विख्यात चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या ५१ व्या स्मृतिदिनानिमित्त सुहास बहुळकर लिखित ‘चित्रकार दीनानाथ दलाल : चित्र आणि चरित्र’ हा ग्रंथ राजहंस प्रकाशनातर्फेनुकताच प्रकाशित झाला. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एका प्रकरणाचा अंश..

हे एक आगळं वेगळं प्रात्यक्षिक होणार होतं. कारण ते अर्कचित्रांचं होतं. शिवाय ही बातमी हेतुत: गुप्त ठेवण्यात आली होती. त्याप्रसंगी दलालांनी विविध चित्र-शिल्पकारांची अर्कचित्रं अल्पावधीत अशी काही अफलातून रेखाटली, की प्रेक्षक बघतच राहिले.

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग

मुंबईत भायखळ्याच्या सर जमशेटजी जीजीभाई मार्गावर एक जुनीपुराणी सुप्रसिद्ध शाळा आहे. या शाळेचं नाव ूम हायस्कूल. या शाळेचे मुख्याध्यापक रेव्हरंड रामदास यांनी १९४० मध्ये अत्यंत नावीन्यपूर्ण असं कलाप्रदर्शन आयोजित केलं होतं आणि दर दिवशी एका मान्यवर चित्रकाराचं प्रात्यक्षिक ठेवलं होतं. त्याशिवाय व्याख्यानं, परिसंवाद असा भरगच्च कार्यक्रम आखला होता. प्रात्यक्षिकासाठी आमंत्रित केलेल्या चित्रकारांत ज्येष्ठ चित्रकार सा. ल. हळदणकर (जलरंगात पोट्र्रेट), व्ही. पी. करमरकर (व्यक्तिशिल्प), गोपाळ देऊसकर (तैलरंगात पोट्र्रेट), हैदराबाद येथील पी. टी. रेड्डी (स्टिल लाईफ), व्ही. एस. गुर्जर (पेस्टलमध्ये पोट्र्रेट) आणि उदयोन्मुख चित्रकार दीनानाथ दलाल (पेन अँड इंक).

या प्रात्यक्षिकांची खूप मोठय़ा प्रमाणात जाहिरात करण्यात आली. तिकीट लावूनही तोबा गर्दी झाली. यातील पी. टी. रेड्डी व दलाल सोडता बाकी सर्वजण ज्येष्ठ चित्रकार व नामवंत शिल्पकार होते. इतर सर्वाची प्रात्यक्षिकं पार पडली व शेवटचं प्रात्यक्षिक दलालांचं होतं. कार्यक्रम दोन दिवसांवर आला. दलालांनी आधीच त्यासाठी पूर्वतयारी करण्यास सुरुवात केली होती. ते काही गाजलेल्या निवडक ज्येष्ठ व श्रेष्ठ चित्र-शिल्पकारांना जाऊन भेटले. त्यांना समोर उभे करून विचारपूर्वक विविक्षित पोझ देऊन त्यांची स्केचेस केली. त्यासोबतच ते ज्या आठ चित्र-शिल्पकारांना भेटले होते त्यांना, ‘तुम्ही या प्रात्यक्षिकाला हजर राहणं का  आवश्यक आहे’ तेदेखील समजावून सांगितलं व त्यांनी स्केच करताना जो वेश घालावयास लावला होता, तोच घालून हजर राहण्याचा आग्रह केला.

प्रात्यक्षिकांचा दिवस उजाडला.ह्यूम हायस्कूलच्या भव्य सभागृहात व्यासपीठावर ईझलवर एक मोठा बोर्ड ठेवला होता. बाजूला एका टेबलावर शाईची बाटली, ब्रश, पेन्सिली अशी सर्व सामग्री होती. बोर्डावर २२  ३१ इंच मापाचा कागद लावला होता. नियोजित वेळ होताच लाऊडस्पीकरवरून दलालांचा अल्पपरिचय करून देण्यात आला व त्यांना प्रात्यक्षिक सुरू करण्याची विनंती करण्यात आली. जमलेले सर्व कलावंत, कलारसिक आणि विद्यार्थी हा तरुण चित्रकार काय करणार, फक्त पेन अँड इंकमध्ये काय दाखवणार, या उत्सुकतेत होते. अन् प्रात्यक्षिक सुरू झालं.

