९ सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मधील ‘गजल विधेची उपेक्षा का?’ हा डॉ. राम पंडित यांचा लेख वाचला. डॉ. पंडित यांनी समतोलपणे समीक्षकांसमोर प्रश्न उपस्थित करतानाच गजलकारांनाही आरसा दाखवला आहे. समीक्षक बहुधा गजल विधा वेगळी न मानता ‘गीत’ या प्रकारात तिला टाकत असावेत. ग. दि. माडगूळकरांनाही जिथे उपेक्षेचे धनी व्हावे लागले, तिथे गजलकारांना कोण विचारतो?
या विषयाला अजून एक पैलू आहे, ज्यावर बोलणे आवश्यक असूनही टाळले जाते. तो म्हणजे उर्दूतले गजलतंत्र मराठीत ‘आयात’ करताना सुरेश भटांकडून (उर्दू लिपी येत नसल्याने) कळत-नकळत काही चुका घडल्या आणि ‘काफिया’चा गोंधळ मराठीत निर्माण झाला. देवनागरीप्रमाणे उर्दूत स्वरांसाठी काना/मात्रा/इकार/उकार इत्यादी चिन्हे नसून रोमन लिपीप्रमाणे अक्षरे आहेत. म्हणून उर्दूत ‘दिया’ व ‘हवा’ हे शब्द ‘काफिया’ म्हणून योग्य ठरतात. कारण त्या लिपीत लिहिताना शेवटचे अक्षर (आपले यमक) सारखे येते. आपण ‘दिया’ असेल तर ‘लिया’च हवं असा नियम केला. शेवटचे अक्षर, त्या अक्षराचा स्वर आणि त्याआधीच्या अक्षराचा स्वर (उर्दूतली अलामत) अशा तीन गोष्टी मराठीतल्या ‘काफिया’वर लादल्या. साहजिकच अवघड तंत्र सांभाळण्याच्या नादात मराठी गजल कृत्रिम/ कृतक होत गेली. उर्दू-फारसीचे नियम देवनागरी लिपीवर लादणे चूक आहे, हा विचार त्या काळात झाला नाही का? रोमन लिपीला देवनागरीचा नियम लावून ‘अष्टाक्षरी’ छंद लिहिता येईल का? ‘तुका म्हणे’ ही चार अक्षरे रोमन लिपीत लिहिताना आठ अक्षरे होतील!
सदानंद डबीर, मुंबई
संकुचित कंपूशाही आणि स्वयंघोषित वारसदार
डॉ. राम पंडित यांचा ‘गझल विधेची उपेक्षा का?’ हा लेख गझल रसिक, जुने-नवे गझलकार आणि एकूणच मराठी काव्य-अभ्यासकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. गझल-लेखनासंबंधी त्यांनी अनेक मुद्दय़ांवर केलेले भाष्य चिंतनीय आहे. त्याचा विचार प्रत्येक गझलप्रेमीला करावाच लागेल. सुरेश भट यांचा अनेकदा प्रत्यक्ष सहवास व असंख्य पत्रांतून त्यांचे मार्गदर्शन मला लाभले. अर्थात अशी संधी मिळालेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत शेकडो जण आहेत. याचे कारण भट नवी गझलकार पिढी तयार करण्यासाठी मिशनरी वृत्तीने अखेपर्यंत कार्यरत होते. मात्र, मराठी गझलेची योग्य समीक्षा न होता तिच्यावर टीकाच वारंवार झाली, हे सत्य आहे. भट असताना त्यांच्या तोडीची गझल मराठीतील अन्य उत्तम दर्जाच्या मान्यवर कवींनीही लिहिली नाही. काहींनी प्रयत्न केले, पण गझलेत ते भटांची उंची गाठू शकले नाहीत. परिणामी भटांबद्दलची असूया अनेकांत निर्माण झाली. परंतु भटांना रसिकमान्यताच इतकी होती, की असल्या असूयेची त्यांनी फिकीर केली नाही. अखेर प्रयत्न करूनही उत्तम गझल लिहायला न जमलेल्यांनी गझलेची टिंगलटवाळी सुरू केली. भट हितगुज करत असलेल्या पिढीला ‘भटांचा भटारखाना’ असे हिणवले गेले. तरीही भट असेपर्यंत मराठी गझलेचा आलेख भटांमुळे वेगळा व चढता होता.
