‘लोकरंग’ (१२ मे) मध्ये ‘‘ईव्हीएम’चा प्रवास… वाद आणि प्रवाद…’ आणि ‘यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा…’ हे ईव्हीएमचा वाद आणि प्रतिवाद करणारे लेख वाचले. मी एक सामान्य नागरिक आहे. वाद आणि प्रतिवाद करणारे दोन लेख होते ते दोन्ही वाचता आले त्यामुळे विचार करण्यास मदत झाली. एका लेखात एका सर्वेक्षणाबद्दल लिहिले आहे. हे सर्वेक्षण मुळातच फार महत्त्वाचे असेल असे वाटत नाही. दोनतृतीयांश पर्याय अविश्वासाकडे झुकणारे आहेत आणि त्याबद्दल कारणमीमांसा देण्यास कोणीही बांधील नाही. सर्वसामान्य माणसांना विचारल्यास ते त्यांच्या वकुबाप्रमाणे आणि त्यांच्या ऐकीव माहितीनुसार उत्तर देतील. त्यातही २७ टक्के लोक १७ टक्क्यांपेक्षा दहाने जास्त आहेत. कुंपणावर बसलेल्या लोकांचा तिसरा पर्याय मुळातच अविश्वासाकडे झुकणारा असल्याने सर्वेक्षणाच्या हेतूबद्दल संपूर्ण विश्वासार्हता वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयालादेखील थोड्याफार प्रमाणात या सर्वेक्षणाबद्दल साशंक वाटते.फटकारणारे शेरे होते हे नमूद करताना ते काय होते हे सांगायचे लेखात टाळले आहे, ते जागेच्या कमतरतेने असावे, पण त्यामुळे हा मुद्दा कांगावा केल्यासारखा वाटतो. ‘काढणार, असेल, करणार, अंदाज बांधणे कठीण आहे काय, असणार, नसणार’ ही क्रियापदे speculation म्हणजे अटकळ दर्शवतात. त्यात कुठेही तथ्यांचा आधार घेतलेला दिसत नाही.
मतदान हे गुप्त असते आणि तसेच राहणे आवश्यक आहे. बूथमधून बाहेर पडताना थेट मतदाराहाती काहीही देणे म्हणजे ही गुप्तता सरळ पायदळी तुडवण्यासारखे आहे. आजही स्लिप तयार करणे हे आपल्या निवडणुकीचा आवाका पाहता पर्यावरणपूरक नाहीच. खरे तर दाबलेले बटन एका डिजिटल स्क्रीनवर दाखवले तर ते पुरेसे असायला हवे.– हर्षल भावे, मुंबई.
हेही वाचा…‘ईव्हीएम’चा प्रवास वाद आणि प्रवाद…
मतदान गुप्ततेचा बाऊ बंद करावा
‘लोकरंग’ (१२ मे) मध्ये ‘‘ईव्हीएम’चा प्रवास… वाद आणि प्रवाद…’ आणि ‘यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा…’ हे दोन्ही लेख वाचले. एक वाचक व मतदार म्हणून मी जगदीप एस. चोकर यांच्या मताशी सहमत आहे की, प्रिंट मतदार ताबडतोब मतदानानंतर घेऊ शकेल. हे जरी पटत असले तरी आता कोविडनंतर ऑनलाइन पारदर्शकता सहज उपलब्ध आहे. तेव्हा प्रत्यक्ष मोठ्या स्क्रीनवर बटण दाबताच सर्वांना दिसेल असे उमटावे, मतदान गुप्ततेचा बाऊ बंद करावा. मी जेव्हा कार्ड वापरून पेमेंट करतो तेव्हा लगेचच माझ्या मोबाइलवर नोंद होते. ज्याच्याकडे मोबाइल नाही त्यांची आपोआप मोठ्या स्क्रीनवर नोंद झालेली सर्वच पाहू शकतात. थोडक्यात, पेपरलेस पद्धतीत हे शक्य आहे. आज हे सर्व संदेश सेव्ह होऊ शकतात. आपण अवकाश भ्रमणच्या गोष्टी करतो व अजून गुटेनबर्ग ५०० वर्षीच्या काळात वावरत आहोत. पक्षांतर हा रोग कसा थांबवता येईल हा विचार केला पाहिजे. लोकशाहीची चेष्टाच करण्याचे ठरवले तर कोडग्यांना आवरू शकत नाही. तसेच कोणताही राजकीय पक्ष नष्ट करणे हादेखील गुन्हा समजावा. आपल्या सुंदर घटनेत सर्वांचे अस्तित्व गृहीत धरले आहे.-रंजन जोशी, ठाणे.
सहजपणे टोपी उडवली
‘लोकरंग’ मधील (१२ मे) सारिका चाटुफळे कुलकर्णी यांचा ‘काहे जाना परदेश!’ हा विनोदी लेख वाचला. लेखिकेने सहजपणे ट्रॅव्हल कंपनी आणि प्रवाशांची टोपी उडवली आहे.– नंदकिशोर गौड, नाशिक.
हेही वाचा…यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा..
खुसखुशीत लेख
‘लोकरंग’ मधील (१२ मे) सारिका चाटुफळे कुलकर्णी यांचा ‘काहे जाना परदेश!’ हा लेख वाचला. चित्तचक्षूंनी पाहायची पर्यटनस्थळं रिल्समध्ये बद्ध करण्याचा सोस हा सध्या वाईट ट्रेंड आहे. हल्ली पर्यटकांना मूळच्या नैसर्गिक आनंदाला मुकून कृत्रिम चलचित्रांत रमावंसं वाटतं. हा खुसखुशीत लेख खूप आवडला.– उमा आमकर