जमलेल्यांची अपेक्षा- दलाल कुणाला तरी समोर बसवून व्यक्तिचित्र करतील अशी होती. मुंबईत त्याकाळी समोर प्रत्यक्ष व्यक्ती बसवून तिचं व्यक्तिचित्र काढून प्रात्यक्षिक देणं याला वेगळीच प्रतिष्ठा होती. पण त्यावेळी दलालांचा मूड वेगळाच होता. कारण त्यांचं ‘राजकीय टीकाचित्रे’ हे पहिलंच पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं होतं. दीनानाथ दलाल हा तरुण चित्रकार व्यक्तिचित्रण किंवा निसर्गचित्रण असे विषय उत्तमरीत्या हाताळत असला तरी एका कलाविषयक काम करणाऱ्या प्रसिद्ध संस्थेत त्याला प्रथमच प्रात्यक्षिकासाठी आमंत्रित केलं होतं आणि काहीतरी वेगळं करावं असं त्यांना वाटत होतं. जमलेले सर्वच जण दलालांकडे उत्सुकतेनं पाहत होते. दलालांनी प्रेक्षकांवर नजर फिरवली आणि त्यांना डावीकडे त्यांचे गुरू आणि अर्थात अनेक चित्रकारांना घडवणारे के. आर. केतकर गुरुजी दिसले. मग दलालांनी हातात पेन्सिल घेऊन साधारण रेखाटन कागदावर साकारलं. मग शाईत ब्रश बुडवला आणि अल्पावधीतच कागदाच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात केतकर गुरुजींचा चेहरा तयार झाला. डोक्यावर काळी उंच टोपी, त्याखालून दिसणारा अरुंद भाळप्रदेश, त्याखाली तीक्ष्ण नजरेनं बघणारे डोळे, लांब नाक, त्याखाली ओठ व दुहेरी हनुवटी असा कुणाला तरी शोधत निघालेल्या केतकर गुरुजींचा चेहरा साकारला. मग त्याखाली त्यांचा सुटाबुटातला देह साकारत असतानाच चित्रकारानी त्यांचा उजवा हात काढून त्यात कातडी बॅग, तर डाव्या हातात धरलेली कागदाची गुंडाळी दिली. प्रेक्षक अवाक् होऊन पाहत राहिले. काही क्षणांनंतर भानावर येत सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. ब्रश शाईत बुडवून केवळ स्मरणाच्या आधाराने शाई सुकण्यापूर्वीच ते व्यक्तिमत्त्व अर्कचित्राच्या रूपात साकारणं व ते पाहणं हा एक अद्भुत अनुभव होता. त्या अर्कचित्रात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व पुरेपूर उतरलेलं असे. चित्र पूर्ण होताच केतकर मास्तरांचं नाव पुकारलं गेलं आणि ते व्यासपीठावर हजर झाले. त्यांनी चित्राप्रमाणेच पोझ घेताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

मग दलालांनी उजवीकडे दुसरं चित्र सुरू केलं आणि त्यावर दोन्ही हात मागे बांधलेले व कमरेत वाकून एक पाय किंचित गुडघ्यात वाकवून उभे असलेले चित्रकार लालकाका साकारले. पुढे वाकून जणू काही हे पारशी बाबा कुणाचं तरी बोलणं लक्षपूर्वक ऐकत असावेत असाच तो आविर्भाव होता. पुनश्च एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लालकाका स्टेजवर हजर झाले. त्यांनी पोझ घेताच पुनश्च टाळ्यांचा कडकडाट घुमला.. दलालांनी कागदावरील बाजूच्या मोकळ्या जागेकडे चेहरा वळवला. आता कुणाची पाळी याची उत्सुकता  जमलेल्यांच्या मनात दाटली होती. दलाल कागदावर प्रथम पेन्सिलच्या फिकट रेषा आणि मग ब्रशचे जाड-बारीक फटकारे मारत होते. त्यातून प्रथम एक जरीकाठी टोपी साकार झाली. ही टोपी कुणाची, असा प्रश्न मनात उमटत असतानाच टोपीखालचं कपाळ, भुवया, त्याखालचे बारीक, पण रोखून पाहणारे डोळे, किंचित उंचावलेलं नाक, बारीक जिवणी साकारताच प्रेक्षकांच्या तोंडून ‘‘अरे वा! हे तर नानासाहेब.. शिल्पकार करमरकर!’’ असे उद्गार उमटू लागले. एवढय़ात त्यांचा शर्ट, कॉलर, त्यावर लावलेला बो, अंगात घातलेला सिल्कचा सूट, उजवा हात किंचित पुढे व बोटात धरलेली सिगरेट, डावा हात खिशात खुपसलेला- असे शिल्पकार करमरकर त्यांच्या खास लकबींसह अवतरले. लोक अवाक् होऊन पाहत होते. दलाल रंगात आले होते. स्वत: करमरकर खुर्चीतून उठून दिलखुलास हसत, टाळ्या वाजवत स्टेजवर आले, पोझ घेतली, उभे राहिले आणि..

