अध्यक्ष, कोकण इतिहास परिषद, ठाणे कल्याण येथील एका भंगाराच्या दुकानात नुकताच ताम्रपट सापडल्यामुळे एक हजार वर्षांपूर्वीच्या कोकणाची राजकीय व सामाजिक जडणघडण समजावून घेता येणे सोपे झाले आहे. त्याविषयी…
कल्याण पोलिसांना एका तपासात भंगाराच्या दुकानात तीन तांब्याचे पत्रे सापडले. त्यावर अक्षरे कोरलेली दिसल्यामुळे त्यांनी ते पत्रे पोलीस स्टेशनमध्ये आणले. माझ्या एका पत्रकार मित्राने मला ही माहिती दिली. कोकण इतिहास परिषदेच्या कल्याण शाखेचे अध्यक्ष काका हरदास, प्रा. जितेंद्र भामरे व ठाण्याहून माझ्यासोबत रवींद्र लाड व सदाशिव टेटविलकर यांनी मिळून या ताम्रपटांची पाहणी केली आणि क्षणार्धात कोकणच्या इतिहासावर नवा संदर्भ सापडला आहे हे लक्षात आले. हे तांब्याचे तीन पत्रे कडीने एकत्र जोडलेले असून त्यावर शिलाहार राजवंशाचे राजचिन्ह असलेल्या गरुडाची प्रतिमा आहे. ताम्रपटाच्या एका पत्र्यावर पाठपोठ कोरलेले आहे, तर दोन ताम्रपटांवर एकाच बाजूने कोरलेले आहे. ताम्रपट संस्कृत भाषेत व देवनागरी लिपीत कोरलेला आहे. त्याचे शास्त्रशुद्ध वाचन व्हावे म्हणून ताम्रपटाची छायाचित्रे पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे विख्यात इतिहासतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्याकडे पाठवले. त्यांनी संस्कृत वाचन करून त्याची प्रत माझ्याकडे पाठवली. नंतर ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिराचे माजी विश्वस्त अध्यक्ष शं. बा. मठ यांच्याबरोबर बसून त्याचे मराठीत भाषांतर करून घेतले. ताम्रपटाचे संकलन करीत असताना प्रत्येक ओळीतून शिलाहार राजवंशाची व त्या काळातील राजकीय, आर्थिक व धार्मिक स्थितीची महत्त्वपूर्ण माहिती मिळत गेली.
शिलाहारांच्या कोरीव लेखांसंबंधी महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांचे ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास व कोरीव लेख’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. शिलाहारकालीन राजांचे सापडलेले शिलालेख व ताम्रपट यांची विस्तृत माहिती त्यात मिळते. नवव्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रकुटांचा राजा तृतीय गोविंद याला युद्धात साहाय्य केल्याबद्दल तगर (हल्लीचे तेर) येथील कपर्दी शिलाहार याला उत्तर कोकण बहाल केले. (सन सु. ८२०) कपर्दीला पश्चिम किनारपट्टीवरचा हा भाग आवडला. बहुधा ठाणे शहर त्याने राजधानीचे शहर म्हणून निवडले असावे. शिलाहारांच्या ताम्रपटातून याचा उल्लेख ‘श्रीस्थानक’ किंवा ‘लक्ष्मीचा निवास’ म्हणून येतो.
प्रस्तुत ताम्रपट हा शिलाहार राजा छित्तराज याच्या सुरुवातीच्या काळातला असून, तो संवत् ९४१ कार्तिक १५ म्हणजे सन १०१९ मध्ये दानपत्राच्या रूपात प्रकाशित करण्यात आला. सुरुवातीला गणपती व शंकराचे नमन व प्रशंसा दिली असून, त्यांचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. ताम्रपटात शिलाहार वंशाचा संस्थापक कपर्दी यापासून छित्तराजापर्यंतच्या सर्व राजांची वंशावळ व त्यांची बिरुदे दिलेली आहेत. त्यात पुल्लशक्ती, द्वितीय कपर्दी किंवा लघु कपर्दी, वपुवत्र झंझ, गोग्गी, अरिकेसरी व द्वितीय वज्जड यांची माहिती मिळते. छित्तराजाचा काळ डॉ. मिराशी यांनी सुमारे १०२० ते १०३५ असा दाखवला आहे. परंतु प्रस्तुत ताम्रपट हा नुकताच सापडलेला असल्यामुळे त्यात संवत् ९४१ चा संदर्भ आला आहे. हा ताम्रपट डॉ. मिराशींना माहीत नसल्यामुळे छित्तराजाच्या कारकीर्दीचा काळ एक वर्षांने वाढलेला आहे. डॉ. मिराशींनी छित्तराजाच्या काळातील भांडुप (सन १०२६), दिवेआगर (सन १०२७), चिंचणी- तारापूर (सन १०३४), बर्लिन (सन १०३४) व रत्नागिरी जिल्ह्य़ातील भोईघर (सन १०२४) येथे सापडलेल्या पाच ताम्रपटांचे संपादन केले आहे. कल्याण येथे सापडलेला प्रस्तुत ताम्रपट हा सहावा ताम्रपट आहे. बर्लिनचा ताम्रपट कोकणात निश्चित कुठे सापडला, हे माहीत नाही; परंतु सध्या तो बर्लिन म्युझियममध्ये सुरक्षित आहे. भोईघरचा ताम्रपट रायगड जिल्ह्य़ातील मुरुड गावाजवळ भोईघर येथे सापडला. पण दुर्दैवाने तो सध्या गहाळ झालेला आहे. त्या काळातील एक विद्वान गृहस्थ नातू यांना त्यांच्या वाडीत खणत असताना तो सापडला. नातू यांना त्यातील मजकूर मुखोद्गत असल्यामुळे त्यांनी तो कागदावर उतरवला. डॉ. मो. गं. दीक्षित यांनी त्याचे संपादन केले. डॉ. मिराशींनी तो आपल्या ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास व कोरीव लेख’ या पुस्तकात पुन्हा उद्धृत केला आहे. भोईघरच्या ताम्रपटातील सुरुवातीचे नमन व वंशावळ प्रस्तुत ताम्रपटानंतरचा मजकूर तपशिलानुसार बदललेला आहे. हे सहा ताम्रपट छित्तराजाच्या कारकीर्दीची उत्तम माहिती देतात.
ताम्रपट हे दानपत्र आहे. त्या काळात कागदाचा अभाव असल्यामुळे त्याचे महत्त्व व पावित्र्य फार मोठे होते. प्रत्येक ताम्रपटात गणेश व शंकराचे नमन व प्रशंसा करण्यात आली आहे. त्यानंतर शिलाहार राजवंशाची विस्तृत माहिती मिळते. छित्तराज हा शिलाहारांचा अतिशय कर्तबगार राजा होता. ताम्रपटावरून त्याचे कोकणचे राज्य उत्तरेस चिंचणी-तारापूरपासून दक्षिणेस रत्नागिरीतील पन्हाळे काजी व चिपळूणपर्यंत पसरलेले होते हे समजते. ते अनेक विषय (जिल्हा), तालुका (खंपण), ग्राम किंवा गावे, नगरे, नाड इत्यादी भागांत विभागलेले होते. तेव्हा सध्याचे ठाणे ‘षट्षष्टिविषय’ म्हणून ओळखले जावयाचे. चिख्खलाड विषय, माहिरिहार विषय, वरेटिका विषय, करकूट विषय, पानाड विषय, मन्दरज विषय अशा जिल्ह्य़ांत हे राज्य विभागलेले होते. या ताम्रपटात प्रशासकीय पदांचा उल्लेख आहे. त्यात राजपुत्र, मंत्री, पुरोहित, अमात्य, प्रमुख नियोजक, राज्याचे प्रमुख (राजपती), नगर व ग्राम प्रमुख (नगर व ग्रामपती) या सर्वाचा समावेश आहे. महाअमात्य श्री दादपैय्य, महासंधिविग्रहक श्री सोदलैय्य व महामंडलेश्वर, श्री छित्तपैयदेवराज ही नावे दिसून येतात.
