‘लोकरंग’ (१७ एप्रिल) मधील डॉ. मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय?’ हा लेख वाचला. अत्यंत निर्भीड आणि स्पष्ट शब्दांत लेखिकेने विचार मांडले आहेत. हा विषय सुरू झाल्यापासून मनात शंका होती, की हे खरोखर महिलांचे सबलीकरण आहे काय? कारण हा शेवट होऊनही अंती धर्मच जिंकला. वर धर्म धर्म करणारे म्हणायला मोकळे, की बघा, धर्म पुरोगामीच आहे मुळी. फुले, आगरकर, कर्वे, आंबेडकरांनी दिलेली देणगी आजच्या काळात किती मौल्यवान आहे असे राहून राहून वाटते. लेखिकेने नेमके वर्मावर बोट ठेवून लिहिले आहे.
वसीम मणेर

.. पण परंपरा सोडवत नाही
‘लोकरंग’ (१७ एप्रिल) मधील डॉ. मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय?’ या लेखात मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे. ‘स्त्री-पुरुष समानतेसाठी गंभीरपणे लढणाऱ्या चळवळींची अशा उथळ आंदोलनांमुळे हानी होते, हेही खरे आहे. हा (गाभाराप्रवेश) हक्क नव्हता म्हणून आजवर स्त्रिया कोणत्या मोठय़ा संधीपासून वंचित राहिल्या होत्या? आणि आता तो मिळाल्यावर त्यांच्या आयुष्याला कोणती सोनेरी किनार प्राप्त झाली? हे लेखिकेने उपस्थित केलेले प्रश्न निरुत्तर करणारे आहेत. जगातील सर्व प्रमुख धर्मानी स्त्रियांना हीन लेखले. त्यांचा छळ केला. असे असता आज पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक धर्मनिष्ठ आहेत असे दिसून येते. धार्मिक परंपरा, व्रत-वैकल्ये हा सांस्कृतिक वारसा टिकवणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटते. जोतिबा-सावित्रीबाई, महर्षी कर्वे अशा समाजसुधारकांच्या कार्यामुळे स्त्रिया शिकल्या. एका कवीने म्हटले आहे-
सावित्रीच्या लेकी खूप खूप शिकल्या
नोकरीला लागल्या
पण परंपरा सोडवत नाही
संकष्टीच्या दिवशी चंद्र उगवल्याशिवाय जेववत नाही
हे खरे आहे. फेटे बांधणे, ढोल वाजवणे, बाइक चालवणे अशा अनेक क्षेत्रांत स्त्रियांनी प्रगती केली, हे कौतुकास्पद आहे. पण वैचारिक प्रगती नगण्य झाली हे खेदजनक आहे.
य. ना. वालावलकर

Story img Loader