‘लोकरंग’ (१६ डिसेंबर) मधील नीरजा यांचा ‘असेही विरेचन’ हा लेख वाचला. ध्येय नसलेली व्यक्ती ही शिडे नसलेल्या जहाजासारखी असते. कुठल्याही पक्षातील ९५ टक्के कार्यकत्रे असेच असतात. घरची गरिबी, शिक्षणाचा अभाव, वाईट गोष्टींचा प्रभाव, व्यसनी लोकांची संगत, कमी श्रमात पसा कमावण्याची वृत्ती आणि दिशाहीन मार्गदर्शन यातूनच आजकालचे अनुयायी घडत आहेत. ज्या व्यक्तीच्या हाताला पुरेसे काम आहे, ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्याला कौटुंबिक तसेच सामाजिक जबाबदारी समजते तो रस्ता चुकत नाही. पसा आणि सत्ता हीच तत्त्वे असतील तर विवेकशील कार्यकर्ता घडणार कसा? नेता बारा गावांचे पाणी प्यायलेला असतो. लोकांची नस एकदा लक्षात आली की पुढचे ठोके कसे पाडायचे हे त्याला ठाऊक असते. चिरीमिरीचे आश्वासन देऊन हवी ती कामे करवून घेतली जातात. कुठल्याही गोष्टींचा संबंध लोकांच्या भावनेशी जोडला की खरे आणि खोटे यामध्ये फरकच राहत नाही. एखादी क्षुल्लक गोष्टसुद्धा संवेदनशील सामाजिक मुद्दा बनू शकते. भावना तर कशानेही दुखावतात. आता सगळ्यांच्याच भावना काही सारख्या नसतात. चांगले केले तर वाईट लोकांच्या ( माफ करा हं !) भावना दुखावतात आणि वाईट केले तर चांगल्यांच्या. स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी अथवा टिकवण्यासाठी लोक कुठल्या थराला जातील ते सांगता येत नाही. उपाशीपोटी तत्त्वज्ञान समजत नाही. नेतृत्व करणाऱ्याला हवा असतो एक मुद्दा. मुद्दय़ावरून गोष्ट गुद्दय़ावर येते. ५ ते १० हजारांत आजकाल लोक कुठलाही गुन्हा करतात. काळ एवढा विचित्र आहे की पशाशिवाय काही होत नाही. पसा सर्व काही नसला तरी बराच काही आहे आणि त्या ‘बऱ्याच काही’मध्ये माणूस सुखाने जगू शकतो. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला तत्त्वांचा विचार करायला वेळ नाही. दिसते ती फक्त भाकरी. सज्जन माणसाला ‘सायको’ म्हणायचा काळ आहे. भरकटलेल्या तरुणांना विवेकशील व चारित्र्यवान नेत्याची गरज आहे. पण हे असेच चालू राहिले तर एक दिवस जगण्यासाठी लोक एकमेकांचे लचके तोडतील.
गणेश चव्हाण, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा