‘लोकरंग’ पुरवणीत मनोहर पारनेरकर (२४ मे) आणि डॉ. न. गो. राजूरकर (७ जून) यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर लिहिलेल्या लेखांवर असंख्य पत्रे आली. त्यापैकी काही निवडक पत्रे..
करंग’मधील (७ जून) डॉ. न. गो. राजूरकर यांचा ‘पं. नेहरू : द्रष्टे लोकशाहीवादी!’ हा लेख वाचून आनंद झाला. लेखकाने या लेखाद्वारे देशउभारणीत पं. जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाबद्दल तरुण आणि जुन्या पिढीला ओळख करून दिली, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. देशात लोकशाही राबविण्यात पंडितजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. देशातील गरिबी दूर करण्याचे प्रयत्न, शेती, व्यापार, उद्योग, वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांशी उत्तम संबंध प्रस्थापित करणे आणि जागतिक शांतता यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. भारताच्या उभारणीत पंडितजींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
– शिवराज पाटील, कॉँग्रेस नेते
नेहरूंचे नाव जगाच्या इतिहासातही!
‘लोकरंग’मधील (७ जून) डॉ. न. गो. राजूरकर यांचा ‘पं. नेहरू : द्रष्टे लोकशाहीवादी!’ हा लेख वाचला. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातून पुसले जाणार नाही. त्यांनी पुण्याला अनेकदा भेटी दिली तेव्हा त्यांना उघडय़ा जीपमधून अगदी जवळून सिटी पोस्ट चौकात पाहिले आहे. रेसकोर्सवर त्यांची भाषणे ऐकली आहेत.
– दिलीप साळवेकर, नाशिक
सध्याच्या काळात हे लिखाण धाडसीच!
‘पं. नेहरू : द्रष्टे लोकशाहीवादी!’ हा लेख वाचला. विशेषकरून महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद प्रभृतींचे नेतृत्व व योगदानामुळेच स्वतंत्र भारताची लोकशाही मुहूर्तमेढ झाली. त्याच लोकशाही कार्यपद्धतीमुळेच निवडून आलेला सध्याचा सत्ताधारी पक्ष स्वकर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याऐवजी विरोधकांना- अर्थात पं. नेहरू आदींना ‘ते वाईटच, म्हणून आम्ही चांगले’ या थाटात त्यांच्या बदनामीची मोहीम राबवीत आहे आणि त्यातच धन्यता मानत आहे. सद्य:स्थितीत लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जाणारी पत्रकारिता ही निर्भीड, सत्यशोधक, माहितीजन्य व वास्तवदर्शी कितपत राहिली आहे, हे तसे दुर्मीळच चित्र आहे. डॉ. न. गो. राजूरकर यांनी केलेल्या धाडसी व वास्तवदर्शी लेखनाबद्दल पुनश्च अभिनंदन व आभार!
– गोपाळ तिवारी, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, पुणे
तरुणवर्गाची विचारक्षमता हरवली आहे!
डॉ. न. गो. राजूरकर यांचा लेख वाचला. पंडित नेहरूंबद्दलच्या वास्तव अनुभवांवर आधारित विचार त्यात मांडले आहेत. वाचून खूप बरं वाटलं. कारण गेल्या काही वर्षांमध्ये स्वातंत्र्यलढय़ामध्ये सर्वस्व अर्पण केलेल्या नेत्यांबद्दल वाईट आणि घाणेरडं (ज्याचा सत्याशी काहीही संबंध नाही असं!) लिहिण्याची आणि समाजमाध्यमांवर टाकण्याची प्रवृत्ती बोकाळली आहे. अर्थात हे काही आपोआप घडलेले नाही. एक विशिष्ट विचारसरणी त्याची प्रेरणा आहे आणि लेखकाने म्हटले त्या गोबेल्स तंत्राचा वापर त्यांनी केव्हापासूनच सुरू केलेला आहे. त्यालाच आज ही कटू फळं लागली आहेत. आणि दुर्दैवाने आज लोकांना सत्य पटेनासे झाले आहे. विचार करण्याची क्षमताच भारतीय समाज, विशेषत: तरुणवर्ग हरवून बसला आहे अशी परिस्थिती आहे. अशा स्थितीत राजूरकरांसारखे विचार करणारे लोक अजूनही आहेत हे बघून समाधान वाटले.
– आशीष बाबूराव सावकारे
नेहरू : आदर्श संसदपटू!
