अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सामाजिक-राजकीय चळवळींशी कलावंतांनी जोडलं जाऊच नये, अशी कप्पेबंदी नाकारण्याचे प्रयत्न गेली काही वर्ष सुरू आहेत. रायगड जिल्ह्य़ातील माणगावातला ‘अॅक्टिव्हिस्टा’ हा असाच एक जोरकस प्रयोग होता.. येत्या आठवडय़ात तो मुंबईत येणार आहे!
मुंबईत मोठय़ा प्रमाणावर भरवल्या जाणाऱ्या, ८० पेक्षा जास्त दृश्यकलावंतांचा सहभाग असणाऱ्या प्रदर्शनांची रेलचेल होती गेला महिनाभर! आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयातर्फे भरणारं ‘राज्य कला प्रदर्शन’, तसंच बॉम्बे आर्ट सोसायटी यांची प्रदर्शनं जहांगीर आर्ट गॅलरीची चारही दालनं भरून टाकतात दरवर्षीच.. तसं यंदाही झालं होतं. त्याखेरीज काही समूह-प्रदर्शनंही अगदी बोरीवलीपासून कुलाब्यापर्यंत भरली. ठाणे स्कूल ऑफ आर्ट, सर ज. जी. कला महाविद्यालय आदींमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वार्षिक प्रदर्शनंही याच काळात भरली. एकंदरीत डिसेंबरच्या सुरुवातीपासून ते फेब्रुवारीच्या अखेपर्यंत कला प्रदर्शनांचा हंगामच महाराष्ट्राच्या राजधानीत असतो. त्यात ही संस्थात्मक पातळीवरची प्रदर्शनं मोठी ठरतात. तसंच यंदाही झालं. त्या प्रदर्शनांमध्ये ‘कागदावरलं ड्रॉइंग’ इथपासून ते ‘तैलरंगचित्र’, ‘सामाजिक संदेश देणारी उपयोजित कला’ अशी निरनिराळ्या श्रेणींमधली बक्षिसं दरवर्षीच असतात. ती यंदाही कुणाकुणाला मिळाली. वाद झाले नाहीत. कलेचा एक उत्सव साजरा झाला.. हे सगळं छानच. पण ही प्रदर्शनं नित्याचीच आहेत आणि त्यांमधली ‘अमक्या प्रकारच्या कलेसाठी पारितोषिक’, ‘तमुक प्रकारातील कलाकृतीसाठी पारितोषिक’ ही कप्पेबंदीही नेहमीचीच आहे. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करण्याचं कारण नाही. या प्रदर्शनांना एकदा का ‘उत्सव’ मानलं की उत्सवात काहीएक रिवाज असतातच, शिस्तही असतेच. त्याबद्दल कशाला तक्रार करायची?
तेव्हा हे लिखाण अशा उत्सवांच्या विरुद्ध वगैरे नाही; मात्र या कला-उत्सवांच्या बाहेरसुद्धा जी कप्पेबंदी दिसते, त्याकडे लक्ष वेधणारं आहे. कप्पेबंदीचा नुसता प्रश्न उभा न करता, त्या कप्पेबंदीला भेदण्याचे जे प्रयत्न दिसतात त्यांना दादही देणारं (होय, सकारात्मक!) आहे. असा एक प्रयत्न जानेवारी महिन्यात माणगावच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात झाला होता. ‘रायगड अॅक्टिव्हिस्टा’ हे त्या प्रदर्शनाचं नाव होतं. आता त्या प्रदर्शनातल्या कलाकृती आणि काही प्रचंड कलाकृतींचं दस्तावेजीकरण असं मुंबईच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी- परळ भोईवाडा भागातल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात मांडलं जाणार आहे. तिथून हे प्रदर्शन महाराष्ट्रात वा राज्याबाहेरच्या अन्य ठिकाणीही मांडलं जाऊ शकेल. पण त्याआधी कप्पेबंदीकडे लक्ष वेधणं महत्त्वाचं आहे.
कलेतली कप्पेबंदी या संस्थात्मक शिस्तीबाहेरसुद्धा- लोकांच्या मनातसुद्धा- कशी काय असते याची एक साधी चुणूक म्हणजे ‘तुम्ही तर चित्रकार ना? मग फोटोंचं प्रदर्शन कशाला भरवलंत?’ यासारखे प्रश्न (आणि त्यातून ‘चित्रं काढता येईनाशी झाली की काय?’ असा डोकावणारा सूर)! किंवा ‘ते नाटककार आहेत ना? मग चित्रंसुद्धा काढतात?’ याचं आश्चर्य. हीच कप्पेबंदी अंगवळणी पडत जाते आणि मग ‘कलाकारांनी कलेकडे लक्ष द्यावं.. राजकीय विषयांवर मतप्रदर्शन करू नये’ असं दरडावणारे आवाज हे प्रत्यक्षात झुंडशाही आणि हुकूमशाहीलाच प्रोत्साहन देतात याचंही काही वाटेनासं होतं.
