डॉ. राधिका विंझे

नोव्हेंबर २०२२… बंगलोरमधील एक प्रसन्न सकाळ. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ( TIFR) च्या इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरिटिकल सायन्स ( ICTS) मध्ये मी एका परिषदेसाठी गेले होते. पीएच.डी. दरम्यान अशा परिषदांना जाणं म्हणजे वेगळीच उत्सुकता असते. आपल्या विषयात सुरू असलेल्या संशोधनाबद्दल नवीन माहिती समजते, त्याचबरोबर अनेक वैज्ञानिकांशी व समवयस्क विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो. मीदेखील या परिषदेसाठी उत्सुक होते. या परिषदेच्या आयोजकांपैकी एक होत्या डॉ. रोहिणी गोडबोले.

world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’

रोहिणी मॅडमशी याआधी एकदा छोटीशी भेट झाली होती. त्यांच्या कार्याबद्दलही ऐकून होते. माझे पीएच.डीचे पर्यवेक्षक प्रा. अनुराधा मिश्रा व प्रा. श्रीरूप रायचौधरी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, त्यामुळे मी रोहिणी मॅडमना भेटण्यासाठी उत्सुक होते. कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर आमच्यासाठी नाश्त्याची सोय केली होती. आजूबाजूला अनेक देशांमधून आलेले प्रतिष्ठित शास्त्रज्ञ एकमेकांशी गप्पा मारत होते, विविध विषयांवर चर्चा करीत होते. सैद्धांतिक संशोधनात ( theoretical research) अशा चहाबरोबर रंगणाऱ्या चर्चांना ( tea table discussions) खूप महत्त्व असतं. या चर्चांतून अनेकदा नवीन संकल्पना उदयास येतात किंवा नवीन माहिती मिळाल्यानं सुरू असलेल्या संशोधनास चालना मिळते. ज्यांचे शोधनिबंध ( research papers) मी नेहमी वाचते असे अनेक शास्त्रज्ञ त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे साहजिकच थोडं दडपण आलं होतं. भांबावलेल्या नजरेनं मी आजूबाजूला बघत असताना एकदम रोहिणी मॅडम समोर आल्या आणि त्यांनी मला विचारलं, ‘‘विंझे ना तू?’’ त्यांचा हा प्रश्न अनपेक्षित, किंबहुना त्यांना मी लक्षात आहे हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. ‘‘कोणत्या गेस्ट हाऊसला उतरली आहेस? नाश्ता केलास का? बाकी सगळं ठीक आहे ना?’’ त्यांनी इतक्या आपुलकीने चौकशी केल्यावर माझ्यावरचं दडपण थोडं कमी झालं.

मी मुंबई विद्यापीठात मास्टर्स करत असताना प्रा. मिश्रा यांच्याकडून मूलकणांविषयी शिकताना रोहिणी मॅडमचं नाव अनेकदा ऐकलं होतं. त्याच वेळी टीआयएफआरला प्रा. रायचौधरी यांच्याकडे संशोधन प्रकल्पात काम करतानासुद्धा रोहिणी मॅडमविषयी ऐकलं होतं. पुढे प्रा. मिश्रा व प्रा. रायचौधरी यांच्या पर्यवेक्षणाखाली माझ्या पीएच.डी.ची सुरुवात झाली तेव्हा एक दिवस प्रा. मिश्रा यांनी मला एक शोधप्रकल्प समजावून सांगितला. त्या प्रकल्पात अपेक्षित निकाल मिळत नव्हता. त्यात काय चूक झाली आहे हे शोधण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. या शोधप्रकल्पाची मूळ संकल्पना रोहिणी मॅडमची होती. त्यावर काम करताना भौतिकशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वं, तसंच संशोधन करण्यासाठी आवश्यक असणारी गणितीय कौशल्यं मला शिकायला मिळाली.

आणखी वाचा-पाहू, निवडू आणि वाचू आनंदे…

स्टोनी ब्रूक विद्यापीठात पीएच.डी. व टीआयएफआर, मुंबईला पोस्टडॉक्टरेट केल्यानंतर काही वर्षे रोहिणी मॅडम मुंबई विद्यापीठात अध्यापन करीत होत्या. तेव्हा त्यांच्या उत्तम अध्यापनाचा फायदा विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना झाला. २०१९ साली त्यांना पद्माश्री सन्मान मिळाल्यानंतर मुंबई विद्यापीठात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या समारंभातील त्यांचं व्याख्यान इतकं मंत्रमुग्ध करणारं होतं की, सैद्धांतिक भौतिकशास्त्राचं विशेष ज्ञान नसणाऱ्या अनेकांनासुद्धा त्यांनी त्यांच्या ओघवत्या भाषणशैलीनं व विषयाची सहज सुंदर फोड करून सुमारे दोन तास एका जागी खिळवून ठेवलं होतं. त्यात त्या त्यांच्या वैज्ञानिक कारकीर्दीबद्दल बोलल्याच, तसंच त्यांची वैयक्तिक आयुष्यातली जडणघडण, त्यांना सामोरं जावं लागलं ती आव्हानं, पेचप्रसंग यांबद्दलदेखील त्यांनी सांगितलं. त्यांचा जीवनप्रवास ऐकणं हे संशोधन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत स्फूर्तिदायी होतं. शास्त्रज्ञ म्हणून त्या किती महान आहेत हे त्या वेळी कळलंच, पण त्याचबरोबर माणूस म्हणून किती खंबीर आणि प्रेमळ आहेत हेदेखील जाणवलं.

