‘लोकरंग’ (१८ जून ) मधील ‘शहरांच्या सामाजिक वारशांचे खच्चीकरण’ हा लेख वर्तमान राजकारणातील धर्माची अपरिहार्यता अधोरेखित करतो आहे. आज भारतीय समाजात एका बाजूला जातीवाद, धर्मवाद अति टोकाचा बनून हिंसक वळण घेतो आहे, तर दुसऱ्या बाजूला सौंदर्याचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व वैचारिक वारसा निष्प्रभ आणि कालबाह्य ठरतो आहे. आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांना विकासाचे राजकारण करण्यापेक्षा जाती -पातीचे आणि धर्माचे राजकारण करणे अधिक फलदायी वाटू लागले आहे. समाजाच्या हितसंबंधांपेक्षा धार्मिक हितसंबंध अधिक जपणे महत्त्वाचे वाटून अधिकाधिक धार्मिक ध्रुवीकरण करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे हे मागील काही दिवसांत छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, अमळनेर आणि नगर शहरात घडलेल्या आणि घडवलेल्या दंगलींवरून स्पष्ट होते. स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी देव आणि धर्माचा आधार घेण्याची कारस्थाने महाराष्ट्रात सध्या मोठय़ा प्रमाणात फोफावत आहेत हे चिंताजनक आहे. समाजाचा बुद्धिभेद करणाऱ्या या कुटिल कटकारस्थानी लोकांना आपण समाजाचं मोठं नुकसान करून, उलट समाजात तेढ वाढवतो आहोत हे केव्हा लक्षात येणार ? या सर्व समस्येचं मूळ आपल्या धर्मव्यवस्थेत आढळते. कारण भारतात बहुसंख्य जनता ही हिंदूू धर्मीय आहे आणि ही जनता विविध जाती -जमातीत विभागली गेली असून जात-जन्म, उच्च नीच, विषमता व अन्याय यांवर संपूर्ण समाजव्यवस्था उभी राहिली आहे आणि या समाजव्यवस्थेला धर्माची मान्यता असल्याने त्यात सहजासहजी परिवर्तन करणे कठीण असून, त्याचाच गैरफायदा आज आपले राजकीय पक्ष घेताना दिसतात. जर आपल्याला लाभलेला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ऐक्याचा वारसा जपायचा असेल तर राजकारणाची धर्मापासून फारकत करायला हवी.- डॉ. बी. बी. घुगे, बीड.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे दुखणं खूप जुनं

‘लोकरंग’ (१८ जून) मधील ‘हा मणी ‘गळू’ होऊ नये !’ हा शाहू पाटोळे यांचा लेख वाचला. लेखकाला असे सांगावेसे वाटते की, नीट माहिती घ्या. ख्रिश्चन मिशनरी इंग्रजांच्या साहाय्याने धर्मातरासाठी तेथे गेले. त्यांनी कशा पद्धतीने फूट पाडली आणि हिंसाचार केला आहे ते तेथे सेवा प्रकल्प चालवणाऱ्या स्वयंसेवकांना विचारा. हे दुखणं खूप जुनं आहे. वनवासी लोकांना कायम मूळ प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम सरकारी यंत्रणा करायची. विकासासाठी पाठवलेला निधी पोचत नसे. ताजा कलममध्ये केलेला उल्लेख निषेधार्ह. – य. आ. धुपकर, रत्नागिरी.

‘प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश..’ ही भावना जागृत होऊ दे

‘लोकरंग’मधील (१८ जून) ‘शहरांच्या सामाजिक वारशांचं खच्चीकरण..’ ही सहा मान्यवरांच्या लेखणीतून साकारलेली लेखमाला वाचली व महाराष्ट्रातील वर्षांनुवर्षे जपलेल्या सुसंस्कारांचा नष्ट होत असलेला वारसा नजरेसमोर आला. कुठच्याही शहराचे महत्त्व त्या शहराच्या नावात नसून, तेथील भूमिपुत्रांच्या कर्तृत्वात असते. आजवरचा हा इतिहास नष्ट करून केवळ आपल्या क्षणिक अस्तित्वाचा ठसा उमटविणारी तथाकथित स्वार्थी मंडळी संस्कृतीच्या पडछाया मातीमोल ठरवीत आहेत. दुर्दैवाने आपल्या देशाचे राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक जीवन केवळ वादांमुळेच जिवंत राहू शकते. मात्र वाद उफाळले की त्यातून काही साधायच्या आतच ते विरून जातात. म्हणजे पुन्हा नव्या वादाला आमंत्रण. मग कसा टिकेल पूर्वजात वारसा? कर्नाटकातील अभ्यासक्रमात सावरकरांचा धडा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज ६३ वर्षांनंतर मुंबईतला महाराष्ट्र गडप झालेला दिसत आहे. मुंबईत अर्थार्जनासाठी येणारे लोंढे इथला वारसा भंग करतात याची कुणालाच कदर नाही. मराठीचा लेखनातला वारसा तर केव्हाच मृत झाला, पण बोलण्यातही तो उरला नाही. लोकल रेल्वेगाडीत ‘जरा आगे सरको’ म्हटल्याशिवाय पुढे जाता येत नाही. व्हॅलेंटाइन डेला दुकाने फोडण्यात आणि गुढीपाडव्याला लाकडी तलवारी मिरवण्यातच आपल्याला महाराष्ट्र धर्म दिसू लागला. जर महाराष्ट्राचा वारसा टिकवायचा असेल तर आजच्या हिंदी गाणी व रिमिक्स मराठी गाण्यांच्या कल्लोळात ‘बहू असोत सुंदर संपन्न की महा..’ हे गीत कानी पडले तर ‘प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश..’ ही भावना जागृत होऊ दे. तोच खरा वारसा ठरेल. – सूर्यकांत भोसले, मुलुंड