एवढय़ात दलालांची नजर एका बाजूला रुबाबात उभ्या असलेल्या देखण्या चित्रकारावर पडली. मग काही क्षणांत कागदाच्या उजव्या कोपऱ्यात एक सडपातळ, पण रुबाबदार असा सुटाबुटातला स्टायलिश पाठमोरा देह साकारला गेला. त्यांच्या उजव्या हातात ब्रश होता, तर तर डाव्या हातात पॅलेट आणि ब्रश! लोक विचार करत होते, हे कोण महाशय.. एवढय़ात त्या पाठमोऱ्या देहावर पाठमोरा चेहरा व उंच मान तयार झाली. आणि डोक्यावर मागे वळवलेले केस आणि डोळ्यावरचा गोल बारीक चष्म्याचा आकार दिसताच ‘देऊसकर’ हे नाव अनेकांच्या तोंडून वेगवेगळ्या स्वरांत बाहेर पडले. देऊसकर त्यादरम्यान नुकतेच लंडनच्या रॉयल अ‍ॅकॅडमीत शिकून भारतात परतले होते आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम करू लागले होते. त्यांचं ते आंग्लाळलेलं व्यक्तिमत्त्व दलालांनी मोजक्या रेषांत आणि थोडय़ा वेळात विलक्षणरीत्या साकारलं होतं.

आता कागदाचा खालचा भाग कोरा होता आणि वरच्या भागात तीन चित्रकार आणि एक शिल्पकार त्यांच्या रूपवैशिष्टय़ांसह अवतरले होते. दलालांनी एकदा या चार अर्कचित्रांकडे नजर टाकली आणि मग प्रेक्षकांत नजर फिरवली, तो त्यांना पुढच्याच रांगेत बसलेले भरभक्कम देहाचे ज्येष्ठ चित्रकार सा. ल. हळदणकर दिसले. वस्तुत: सा. ल. हळदणकर कार्यक्रमाला

पँट- शर्ट घालून आले होते. पण दलालांनी त्यांना थ्री-पीस सूटमध्ये आणि बगलेत हॅट घेतलेले साकारलं. त्यानंतर त्यांनी अचानक एका दुसऱ्या थ्री-पीस सूट घातलेल्या व डोक्यावर हॅट आणि दाढी-मिशी असलेल्या व्यक्तीचं चित्र साकारलं. त्या व्यक्तीनं हॅट डोळ्यांवर ओढली होती. ते होते मूळचे गोव्यातले, पण पुढील काळात

जे. जे.त शिकून त्यानंतर लंडनच्या रॉयल अ‍ॅकॅडमीचं सुवर्णपदक मिळवणारे शिल्पकार आर. पी. कामत.

आता फक्त उजव्या बाजूचा कागदाचा खालचा एक-चतुर्थाश भाग कोरा होता. त्यात दलाल काय करामत करतात, कोणाला साकारतात, हे उत्सुकतेनं सर्वजण न्याहाळत होते. अजिबात वेळ न गमावता दलालांनी कागदावर रेषा मारायला सुरुवात केली. उंच दिवालाची काळी टोपी, त्याखाली एक गबदुल चेहरा, अंगात कोट, नेसलेलं ब्राह्मणी धोतर, पायात पंप शू आणि उजवा हात कमरेवर, तर डाव्या हातात छत्री अशी एक आकृती तयार झाली. चेहऱ्याचा भाग मोकळाच होता. त्यावर गोल सोनेरी चष्मा, अपरं नाक, बारीक जिवणी असे तपशील साकारताच पुढेच बसलेले परांडेकर जोरात उद्गारले, ‘‘अरे, हा तर मीच!’’ आणि हशा उसळला. आता कागदाचा उजवीकडचा खालचा कोपराच रिकामा होता. जमलेल्यांपैकी व चित्रांत नसलेल्यांपैकी प्रत्येकाला ‘आपण तिथे असू का?’ अशी उत्सुकता वाटत होती. पण चित्रकारांनी स्वत:च्या मनाशी आधीच विचार करून ठेवला होता.