पं. नेहरूंच्या द्रष्टेपणाचे दाखले देणारा सत्याधारित लेख वाचला. वयाच्या नव्वदीतही लेखकाने पंडितजींबद्दल नव्या ऊर्जेने लिहिले आहे. लेखकाने कुरुंदकर सरांसह लिहिलेल्या पंडितजींवरील पुस्तकाची मी अनेकदा पारायणे केली आहेत. पंडितजींचे विस्मरण होणाऱ्या या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवून आधुनिक भारताच्या उभारणीतील त्यांचे योगदान लोकांपर्यंत पोहोचविणे हा सामाजिक दायित्वाचा भाग आहे. लेखक पंडितजींच्या काळात वाढलेल्या पिढीचे प्रतिनिधी आहेत याचाही मनस्वी आनंद होतो आहे. स्वातंत्र्य हे भारताच्या सर्वागीण प्रगतीचे साधन मानून, स्वातंत्र्यापूर्वीपासूनच पंडितजींनी राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून जे विविध ठराव मांडले त्यातून त्यांच्या आधुनिक भारताबद्दलच्या दूरदृष्टीचे दर्शन घडते. लेखात हा भाग उत्तमरीत्या आलेला आहे. पंडितजींच्या चीनबद्दलच्या धोरणाबाबतही लेखकाने समंजस, वास्तववादी लेखन केले आहे आणि त्यासाठी विश्वसनीय संदर्भस्रोतांचा आधार घेतला आहे. न्या. श्री. छागला यांचे पंडितजींसंदर्भातील उत्तम प्रशासकाबद्दलचे मत कोरून ठेवण्यासारखे आहे. नेहरूंचे आदर्श संसदपटुत्व अनेकांनी शिरोधार्य मानले होते. पुढील काळात त्यांच्याकडे पाहून अनेक संसदपटू तयार झाले. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध रूपे लेखकाने अत्यंत तरलपणे टिपली आहेत. ‘नेहरूंमुळे गांधी पाश्चात्त्यांना समजले’ हे विधान मात्र गांधीजींवर अन्याय करणारे आहे. वास्तविक गांधीजींचा परिचय पाश्चात्त्य जगताला विसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच होता.
– ज्ञानेश्वर घुरके, नांदेड</strong>
पंडितजींच्या चारित्र्यहननाने मन व्यथित
नेहरूंवरील लेख उत्कृष्टच! वाचताना डोळे भरून येत होते. पंडित नेहरू कालवश झाले तेव्हा माझं वय पाच वर्षांचंच होतं; पण माझे वडील पंडितजींना फार मानत असत. त्यामुळे त्यांच्याकडून वेळोवेळी जे ऐकलं आणि पुढे त्याकाळी जे जे वाचनात आलं त्यावरून भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू भारताला मिळाले हे आपल्या देशाचं महद्भाग्य असंच वाटतं. गेल्या काही वर्षांत मात्र पंडितजींचं जे चारित्र्यहनन चाललं आहे त्याने मन व्यथित होतं. दुर्दैवाने ‘असत्य तेच सत्य’ अशीच आज समाजधारणा झाली आहे. या लेखामुळे नेहरूंबद्दल खूप चांगलं वाचायला मिळालं याबद्दलचा आनंद व कृतज्ञता इथे व्यक्त करते.
– श्वेता कुलकर्णी
विचारप्रवृत्त करणारा लेख
‘पं. नेहरू : द्रष्टे लोकशाहीवादी!’ हा लेख वाचला. लेख केवळ अप्रतिम आहे. समकालीन वातावरणात तो अत्यंत महत्त्वपूर्ण, आवश्यक व प्रस्तुत आहे. अगदी मर्यादित जागेत नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू ठोसपणे लेखात मांडले आहेत. आधुनिक भारताच्या उभारणीसाठीआवश्यक असलेली वैचारिक व संकल्पनात्मक चौकट नेहरूंनी उपलब्ध करून दिली. ती नेस्तनाबूत केल्याशिवाय आपली मुळे इथे रुजणार नाहीत याची खात्री असलेले त्यांचे आजचे राजकीय विरोधक असत्याचा आधार घेऊन त्यांची प्रतिमा डागाळत आहेत. यामुळे नेहरूंचे नाही, परंतु देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. या लेखामुळे काही लोक तरी विचारप्रवृत्त होतील अशी आशा आहे.