हे फक्त चित्रकलेच्या किंवा दृश्यकलेच्या क्षेत्राबद्दलच होत राहतं असंही नाही. रत्नाकर मतकरी यांनी महात्मा गांधींच्या खुनाबद्दल ताजं नाटक लिहिलंय. त्याबद्दलही ‘मतकरींनी गूढकथा लिहाव्यात, सामाजिक नाटकं लिहावीत.. गांधींबद्दल आणि देशाच्या इतिहासाबद्दल मतकरींचा अभ्यास काय?’ असं विचारू पाहणारे लोक तयारच असतात कुठे कुठे. मतकरींनी ‘लोककथा- ७८’ लिहिलं होतं, याची आठवण कमलाकर नाडकर्णीसारख्या अभ्यासू समीक्षकांना असते. पण त्यांचा आवाज किती पोहोचणार?
याच रत्नाकर मतकरींनी चित्रंही काढली होती. साधारण १९८० च्या दशकातली चित्रं असावीत ती. सर्व चित्रं साधारण दीड- पावणेदोन फूट बाय दोन- अडीच फूट अशा आकाराची. ही अख्खी चित्रमालिका नर्मदा बचाओ आंदोलनाचं जवळून निरीक्षण केल्यानंतर मतकरींना सुचू लागली. चित्रकलेच्या स्पर्धेत या चित्रांना बक्षीस मिळणार नाही. किंबहुना, ही ‘चांगली चित्रं’ आहेत असं कलाध्यापक, कलाशिक्षण घेतलेले समीक्षक अजिबात म्हणणार नाहीत. ते मतकरींच्या विरुद्ध किंवा नर्मदा बचाओ या विचाराविरुद्ध आहेत म्हणून नव्हे; पण त्यांना माहीत असलेली ‘चांगली चित्रं’ ही ठरावीक निकष पूर्ण करणारी असतात आणि ते निकष इथं लागू पडत नाहीत, म्हणून!
इथं खरी गोम आहे.. मतकरींची ही चित्रं खरं तर ‘मीच हे केलं पाहिजे’ अशा भावनेतून अवतरलेली आहेत. मतकरींची चित्रं कशी आहेत यापेक्षाही, ही चित्रं कुणीच न केल्यामुळे मतकरींना रंगवावी लागली, हेही महत्त्वाचं आहे. दुसऱ्या कुणालाही ज्यावेळी नर्मदा बचाओ आंदोलन हा रंगचित्रांचा विषय होऊ शकतो असं सुचलंसुद्धा नव्हतं, त्यावेळी मतकरींना ही चित्रं सुचली आहेत. पण आपण मात्र, ‘हा एकच हात जास्त जाडा दिसतोय’ यासारखी चूक त्यात निघाल्यावर आनंद मानणार आहोत? कुणी कशी ‘अभिव्यक्ती’ केली याबद्दल कुतूहल असणं योग्यच; पण ‘याला आम्ही अभिव्यक्ती मानणार नाही’ हा उर्मटपणा किंवा माज ठरतो.
मतकरी यांची ही चित्रं प्रदर्शित करण्याचा निर्णय प्रदर्शनाचे गुंफणकार या नात्यानं राजू सुतार यांनी घेतला, पण त्यांचं अभिनंदन केवळ तेवढय़ासाठी करणं ठीक नाही. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत प्रदर्शन भरवण्याची कल्पना मान्य करणं,ती प्रत्यक्षात आणण्याच्या पाच महिने आधीच ‘ओपन कॉल’द्वारे तरुण चित्रकारांना त्यात सहभागाचं आवाहन करणं, त्यातून निवडलेल्या चित्रकारांना सामाजिक चळवळींचं जवळून अवलोकन करता यावं म्हणून नर्मदा बचाओ आंदोलनाच्या भागात या चित्रकारांसह जाणं, मेधा पाटकर आणि गजानन खातू यांच्याशी या चित्रकारांची बातचीत घडवून आणणं.. हेदेखील राजू सुतार यांनी केलं. सहभागी कलाकारांच्या आस्थेला त्यामुळे आकार आला.