न रुचणारा लेख

‘लोकरंग’ (२ जुलै) मधील नंनद होडावडेकर यांचा ‘डेव्ह, डॅश आणि धर्मासाठी..’ हा लेख वाचून पार अपेक्षाभंग झाला. मोदींच्या अमेरिकावारीवर तिथली तरुणाई एवढी चार्जड् झाली होती की मोदींना भीक नको पण कुत्रा आवर! म्हणण्याची वेळ आली होती. रस्त्यावर ‘मोदी गो बॅक’चे नारे लागले, मित्र ओबामांनी कान उपटले, तर वार्ताहर परिषदेत सबरीना सिद्दिकीच्या प्रश्नावर मोदींना खऱ्याखुऱ्या वार्ताहर परिषदचे दर्शन घडले. तिला ट्रोल केल्यावर चक्क बायडेन प्रशासनाने याची दखल घेत अमेरिकन वृत्तपत्रीय लोकशाहीबाबत भारताला सुनावले. एवढे सगळे झाले आणि अमेरिकेतील मराठी माणूस फक्त बार्बेक्यू करत खात आणि दारू ढोसत होता हे लेखकाला सांगायचे आहे का? यात विनोदाच्या नावाने फक्त हम्म! हम्म! एवढेच होते. अमेरिकेतील गुज्जू भाईंनी निदान तिकिटे काढून मोदींचा इव्हेंट करून आपले अस्तित्व अधोरेखित केले. आपले देव, देशमुख, धर्मा देशमुख स्वत:ला डेव्ह, डॅश, धर्मा संबोधण्यातच धन्यता मानत स्कॉच ढोसत बर्गर आणि मक्याचे कणीस, चिकन विंग्ज (तंगडीही नाही ) खात असली बाष्कळ, लाळघोटी राजनैतिक चर्चा करतात आणि लोकसत्तेच्या प्रगल्भ वाचकांनी ती वाचावी अशी अपेक्षा करतात, का? तर, ही अमेरिकेतील बाटलेली ‘महाराष्ट्र मंडळ’ मंडळी आहेत म्हणून. –अॅड. एम. आर. सबनीस. अंधेरी.

नेहरूंचे मोठेपण!

‘व्यक्तीश्रेष्ठांचा स्मरणोत्सव’ हे प्रकाश बाळ यांचे पुस्तक परीक्षण वाचनीय आहे. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या ‘मोठी माणसे’ या पुस्तकातील, एका प्रसंगात काकासाहेब गाडगीळ रस्त्याने चालत असताना, पंडित नेहरूंनी पाहिले व त्याविषयी स्वीय साहाय्यकास विचारणा केली असता, मंत्रीपद गेल्यावर, आता त्यांची आर्थिक ऐपत गाडी बाळगण्याची नसल्याचे सांगितले, तेव्हा नेहरूंनी त्यांची ‘स्टेट बॅक ऑफ इंडिया’ चे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि त्यांना गाडी मिळवून दिली. आजच्या राजकीय परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर काकासाहेबांचा साधेपणा व नेहरूंची समयसूचकता निश्चितच गौरवास्पद वाटली. –प्रदीप करमरकर, नौपाडा ठाणे.