– सदा डुम्बरे
इतिहास पुसून टाकण्याचा डाव
डॉ. न. गो. राजूरकर यांचा पं. नेहरूंवरील लेख वाचला. लेख वाचून मन सुखावले. नेहरूंसारख्या महान, द्रष्टय़ा लोकनेत्याला- ज्यांनी आधुनिक औद्योगिक भारताचा पाया रचला- त्यांची गेल्या काही काळात होणारी अपमानकारक अवहेलना बघून वाईट वाटे. त्यांचे नावच इतिहासातून पुसून टाकण्याचे कसोशीने प्रयत्न होत आहेत. जो समाज आपल्या उद्धारकर्त्यां महापुरुषांशी कृतघ्नपणे वागतो त्याला इतिहास क्षमा करत नाही, हे सत्य उमगायला काळच जावा लागेल.
– शरद फडणवीस, पुणे
वाचनाशिवाय दृष्टिकोन बांधणे गैर
नेहरूंवरील सत्याधारित लेख वाचला. आजवर नेहरूंविषयी वाचलेल्या लेखांपैकी हा लेख सर्वोत्तम वाटला. माझं वय २७ वर्षे आहे. पं. नेहरू, महात्मा गांधी यांच्यासारख्या युगपुरुष नेत्यांमुळे निर्माण झालेल्या स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेण्याची संधी मिळालेली आमची पिढी कायमच नेहरू, महात्मा गांधी यांच्याविषयी नकारात्मक बोलत असते. तरी इतक्या महान व्यक्तिमत्त्वांविषयी समग्र वाचन केल्याशिवाय आपला दृष्टिकोन तयार करणे मला गैर वाटते. म्हणूनच हा लेख माझ्यासाठी पं. नेहरूंविषयी आदर आणि कुतूहल वाढवणारा ठरला. इतक्या संक्षिप्त रूपात, अनेकविध संदर्भ देऊन या महान व्यक्तिमत्त्वाविषयी उत्सुकता निर्माण करण्याची हातोटी आणि ताकद लेखात आहे.
– कौस्तुभ बांबरकर
नेहरूंची प्रतिमा डागाळण्याचा एककलमी कार्यक्रम
‘उपेक्षित अन् अपमानित नेहरू’ (२४ मे) हा मनोहर पारनेरकर यांचा लेख वाचला. लेखकाने लेखाच्या शेवटी दिलेलं उदाहरण आजच्या समाजमाध्यमांतील लेखकांच्या मानसिकतेवर नेमकं बोट ठेवतं. गेल्या पाऊण शतकापेक्षा जास्त काळ महात्मा गांधी व पं. नेहरू यांचं गारूड भारताच्या जनमानसावर आहे. त्यांच्या विरोधकांनी त्यांची यथेच्छ निर्भर्त्सना केली. तथापि गेल्या पाच-सहा वर्षांत महात्मा गांधींबाबत बरीचशी सौम्य भूमिका घेण्याजोगी परिस्थिती या विरोधकांवर आली आहे. समाजमाध्यमांच्या उदयानंतर पं. नेहरूंची प्रतिमा डागाळणे हाच त्यांचा आता एककलमी कार्यक्रम झाला आहे. त्याकरता नेहरूंबाबत अनेक खऱ्या-खोटय़ा घटना अस्सल वाटाव्यात इतक्या सफाईने विपर्यस्त स्वरूपात समाजमाध्यमांतून पेरल्या जात आहेत. याकरता इतिहासाशी काहीही देणंघेणं नसलेला व इतिहासाचं वाचन नसलेला वर्ग माध्यम म्हणून वापरला जातोय. अनेक सुशिक्षितदेखील या यात्रेत सामील झाल्याचं पाहून वाईट वाटतं. नेहरूंच्या मृत्यूला ५७ वर्षे होतील, परंतु अजूनही त्यांची प्रतिमा मलिन होऊ शकलेली नाही, हीच त्यांनी केलेल्या कामाची खरी पावती आहे. कोणत्याही राज्यकर्त्यांकडून होतात त्याप्रमाणे नेहरूंकडूनही काही चुका झाल्या. त्याकरता त्यांना माफी नाही. त्याचबरोबर त्यांनी देशउभारणीकरिता केलेल्या कार्याचा गौरव करण्याचंही भान आपण ठेवायला हवं. त्यांच्याविषयी निव्वळ विद्वेष पसरवून एक प्रकारचा आभास निर्माण करता येईलही, परंतु ते वास्तव नसेल.
– शैलेश न. पुरोहित, मुलुंड (पूर्व)
आज ना उद्या मोल जाणवेल!