ताम्रपटात दानाचे महत्त्व विशद केले आहे. ‘कृत, त्रेता, द्वापार या युगांत तपश्चर्येची प्रशंसा होत असे. मात्र, मुनीजनांच्या मते, कलियुगात फक्त दानच स्तुत्य आहे.’ छित्तराजाने दिलेल्या दानातील बहुधा हे पहिले दान असावे, हे त्याच्या काळावरून (सन १०१९) कळते. कऱ्हाड येथील श्रेष्ठ ब्राह्मण विप्रश्री जगुप, श्रीराव पंडित व पुत्र अय्यपै हे श्री स्थानक म्हणजे ठाण्यात वास्तव्याला होते. त्यांच्या विद्वत्तेने प्रसन्न होऊन छित्तराजाने पानाड विषयात म्हणजे रायगड जिल्ह्य़ातील हल्लीचे पोयनाड येथील कोकुंबदह, मणेरीग्राम, देई, तलाईक, कवेयाराम, पंथईका, मामामामीसलाराम व शुर्पारक ही गावे शक संवत्सर ९४१ सिद्धार्थ ताम्र संवत्सर कार्तिक शुक्ल १५ (पौर्णिमा) रोजी दान दिली. तो दिवस सोमवार असून, सूर्यग्रहणही होते. वर उल्लेखित गावांच्या सीमा दाखवलेल्या आहेत. नावांत पाठभेद असला तरी बरीचशी गावे आजही अस्तित्वात आहेत. ताम्रपटातील शुर्पारक हे पोयनाडमधील गाव असावे. त्याचा प्राचीन सोपाऱ्याशी संबंध येत नाही.
ताम्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे राजाने समकालीन राजांना व प्रजेला अतिशय हृदयस्पर्शी उपदेश केला आहे. तो म्हणतो, ‘‘विभूतीतत्त्व नाशवंत आहे. तारुण्य हे क्षणभर आहे. यमाच्या जबडय़ात सापडलेले आपले जीवन आहे. तरी परलोकाविषयी हेळसांड करून राजे लोकांचे (पृथ्वीतलावरील) व्यवहार चालू आहेत. वृद्धत्व शरीरात दडलेले आहे आणि ते यौवनाचा घास घेते. स्वर्गापेक्षा नरकात पडून वियोगाचे वृद्धत्व व मरण यांना (हे राजे लोक) जवळ करतात.’’
ताम्रपटाची भाषा अलंकारिक असून शुद्ध आहे. ताम्रपटातील आदेश न मानणाऱ्यास शापही दिलेला आहे. हा ताम्रपट भांडागारसेन महाकवी श्री नगलैय्यच्या भावाचा पुत्र जोडावेन याने कोरलेला असून, त्यातील सर्व मजकूर व अक्षरे प्रमाणित केली आहेत अशी ग्वाही दिली आहे. छित्तराजाचे इतर ताम्रपटही यानेच कोरलेले आहेत.
प्रस्तुत ताम्रपटातून त्या काळातील राजकीय स्थितीवर बराच प्रकाश पडतो. छित्तराजाच्या सुरुवातीच्या काळात गोव्याचा कदंब राजा द्वितीय गुहक्कदेव याने उत्तर कोकणावर स्वारी केली होती. त्यानंतर कोल्हापूरच्या शिलाहार शाखेचा राजा गोंक यानेही काही काळ कोकणावर वर्चस्व बसवले होते. त्यानंतर मात्र छित्तराजाने स्थिती सावरली व राज्य मजबूत केले. त्याची बिरुदे कोकणावरील स्वामित्व व त्याचे मोठेपण सिद्ध करतात. पश्चिम समुद्राधिप (समस्त कोकणचा राजा), सागजगटझेप (जगातील सर्वात दानशूर), गुणसरोहंस (उत्तम गुणांचा सागर), जगदंडगजांकुश (सर्व जगावर हत्तीवरील अंकुशाप्रमाणे नियंत्रण ठेवणारा) अशी बिरुदे घेतली होती.
प्रस्तुत ताम्रपट सापडल्यामुळे एक हजार वर्षांपूर्वीच्या कोकणाची राजकीय व सामाजिक जडणघडण समजावून घेता येणे सोपे झाले आहे. ज्या पोलिसांना भंगाराच्या दुकानात हा ताम्रपट सापडला व त्यांनी तो सुरक्षितपणे पोलीस स्टेशनमध्ये आणला, त्या सर्वाचे आभार मानणे उचित ठरेल.

indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Bhau Daji Lad Museum, Devendra Fadnavis, Renovation ,
आक्रमणे आणि अनास्थेमुळे भारताच्या ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास – देवेंद्र फडणवीस, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण
commercial complex on thane east satis will open in one and a half years
ठाणे पुर्व सॅटीसवरील व्यापारी संकुल दिड वर्षात खुले होणार; व्यापारी संकुलातील आठ मजले रेल्वे देणार भाड्याने
Story img Loader