मणिपूरचा इतिहास समजण्यास मदत

‘लोकरंग’ (१८ जून) मधील ‘हा मणी ‘गळू’ होऊ नये !’ हा शाहू पाटोळे यांचा लेख वाचला. मणिपूर राज्यात गेले तीन महिने हिंसा, जाळपोळी घटना घडत आहेत. शाहू पाटोळे यांच्या लेखामुळे तेथील पूर्व-इतिहास समजण्यास मदत झाली. जगण्याच्या साधनांची कमतरता असते तेव्हा ती उपलब्ध व्हावी/ मिळावी यासाठी तो प्रसंगी कठोर/ क्रूर बनतो. तशात जाती/ जमाती/ कळप करून तो आपल्या गरजा पूर्ण करू लागला की मणिपूर/ ईशान्येतील अन्य राज्यांप्रमाणे आक्रमक बनतो. आता मैती नि कुकी या दोन जमातीत हा पेटलेला वणवा कधी शांत होईल, काही सांगता येत नाही. (१) विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसचा आग्रह आहे की पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन हा तिढा सोडवावा. पण दोन्ही बाजू ते देतील तो निवाडा मान्य करण्याच्या मन:स्थितीत आहेत काय? कारण तो शेवटचा उपाय आहे व तो तेव्हाच पुढे केला पाहिजे, जेव्हा दोन्ही बाजू सल्ला ऐकण्याच्या मन:स्थितीत असतील. (२) मुळात सरकारने नव्हे तर न्यायालयाने मैतींना अनुसूचित जमातीचा दर्जा बहाल करून काही सवलती मिळाव्यात यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे सांगितले आहे. (३) तो न्यायालयीन निर्णय कुकींना मान्य नाही. त्यासाठी चर्चा, विचारविनिमय करणे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे असले संविधानिक पर्याय उपलब्ध असताना, कुकींनी सरकारी शस्त्रे लुटून नेली नि राज्यात हिंसाचार घडविला, यात कसला आहे शहाणपणा? कावेरी पाणी प्रश्न, महाराष्ट्र सीमावाद इ. असे अनेक प्रश्न अन्य राज्यांत आहेत, पण त्यासाठी कोणी शस्त्र हाती धरत नाही.
(४) ईशान्येकडील राज्यात मिशनरी लोकांनी शिक्षणाचा प्रसार केला, त्यामुळे ती जनता साक्षर बनली, शाळा-कॉलेज शिकली याबद्दल त्यांचे कौतुक केले जाते. पण शिक्षणाबरोबर शहाणपण येणे म्हणजे खरी साक्षरता, तसेच तेथील बहुतेक लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे, असेही वाचले. येशूचा धर्म ‘प्रेम आणि करुणा’ या दोन भक्कम पायावर उभा आहे. तेव्हा त्यांनी शस्त्रे उचलून-नव्हे पळवून धिंगाणा घालावा, हिंसाचार करावा, हे मनाला पटत नाही. (५) लेखात वाक्य आहे- ‘मिशनऱ्यांच्या अगोदर किमान तीनशे वर्षे तिकडे ब्राह्मण पोहोचले होते. त्यांनी जर तिकडच्या आदिवासींसाठी शाळा काढल्या असत्या, त्यांच्या भाषा शिकून घेऊन शालेय पुस्तके तयार केली असती.. तिकडचे आदिवासी आज ‘मुख्य प्रवाहात’ असते.’ (अ ) परकीय आक्रमणाने त्रस्त झालेल्या ब्राह्मणांनी नाइलाजास्तव मणिपूरमध्ये गमन केले असण्याची शक्यता अधिक वाटते. मूळ जागी जर ते सुरक्षित असते, तर परप्रांती जेथे सोयीसुविधांचा अभाव आहे, तेथे ते जातेच ना! तो त्यांचा पिंड नाही! (अर्थात आता विवेकानंद मिशनतर्फे अनेक स्वयंसेवक तेथे पाय रोवून शाळा, कॉलेज, आरोग्यसोयी देऊन जनसेवा करीत आहेत) (ब ) आपल्याकडील अनेक सेक्युलर लोकांना राष्ट्रवाद हा प्रतिगामी वाटतो. पण आपल्याकडे त्याची जाण सर्वाना नि सर्वकाळ असती तर या देशावर परकीय आक्रमणे झालीच नसती नि १२०० वर्षे परकीय लोकांनीही राज्य करून या देशाची लूट केली नसती. असो. – श्रीधर गांगल, ठाणे

भयाण वास्तवाचे दर्शन

‘लोकरंग’ मधील ‘ललित’ सदरातील ‘स्वप्नाची दुरुस्ती!!’ ही श्याम मनोहर यांची कथा वाचताना वास्तव किती कठीण होत आहे व भावी काळात काय परिस्थिती असेल याची जाणीव झाली. महागाई, बेरोजगारी तीव्र होताना, लोकसंख्या वाढत असताना त्यावर उपाय करण्याची गरज असताना भलतेच मुद्दे घेऊन त्यावर निर्थक वादविवाद होत आहेत. धार्मिक मुद्दे महत्त्वाचे होत असताना तेढ मतभेद तीव्र होत आहेत. पर्यावरण प्रश्न, हवामानबदल, तापमानवाढ समस्या जगभरात वाढत असून, परिणामी दुष्काळ, पाणीटंचाई, अन्नधान्य उत्पादन घटत असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वप्न कोणते पाहायचे? स्वप्न पूर्ण होतील का? त्यामुळे स्वप्नांची दुरुस्ती करणेच योग्य असेल. वास्तव स्वीकारायला कठीण असले तरी त्यातून मार्ग काढून जीवनाची वाटचाल सुरू ठेवावी लागेल. – प्र. मु. काळे, नाशिक.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padsad religion and politics are very different amy
Show comments