व्याख्यानानंतर प्रा. मिश्रा यांनी आमची ओळख करून दिली. आम्ही करत असलेल्या त्यांच्या संकल्पनेवरील कामाची चर्चा केली. त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन ते काम पुढं कसं नेता येईल याविषयी काही कल्पना सुचवल्या. त्यानंतर कोविड काळात ऑनलाइन स्वरूपात झालेल्या एका परिषदेतील माझ्या भाषणास त्या उपस्थित होत्या. त्यांनी विविध प्रश्न विचारून शांतपणे माझं काम समजून घेतलं आणि त्यावर काही गोष्टी नमूद केल्या. त्यांचा सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील कामाचा पसारा खूप मोठा आहे. या क्षेत्रातील मोजकेच विषय असतील ज्यावर रोहिणी मॅडमचा शोधनिबंध सापडणार नाही. शास्त्रातील संकल्पनांचा प्रयोगांतील निरीक्षणाबरोबर ताळमेळ साधताना शास्त्रातील खाचखळगे समजणं महत्त्वाचं; पण त्याच बरोबरीनं प्रयोगाची रचना, कृती, त्यातील अनुमानाच्या पद्धती यांविषयीचं ज्ञान असणंदेखील किती आवश्यक आहे हे मला रोहिणी मॅडमच्या व्याख्यानांमध्ये अनेकदा जाणवलं आहे. त्या अनेक आंतरराष्ट्रीय सहयोगाचा ( collaborations) भाग होत्या. त्याचप्रमाणे भारतातही सर्वोत्तम संशोधन सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. त्यांनी आयोजित केलेल्या परिषदांमधील त्यांची दूरदृष्टी तसंच नवोदित संशोधकांनी या विषयातील संशोधन वाढवावं, पुढे न्यावं यासाठीचे त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. या विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी त्या कायम एक प्रेरणास्थान आहेत.

संशोधनात करिअर करणं हा सरधोपट मार्ग नाही. त्यासाठी आधी पीएच.डी. पुढे पोस्ट डॉक्टरेट व त्यानंतर अध्यापन… स्वतंत्र संशोधनाचा असा साधारण साचा असतो. सर्वप्रथम आपल्याला कोणत्या विषयात संशोधन करायला आवडेल हे समजणं, त्यानंतर संशोधनाच्या विषयातील आधी न हाताळली गेलेली संकल्पना / मुद्दा शोधणं, त्या अनुषंगानं इतर काही संशोधन झालं आहे का याची खातरजमा करणं, तसंच संशोधनासाठी लागणाऱ्या अद्यायावत नवीन गोष्टी शिकणं… असा तो प्रवास असतो. या प्रवासात अनेक आव्हानं येतात. काही वेळा हाती काहीच लागत नाहीये, सगळं सोडून द्यावं असंही वाटतं, पण याच वेळी रोहिणी मॅडमनी विद्यापीठातील सत्कार समारंभात सांगितलेलं वाक्य मला नेहमी आठवतं, ते असं – ‘‘आयुष्यात असंख्य आव्हानं येतील, किंबहुना कठीण प्रसंग असणारच आहेत, पण आपण त्या सर्वांवर मात करून पुढे जायला शिकलं पाहिजे!’’

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उदाहरणार्थ ‘डॉक्यूफिल्म बनवणे’…

स्त्रियांनी विज्ञान संशोधन क्षेत्रात पुढे यावं यासाठी त्यांचे प्रयत्न अतुलनीय असेच आहेत. संशोधक बनण्याचा प्रवास सोपा नाहीच, पण एका स्त्रीसाठी संशोधनात पूर्णवेळ करिअर करणं जास्त आव्हानात्मक आहे. पीएच.डी, पोस्ट डॉक्टरेट इत्यादींनी व्याप्त शैक्षणिक वाटचाल तसंच लग्न-मूलबाळ इत्यादींनी व्याप्त वैयक्तिक सांसारिक वाटचाल या दोन्हींचा ताल व तोल सांभाळून करणं ही एका स्त्रीसाठी कसरत असते. स्त्रियांनी संशोधन क्षेत्रात यावं व त्यात टिकून राहून काम करावं यासाठी रोहिणी मॅडमनी विविध स्तरांवर व्याखानं देणं, लेख लिहिणं तसंच स्त्रियांकरिता संशोधनाची वाट सुकर व्हावी यासाठी विविध समित्यांची स्थापना यांसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी संपादित केलेलं सुमारे १०० भारतीय स्त्री संशोधकांचा प्रवास उलगडणारं ‘लीलावतीज् डॉटर्स’ हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे.

त्यांच्याशी बोलताना एक वेगळी ऊर्जा जाणवायची. आपल्याला पडलेला प्रश्न- मग तो किचकट असो व सोपा, त्यांच्यासमोर व्यक्त करताना कधी दडपण वाटत नसे. नेहमी प्रोत्साहन देऊन आणि प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून विद्यार्थी पुन्हा विचार करायला लागेल अशा पद्धतीनं त्या प्रश्न हाताळत असत. वर नमूद केलेला रोहिणी मॅडमची संकल्पना असलेल्या प्रकल्पाचा शोधनिबंध आम्ही याच वर्षी पूर्ण केला. त्याची पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधायचा होता. परंतु त्याच वेळी त्यांची प्रकृती बरी नाही असं कळलं आणि थेट त्यांच्या निधनाचीच बातमी आली. दु:ख झालं, पण कठीण प्रसंगातून पुढे जायला शिकलं पाहिजे हे त्यांचे शब्द मनात कायम कोरले गेले आहेत. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष नाही, पण त्यांनी दिलेल्या संकल्पनेवर काम करता आलं याचं मनोमन समाधान वाटतं.

radhikavinze94@gmail.com