भटांच्या निधनानंतर त्यांच्याविषयीचे प्रेम दाखवत काही जणांनी भटांच्या मिशनरी संस्कृतीशी प्रतारणा करत वाढवलेला व्यक्तिकेंद्रित कंपूशाहीचा रोगही गझल विधेच्या विस्ताराच्या अडथळ्याचे कारण ठरला. बहुतांश राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नावाने घेतले जाणारे मुशायरे आणि चर्चासत्रेही समग्रतेचे भान सोडून संकुचित होऊ लागली. अनेक जुन्या-जाणत्यांना जाणीवपूर्वक उल्लेखाने वा अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न झाला व आजही सुरूच आहे. परिणामी कूपमंडुकही ऐरावत म्हणून मिरवू लागले. गझल विधेवरील अन्यायाला हेही एक कारण आहे. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी ‘गझलसागर प्रतिष्ठान’द्वारे गेल्या दीड-दोन दशकांत अनेक गझल संमेलने घेतली. लेखन व गायकी या दोन्ही अंगांनी या संमेलनांनी काही मूलभूत चर्चा घडवून आणली. भीमरावांसह काही गायक-संगीतकारांनी अनेकांच्या गझलांना चाली लावून स्वरबद्ध केले. त्याच्या कॅसेट्स, सीडीज्ही निघाल्या. त्यातून निर्माण झालेल्या दंभात काही गझलकारांची पुढे निर्मिती खुंटली.
आज गझलेची लोकप्रियता वाढलेली आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व इतर अनेक ठिकाणी स्वप्रतिभेने आणि अभ्यासाने शास्त्रशुद्ध गझल लिहिणारे अनेक नवे गझलकार आहेत. ते फार उत्तम लिहीत आहेत. आजवरच्या गझलेत जे नव्हते ते, ते गझलेत आणत आहेत. त्यामुळे मराठी गझल विकसित होत जाणार व ही नवप्रतिभाच संकुचित कंपूशहांना आणि भटांच्या गझल परंपरेचे आपणच एकमेव वारसदार असल्याचा दावा करणाऱ्या स्वयंघोषितांना उत्तर देत आहे. भट यांनी ‘विजा घेऊन येणाऱ्या नव्या पिढी’चे पाहिलेले स्वप्न सत्यात यायचे असेल तर डॉ. पंडित यांच्या लेखाचा अर्थ समजून घ्यायला हवा.
– प्रसाद माधव कुलकर्णी, कोल्हापूर</strong>
बँकिंग क्षेत्राचे काय होणार?
‘लोकरंग’मधील (१६ सप्टेंबर) डॉ. रूपा रेगे-नित्सुरे आणि संजीव चांदोरकर यांचे २००८ च्या जागतिक मंदीवरील उत्कृष्ट लेख वाचले आणि जुन्या कटू स्मृती जाग्या झाल्या. या मंदीतून बाजार काहीसा सावरतोय तोच २००९ या नववर्षांच्या सुरुवातीलाच ‘सत्यम कॉम्प्युटर्स’मधील घोटाळ्याच्या आघाताने तो जवळपास रसातळाला गेला. आणखी एक आठवण म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीस ‘लोकसत्ता’मध्ये आलेली एक बातमी. तिच्यात म्हटले होते की, ‘लेहमन ब्रदर्स’नी अहमदाबादच्या ‘आयआयएम’मधील कॅम्पस इंटरवूमध्ये एका मुलीची १.१० कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊन निवड केली.’ त्यानंतर काही दिवसांतच ‘लेहमन ब्रदर्स’ कोसळल्याची बातमी आली. तेव्हा त्या मुलीचे काय झाले असावे असा विचार मनात येऊन गेला. गेल्या काही वर्षांत काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता असलेल्यांना भरमसाट पगार देण्याकडे कल वाढत आहे. परंतु त्याचबरोबर अशा व्यक्तींना कंपनी व्यवस्थापन काही उद्दिष्टे (टार्गेट्स) ठरवून देते आणि ती साध्य करण्याच्या धडपडीत गळेकापू स्पर्धा वाढते, सारासार विवेकबुद्धी लोप पावते आणि शिल्लक राहतो तो फक्त स्वार्थ. त्यातूनच मग ‘डेरिव्हेटिव्हज्’सारख्या कल्पना जन्माला येतात.
भारतीय बँकिंग क्षेत्र यातून काही शिकले नाही, असे लेखात म्हटले आहे ते खरेच आहे. या क्षेत्रात भरती केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांत एमबीए झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. एका बडय़ा राष्ट्रीयीकृत बँकेतून निवृत्त झालेल्या माझ्या मित्राने सांगितले की, केवळ गणित आणि इंग्रजी या दोन विषयांच्या जोरावर हे उमेदवार बँकेत वरच्या पदावर येतात, परंतु बँकिंगचे प्राथमिक ज्ञानसुद्धा त्यांना नसते. अशांना थेट कर्ज अधिकारी म्हणून नेमले जाते. अनुभवी कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून काही शिकणे त्यांना कमीपणाचे वाटते. त्याच्या म्हणण्यानुसार, परकीय चलन व्यवहारात प्रावीण्य असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची संख्याही कमी कमी होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशातील बँकिंग क्षेत्राचे काय होणार याची कोणालाही साहजिकच चिंता वाटेल.
– अभय दातार, मुंबई
‘कोयाबोली’चा शोध
‘लोकरंग’मधील (१६ सप्टेंबर) ‘सामवेदी बोलीचे व्याकरण’ हा फेलिक्स डिसोझा यांचा ‘सामवेदी बोली- संरचना आणि स्वरूप’ या डॉ. नरेश नाईक लिखित पुस्तकावरील परीक्षण वाचून मनात काही विचार आले. ‘बोलीभाषा विरुद्ध प्रमाणभाषा’ असा वाद कित्येकदा ऐकू येतो. वास्तविक बोली ही त्या-त्या जनसमूहाची अभिव्यक्त होण्याची भाषा असते. ती नैसर्गिक असते. वेगवेगळ्या बोलीभाषांना जोडण्याचे व परस्परांना विचारांचे संवहन करण्याचे काम बोली करते. अर्थात प्रमाणभाषा ही कोणाचीही बोली नसते. बऱ्याच अंशी ती प्रयत्नपूर्वक घडवावी लागते. त्यामुळे व्याकरणाच्या लेखन नियमांचे बंधन तिला पाळावे लागते. बोलीला मात्र असे बंधन नसते. सहजप्रवृत्ती व प्रकृती हा तिचा स्थायीभाव आहे. याचा अर्थ असा नव्हे की बोलीला व्याकरणच नसते. या लेखात म्हटल्याप्रमाणे, काही बोलींच्या बाबतीत सुव्यवस्थित व्याकरणाची मांडणी स्पष्टपणे दिसते. एक गोष्ट खरी की, त्या- त्या भाषक समूहातील लोकांनी एकत्र येऊन आपल्या बोलीवर बराच विचारविमर्श व संशोधन करण्याची गरज आहे. बोलीचा व प्रमाणभाषेचा संबंध काये, हेही लोकांसमोर आले पाहिजे. कित्येक सुंदर शब्द, वाक्प्रचार आदी बोलींमुळेच मराठीला मिळाले आहेत.
या संदर्भात एक उदाहरण देण्यासारखे आहे. ‘कोयाबोली’ या नावाची एक बोली पूर्व विदर्भातील आदिवासी गोंडी समाजात बोलली जाते. बहुश: लुप्तप्राय होत चाललेली ही बोली या समाजातील एका सुविद्य व्यक्तीने- तिरु सीताराम मंडाले यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी संशोधित करून लोकांसमोर आणली. या बोलीला एक लिपीही अस्तित्वात होती, तिचाही त्यांनी शोध घेतला. माझे एक स्नेही मुकुंदराव गोखले (स्क्रिप्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, पुणे) यांनी त्यावर खूप परिश्रम घेऊन त्या लिपीसाठी मुद्रणसुलभ अशी संगणकीय प्रणाली तयार करवून घेतली आणि ‘कोयाबोली’ हे पुस्तक सिद्ध केले. त्याला शेवटी एक संक्षिप्त गोंडी शब्दसंग्रह (गोंडी-मराठी-हिंदी) जोडला आहे. बोलींचा अभ्यास करण्यासाठी असे स्तुत्य प्रयत्न व्हायला हवेत. तेव्हा कुठलाही अभिनिवेश न ठेवता बोली व प्रमाणभाषा यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका स्वीकारल्यास आपली मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने समृद्ध होईल!
– वि. दा. सामंत, पुणे
‘आर. के.’च्या बोधचिन्हाविषयी..
अरुणा अंतरकर यांचा ‘अलविदा आर. के.’ हा लेख आर. के. स्टुडिओच्या निर्मितीपासून त्याच्या सद्य:स्थितीची अभ्यासपूर्ण माहिती देतो. राज कपूरने आपल्या स्टुडिओसाठी जे बोधचिन्ह घेतले, त्याबद्दल थोडेसे..
लेखात म्हटले आहे : ‘राज कपूरने खजुराहोच्या वर्गातली ही पोझ बेधडक बोधचिन्ह म्हणून घेतली. हे असलं बोधचिन्ह त्याच बेधडकपणानं राजनं स्टुडिओच्या दर्शनी भागातही कोरलं. पण ते कधीच अकारण धीट वा अश्लील वाटलं नाही. शिल्पच वाटलं.’ खरंच ते समस्त चित्रपटप्रेमींना शिल्पच वाटलं होतं. कारण ते शिल्प होते स्वत: शोमन राजचे व त्याने जिच्यावरील प्रेमाचा आपल्या चित्रपटांसाठी प्रेरणा म्हणून उपयोग केला त्या नर्गिसचे! ‘बरसात’ चित्रपटातील एका दृश्यात नर्गिस धावत येऊन व्हायोलिन धरलेल्या राजला आवेगाने बिलगते. एका लतिकेने एखाद्या वृक्षाला बिलगून त्याच्या छायेत झुकावे, झुलावे असा तो अद्भुत दृश्यक्षण होता. हाच क्षण राजने टिपला व आपल्या सर्व चित्रपटांत वापरला. ‘बरसात’ चित्रपटात हे बोधचिन्ह दिसत नाही, कारण त्याचा जन्मच मुळी तेव्हा झाला नव्हता.
स्टुडिओसाठी हे चिन्ह ‘बरसात’च्या यशानंतर या चित्रपटाच्या पोस्टरवरील दोघांच्या स्थिरचित्रावरून १९४९ साली घेतले होते. ‘आह’ चित्रपटाच्या सुरुवातीला श्रेयनामावली सुरू होण्याच्या अगोदर ‘आर. के.’ या आद्याक्षरांवर याच दोघांचे स्थिरचित्र मूर्तिरूपात स्पष्टपणे नजरेस पडते. बोधचिन्हातले त्यांचे चेहरे अधोरेखित करणारे शिल्प राजने नंतर फक्त ‘आवारा’पर्यंतच वापरले. चेहरा असलेले बोधचिन्ह काढून टाकण्यामागील कारण काय असावे? ‘श्री ४२०’नंतर त्याने अमूर्त स्वरूपाचे शिल्प चिन्ह म्हणून वापरले. त्यात व्हायोलिन दिसत असे. नंतर ‘बॉबी’पासून हातातच विलीन झालेले क्रुसासारखे दिसणारे बोधचिन्ह (स्टुडिओच्या प्रवेशद्वारावर आता असलेले) झळकले. ‘प्रेमग्रंथ’ या चित्रपटात पुन्हा जुने, पण अमूर्त स्वरूपात ते दिसले. ‘आ अब लौट चले’ सिनेमातही तेच जुने व्हायोलिनवाले चित्र सोन्याच्या मुशीतून काढल्यासारखे पिवळ्याजर्द सूर्याच्या पाश्र्वभूमीवर येते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘कल, आज और कल’ या चित्रपटात ना पृथ्वीराज दिसतात, ना राजचे ते सुप्रसिद्ध बोधचिन्ह! याचे कारण समजले नाही.
अन्तरकर यांनी सुचवल्याप्रमाणे, मुंबईतील हा अमोल ठेवा वारसा म्हणून जतन करतानाच आर्थिक गणितही सरकारला जुळवता येईल. परंतु ते होणार नाही. आर. के. चित्रसंस्थेबद्दल आणि त्याच्या उज्ज्वल गतेतिहासाबद्दल एक ग्रंथच तयार होईल असे वाटते. चित्रपटनिर्मिती राजच्या पुढील पिढीस नाही करता आली, पण ‘आर. के.’च्या भव्यदिव्य इतिहासाच्या कडू-गोड, रम्य आठवणी तरी त्यांनी लिहाव्यात, ही अपेक्षा!
– सुभाष अंतू खंकाळ, नवी मुंबई</strong>
शिस्तीने उत्सव करण्याची जबाबदारी आपलीच!
‘लोकरंग’मधील ‘मी जिप्सी..’ या संजय मोने यांच्या सदरातील ‘हंडीवाल्या नेत्यांचा विजय असो!’ हा लेख (१६ सप्टेंबर) वाचला. उत्सव मंडळांनी परिसरातील एखादे मैदान, सभागृह भाडय़ाने घेऊन तिथे उत्सव साजरा केला तर उत्सवाला शिस्त येईल. सध्या धर्मासाठी लोक जीव द्यायलाही तयार होत आहेत. तेव्हा मैदान, सभागृहासाठी जे काही भाडे द्यावे लागेल ते द्यायला कुणीही तयार होईल. राहता राहिला प्रश्न- एकाच धर्माला लक्ष्य करण्याचा! तर या देशात आपण हिंदू बहुसंख्य असल्याने साहजिकच उत्सवही त्यांचेच जास्त असणार. त्यामुळे रस्ते मोकळे राहिले, आवाज झाला नाही तर त्याचा फायदा जास्त हिंदूंनाच होणार.. नाही का? जेव्हा उत्सव सुरू झाले तेव्हाचे स्वरूप आणि आताचे स्वरूप यात किती स्थित्यंतरे घडली आहेत. ती जर आपण स्वीकारली तर शिस्तीने, कायदे पाळून उत्सव करण्याची ही पद्धतही रूढ व्हायला फार वेळ लागणार नाही. फक्त ज्यांना ज्यांना शिस्तीने व कायदे पाळून उत्सव साजरे व्हावेत असे वाटते त्यांनी फक्त लेखणीवीर न होता त्यासाठी रस्त्यावर उतरून पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी धिंगाण्याचे समर्थन करणाऱ्यांना पुरून उरावे. याउप्परही कुणाचा धर्माच्या नावाखाली ढोंग करण्याचा हेतू असेल, रस्त्यावर साजरे होणारे उत्सव, आवाज याला समर्थन असेल त्यांची नावे नोंदवून घ्यावीत आणि दहीहंडीत जे मरण पावले, जखमी झाले, आवाज आणि वाहतुकीची कोंडी यामुळे शारीरिक-मानसिक त्रास झालेल्यांच्या नुकसानभरपाईची सर्व जबाबदारी या समर्थकांवर टाकावी आणि हा प्रश्न कायमचा मिटवावा.
– नील भोसले, मुंबई