अभिजीत रणदिवे rabhijeet@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ‘कोडा’ने बाजी मारली. त्याला कडवी टक्कर देणाऱ्या ‘पॉवर ऑफ द डॉग’ची मात्र एकाच पुरस्कारावर बोळवण झाली. यामागच्या ‘गणिता’चा मागोवा घेणारा खास लेख..

दरवर्षी ऑस्कर नामांकने जाहीर झाली की कोणकोणत्या चित्रपटाला कोणकोणत्या विभागात पुरस्कार मिळणार याची चर्चा सुरू होते. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार सर्वात शेवटी जाहीर होतो. त्याची चर्चा सर्वाधिक होते. या वर्षी स्पध्रेत दहा चित्रपट होते. त्यापकी ‘पॉवर ऑफ द डॉग’ किंवा ‘कोडा’ यांपैकी एकाला अ‍ॅकॅडमीची पसंती मिळेल अशी बऱ्याच जणांची अटकळ होती. कारण ऑस्करची चाहूल देणाऱ्या आधीच्या अनेक पुरस्कारांसाठी या दोन्हीपकी एकाची वर्णी लागलेली होती. आणि अखेर २७ मार्चला ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि ‘कोडा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

इतक्या वर्षांचा ऑस्करचा इतिहास पाहून साधारणत: कोणत्या प्रकारचा सिनेमा मानकरी ठरतो याबद्दल रसिक ठोकताळे बांधत असतात. तो अगदीच जनसामान्यांच्या पसंतीचा लसावि असलेला बिग बजेट ब्लॉकबस्टर सिनेमा नसावा, तर त्यात कलात्मकतेचाही काहीसा अनुभव मिळावा अशी अपेक्षा दिसते. मात्र, तो कळायला फार कठीणही नसावा; अन्यथा ज्यांना ऑस्करसाठी मतदानाचा हक्क असतो, ते अ‍ॅकॅडमीचे सदस्य त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत असेही मानले जाते. मोठय़ा पडद्यावर पाहायला मजा येईल असे नेत्रदीपक चित्रण त्यात असेल तर अगदी सुपरस्टार्स नसले तरी थोडे ओळखीचे चेहरे असतील तर त्याचा फायदा होतो असे काही इतर घटकही महत्त्वाचे मानले जातात.

या पार्श्वभूमीवर ‘कोडा’मध्ये नक्की काय आढळते? रुबी नावाच्या एका आकर्षक, गोऱ्या, सतरा वर्षांच्या मुलीभोवती ही गोष्ट फिरते. एका लहान गावात पिढय़ान् पिढय़ा मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात ती जन्मली आहे. गाण्याची आवड असल्यामुळे ती शाळेतल्या गानवृंदात सामील होण्याचा निर्णय घेते आणि तिच्या आयुष्याला (आणि कथेलाही!) कलाटणी मिळते. तिच्या शिक्षकाच्या मते, तिला चांगले गाता येतेच; शिवाय संगीताच्या एका प्रतिष्ठित व उच्चभ्रू कॉलेजात तिला प्रवेश मिळू शकेल आणि ती त्या क्षेत्रात यशस्वी करीअर करू शकेल इतपत गुणवत्ताही तिच्यात आहे. त्या कॉलेजात प्रवेश मिळवण्याचे स्वप्न मग ती पाहू लागते. घरची कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसलेल्या एका मुलीने असे स्वप्न पाहणे हा ‘अमेरिकन ड्रीम’चाच एक आविष्कार. ‘कोडा’मध्ये पुढे काय प्रकारची मांडणी असेल याचा अंदाज यावरून करणे फारसे कठीण नाही. थोडा रोमान्स, थोडा विनोद, थोडा ताण अशा अपेक्षित मसाल्यांचा वापर करत एखाद्या परीकथेप्रमाणे रूबीच्या स्वप्नाची पूर्ती होते.

