सा त शतकांपेक्षा अधिक काळ चाललेली पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे. जगन्नाथाच्या रथोत्सवाप्रमाणेच देशी-परदेशी निरीक्षकांना, अभ्यासकांना कुतूहलाचा वाटणारा चमत्कार! या चमत्कारामधली सामाजिक वास्तवाची गुंतागुंत हा खरोखरच मोठय़ा अभ्यासाचा विषय आहे.
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयानं त्यातलं बायकांच्या संदर्भातलं वास्तव अभ्यासण्यासाठी एक प्रकल्प कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या प्रोत्साहनानं गेल्या वर्षांपासून हाती घेतला. विश्वविद्यालयाच्या ‘शाश्वती’ केंद्राचा पंढरीच्या वारीतल्या स्त्रियांच्या सहभागाचं स्वरूप अभ्यासणारा प्रकल्प. आणखी दोन र्वष या प्रकल्पाचं काम चालेल खरं; पण गेल्या वर्षी त्या कामाची सुरुवात करताना दिसलं ते बायकांचं केवढं तरी
* * *
पालखीचं प्रस्थान दोन-चार दिवसांवर आलेलं. आम्ही फिरत होतो तो देहू आणि आळंदीचा सगळा परिसर वारक ऱ्यांनी फुलून गेलेला. त्यात बायकांची संख्या डोळ्यांत भरणारी. दोन्हीकडे वाटेवर चालणारे भाविकांचे जथे. वाहनं माणसांनी भरून चाललेली. देवळांमध्ये ओसंडून असणारे भाविक. नामाचे गजर आणि मधूनच ऐकू येणारे अभंग. आवारांमध्ये रंगलेल्या बायकांच्या फुगडय़ा. फोटोग्राफर मिलिंदचा कॅमेरा आमच्यासाठी ती दृश्यं टिपण्यात पूर्ण गुंतलेला.
आळंदी संस्थानच्या कार्यालयात मुख्य पालखीची जय्यत तयारी होती. भलंमोठं दालन सामानानं भरून गेलं होतं. व्यवस्था पाहणाऱ्या दोघीजणी तिथं भेटल्या. एक मराठवाडय़ातल्या होत्या. म्हणाल्या, ‘‘सगळा संसार
बाहेर घाटाकडे जाताना दोन्ही बाजूंना दुकानं लागलेली. फुलं, हार, बत्तासे, साखर फुटाणे, बांगडय़ा, तुळशीच्या माळा, खेळणी. पुढेही वारीमध्ये प्रत्येक मुक्कामावर तात्पुरती दुकानं लागलेलीच. बायका-मुली जास्त दिसत होत्या. या उद्योगांची उलाढाल आणि त्यातला बायकांचा वाटा यांची माहिती घ्यायला हवी.
नदीच्या घाटावर गर्दी. माणसं पायऱ्यांवर इथे-तिथे बसलेली. बायकांच्या अंघोळी तिथेच चाललेल्या. घाई नाही. संकोचही नाही. मोजकेच कपडे. पाण्याबाहेर येऊन साडी बदलायची आणि अंगावरची पिळून तिथेच वाळवायची. पुरुषांचे डोळे देवादारी आल्यावर निर्मळ होतात असं या बायकांना वाटतं की काय? मोठ्ठी नथ अडकवलेल्या शेजारी उभ्या बाईंकडे मी पाहते. प्रसन्न हसून त्या म्हणतात, ‘वारी हाय ही. कुणाच्या बी मनात काय बी येत न्हाई.’ बाई दरवर्षी अख्ख्या परिवारासकट वारीला येणाऱ्या. पंधरा-वीसजणांचा घोळका. मुलं आहेत. सुना पण आहेत. ‘पुण्याचं काम आहे हे!’
बाई दिंडीबरोबर आलेल्या नाहीत. त्यांची स्वतंत्र वारी चालली आहे. अशी माणसं पुष्कळ आहेत. दिंडय़ांची संख्याही दरवर्षी वाढतेच आहे. अधिकृत दिंडय़ाच चारशेपर्यंत जातील. प्रत्येक दिंडीत सरासरी चार-पाचशे माणसं. म्हणजे नोंदणी असलेले वारकरीच दीड-दोन लाख होतात. त्यात बायकांची संख्या बहुतेक दिंडय़ांमध्ये पन्नास टक्क्य़ांपेक्षा कितीतरी जास्त आहे. सलग तीन-चार र्वष ही संख्या तपासून पाहायला हवी.
या दिंडय़ा येतात त्या मराठवाडय़ामधून जास्त. पण महाराष्ट्राच्या इतर भागांमधूनही खूप दिंडय़ा येतात. शिवाय आंध्रातून, कर्नाटकातून, गोव्यातून येतात. आणि मध्य प्रदेशातून, गुजराथेतूनही येतात. बायका-बायकाच अगदी छत्तीसगढवरूनही येतात. वारीत चालणाऱ्या अशा दीड-दोन लाख बायकांच्या सहभागाचं भौगोलिक प्रमाण पाहिलं पाहिजे.
