‘लोकरंग’मधील (३ मार्च) ‘कोन्हाची म्हैस, कोन्हाले उठबैस’ हा लेख वाचून चांगलीच करमणूक झाली! एका वाहिनीवर ‘बोलीभाषेचा जागर’ या कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात जेथे लेवा गणबोली सर्रास वापरली जाते, त्या भागात ‘तावडी बोली’ बोलली जाते असा शोध लावलेला होता. या दोन्हीचे कर्तेधर्ते आहेत ‘पाडा’, ‘कुम्ड’, ‘कुंधा’ या तावडी भाषेतल्या कादंबऱ्यांचे लेखक अशोक कौतिक कोळी! या कादंबऱ्यांमुळे तावडी भाषेला ओळख मिळाली आणि लेखकालाही! पण तावडी भाषेची हवा कानात शिरल्याने त्याच अभिनिवेशात जेथे लेवा गणबोली बोलली जाते, त्या प्रदेशात तावडी बोलली जात असल्याचा या लेखकाला साक्षात्कार झाला. हे करत असताना आपण वडाची साल पिंपळाला जोडत आहोत याचे भान त्यांना राहिले नाही.
अहिराणी बोली नुसत्या पश्चिम खानदेशात बोलली जात नाही, तर पूर्व खानदेशात- म्हणजे जळगाव जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागातही बोलली जाते. लेवा गणबोली जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात बोलली जाते. तावडी पाचोरा आणि जामनेर तालुक्याचा दक्षिणेकडील- म्हणजेच अजिंठा डोंगराकडील प्रदेशातच बोलली जाते. अन्यत्र कोठेही ती बोलली जात नाही.
जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात सर्वत्र लेवा गणबोली बोलली जाते. तापी, पूर्णा, वाधुर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेतीव्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात मदतनीस असणाऱ्या बारा बलुतेदारांनीही हीच बोली संपर्कभाषा म्हणून स्वीकारली आहे. म्हणूनच तिला ‘लेवा गणबोली’ असे संबोधले जाते. मात्र, जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात आणि मलकापूपर्यंतच्या परिसरात तावडी बोलली जाते, हा लेखकाचा जावईशोध धक्कादायक आहे. जळगाव जिल्ह्य़ातील उत्तर जामनेर, भुसावळ, जळगाव, रावेर, यावल, मुक्तानगर, तसेच मोताळा, मलकापूर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूपर्यंतचा भूप्रदेश लेवा गणबोलीचा बालेकिल्ला आहे. तेथे तावडीचा काहीही संबंध नाही.
लेवा गणबोली ही समाजजीवनाशी एकरूप झालेली आहे. या भाषेला स्वत:चे सौष्ठव आहे. गोडवा आहे. शब्दांमध्ये नाद आहे, लय आहे. खास लहेजा आहे. तिला व्याकरण आहे. अशोक कोळी जिला तावडी समजतात, ती लेवा गणबोली आहे. त्यांना अपेक्षित असलेली तावडी जामनेर व पाचोरा तालुक्याचा जो अजिंठा डोंगराजवळचा प्रदेश आहे, तेथेच बोलली जाते; इतरत्र नाही.
नि. रा. पाटील आणि ऊर्मिला पाटील यांनी ‘लेवा गणबोली कोश’ तयार केला आहे. त्यात लेवा बोलीचा संपूर्ण इतिहास व्याकरणासह दिलेला आहे. शब्द आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. या पुस्तकाला २००६ चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. हा कोश अशोक कोळी यांच्या वाचनात न आल्यामुळे कदाचित त्यांनी ही गल्लत केली असावी.
‘पीपल्स लिंग्विस्टिक सव्र्हे ऑफ इंडिया’तर्फे भाषा सर्वेक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषांचा सव्र्हे केला. त्यात बोलीभाषा, त्यांचे स्थान, त्यांची वैशिष्टय़े या साऱ्याचा ऊहापोह केलेला आहे. ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या नावाने (संपादक डॉ. गणेश देवी, प्रकाशक : अरुण जाखडे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्व भाषांचे सर्वेक्षण केलेले आहे. ते असे-
बोली आणि भाषा : मराठी आणि मराठीची रूपे- १) मराठी, २) अहिराणी, ३) आगरी, ४) खानदेशी लेवा, ५) चंदगडी, ६) झाडी, ७) पोवारी, ८) कोहळी, ९) तावडी, १०) मालवणी, ११) वऱ्हाडी, १२) वाडवळी , १३) सामवेदी, १४) संगमेश्वरी. याशिवाय आदिवासींच्या २० भाषा आणि भटक्या-विमुक्तांच्या २४ भाषा अशा एकूण ५४ भाषांचा अभ्यास केलेला आहे.
‘बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे, के. नारखेडे, श्रीराम अत्तरदे या लेवा समाजाच्या लेखकांनी तावडी भाषेत लेखन केलेले आहे,’ असे म्हणत अशोक कोळी यांनी षट्कारच मारला आहे. बहिणाबाई चौधरी यांची ‘बहिणाबाईची गाणी’, रुक्मिणीबाई पाटील यांचे ‘रुक्मिणीगान’, भानू चौधरी यांची ‘गावाकडली गाणी’, भा. लो. चौधरी यांचे नाटक ‘मरी जाय जो’, अ. कृ. नारखेडे यांचा नाटय़छटासंग्रह -‘खान्देशी खुडा’, नि. रा. पाटील यांचा ‘लेवा गणबोली कोश’ असे लेवा बोलीतील साहित्य असून ते लेवा पाटीदार समाजातील लेखकांनी लिहिले आहे. भालचंद्र नेमाडे यांचे ‘बिढार’, ‘झूल’, ‘कोसला’, ‘जरीला’, ‘हिंदू- एक समृद्ध जीवनातील अडगळ’ या कादंबऱ्या, के. नारखेडे यांचे ‘शिवार’, ‘खानदेशी माती’ आणि इतर ग्रंथसंपदा, दिवाकर चौधरी यांची ‘बुझ्र्वागमन’, डॉ. श. रा. राणे यांची ‘कंदील’, पद्मावती जावळे यांचे ‘अरे संसार संसार’ इत्यादी अनेकांनी लेवा समाजजीवनावर आधारीत वाङ्मय निर्माण केले असून, त्यात लेवा गणबोलीचा वापर केला आहे. तिला विजनवासात पाठवू नका. नाही तर लेवा गणबोलीचा वापर करून म्हणावे लागेल- ‘जाढं मोठं दयलं, झावरनं गायलं.’
– अरविंद नारखेडे, जळगाव.
पडसाद : लेवा गणबोलीची म्हईस, तावडीले उठबईस
‘लोकरंग’मधील (३ मार्च) ‘कोन्हाची म्हैस, कोन्हाले उठबैस’ हा लेख वाचून चांगलीच करमणूक झाली! एका वाहिनीवर ‘बोलीभाषेचा जागर’ या कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात जेथे लेवा गणबोली सर्रास वापरली जाते, त्या भागात ‘तावडी बोली’ बोलली जाते असा शोध लावलेला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padsad