‘कोडा’मध्ये सुपरस्टार्स नाहीत. तो मोठय़ा पडद्यावरच पाहावा असा भव्यदिव्य, स्पेशल इफेक्टस् असणारा सिनेमा नाही. अशा साध्या-सोप्या व ठोकळेबाज गोष्टीचा पुरस्कारापर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी त्यात आणखी एखादा खास घटक आवश्यक असतो. ‘कोडा’मध्ये तो रूबीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत सापडतो. तिचे आई-वडील आणि भाऊ कर्णबधीर आहेत. ‘कोडा’ हे शीर्षक ‘चाइल्ड ऑफ डेफ अ‍ॅडल्ट्स’चं लघुरूप आहे. संगीताची पार्श्वभूमी तर सोडाच; रूबीच्या कुटुंबीयांना संगीत ऐकूच येत नाही. शिवाय कर्णबधीर नसलेली घरातली एकमेव व्यक्ती या नात्यानं रूबीवर एक वेगळी जबाबदारीही आहे. त्या कुटुंबाच्या आणि गावातल्या इतर लोकांमधील संवादाचे एकमेव माध्यम ती आहे. गावातल्या मच्छिमारांचे आडते आणि स्थानिक नियामकांकडून होत असलेल्या शोषणाचे एक उपकथानकही चित्रपटात आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या संघर्षांत रूबीचे संवादक असणे अधिकच कळीचे ठरते. आपल्या सहकाऱ्यांना संघटित करून अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची रूबीच्या वडिलांची इच्छा आहे. पण रूबीच्या मदतीशिवाय त्यांना कुणाशी संवादच साधता येत नाही. थोडक्यात, एक व्यक्ती म्हणून रूबीला कराव्या लागणाऱ्या संघर्षांशिवाय कथानकाला सामाजिक संघर्षांचीही एक बाजू आहे. अर्थातच या दोन्हीच्या हेलकाव्यांनुसार कथेत अनेक उतार-चढाव येतात आणि चित्रपटाची नाटय़मयता अधिक परिणामकारक होते. म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीचा एका मुलीचा संघर्ष, त्यात शारीरिक व्यंगाची पार्श्वभूमी असलेले तिचे कुटुंब आणि शिवाय पारंपरिक घडीच्या टुमदार गावातल्या शोषितांचा सामाजिक संघर्ष अशी तिपेडी रचना करून प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारी एक गोष्ट हॉलिवूडच्या सराईत, पठडीबाज, पण प्रभावी कथनपद्धतीनुसार यात सांगितली जाते.

‘कोडा’चा विजय ज्या कारणांसाठी साजरा केला जात आहे, त्यांपकी एक म्हणजे रूबीच्या कुटुंबीयांची भूमिका साकारणारे अभिनेते प्रत्यक्ष आयुष्यातही कर्णबधीर आहेत. रूबीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या ट्रॉय कॉट्सरला साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच कर्णबधीर अभिनेता ठरला, म्हणून त्या पुरस्काराचे महत्त्व आहे. याव्यतिरिक्त काही अनपेक्षित ठिकाणीही ‘कोडा’चा विजय साजरा झाला. तो एका फ्रेंच चित्रपटाचा रीमेक आहे. इतकेच नव्हे, तर ‘कोडा’चे काही सहनिर्मातेही फ्रेंच आहेत. त्यामुळे फ्रान्सलाच ऑस्कर मिळाल्याच्या थाटात फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी ‘कोडा’ चमूचे अभिनंदन केले आहे.

‘कोडा’ला तीनच नामांकने होती आणि त्या तीनही विभागांत तो विजेता ठरला. याउलट, त्याचा तगडा प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या ‘पॉवर ऑफ द डॉग’ला तब्बल १२ नामांकने होती, पण केवळ एकाच पुरस्कारावर त्याची बोळवण झाली. अर्थात हा एकमेव पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार होता आणि त्यासाठी ‘कोडा’ला नामांकनच नव्हते हे लक्षात घ्यावे लागेल. दिग्दíशका जेन कँपियनला हा पुरस्कार मिळाला आणि त्यामुळे लागोपाठ दोन वर्षे स्त्रीला दिग्दर्शनाचा पुरस्कार देऊन अ‍ॅकॅडमीने आपल्या इतिहासातल्या पुरुषवर्चस्ववादाबद्दलचे प्रायश्चित्त घेतले असेही म्हटले जात आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने ‘पॉवर ऑफ द डॉग’ला हुलकावणी का दिली असेल, याविषयी अंदाज करण्यासाठी त्यातल्या काही घटकांकडे लक्ष पुरवावे लागेल.

१९२५ च्या सुमाराला घडणाऱ्या या कथेत फिल आणि पीटर या दोन वेगवेगळ्या पिढय़ांतल्या समलंगिक पुरुषांचे चित्रण आहे. जुन्या पिढीतला फिल आपल्या लंगिक प्रवृत्ती दाबून अधिकाधिक पुरुषी वागत जगत आला आहे, तर पीटर तरुण आहे आणि अधिक मोकळ्याढाकळ्या पद्धतीने जगत आहे. पीटरची आई जेव्हा फिलच्या भावाशी विवाह करते तेव्हा फिल चिडतो आणि तिचा मानसिक छळ करू लागतो. त्यातून फिल आणि पीटर यांच्यात द्वेषाची आणि संघर्षांची ठिणगी पडते. फील गुड ‘कोडा’पेक्षा यातले व्यक्तिचित्रण अधिक गुंतागुंतीचे आहे. फिलचे वागणे हिंसक, रासवट आणि क्रूर आहे. त्याची जीभही विखारी आहे. त्यामागचे कारण म्हणजे त्याने आयुष्यभर दाबून ठेवलेल्या आपल्या भावना आणि त्याला वाटत असलेली स्वत:च्या लंगिकतेविषयीची शरम असावी असे सुचवले जाते. त्यामुळे तो विशुद्ध काळ्या रंगात रंगवलेला खलनायक नाही. पुस्तकांत रमणारा, संवेदनशील आणि नाजूक प्रकृतीचा पीटर फिलची क्रूर वर्तणूक सोसत राहतो, म्हणून सुरुवातीला प्रेक्षकांची सहानुभूती मिळवतो आणि कथेचा नायक वाटतो. नंतर मात्र तो फिलशी जवळीक साधण्याचा आव आणत अतिशय थंड डोक्याने, पद्धतशीरपणे फिलचा काटा काढण्याचा बेत रचतो. त्यामुळे प्रेक्षक ज्याच्याशी सहज भावनिक तादात्म्य साधू शकतील अशा प्रकारची सफेद रंगात रंगवलेली ही सद्वर्तनी व्यक्तिरेखा नाही. विशेषत: ‘कोडा’मधल्या रूबीशी तुलना करता हा मुद्दा अधिक स्पष्टपणे जाणवतो.

बेनेडिक्ट कंबरबॅचसारखा लोकप्रिय अभिनेता फिलच्या भूमिकेत आहे. इतर भूमिकांतही काही सुपरिचित चेहरे आहेत. नेत्रसुखद निसर्गचित्रण त्यात आहेच, शिवाय त्यातली काही तलम दृश्ये आणि काही शैलीदार िहसक दृश्येही प्रेक्षकांना भुरळ पाडणारी आहेत. चित्रपटाची रचना मोठय़ा पडद्यावरच पाहण्यासाठी केलेली आहे, हे अगदी स्पष्ट आहे. (मात्र, करोनाकाळात ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध झाल्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांनी तो घरी पाहिलेला असणार.) कथानकात अनपेक्षित कलाटण्या आहेत आणि थरारही आहे. थोडक्यात, ऑस्कर जिंकण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे अनेक घटक चित्रपटात आहेत, आणि तरीही त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. तेव्हा त्यामागे कदाचित काही चित्रपटबा कारणे असतील का?