कागदाकडे दलाल क्षणभर पाहत राहिले.. ब्रश शाईच्या बाटलीत बुडवला आणि लीलया कागदावर फटकारे उमटू लागले. दलाल रंगात आले होते. ब्रश कागदावर फिरत होता. मान तिरपी होत होती. प्रेक्षकांची नजर ‘आता कोण अवतरणार?’ याची उत्सुकतेनं प्रतीक्षा करत होती. अचानक काहीतरी दिसू लागलं.. ते अल्पावधीत पूर्ण झालं. एक ठेंगणी ठुसकी, नमुनेदार व्यक्तिमत्त्व असलेली आकृती कागदावर उमटली. वाढलेले केस, त्याखाली बाकदार नाक, उभ्या कॉलरचा शर्ट, त्यावर कोट, खाली दुटांगी धोतर, पायात चपला, डावा हात कोटाच्या खिशात खुपसलेला, तर उजव्या हातात रुबाबात छत्री धरलेली, शिवाय त्या छत्रीत खुपसलेला ब्रशचा जुडगा.. चित्र सांगत होतं की हे चित्रकार व्ही. एस. गुर्जर! नमुनेदार व्यक्तिमत्त्वाचे, किंचित एक खांदा वर उडवत चालणारे. आता दलालांचं प्रात्यक्षिक पूर्ण झालं होतं. उजव्या कोपऱ्यात त्यांनी ‘दलाल’ अशी सही इंग्रजीत ठोकली व त्याखाली मराठीत ‘४०’ हा आकडा टाकला. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

कागद पूर्ण भरला होता. त्यावर सहा चित्रकार आणि दोन शिल्पकार आपल्या वैशिष्टय़ांसह साकार झाले होते. प्रात्यक्षिकांच्या इतिहासातील एक वेगळ्याच प्रकारचं दीर्घकाळ स्मरणात राहणारं प्रात्यक्षिक संपलं होतं. ती जणू काही हसतखेळत पार पडलेली आणि उत्सुकता, आनंद अन् अनपेक्षितता यांनी आणि वारंवार होणाऱ्या टाळ्यांच्या कडकडाटांनी भरलेली एक मैफलच होती.

जमलेल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न उभा राहिला होता की, या तरुण चित्रकाराने कुणालाही समोर उभं न करता या आठ कलावंतांची अर्कचित्रं कशी साकारली असतील? पण त्यासाठी दलालांनी भरपूर परिश्रम घेतले होते आणि विलक्षण स्मरणशक्ती हे तर या चित्रकाराचं वैशिष्टय़च होतं. एखादी गोष्ट बघितली आणि मनात ठसली, तर तो ती समोर नसतानाही सहजतेनं सर्व वैशिष्टय़ांसह कागदावर साकारत असे. लहान वयापासूनच त्याची ती सवय हे त्याचं फार मोठं बलस्थान होतं. केवळ एका तासाच्या अवधीत दलालांनी साकारलेली ही आठ अर्कचित्रं अनुभवून प्रेक्षकच नव्हे, तर ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावंतही या तरुण चित्रकाराची निरीक्षणशक्ती, वेग आणि कौशल्य पाहून चकित झाले.

१९४२ च्या ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या पन्नासाव्या वार्षिक प्रदर्शनासाठी दलालांनी ही आठ ‘अर्कचित्रं’ असलेली त्यांची आगळीवेगळी कलाकृती पाठवली आणि विशेष म्हणजे या अर्कचित्रांना त्या वर्षीचं बॉम्बे आर्ट सोसायटीचं मानाचं कास्यपदकही मिळालं.

बॉम्बे आर्ट सोसायटीत त्या काळात अनेक मोठे चित्रकार समितीवर असत व परीक्षक म्हणूनही आमंत्रित केले जात. त्यात ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे आर्ट डायरेक्टर वॉल्टर लँगहॅमर आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रिन्सिपॉल चार्ल्स जेरार्ड हेदेखील होते. या प्रदर्शनात दलालांची दोन चित्रं लागली होती. त्यातील एक वर उल्लेखलेल्या चित्रकार-शिल्पकारांच्या अर्कचित्रांचं ‘prominent Characters’ हे होतं. याशिवाय वास्तववादी शैलीत दलालांनी रंगवलेल्या ‘An Old Goldsmith’ या चित्रानंही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय हे चित्रदेखील सर जमशेटजी कांगा प्राईज या रु. ५०च्या पारितोषिकाचं मानकरी ठरलं.

lokrang@expressindia.com

Story img Loader