वारीत चालणाऱ्या बायकांमध्ये परदेशी पर्यटक आणि अभ्यासक बायका दिसतात, तशाच शहरातल्या हौशी बायका-मुलीही दिसतात. जीन्स घातलेल्या, गॉगल लावलेल्या, मोबाइलवर बोलत चालणाऱ्या. कुणी शिक्षिका, कुणी डॉक्टर, कुणी प्राध्यापक, कुणी गृहिणी.. पुष्कळजणी दिसतात. पण तरी एकुणांत यांचं प्रमाण फार नव्हे. म्हणजे शहरी, अर्धग्रामीण आणि ग्रामीण भागांमधलं वर्गीकरणही पाहायला हवं.
या दिंडय़ांची मुक्कामाची ठिकाणं ठरलेली असतात. कामाची वाटणीही ठरलेली असते. बहुतेक दिंडय़ांमधून बायका धान्य निवडतात, भाज्या निवडतात, चिरतात आणि स्वयंपाकही करतात. मोठय़ा दिंडय़ांमध्ये अशा कामांसाठी बायका मोलानं घेतलेल्या असतात. पण बाप्यामाणसांपेक्षा त्यांना मिळणारी मजुरी कमीच असते,
आणखीही पुष्कळ नोंदी करायला हव्यात. या बायकांच्या खेळांच्या नोंदी. काठवट कणी, धावे, फुगडय़ांचे किती प्रकार खेळतात या. कधी नाचतात, गातात. अभंग, भारूडं आणि ओव्या म्हणतात. तानाजी काळ्यांसारख्या एखाद्या कुणाच्या इंदापूरजवळच्या ओळखीच्या घरात गेलं तरी घरच्या सुभद्राबाई ओव्या म्हणून दाखवतात-
पंढरीच्या वाटे वाट लागली चिखलाची
वाट लागली चिखलाची, संग सोबत इठ्ठलाची
त्यांना अशा पुष्कळ ओव्या पाठ असतात. पूर्वी वारीला जाताना गायलेल्या असतात. आणि आता शरीर थकल्यानंतर, पाऊल अडल्यानंतर त्यांना जडलेली खंतही असते. वारीतल्या बायकांचं हे मौखिक धन टिपून ठेवायला हवं.
* * *
वारीतून चालणाऱ्या बायका डोळ्यांपुढून सरकत जातात. खांद्यावर पताका घेतलेल्या. डोक्यावर हंडे घेतलेल्या. वृंदावन घेऊन चाललेल्या. रंगीबेरंगी लुगडी नेसलेल्या. नऊवारी, पाचवारी, पंजाबी पोशाख, परकर, घागरे.. एखादीशी बोलताना तिच्या नाकातली वेगळीच नथ लक्ष वेधून घेते आणि लक्षात येतं, आळंदीला घाटावर भेटलेल्या बाईंपेक्षा वेगळी आहे हिची नथ. नेसणंही वेगळं आहे. कोणत्या समाजाच्या आहेत या? वेगवेगळ्या समाजांमधल्या या स्त्रियांच्या त्या- त्या समाजांनुसार नोंदी घ्यायला हव्यात.
मुक्कामाच्या ठिकाणी जरा निवांत दिसतात बायका. हसणाऱ्या. गप्पा मारणाऱ्या. आडव्या पडून जुनं काही आठवणाऱ्या. एकीकडे पोराला पाजायला घेऊन दुसरीकडे दुसऱ्या पोराला भरवणाऱ्या. चालून दमलेल्या असल्या तरी दणादणा फुगडय़ा खेळणाऱ्या. एकीकडे त्यांच्या चपळपणाचं कौतुक वाटत राहतं आणि दुसरीकडे मोकळा आनंद अनुभवण्याच्या त्यांच्या असोशीची नवलाई. काय कामं करतात त्या एरवी? काय कमावतात? पैशांची व्यवस्था कशी करतात? घरची व्यवस्था कशी लावतात? महिना महिना घरापासून दूर राहतात या. त्यांच्यासाठी हे येणं किती अवघड. तरी या दरवर्षी नेमानं येतात. अनेक र्वष येतात. यायला मिळालं नाही तर खंतावतात. हट्ट करून, वाद घालून, प्रसंगी नेसत्या साडीनिशी निघून येतात. कशा येतात या? यांची पाश्र्वभूमी आणि येण्याची ओढ समजून घेतली पाहिजे.
विचार केला पाहिजे या बायकांच्या वयाचाही. पाळी येण्याचं वय उलटून गेल्यावर येणाऱ्या जास्त असणार बहुधा. पण वीस-पंचवीस- तीस र्वष नेमानं येणाऱ्या? यांच्या वयाची वर्गवारी करून प्रमाण पाहिलं पाहिजे. तिशी ते पन्नाशीच्या तर पुष्कळ जणी दिसतात. आपल्या मुलाबाळांची व्यवस्था त्या कशी लावतात? मासिक धर्माचं काय करतात? ‘देवळात आणि पालखीजवळ जात नाही अशावेळी. वीणेक ऱ्याला नाही शिवत. बाकी निभतं..’ एकजण म्हणाली. विशी-बाविशीतल्या तरुण होमगार्ड मुलींशी बोलले. पालखीजवळची डय़ूटी असली तर आपापसात बदलून सांभाळून घेतात त्या. एरवी घरी त्याबाबतीत आधुनिक असल्या तरी वारीत देवाचं काम या भावनेनं वागतात त्या. शक्यतो सार्वत्रिक श्रद्धासंकेतांना धक्का लावीत नाहीत.
पण स्वच्छतेचं काय? बायकांचे सर्वात मोठे प्रश्न तर स्वच्छतेचेच असतात. जिथे सर्वासाठीच आरोग्यव्यवस्था अपुरी पडते, तिथे त्या काय करतात? ती प्रचंड गर्दी, ते ऐऱ्यागेऱ्यांचं प्रमाण, ते प्रदूषण, ते नकोसे वाटणारे अनेक प्रकार. बायका एक-दोन दिवस नव्हे, तर महिनाभर स्वीकारतात हे सगळं. कोणत्या प्रेरणेनं? – शोधलं पाहिजे.
बावीस र्वष नेमानं दिंडीत चालणारी अडतीस वर्षांची वर्षां. विदर्भातल्या आर्वीची. नवरा उत्तम नोकरीतला. स्वत:चं घर. दोन मुलं. जंतुनाशकाचा उग्र वास पसरलेल्या एका अंधाऱ्या, ओलसर शाळेच्या खोलीत भेटली. तिला विचारलं, ‘हे सगळं असह्य़ नाही होत?’ म्हणाली, ‘नाही. आपण एरवी स्वत:साठी जगतोच ना! मग वर्षांकाठी एक महिना स्वत:ला विसरून जगायचं. त्यानं बळ मिळतं.’ हे बळ कसलं? बाईपणाचं ओझं बाजूला सारता येण्याचं आणि मोकळेपणा अनुभवण्याचं तर नाही? पाहिलं पाहिजे.
‘काही अतिदरिद्री माणसं दोन वेळच्या जेवणासाठी वारीत घुसतात..’ कुणी म्हणालं. ‘फॅशन म्हणून, हौस म्हणून लोक वारीला येतात-’ आणखी कुणी म्हणालं. ‘गुन्हेगार, मवाली, गुंड येतात-’ असंही कुणी म्हणालं. पण दोन-तीन लाख वारकऱ्यांमध्ये यांचं प्रमाण असं कितीसं असणार? आणि त्यापलीकडच्या शेकडो, हजारो, लाखो वारक ऱ्यांच्या हाल, गैरसोयी, असुविधा सोसण्याच्या प्रेरणा तरी काय आहेत? पंढरीला पोचल्यावर फक्त कळसाचं दर्शन घेऊन परततात अनेकजण. मग वारीत पायी चालत राहणं ही गोष्ट इतकी मोठी आहे यांच्यासाठी? या साध्यासुध्या, फाटक्या, कष्टकरी अशा बहुसंख्य बायकांचं जगणं थोडं तरी उलगडेल का वारीच्या निमित्तानं? त्यांचं प्रेयस-श्रेयस काय हे समजेल का?
दिंडी चालक-मालक असणाऱ्या यमुनाबाई शिंदे, सुशीलाताई कामत, मुक्ताबाई बेलगावकर अशा अगदी मोजक्या बायका आहेत आज. त्यांचं महत्त्व वेगळंच आहे. त्यांच्या दिंडय़ा धंदेवाईक, व्यापारी झालेल्या नाहीत अजून. त्यांची नोंद सविस्तर घ्यायला हवी. वारीच्या एकूण प्रतिष्ठेच्या सोपानात बायकांचे मान किती आणि कुठवर आहेत, तेही पाहायला हवं. महाराष्ट्रातल्या, विशेषत: बहुजन समाजातल्या स्त्रियांना सांस्कृतिक क्षेत्रामधला जाति-धर्मनिरपेक्ष असा हा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरचा सहभाग दुर्लक्षित राहता कामा नये.
* * *
आज पुन्हा एकदा गेल्या वर्षी आम्ही घेतलेल्या छायाचित्रांमधून उठून बायका वारीची वाट चालू लागल्या आहेत. शतकांपूर्वीच्या बायकांच्या पावलांना लागलेली चिखलमाती पुन्हा एकदा त्यांच्या पावलांना लागते आहे. त्या चिखलातून चालताना पूर्वी त्या संत जनाबाईसाठी तिचा विठू तिच्या प्रत्येक पावलावर तिच्यासोबत होता. आणि आज कुणा सुभद्राबाईंची ओवी बाईचं तेच श्रेय सांगते आहे-
‘पंढरीच्या वाटे, वाट लागली चिखलाची,
संग सोबत विठ्ठलाची..’
आज तरी ही एवढी ओवीच हाती आहे. प्रकल्पातले उद्याचे निष्कर्ष आज कसे कळणार? आणि अभ्यासापलीकडेच जो नेहमी उरतो तो जगण्याचा अर्थ तरी पंढरीच्या विठूखेरीज कुणाला माहीत असणार?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा