प्रसाद मोकाशी
या जगाचा भूगोल दर वेळी काही कारणाने बदलत गेला आहे. अर्थात हा बदल केवळ राजकारणामुळे झालेला आहे. किंबहुना या जगातील देशांची रचना हीदेखील राजकीय सोय असावी अशीच झालेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या देशाची रचना हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. मध्य आशियातील अनेक देश हे असेच निर्मिले गेले आहेत. मात्र तरीही त्या देशांमधील विविध शहरांचा इतिहास काही बदललेला नाही. पाच शहरांमध्ये असाच एक इतिहास आपल्यासमोर सादर होतो आणि आपल्याला या शहरांची नव्याने ओळख होते. इस्तंबूल विद्यापीठातील ओट्टोमन आणि तुर्की साहित्याचे प्राध्यापक अहमेत हमदी तानपिनार यांनी लिहिलेल्या ‘बेस सेहिर’ या पुस्तकाचा शर्मिला फडके यांनी केलेला अनुवाद म्हणजे ‘पाच शहरे’. या पुस्तकात अनभिज्ञ अशा पाच शहरांची रोचक माहिती मिळते.
अंकारा, कोन्या, इस्तंबूल, एर्झरुम आणि बुर्सा या शहरांना एक इतिहास आहे. या शहरांमधील सांस्कृतिक, सामाजिक जीवनाची ओळख करून देताना लेखकाने या शहराशी संबंधित इतिहासाबद्दल रंजक माहिती दिली आहे. त्याचबरोबर लेखकाचं या शहरांशी असलेलं नातं, काही नोंदी यात आहेत. त्यामुळे या पुस्तकाला एक काव्यात्मक दर्जा मिळाला आहे. स्वप्नरंजनात्मक शैलीत लिहिलेल्या या कादंबरीमध्ये आयुष्यातील उदास स्मृती आणि देशाच्या अप्रत्याशित भविष्याची चिंता यातील ताणही वाचकांना अनुभवायला मिळतो. या पुस्तकामध्ये वैयक्तिक दृष्टिकोन आणि प्रतिक्रियांवर जोर दिला असून, भूगोल, इतिहास आणि शहरांची संस्कृती याची विस्तृत व्याप्ती या कादंबरीमध्ये पाहायला मिळते.
या अनुवादामुळे तुर्की साहित्याची ओळख मराठी वाचकांना झाली आहे. अनुवाद करताना अनेक तुर्की शब्द तसेच ठेवल्याने त्यांचा लहेजा अनुभवता येतो, तसेच मूळ पुस्तकातील रंजकताही अनुभवता येते. प्रवाही लेखनामुळे वाचक अखेपर्यंत पुस्तकामधल्या शहरांमध्ये हरवून जातो, हे नक्की.
‘पाच शहरे’, – अहमेत हमदी तानपिनार, अनुवाद- शर्मिला फडके, पॉप्युलर प्रकाशन, पाने- २३६, किंमत- ३५० रुपये.