‘लोकरंग’ (२५ फेब्रुवारी) ‘भाषागौरव कशाचा’ या लेखामध्ये मंदार भारदे यांनी मांडलेल्या मराठी भाषेच्या स्थितीवर फक्त मुंबईपुरता विचार केला तरीही त्यांनी मांडलेल्या विषयाचे गांभीर्य जाणवते. माझ्या मते, कोणत्याही भाषेचे अस्तित्व प्रामुख्याने, ती ज्यांची मातृभाषा आहे अशा व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील भाषावापरातून टिकते. त्यातूनच त्या भाषेतील साहित्य निर्मितीस उत्तेजन मिळते. त्यास वाचकवर्ग लाभतो आणि भाषेचा प्रसार होतो.
गेल्या काही दशकांत मुंबईचे मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण झाले आणि आजदेखील ते वाढतेच आहे. त्यातूनच व्यवसाय आणि रोजगार यांच्या वाढत्या संधी लक्षात आल्यामुळे मराठी भाषिक नसलेल्या अन्य प्रांतातील मंडळींना मुंबईमध्ये आपला जम बसावा असे वाटणे स्वाभाविक होते आणि हे प्रमाण वाढतच गेले. राजकीय धोरणांपेक्षाही सर्वसामान्य मराठी माणसातील अल्पसंतुष्टता, नवीन कौशल्ये हस्तगत करण्याबद्दल अनास्था, स्वतंत्र व्यवसाय करण्याबाबतची सर्वसाधारण उदासीनता, जे कोणी तळमळीने व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यापैकी अनेकांना विविध बाबतीत झालेला त्रास आणि याबाबतीत सामाजिक प्रबोधन करून मराठी माणसास इतरांबरोबर स्पर्धेत टिकून जिंकण्यास प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण सुविधा व संरक्षण देण्यासाठी सक्षम यंत्रणांचा अभाव यामुळे बहुसंख्य सर्वसाधारण मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या समर्थ झाला नाही. परिणामी, वाढत्या कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी त्याला मुंबई सोडून स्थलांतरित होणे भाग पडले आणि मुंबईतील मराठी भाषिकांचा टक्का विलक्षण घसरला. त्यामुळे मराठी बोलू शकणाऱ्या माणसांची संख्याच मुंबईत कमी होत गेली. रेल्वे, बस, बाजार व सार्वजनिक स्थानांवर दृष्टिक्षेप टाकला तरीही हे सहज लक्षात येईल.
मुंबईतील अन्य भाषिकांच्या वाढत्या प्रभावामुळे व्यवहारात विशेषत: हिंदी भाषेचा प्रभाव वाढला. मुंबईच्या शालेय शिक्षणक्षेत्रात इंग्रजी भाषेला प्राधान्य मिळेल या दृष्टीने मातब्बरांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले. मराठी माध्यमातील शाळांत शिकलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी जीवनात अधिक यशस्वी होतात या गैरसमजातून मराठी भाषिकांनी आपले पाल्य इंग्रजी माध्यमाकडे वळवले. त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व वाढावे या भावनेतून घरात पाल्यांशी संवाद साधतानादेखील मराठी पालक इंग्रजीचा वापर करू लागले. मराठी भाषेतील व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्य याबाबत पालक आणि विद्यार्थी या दोहोंमध्ये अनास्था वाढलेली दिसते यामागे ही काही ठळक कारणे आहेत. त्यामुळे काही मराठी सूत्रसंचालक, कलाकार वगैरे मंडळी मराठीतून कार्यक्रम सादर करताना जे ‘इंग्रमराठी’ बोलतात त्याचे आश्चर्य वाटत नाही. हे लोण महाराष्ट्रातील अन्य भागांतही पसरत चाललेले आहे. मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळून, ‘मराठी भाषा दिन’ यासारखे शासकीय वार्षिक सोहळे साजरे करून अथवा चर्चासत्रे भरवून ‘मराठी’ भाषा मराठी भाषिकांच्या मुलुखात टिकून राहणार नाही. त्यासाठी राजकीय आणि सामाजिक धुरीणांनी मराठी माणसांची मानसिकता बदलण्यासाठी, त्यांच्यामध्ये व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि महानगरातील मराठी टक्का निदान टिकून राहण्यासाठी सातत्याने योजनाबद्ध प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठी भाषा समर्थ आणि समृद्ध आहेच, पण त्या सुखद भावनेपलीकडे जाणे ही काळाची निकडीची गरज आहे हे निश्चित.-विजय नाडकर्णी, गोरेगाव, मुंबई.
… म्हणून आपण मागे
लोकरंग (३ मार्च) मधील ‘समाजभानाचं हरपणं…’ हा मुक्ता चैतन्य यांचा लेख वाचला. आज सगळे जणू ‘मुठ्ठीतल्या दुनियेचे’ गुलाम झाल्यासारखी परिस्थती आपल्या भारतात निर्माण झाली आहे. अत्यंत स्वस्तआणि हवा तिथे उपलब्ध असणारा मोबाइल डेटा यामुळे सगळ्यांना आकाश ठेंगणं झालंय. हॅाटेलमध्ये जेवण्याआधी डिशेसचे फोटो काढून समाजमाध्यमांवर अपलोड करणं, एकाच घरात राहून चार दिशेला चौघांचं मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसणं,अगदी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत सोशल मीडियावर क्रियाशील असणं, रात्रीच्या बाराच्या ठोक्याला बर्थडे विश करणं, असे अनेक उद्याोग मोबाईलनं आपल्याला दिलेत. ट्रेनच्या ट्रॅकमधून चालताना, रस्ता क्रॉस करताना कित्येंकांनी या मोबाइलमुळे आपले जीवही गमावले आहेत, पण मोबाइल वापरण्याची सवय काही सुटत नाही. मोबाइलचा बेजबाबदारपणे वापर करणाऱ्यांची संख्या भारतात प्रचंड आहे असं खेदानं नमूद करावसं वाटतं. मी स्वत: कधी मोटारीने, कधी बसने, कधी ट्रेनने, कधी मेट्रोने तर कधी क्रुझने युरोपातील अनेक देश फिरलो आहे, पण मोबाइलचा बेजाबदारपणे वापर मला कुठेही दिसून आला नाही. इथे एक प्रसंग मुद्दाम नमूद करावासा वाटतो. मी जर्मनीहून इटलीला ट्रेनने निघालो होतो त्यावेळची ही गोष्ट आहे. माझ्या समोरच्या आसनावर बसलेल्या जोडप्याचा सुमारे दहा वर्षांचा मुलगा मोबाइलला दूर सारून त्या प्रवासात पुस्तक काढून अभ्यास करत होता. त्यावेळी मला कळालं की भारत अजूनही जगाच्या मागे का आहे ते.-धनराज खरटमल, मुलुंड, मुंबई.