गजानन खातू यांच्याशी बातचीत झाल्यानंतर स्नेहल एकबोटे यांनी ‘गिरणगावा’ची छायाचित्रं आधीच कुणी कुणी काढली असतील वगैरे संकोच सोडून दिला. मला दिसणारं आजचं गिरणगाव मला फोटोंमधून मांडायचं आहे, हा ध्यास एकबोटे यांनी घेतला. या फोटोंची मांडणीसुद्धा ‘फॅक्टरी शेड’च्या आकारात केल्यामुळे खुलली. वैशाली ओक यांनी भिंतीसरशी चित्रं करण्याचं सोडून घर/ कारखाना/ मालकवर्ग/ कामगारवर्ग यांची सामाजिक आणि मानसिक उतरंड दाखवणारं मांडणशिल्प तयार केलं. त्यासाठी माती वापरली. मातीकामासाठी नामांकित झालेले आणि माणगावनजीकच स्टुडिओ थाटलेले राजेश कुलकर्णी यांनी मात्र एक प्रचंड आकाराची मोजपट्टी तयार केली.. धरणाच्या भिंतीवर रंगवलेली असते तशी! साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा परिसर मोठा आहे. साने गुरुजींचा जीवनपट उलगडणारं (वसंत आबाजी डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं) संग्रहालय, कार्यालय, वाचनालय, डॉर्मिटरीवजा खोल्या, कॅम्पिंगसाठी मोठं मैदान, वडाचा मोठ्ठा पार हे सारं ओलांडून जेवणघराच्या आधी ती मोजपट्टी संपत होती. मोजपट्टीवरल्या ‘१६८.८ मीटर’ या उंचीच्या खुणेपासून एक निळी दोरी, ती खाली जमिनीवर जाता जाता जाळीसारखी होऊन, तिथून उसळून पलीकडल्या अंगणात पसरली होती.. याच निळ्या दोरीपासून तयार झालेला भोवरा कार्यालयाच्या चौकासारख्या आवारातही होता. ती मोजपट्टी सुरू होतेवेळी प्रेक्षकांनी ‘बाई मी धरण, धरण बांधते। माझं मरण, मरण कांडते॥’ ही दया पवार यांची कविता मोठय़ा फलकावर पाहिलेली असायची. तिथूनच थोडं पुढं गेल्यावर समोरच्या डोंगराच्या दिशेनं गेलेला बाण आणि त्या दिशेनं पाहिल्यास ‘२६ मीटर’ असं वाचलेलं असायचं. या साऱ्याचा अर्थ स्मारकाचा अर्धा परिसर ओलांडून जाणाऱ्या त्या मोजपट्टीच्या शेवटी कळायचा.. ‘सरदार सरोवर’ धरणाची ही उंची! या धरणात वस्त्या गेल्या, गावं गेली, डोंगर गेले, देवळं गेली म्हणजे काय झालं, ते या पट्टीच्या अखेरीस उमगायचं आणि मग निळ्या दोरीपासून तयार केलेली जाळी ही पाण्याची पातळी आहे, हे कुणी नाही सांगितलं तरी लक्षात यायचं! प्रेक्षकांना थेट अनुभव देणारी ही कलाकृती मुंबईत मात्र फोटो-व्हिडीओ या स्वरूपात दिसेल.
या प्रदर्शनाइतकाच, ते ज्या चळवळींबद्दल आहे त्या दोन चळवळींचा (कामगार चळवळ आणि प्रचंड आकाराच्या धरणांऐवजी समन्यायी पाणी नियोजनाची चळवळ यांचा) संदर्भ महत्त्वाचा आहे. तो स्पष्ट करण्यासाठी चित्रपट हे माध्यमही दृश्यकलेच्या या प्रदर्शनानं परकं मानलेलं नाही. कामगार चळवळ आणि कवी नारायण सुर्वे व चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्याविषयी अंजली माँटेरो आणि के. जयशंकर यांनी केलेला ‘साचा’ हा गाजलेला लघुपट, नर्मदा खोऱ्यातल्या आदिवासींच्या जीवनसंघर्षांवर सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांनी २५ वर्षांपूर्वी केलेला एक ‘डॉक्युड्रामा’ प्रकारातला लघुपट आणि शिल्पा बल्लाळ यांनी थेट आजच्या ‘फेसबुक- व्हॉट्सअॅप पिढी’साठी बनवलेला दीर्घ माहितीपट हेदेखील प्रदर्शनाचा भाग आहेत.
कप्पेबंदी मोडण्याची सुरुवात ‘डॉक्युमेंटा’सारख्या- जर्मनीच्या कासेल या शहरात दर पाच वर्षांनी भरणाऱ्या- महाप्रदर्शनानं १९६० च्या दशकातच केली होती. पुढे भारतातही असे अनेक प्रयोग, अनेक प्रयत्न झाले. मुंबईत तेव्हा राहणारे तुषार जोग आणि शर्मिला सामंत हे अशा प्रयोगांत आघाडीवर होते. ‘आर्ट ऑक्सिजन’ या मुंबईतल्या संस्थेनं पुढे अशा प्रयोगांना अधिष्ठानही दिलं. या मालिकेतला आणि थेट ‘डॉक्युमेंटा’च्या नावाशी नातं जोडणारा ‘अॅक्टिव्हिस्टा’ हा महाराष्ट्रातल्या चित्रकारांना कप्पेबंदी मोडण्याची संधी देणारा प्रयोग आहे. दर दोन वा तीन वर्षांनी तो माणगावात होत राहायला हवा आणि त्याचा पाठपुरावा म्हणून महाराष्ट्राच्या अन्य भागांतही या प्रदर्शनातल्या कलाकृती दिसायला हव्यात.