‘लोकरंग’मधील (२ डिसेंबर) अतुल पेठे यांचा ‘संडास संस्कृती’ हा लेख वाचला. आपापल्या संस्कृतीचे गोडवे गाताना या संस्कृतीचा विचार करण्यास कोणासच फुरसत नाही. ‘सुलभ स्वच्छ शौचालय’ आणि तेही सार्वजनिक ठिकाणी, ही कल्पना फक्त स्वप्नातच शक्य आहे. महाराष्ट्रातच काय, पण भारतातही अनेक ठिकाणी फिरताना सर्वानाच (सुजाण नागरिकांना) अपेक्षा असते, ती एका स्वच्छ शौचालयाची! स्त्रियांना तर बऱ्याचदा किळसवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. अवघड जागेची दुखणी! कोणाला सांगणार? मी एक स्त्री-रोगतज्ज्ञ आहे. आम्हीही बऱ्याच ठिकाणी गेल्यावर सर्वतोपरीने सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृतीचा प्रयत्न करतो. मला वाटतं अगदी शाळांपासूनच जनजागृतीची सुरुवात केली पाहिजे. ई-लर्निगच्या जमान्यात जर मूळ गोष्टींकडेच दुर्लक्ष होत असेल तर असे शिक्षण काय कामाचे? बऱ्याच शाळा, महाविद्यालयांमध्ये मुले-मुली आठ ते दहा तास घराबाहेर असतात. अशावेळी स्वच्छतागृहांचा असलेला खेळखंडोबा लक्षात घेता मुलांची काय अवस्था होते, हे न बोललेलेच बरे! नाटय़गृह-सिनेमागृहांच्या स्वच्छतागृहांतून बाहेर पडताना नाकाचा रुमाल काढणे म्हणजे उलटीला आमंत्रण देणे. अगदी झोपडय़ांतूनही मोबाइल्स, डिश अँटेना आहेत, पण संडास नाहीत, ही शोकांतिका आहे. आपल्याकडे सर्वच बाबतीत पाश्चात्यांचे अनुकरण करण्याचा ध्यास आहे, तर मग सार्वजनिक स्वच्छतेच्या आणि शौचालयाच्या बाबतीतच त्यांचे अनुकरण का होत नाही? याला जबाबदार फक्त प्रशासन नाही तर नागरिकही आहेत. सार्वजनिक मालमत्ता ही सर्वाच्या उपयोगांसाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी असते. तिचा काळजीपूर्वक वापर करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हा विचार जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात येत नाही तोपर्यंत सुधारणा होणे अशक्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता, शौचालयांची दुरवस्था हा आपल्याला लाभलेला शापच आहे! वरदानाची वाट पाहता पाहता किती पिढय़ा जाणार आहेत, देवच जाणे!
– डॉ. गौरी कहाते, पुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संडासाला फुटली वाचा!
अतुल पेठे यांचा लेख आवडला. कारण काहीही असो लोकसंख्येच्या तुलनेत संडासाचे महत्त्व जाणणारे जनमानसात फार कमी दिसतात. घरादारातील संडासाचे निरीक्षण (!) केल्यास आपण संडासाला किती महत्त्व देतो, हे लक्षात येते. सर्वसामान्यपणे घर बांधताना जेवढे लक्ष दिवाणखाना, जेवणाची खोली, बेडरूम आणि (थोडय़ाफार प्रमाणात) स्वयंपाकघराला दिले जाते. त्यामानाने संडासाकडे लक्ष आणि जागा या दोन्ही बाबतीत कमी महत्त्व दिले जाते, ही आमची ‘संडास संस्कृती’!

संडासपुराण
अतुल पेठे यांच्या लेखाला खरं म्हणजे ‘संडासपुराण’ हे शीर्षक शोभून दिसले असते. हा लेख वाचून प्रत्यक्ष पाहिलेल्या दोन घटना आठवल्या. रेल्वे कारखान्यात काम करणारे कामगार मोठय़ा व्यासाचा चार-पाच फूट लांबीचा होजपाइप तोंडाजवळ तारेने बांधून त्याचा इंग्रजी व आकार करत आणि त्यात पाणी भरून तो संडासात घेऊन जात. एका कंपनीतील कामगार रबरी सोल्यूशनचे रिकामे डबे टमरेल म्हणून वापरत. आमच्याकडे येणारे एक कीर्तनकार त्यांच्या कीर्तनात एक गोष्ट सांगत असत. निजाम हा महाडँबिस माणूस. वेळोवेळी तो मराठय़ांची कुरापत काढी. पण अंगाशी आले की नमते घेई. त्याने एक दिवस त्याच्या दरबारात असलेल्या पेशव्यांच्या वकिलाला स्वत:चा महाल पाहण्यासाठी बोलावले. त्याने त्या वकिलाला आपल्या संडासात नेऊन आतील बाजू दाखवली. तेथे पेशव्यांचे मोठे चित्र लावले होते. निजाम कुत्सितपणे वकिलाकडे पाहत होता.  त्याला वाटले, वकील चांगलाच चिडेल. पण झाले उलटेच. वकिलाने चित्र पाहिले आणि तो म्हणाला, ‘‘आजपर्यंत तुमच्या बुद्धिमत्तेची खूप तारीफ ऐकून होतो, पण आज ती प्रत्यक्ष अनुभवास आली.’’ अपेक्षाभंग झालेला निजाम बावचळून म्हणाला, ‘‘म्हणजे?’’ ‘‘म्हणजे आमच्या मालकांचे चित्र आपण अतिशय योग्य जागी लावले आहे. दरवाजा बंद करून आपण खाली बसलात आणि समोर हे चित्र बघितलेत की क्षणार्धात तुमचे पोट साफ होत असणार.’’ त्यावर निजाम काही न बोलता चालता झाला.
दि. मा. प्रभुदेसाई, कुर्ला

व्यवस्थेचा बिघडलेला तोल
‘लोकरंग’मधील (९ डिसेंबर) मधु कांबळे यांचा ‘माहितीची टोलवाटोलवी’ हा लेख वाचला. सरकारी अधिकाऱ्यांची जनतेच्या प्रश्नाबद्दल असलेली अनास्था पाहून वाईट वाटले. अधिकारपद मिळते ते जनतेच्या कल्याणासाठी. पण आपल्या इथे परिस्थिती वेगळी आहे. मिळालेल्या अधिकाराचा उपयोग हे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी करतात. नोकरी मिळायच्या अगोदर असलेली दयनीय अवस्था आणि मिळाल्यानंतर आलेली मग्रुरी यात खूप तफावत असते. मूल्यशिक्षण आणि संस्कार यांची कमतरतादेखील असू शकते. सरकारची उदासीनता अशा प्रकरणांमधून दिसून येते. अधिकाऱ्यांना मिळणारा पगार हा सामान्य लोकांच्या ‘कर’रूपी पशांतून होतो. जनता हक्क मागायला येते, भीक नव्हे! टोलवाटोलवी करणाऱ्यांनी फुटबॉल नाही तर टेनिस खेळावे. तिकडे त्यांचे नक्कीच कौतुक होईल. ज्येष्ठांनी कामचुकारांना पाठीशी घालू नये. सरकारी व्यवस्थेचा बिघडलेला तोल आज टोलच्या रूपाने समोर आला आहे.
– गणेश चव्हाण, पुणे</strong>

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reaction on lokrang article
Show comments