‘उपेक्षित अन् अपमानित नेहरू’ हा लेख वाचला. याबाबत एकच सांगावेसे वाटते की, पंडित नेहरूंनी नव्हे, पण त्यांचे निकटवर्तीय आणि काँंग्रेस पक्षाने नेहरू-गांधी यांचे देव्हारे माजवले आणि सावरकर ,सुभाषचंद्र बोस यांचे अवमूल्यन करण्याचे, त्यांचे स्वातंत्र्यप्राप्तीतले श्रेय नाकारण्याचे सातत्याने प्रयत्न केले. त्याची अटळ प्रतिक्रिया सध्याच्या सत्ताबदलानंतर आपण पाहतो आहोत. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारावे का, हा प्रश्न या ठिकाणी पूर्णपणे अप्रस्तुत ठरतो. भविष्यात कधीकाळी वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला जाईल तेव्हा सर्वाचेच यथायोग्य मूल्यमापन होईल अशी आशा बाळगणे एवढेच आज आपण करू शकतो.
– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर.
नेहरूंच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे मारेकरी त्यांचे वारसच!
‘लोकरंग’मधील ‘उपेक्षित अन् अपमानित नेहरू’ हा मनोहर पारनेरकर यांचा लेख वाचला. मुळात नेहरू हे कधीही उपेक्षित आणि अपमानित नव्हते आणि नाहीत. एक राजकीय नेता म्हणून त्यांच्यावर कडवी टीकाही झाली आणि त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुकही झाले. कोणताही राजकीय नेता त्यापासून दूर राहू शकत नाही. त्यांच्या निधनाला आता अर्धशतक होऊन गेल्यानंतर त्यांच्या राजकारणाबद्दल किं वा त्यांच्या राजकीय निर्णयांबद्दल दोन टोकांची मते व्यक्त केली जातात. पण नेहरूंचे कर्तृत्व एकाच गोष्टीने मोजता येण्यासारखे आहे, ते म्हणजे- त्यांनी या देशात घटनात्मक लोकशाही रुजविली व ही लोकशाही कधीही, कोणालाही नष्ट करता येणार नाही असा तिचा भक्कम पाया घातला. स्वातंत्र्याच्या त्या काळात नेहरू नसते तर काय झाले असते, हा विचार खूप अस्वस्थ करून जातो. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रभावी नेते त्याकाळी होते. परंतु यापैकी कोणताही नेता नेहरूंऐवजी सत्ताधीश झाला असता तर आजच्या भारताचे चित्र खूपच वेगळे दिसले असते. नेहरूंची सर्वच धोरणे सर्वाना मान्य असतील असे नाही, पण नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष व समाजवादी तत्त्वज्ञानावर लोकांचा इतका विश्वास होता की त्यामुळे देशातील हिंदुत्ववादी राजकारणाला जवळपास अर्धशतकाहून अधिक काळ सत्तेच्या जवळपासही फिरकता आले नाही. पण नेहरूंच्या वारसांनी व अनुयायांनी इतक्या घोडचुका केल्या, की ज्यामुळे नेहरूंचे राजकीय तत्त्वज्ञान चुकीचे आहे असा भ्रम निर्माण करणे त्यांच्या विरोधकांना सहज शक्य झाले. त्याची परिणती आज आपण पाहतोच आहोत. त्यामुळे नेहरूंच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे खरे मारेकरी त्यांचेच अनुयायी व वारस आहेत.
लेखकाने नेहरूंच्या ‘हिमालयाएवढय़ा चुकां’च्या यादीत त्यांची चीन, काश्मीरविषयक धोरणे आणि रशियाशी मैत्री या गोष्टी टाकल्या आहेत. पण नेहरू ज्या स्थिर, सक्षम भारताचा विचार करीत होते, तो पाहता ही धोरणे चुकीची होती हे म्हणणे धाडसाचे ठरेल. ‘नेहरूंचे परराष्ट्र धोरण हे स्वप्नरंजन करणारे होते’, ‘नेहरूंनी चीनचा कावा ओळखलाच नाही’, ‘काश्मीर प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्रांत नेऊन चूक केली’, ‘रशियाच्या कळपात त्यांनी देश नेला’ वगैरे आक्षेप घेतले जातात. पण तत्कालीन परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यात या सर्व निर्णयांकडे पाहिले तर ही धोरणे किती योग्य होती हे लक्षात येईल.
