‘लोकरंग’ (१६ डिसेंबर) मधील नीरजा यांचा ‘असेही विरेचन’ हा लेख वाचला. ध्येय नसलेली व्यक्ती ही शिडे नसलेल्या जहाजासारखी असते. कुठल्याही पक्षातील ९५ टक्के कार्यकत्रे असेच असतात. घरची गरिबी, शिक्षणाचा अभाव, वाईट गोष्टींचा प्रभाव, व्यसनी लोकांची संगत, कमी श्रमात पसा कमावण्याची वृत्ती आणि दिशाहीन मार्गदर्शन यातूनच आजकालचे अनुयायी घडत आहेत. ज्या व्यक्तीच्या हाताला पुरेसे काम आहे, ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्याला कौटुंबिक तसेच सामाजिक जबाबदारी समजते तो रस्ता चुकत नाही. पसा आणि सत्ता हीच तत्त्वे असतील तर विवेकशील कार्यकर्ता घडणार कसा? नेता बारा गावांचे पाणी प्यायलेला असतो. लोकांची नस एकदा लक्षात आली की पुढचे ठोके कसे पाडायचे हे त्याला ठाऊक असते. चिरीमिरीचे आश्वासन देऊन हवी ती कामे करवून घेतली जातात. कुठल्याही गोष्टींचा संबंध लोकांच्या भावनेशी जोडला की खरे आणि खोटे यामध्ये फरकच राहत नाही. एखादी क्षुल्लक गोष्टसुद्धा संवेदनशील सामाजिक मुद्दा बनू शकते. भावना तर कशानेही दुखावतात. आता सगळ्यांच्याच भावना काही सारख्या नसतात. चांगले केले तर वाईट लोकांच्या ( माफ करा हं !) भावना दुखावतात आणि वाईट केले तर चांगल्यांच्या. स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी अथवा टिकवण्यासाठी लोक कुठल्या थराला जातील ते सांगता येत नाही. उपाशीपोटी तत्त्वज्ञान समजत नाही. नेतृत्व करणाऱ्याला हवा असतो एक मुद्दा. मुद्दय़ावरून गोष्ट गुद्दय़ावर येते. ५ ते १० हजारांत आजकाल लोक कुठलाही गुन्हा करतात. काळ एवढा विचित्र आहे की पशाशिवाय काही होत नाही. पसा सर्व काही नसला तरी बराच काही आहे आणि त्या ‘बऱ्याच काही’मध्ये माणूस सुखाने जगू शकतो. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला तत्त्वांचा विचार करायला वेळ नाही. दिसते ती फक्त भाकरी. सज्जन माणसाला ‘सायको’ म्हणायचा काळ आहे. भरकटलेल्या तरुणांना विवेकशील व चारित्र्यवान नेत्याची गरज आहे. पण हे असेच चालू राहिले तर एक दिवस जगण्यासाठी लोक एकमेकांचे लचके तोडतील.
गणेश चव्हाण, पुणे.

लेखमाला संदर्भग्रंथाच्या दर्जाची!
नाटय़दिग्दर्शक विजय केंकरे यांचे पाश्चात्य रंगभूमीवरील विविध नाटय़प्रयोगांविषयीचे सविस्तर आणि अभ्यासपूर्ण लेख माहितीपूर्ण व रंजकरीत्या लिहिलेले असल्यामुळे वाचनीय असत. या लेखांमधून प्रगत ब्रिटिश-अमेरिकी रंगभूमी आणि तीवरील वेगवेगळ्या प्रकारचे नेपथ्य व सादरीकरण याबद्दल उत्कृष्ट वर्णन आणि त्याची आपल्या मराठी रंगभूमीशी घातलेली सांगड यामुळे प्रत्येक रंगकर्मीने हे लेख वाचावेत असेच होते. या लेखांवर आधारित पुस्तकाची निर्मिती झाल्यास तो रंगभूमीविषयक अभ्यासूंसाठी एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ होईल.
– स्वानंद दाते, माहीम, मुंबई.
अवघड दुखणे
दोन डिसेंबरच्या ‘लोकरंग’मध्ये अत्यंत पोटतिडकीने समाजापुढे निर्भीडपणे मांडलेली ‘संडास संस्कृती’ एका नव्याच आशयाचं दर्शन घडविते. यामध्ये दोन प्रचलित संस्कृतींचा त्यांना विसर पडलेला दिसतो. त्यातील एक प्रकार म्हणजे, महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात कोठे गेले म्हणून विचारले तर ‘पाकिस्तान’ला गेले म्हणून सांगितले जाते. म्हणजे संडासला गेले होय. दुसरा प्रकार म्हणजे, विशेषत: उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ‘मैदान की गये’ म्हणून आजही मोठय़ा गर्वाने सांगितले जाते. मोकळ्या मैदान आकाशाखाली लोटय़ाच्या साक्षीने संडास प्रसूतीचा आनंद फक्त तेच लोक घेऊ शकतात. मुंबईमध्ये मात्र तो मान रेल्वे लाइन्सला मिळाला आहे. आपल्या फ्लॅट संस्कृतीच्या नशिबी मात्र तेवढे मोकळे वातावरणही नाही व मैदानी आनंदही नाही.
– अनिल पाठक, विरार (प.)

वर्मावर बोट
अतुल पेठे यांनी ‘संडास संस्कृती’ या लेखातून अगदी वर्मावर बोट ठेवलं आहे आणि ते अगदी योग्यच केलं आहे. याबाबतीत कितीतरी त्रास सामान्य नागरिकही भोगतोच आहे. प्रत्येक सार्वजनिक ठिकाणच्या शौचालय/मुतारी प्रकाराचा हाच अनुभव आहे. केवळ नाटय़गृहे नव्हेत; सारीकडेच..
एकदा राजस्थानात गेले होते. जयपूरहून उदेपूरला किंवा असाच काही तो बसचा प्रवास. बस राजस्थान पर्यटन खात्याची असावी. मध्येच एके ठिकाणी एका हॉटेलपाशी चहापाण्याला थांबलो. तिथल्या बायकांच्या स्वच्छतागृहात हीच अवस्था. फक्त बांधकाम पडकं नव्हतं एवढाच फरक. बाकी व्यवस्था तशीच! दार बंद केलं की, दिवसाढवळ्या आत गर्द अंधार. मी बाहेर येऊन मॅनेजरला बोलावून घेतलं. त्याला आतली परिस्थिती काही माहितीच नसावी. मी सांगितल्यावर प्रथम कळली.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राबाहेर दिवाळीला गेलो. येताना रात्र झाली. रस्ता वाईट- (महाराष्ट्रातला होता) त्यात मध्येच थांबावं लागलं. एका हॉटेलशी थांबलो. होतं दुसऱ्या-तिसऱ्या श्रेणीचंच. पण नाव जोरदार, कसलातरी ‘स्वर्ग’ वगैरे. बाहेर दिव्यांच्या माळांची भरपूर रोषणाई. अर्थातच हॉटेलच्या मागे कुठेतरी शौचालय. बाहेर गाडीत थांबलेला माझा मुलगा आधीच म्हणाला होता, ‘‘इकडे एवढा लखलखाट केलाय ना, तिकडे नक्की अंधार असणार.’’ तसंच होतं. सगळ्या ‘सोयी’ तशाच. शिवाय बाहेरची पायरी तुटलेली.
मानवी मलमूत्रापासून जर खत, विद्युत निर्मिती आणि इंधन अशी तीन कामं साधतात, तर ते काम हाती का घेतलं जात नाही? आपसातल्या लाथाळ्या, पाय ओढणं आणि सत्तेसाठी ‘संगीत खुर्ची’चा खेळ यांनाच प्राधान्य दिलं आणि लोकांना दुरवस्थेत ठेवलं तर उद्या आपण कशा अवस्थेला पोहोचू?
त्यामुळे लोकांची मानसिकता त्यांनीच स्वत: बदलणं महत्त्वाचं. घरातल्याइतकीच स्वच्छता संडासातही हवी हे लहानात प्रथमपासून बिंबवणं आणि मोठय़ांनीही त्याचं महत्त्व समजून घेऊन त्यानुसार वागणं याला पर्यायच नाही. टीव्हीसारख्या उत्तम माध्यमाचा उपयोग  लोकांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी करता येईल.
– अनुराधा खोत, मुंबई.

Story img Loader