोत्सवी सण या वर्षी १६ सप्टेंबरला येत आहे. केरळमध्ये पूजनीय असलेल्या वामनाचे ‘त्रिक्काकरा’ हे मंदिर कोची शहरानजीक आहे.
ओणम
केरळमध्ये धूमधडाक्यात साजरा होणारा खास मल्याळी लोकांचा सण म्हणजे ‘ओणम’! ओणम म्हटल्यावर आठवतात त्या या दिवसांत केरळमध्ये ठिकठिकाणच्या नद्या व तळ्यांमध्ये होणाऱ्या बोटींच्या शर्यती!
First published on: 08-09-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onam