चीनने तिबेट गिळंकृत केला तेव्हा नेहरू गप्प बसून राहिले, हे खरे आहे. पण त्यावेळी भारताकडे काय पर्याय होता? नेहरूंना प्रचंड दारिद्य्र, बेकारी, अज्ञान, अंधश्रद्धा असलेल्या भारतात स्थैर्य राखून सर्व सुधारणा घडवायच्या होत्या. त्यासाठी नवस्वतंत्र भारताला खर्चीक युद्धात ढकलणे म्हणजे देशात आधीच असलेली अनागोंदी पुढे चालू ठेवणे होते. देशात विभाजनाचा गोंधळ व जातीय दंगली चालू होत्या. पाकिस्तानबरोबर काश्मीरमध्ये एक युद्ध झालेलेच होते. ते संपते- न संपते तोच चीनबरोबर दुसरे युद्ध- तेही हिमालयासारख्या दुर्गम भागात, सैन्याला काहीही अनुभव नसताना, जगात कुठूनही विनाअट मदत मिळण्याची शक्यता नसताना हे युद्ध करणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्यासारखेच होते. तिबेटशी भारताचा पहिला लष्करी संघर्ष १९०४ साली ब्रिटिश भारतीय सैन्यातील कॅप्टन फ्रान्सिस यंगहजबंड या लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील तुकडीने केला होता. त्यावेळी कमकुवत तिबेटी लष्कराशी लढताना कॅप्टन यंगहजबंडच्या प्रबळ लष्कराचीही दमछाक झाली होती. तिबेटमधील युद्ध फक्त सैन्याशीच नसतं, तर तेथील पर्यावरण व हवामानाशीही असतं, हे ओळखूनच नेहरूंनी तिबेटवरील चीनच्या आक्रमणाकडे दुर्लक्ष केलं. भारताने त्यावेळी तिबेटमध्ये चीनशी संघर्ष करायचे ठरवले असते तर १९६२ च्या ऐवजी १९५२ मध्येच भारत-चीन युद्ध होऊन भारताचा पराभव झाला असता. पण १९५२ ते ६२ या काळात भारताला आपले लष्करी सामर्थ्य वाढवता आले नसते का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. भारताची त्यावेळची परिस्थिती पाहता मोठी सैन्यभरती नक्कीच करता आली असती. पण ते सैन्य नेण्यासाठी हिमालयात प्रचंड खर्च करून रस्ते बांधावे लागले असते. हा खर्च आजही भारताला परवडणारा नाही. अनेक विकास कामांवरचा खर्च वळवून सध्याचे मोदी सरकार अजूनही या भागात रस्ते बांधण्याचे काम करीत आहे. याशिवाय चीनबरोबर लढण्यासाठी अब्जावधी रुपयांचे रणगाडे, लष्करी वाहने, तोफा आदी सामुग्री खरेदी करावी लागली असती. त्यावेळी नवस्वतंत्र असलेल्या भारताला हे परवडणारे नव्हते.
काश्मीरमधील युद्ध अर्धवट सोडण्यामागे नेहरूंची दोन कारणे होती. एक तर सध्याच्या नियंत्रण रेषेपलीकडील भाग युद्धासाठी प्रतिकूल होता. तो भाग जिंकण्याचा प्रयत्न केला असता तर जो भाग जिंकला आहे तोही गमावण्याची पाळी आली असती. शिवाय या युद्धामुळे रसद, लष्करी सामुग्री व अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला असता. युद्ध थांबवण्याचे दुसरे कारण हे होते की, पाकिस्तानकडे काश्मीरचा अर्धा भाग ठेवल्याने पाकिस्तानशी भविष्यात तडजोड करणे शक्य व्हावे आणि स्वतंत्र काश्मीरचा पर्याय कायमचा संपून जावा. यातला पाकिस्तानशी तडजोडीचा अंदाज १९७१ च्या युद्धानंतर सिमला करार करताना इंदिरा गांधींनीही बांधला होता आणि पुढे लाहोर करार करताना वाजपेयींनाही तसेच वाटत होते. पण पाकच्या आडमुठय़ा धोरणामुळे ही तडजोड कधीही होऊ शकत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांत गेल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या पाच बडय़ा सदस्यांपैकी अमेरिका, ब्रिटन व चीन (त्यावेळी तैवान) यांनी भारताचे समर्थन करण्यास स्पष्ट नकार दिला होता. फ्रान्सला त्यावेळी या वादात काही भूमिकाच नव्हती. पण सोविएत रशिया भारताला समर्थन देण्यास तयार होता. मग रशियाशी मैत्री करण्यात नेहरूंचे काय चुकले?
– दिवाकर देशपांडे, नवी मुंबई</strong>