गिरीश कुबेर आणि संतोष प्रधान यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत वाचली. ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे बहुभाषिकांचा पगडा आहे, केवळ मराठी मतांवर निवडणुका जिंकता येत नाहीत,’ असे विश्लेषण करताना त्यांनी मराठी माणसाच्या कष्ट टाळण्याकडे असलेल्या कलाकडे अंगुलिनिर्देश केला आहे. नाका कामगार, बांधकामावरील मजूर, भाजीविक्री, इस्त्री, रद्दी, भंगार सामानाची खरेदी-विक्री, मोटारदुरुस्ती, चहाच्या आणि पानाच्या टपऱ्या अशा अनेक व्यवसायांत मराठी माणसे नगण्य आहेत हे खरे; परंतु अगदी पूर्वीपासून बहुतांश गिरणी कामगार, माथाडी कामगार, रेल्वे स्टेशनवरचे बिल्लाधारी हमाल असे अनेक कष्टकरी मराठीच होते. आपल्या कार्यक्षमतेकरता जगभर गाजलेले डबेवालेसुद्धा मराठीच आहेत. दारोदार वणवण भटकून कुरिअर पोहोचवणारी बहुतांश कष्टाळू मुलेही मराठीच आहेत. तीच गोष्ट चित्रपट व्यवसायात सेटवर राबणाऱ्या अनेक कामगारांबद्दल म्हणता येईल. असे असताना पवारांसारख्या अनुभवी नेत्याने केलेले हे विधान आश्चर्यकारक वाटते. मुंबई जेव्हा ७० च्या दशकात कात टाकून सध्याच्या रूपातील आर्थिक राजधानी होण्याकडे पावले टाकू लागली होती तेव्हा महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात काही मूलभूत चुका झाल्या (किंवा केल्या गेल्या) असे वाटते. अशा चुका नंतर अगदी कितीही वाटले तरी सुधारता येत नाहीत. मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे ‘महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांच्या वाढीवर नेहमीच मर्यादा आल्या आहेत..’ याची मुळे या चुकांत आहेत. त्याची कारणमीमांसा करताना मराठी माणसे कष्ट टाळतात असे सुचवणे बरोबर वाटत नाही.
प्रसाद दीक्षित, ठाणे
पवारांचे विश्लेषण आश्चर्यकारक
गिरीश कुबेर आणि संतोष प्रधान यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत वाचली.
Written by झियाऊद्दीन सय्यद
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-12-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response on lokrang article