‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ हा फार मोठा, अवघड प्रकल्प डॉ. गणेश देवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडला. त्यासाठी त्या सर्वाचे मन:पूर्वक अभिनंदन. यानिमित्ताने डॉ. देवी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. (लोकरंग- १८ ऑगस्ट). त्यातल्या दोन विधानांबद्दल मात्र एक प्रश्नचिन्ह उभे करावेसे वाटते.
१) ‘‘अक्करमाशी’ हा शब्द मराठीत कधीही नव्हता, तो विसाव्या शतकाच्या मध्यावर भाषेत आला,’ असे डॉ. देवी म्हणतात. म्हणजे इ. स. १९५० च्या पुढेमागे काही वर्षे.  
भाषेत नवे शब्द घडतात, घडवले जातात, परभाषेतूनही येतात. हे व्हायलाच हवे. न झाल्यास भाषा कोमेजते, संपूही शकते. तेव्हा ‘अक्करमाशी’ शब्द मराठीत बाहेरून आला असेल तर त्यात वावगे म्हणण्याचे कारण नाही. इ. स. १५०० पर्यंत बटाटा, रताळे, मिरची, चिकू, हापूस, साबूदाणा, भुईमूग हे शब्द मराठीत नव्हते. कारण १४९८ साली भारतात पाय ठेवलेल्या पोर्तुगीजांनी हे पदार्थ भारतात आणले, रुजवले. प्रश्न असा की, ‘अक्करमाशी’ हा शब्द मराठीत १९५० च्या आसपास इतका अलीकडचा आहे?
दाते-कर्वे शब्दकोश प्रसिद्ध झाला १९२८ साली. त्यात ‘अकरमाशी’ हा शब्द आहे. आज प्रचलित आहे त्याच अर्थाने. गुंजा- मासा- तोळा हे पूर्वीचे वजनमापाचे कोष्टक. यात १२ मासे = एक तोळा असे गणित होते. यात एक मासा कमी असेल, हीण  मिसळलेले असेल तर शुद्ध नाही. अतएव ‘अकरमाशी’ असा शब्द प्रचलित झाला. लोकव्यवहारात पुढे तो ज्याचा जन्मदाता पिता प्रश्नचिन्हांकित तिथे वापरात येत तुच्छतादर्शक झाला. अकरामासे-अकरमासे-अक्करमासे-अक्करमाशी अशी ही व्युत्पत्ती दर्शवली जाते. १९२८ साली व्युत्पत्तीसह कोशात छापला गेलेला शब्द निदान २०-२५ वर्षे प्रचलित, रुळलेला गृहीत धरावा लागतो.
माझे आजोळ कोकणातले. बालपणी (१९५० च्या आधी) ज्या खेडय़ाने वीज पाहिलेली नाही अशा ठिकाणांत अशिक्षित स्त्रियांच्याही तोंडी हा शब्द मी ऐकला आहे.
उत्तर पेशवाईत ‘घाशीराम कोतवाल’ हे गाजलेले प्रकरण. या घाशीरामचा उल्लेख ‘अक्करमाशी’ असा जुन्या कागदपत्रांत आहे असे वाचल्याचे स्मरते. मात्र, संदर्भसामग्री हाताशी नसल्याने ठाम मत देता येत नाही. कृपया तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा.
२) डॉ. देवींचे दुसरे विधान असे आहे की- बंगाली व गुजराती भाषेत ‘ड’ व ‘ण’ या मूळाक्षरांचा संबंध नाही. जर असलाच तर नगण्य इतका कमी. बंगालीबद्दल मला माहिती नाही. मात्र, गुजरातीबद्दल हे कितपत खरे?
१) ‘ण’ हे अक्षर असलेली गुजरातमधली गावे- संजाण (डहाणूजवळ), जसदण (पूर्वी संस्थान. आता तालुका, राजकोट जिल्हा, वासणा (अहमदाबादचा भाग).
२) पुढे कंसातला शब्द मराठीतला : पाणी (पाणी), कणक (कणिक), चणा (चणे), माखण (लोणी), वखाण (स्तुती).