 या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरेल याविषयी अनेकांनी आपापली भाकिते वर्तवली होती. एका समीक्षकाने असा मुद्दा मांडला होता की ‘कोडा’ कुणाच्याही भावना दुखावत नाही म्हणून विजेता ठरेल. नेमका हाच मुद्दा ‘पॉवर ऑफ द डॉग’च्या विरोधात गेलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उदाहरणार्थ, वर उल्लेख केल्याप्रमाणे यातल्या व्यक्तिरेखा काळ्या-पांढऱ्या रंगांतल्या नाहीत आणि त्यातला संघर्षही ‘सुष्ट विरुद्ध दुष्ट’ असा ठोकळेबाज नाही. विखारी पुरुषी मानसिकता दाखवण्यासाठी समलंगिक व्यक्तिरेखांचा वापर केल्याबद्दल चित्रपटावर मर्यादित प्रमाणात टीका झाली. त्यातच कँपियनने केलेल्या एका वक्तव्यामुळे वेगळाच वाद सुरू झाला : सेरेना आणि व्हीनस विलियम्स या भगिनी सहनिर्मात्या असलेला, त्यांच्या वडिलांवरचा चरित्रपटही पुरस्कारांच्या स्पध्रेत होता. दुसऱ्या एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रेक्षकांत विलियम्स भगिनी असताना त्यांच्यासमोर पुरस्कार घेताना कँपियनने असे वक्तव्य केले की, सिनेसृष्टीत मला जसा पुरुषांशी संघर्ष करावा लागतो, तसा या बहिणींना तो करावा लागत नाही. (गोऱ्या) कँपियनवर यामुळे पुष्कळ टीका झाली आणि अखेर तिला माफी मागावी लागली. यामुळेही ‘पॉवर ऑफ द डॉग’ला फटका बसला असण्याची शक्यता आहे. म्हणजे एका बाजूला शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तिरेखांचे प्रेक्षकप्रिय चित्र रंगवणारा, पोलिटिकली करेक्ट, कोणताही वाद टाळणारा, साधा, गोड, आशादायी ‘कोडा’; तर दुसऱ्या बाजूला गुंतागुंतीची, विचार करायला लावेल अशी करडय़ा रंगातली, प्रसंगी अस्वस्थ करणारी आव्हानात्मक गोष्ट सांगणारा, पण समलंगिक व्यक्तिरेखांचे ‘पोलिटिकली इनकरेक्ट’ चित्र रंगवणारा ‘पॉवर ऑफ द डॉग’ असा हा सामना होता का? आणि भावना दुखावल्यामुळे त्याला पुरस्कार गमावावा लागला का? याच ऑस्कर सोहळ्यात दोन अमेरिकन चित्रपटांचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला : ‘गॉडफादर’ आणि ‘कॅबरे’! पन्नास वर्षांपूर्वी या दोन्ही चित्रपटांनी आपापल्या पद्धतीने हॉलिवूडमधल्या रूढ चौकटींना छेद दिला. आज मात्र हॉलीवूडला कदाचित अशा प्रकारची बंडखोरी आणि प्रयोगशीलता झेपत नाही की काय असा प्रश्न पडतो. ‘कॅबरे’मधली गुंतागुंतीची नायिका साकारणारी लायझा मिनेली ‘कोडा’ला पुरस्कार देण्यासाठी मंचावर आली होती. ‘कोडा’ची नायिका मात्र गुंतागुंतीची नाही. ‘आय बिलिव्ह इन अमेरिका..’ असे सुरुवातीलाच म्हणणारा ‘गॉडफादर’ ज्या ‘अमेरिकन ड्रीम’ला धक्के देत होता त्याचेच साजिरे रूप दाखवणारा ‘कोडा’ यावर्षीचा विजेता ठरावा, यात एक काव्यगत न्याय आहे की काळाचा महिमा?

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscar awards 2022 coda won best picture at 2022 oscars zws
Show comments