३) महात्मा गांधींचे एक आवडते भजन ‘वैष्णवजन तो तेने रे कहिये जे पीड पराई जाणे रे।’ हे संत नरसी मेहेता यांचे. त्यांचा काळ : इ. स. १४१५ ते १४८१.
तेव्हा गावे, अध्यात्म, खाणेपिणे यांत ‘ण’ चा विपुल वापर आढळतो. नगण्य व अपवादात्मक नाही. पुरेसा जुनाही.
इथे एक उल्लेख मजेदार वाटावा. पोरबंदर जगप्रसिद्ध आहे महात्मा गांधींचे जन्मस्थान म्हणून. मात्र पोरबंदरमध्ये गावाची ओळख ‘राणो, भाणो, पाणो एनू गाम’ अशी सांगितली जाई. यात ‘राणो’ म्हणजे तिथले राजे. क्रिकेट, ब्रास बँड यांचे शौकिन. ‘भाणो’ म्हणजे भाणजी लवजी घीवाला. आजूबाजूच्या खेडय़ांतून माखण म्हणजे लोणी खरेदी करून तूप मुंबई-अहमदाबादला पुरवणारी मोठी पेढी-उद्योग. याचे संस्थापक ‘भाणजी’ म्हणून भाणो. ‘पाणो’ म्हणजे दगड. या भागात चुनखडीचा दगड विपुल. याच्या खाणींमधून जांभ्या दगडातल्या चिऱ्यांप्रमाणे दगड काढून बांधकामात वापरतात, शिवाय याच्या वैपुल्यामुळे तिथे सिमेंटचे कारखाने झाले. या तिन्ही शब्दात ‘ण’ आहेच.
‘ड’ चेही तसेच. वडोदरा, गडू, लिंबडी ही ग्रामनामे आहेत. गांधीजींची ‘दांडीयात्रा’ विख्यात आहे. डेंको (डंका), वाडी (याचे आंबावाडी, गुंदावाडी असे वापर आहेत. गुंदा म्हणजे ‘भोकर’), डब्बो (डबा). रास या नवरात्रातल्या, समूहनृत्यात ‘दांडिया’ हा महत्त्वाचा घटक आहे. (वडोदऱ्यात दांडिया बजार म्हणून वस्ती आहे.) लाडू-श्रीखंड हे वापरात आहेत. दुधाच्या वैपुल्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत श्रीखंडाचा वापर गुजरातेत पूर्वापार खूप आहे. अडदिया व मठडी हे खास गुजराती खाद्यपदार्थ. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या (कच्छ, सौराष्ट्र, पंचमहाल, उत्तर गुजरात) भागात २००-२५० फुटांच्या खोलीची विंधन विहीर घरोघर दिसते. वर हातपंप असतो. त्याला ‘डंकी’ म्हणतात. या सर्व वापरांत ‘ड’ आहेच.
मात्र, हे मुद्दे लहानसे. खरी गरज निराळीच.
हा विषय आहे भाषेच्या वापरात मूळाक्षरांची वारंवारिता तपासणे. (फ्रीक्वेन्सी अ‍ॅनालॅसिस) कुठले मूळाक्षर जास्त वापरले जाते? कुठले कमी? इंग्रजीत कुठलाही एक विषय (जसे कायदा, अभियांत्रिकी, समीक्षा, इतिहास, भूगोल) नव्हे, तर अनेकानेक विषयांच्या गणनेवरून ‘ई’ (ए) हे मूळाक्षर (हा स्वर आहे हे अधोरेखित!) सर्वात जास्त म्हणजे १६ टक्के वापरात येते. अशी इंग्रजीची आणखी काही वैशिष्टय़े संशोधकांनी मांडली आहेत. मात्र मराठीचा असा अभ्यास झाला आहे का? हा अभ्यास प्रमाणभाषा व बोलीभाषा यांचा स्वतंत्र करता यायला हवा. हे काम खरे तर विद्यापीठे, साहित्यसंस्था यांचे आहे. डॉक्टरेटसाठी यातले अभ्यास निवडायला हवेत. अमक्याच्या साहित्यातील स्त्री- प्रतिमा अशा काथ्याकुटापेक्षा हे जास्त अगत्याचे आहे. डॉ. देवी व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुन्हा आभार.
– विश्वास दांडेकर, सातारा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा