संजीव अभ्यंकर – sanjeevabhyankar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रसिकांसाठी कला सादर करताना दर्जामध्ये तडजोड न करता गाणे लोभस वाटले पाहिजे याची दक्षता जसराजजी सदैव घेत. रंजकता व बौद्धिकता यांचा सुरेल समतोल असलेले गुरुजी हे दुर्मीळ रसायन होते. त्यांचे स्वर सर्वाच्या मनाला स्पर्श करत. आणि हेच त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचे गमक होते.

‘ख्यालगायन मैफिलीचा जातिवंत व यशस्वी कलाकार’ असेच मी गुरुजी, संगीतमरतड पं. जसराज यांचे वर्णन करेन. जातिवंत मैफिलीचा कलाकार मैफील पूर्णपणे जगतो. मैफील असेल त्या दिवशी अंतर्मुख होण्यापासून त्यांचे मैफिलीचे बौद्धिक नियोजन असायचे. आपण काय गायचे, यापुरतेच ते मर्यादित न राहता मनातील विचार काढून टाकत मनाला मोकळे ठेवणे हे तसे अवघड काम असते. गायनक्रियेशी एकरूप होण्याची त्यांची प्रक्रिया सकाळपासूनच विचाररहित होण्याच्या दृष्टीने सुरू व्हायची. हलकेफुलके वातावरण, विनोद आणि चेष्टामस्करी करणारे गुरुजी मैफिलीच्या दिवशी कमी बोलायचे. स्वरमंडल घेऊन तासभर देवघरात पूजन करायचे. गुरुजींच्या योग्यतेच्या कलाकाराला मैफील चांगली होईल याची काळजी नसायची, तर आपण सर्वोच्च देऊ शकू की नाही याची तळमळ असे. गाणे रंगेल की नाही यापेक्षा ते रंगवता येईल की नाही, हीच भूमिका त्यामागे असायची. शास्त्रीय संगीत ही बौद्धिक कला आहे. विषय समजावून विकसित करताना मैफील फुलवत नेणे ही प्रक्रिया असते. ख्यालगायन उलगडत नेणे ही बौद्धिक प्रक्रिया आहे. आपली क्षमता त्यांना पूर्णपणे ठाऊक होती.

मी गुरुजींकडे शिकण्यासाठी गेलो तेव्हा ते कारकीर्दीच्या सर्वोच्च स्थानावर होते. ते ५३ वर्षांचे होते आणि मी १३ वर्षांचा होतो. वेशभूषेबाबत ते काटेकोर असायचे. जरीकाठ असलेले सिल्कचे धोतर आणि ऑफ व्हाइट रंगाचा सिल्कचा झब्बा ते परिधान करायचे. त्यांच्या धोतराला मी इस्त्री करायचो. त्यांना सौंदर्याची जाण होती. स्वत:च्या आनंदासाठी आणि रसिकांना आनंद देण्यासाठी गायन करणारे गुरुजी स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधत असत. हीच कलेची श्रीमंती आहे. काही क्षेत्रांमध्ये यश हे स्वत:पुरते मर्यादित असते. पण संगीताच्या क्षेत्रात स्वरमंचाने उंची गाठली तर त्यातून रसिकांनाही आनंद मिळतो. गुरुजींच्या गायनामध्ये बौद्धिक आणि आत्मिक आनंद देण्याचे सामथ्र्य होते. कलाकाराने गाठलेला परमोच्च बिंदू रसिकांपर्यंत संक्रमित होत असतो. त्यातून आपण मैफिलीतले अडीच तास वेगळ्याच जगात होतो अशी रसिकांची भावना होते. मनोरंजन आणि आत्मरंजनाचा मिलाफ असलेली त्यांची मैफील ऐकणाऱ्याला वेगळ्याच जगात नेते याचा अनुभव जवळपास चारशे मैफिलींमध्ये स्वरसाथ करताना मी घेतला आहे.

मैफिलीमध्ये रसिक जवळपास तीन तास कलाकारांच्या संचाला पाहतात. त्यामुळे वाद्यांबाबत गुरुजी जागरूक असायचे. स्वरमंडल आणि दोन मोठे तंबोरे हे मुंबईतून मैफिलीच्या ठिकाणी जायचे. पहिल्या रागाला अनुरूप स्वरमंडल लावलेले असायचे. थोडा उशीर झाला किंवा तयार होण्यासाठी वेळ लागला तर गुरुजी रागवायचे. त्यामागे रसिकांचा वेळ वाया जाऊ नये ही कळकळ असायची. मैफिलीमध्ये वादकांबरोबर त्यांचा संवाद प्रसन्न असायचा. कलाकाराला अंतर्मुख होता आले नाही तर रसिकांना आनंद मिळत नाही. मैफील रंगवणे हा प्रतिभेचा भाग असतो. म्हणूनच गुरुजींना ‘रसराज’ पं. जसराज असे म्हटले जायचे. चित्रपट रेंगाळणार नाही याची दक्षता दिग्दर्शक घेत असतो, तसेच मैफिलीचे असते. मैफील मांडण्याचे कसब त्यांनी विकसित केले होते. त्यामागे त्यांचे चिंतन असायचे. त्यामुळेच गुरुजींची मैफील कधीच कंटाळवाणी झाली नाही. रसिकांसाठी कला सादर करताना दर्जामध्ये तडजोड न करता गाणे लोभस वाटले पाहिजे याची दक्षता ते सदैव घेत. रंजकता आणि बौद्धिकता यांचा सुरेल समतोल असलेले गुरुजी हे दुर्मीळ रसायन होते. त्यांचे स्वर सर्वाच्या मनाला स्पर्श करायचे. आणि हेच त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचे गमक होते.

रागांचा मोठा खजिना असलेले गुरुजी कधीही पारंपरिक बंदिशींवर थांबले नाहीत. प्रतिभासंपन्न कलाकाराला आपल्या सौंदर्यदृष्टीला अनुरूप न्याय देऊ शकणाऱ्या रचना लागतात. अशी रचनांची निर्मिती गुरुजींनी केली आणि त्या रचनांवर आपला ‘स्टॅम्प’ निर्माण केला. म्हणूनच ९० व्या वर्षांपर्यंत रसिकांना ते हवेहवेसे वाटायचे. मेवाती घराण्याची गायकी गुरुजींनी समृद्ध केली. कणस्वरांचा वापर, मींडचा वापर, स्वच्छ शब्दोच्चार, तीन सप्तकांचा वापर, ठहरावयुक्त आलापी ही त्यांच्या गायनाची वैशिष्टय़े होती. स्वरांवर प्रेम करण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. घराण्याच्या साचेबद्धतेमध्ये न राहता घराण्याच्या गायकीचे मूल्यात्मकदृष्टय़ा सौंदर्य त्यांनी वाढवले. सरगममध्ये लयकारी हा घटक त्यांनी आणला. खर्जासह मंद्र, मध्य आणि तार अशा तीन सप्तकांचा समतोल वापर त्यांनी गायकीमध्ये केला. त्यामुळे त्यांच्या गायनामध्ये सौंदर्याबरोबरच रंजकता आली. शंृगार, भक्ती, करुण रसाच्या रागाला पूरक भाव घेऊन त्याला न्याय देणाऱ्या त्यांच्या तानांमध्ये विविधता होती. तालाबरोबर मिठी मारत जाणाऱ्या गमकेच्या ताना, गतिमान सपाट ताना, कापून जाणाऱ्या आणि अंगावर मोरपीस फिरवणाऱ्या मऊ, मुलायम ताना हे त्यांच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. नैसर्गिक आवाजामुळे नादमाधुर्य एकसारखे टिकायचे. त्यांचा आवाज गहिरा होता. पण तो गोड होता. असा समतोल साधणे अवघड असते.

गुरुजी खाण्याची पथ्ये कटाक्षाने पाळायचे. गोडावर नियंत्रण, चालण्याचा व्यायाम आणि जमेल तेवढे घरातील खाण्यावर त्यांचा भर असे. जेथे जातील तेथे त्यांच्या ओळखीचे गुरुजींसाठी घरचा डबा घेऊन यायचे. गायक म्हणून ऊर्जा आणि एकाग्रता टिकवण्यासाठी आवश्यक ते सर्व ते करीत. दिलखुलास गप्पा मारायला त्यांना आवडत असे. परंतु आवश्यक तेव्हा ते मौनही बाळगत. शिष्य आणि साथीदार बरोबर असले तरी सर्वामध्ये राहूनही एकटे राहण्याचे कसब त्यांच्यापाशी होते. अनेकदा ते एकटेच बसून पत्त्याचा डाव लावत असत. आवाज बंद करून क्रिकेटचा सामना पाहणे हे गप्प राहण्याचे अस्त्र त्यांच्याकडे होते. सकारात्मकता हा त्यांचा गुण होता. दुसऱ्या कलाकाराबद्दल चांगले बोलायचे हा त्यांचा कटाक्ष होता. एखाद्या कलाकाराची आलापी आवडली नाही अशी आम्ही शिष्य चर्चा करायचो तेव्हा ‘त्याच्या ताना किती छान होत्या..’ असे गुरुजी आम्हाला म्हणायचे. त्यामुळे गुरुजी कलाकारांमध्येही लोकप्रिय होते. त्यांचे गाणे त्यांना आवडायचे, तितकेच त्यांचे व्यक्तित्वही! सतत कार्यमग्न राहणे आणि लोकांना भेटणे हा त्यांचा स्थायीभाव होता. खूप लोक त्यांच्याशी जोडले गेले आणि शेवटपर्यंत ते गुरुजींच्या संपर्कात राहिले. एका अर्थाने गुरुजी हे लोहचुंबकासारखे सर्वाना आकर्षित करून घेणारे व्यक्तिमत्त्व होते. माझी आजी आजारी आहे असे समजल्यावर पुण्याला मैफिलीसाठी आलेल्या गुरुजींनी दुसऱ्या दिवशी सकाळी आजीची भेट घेतली आणि नंतर ते मुंबईला गेले. मी आवडता शिष्य म्हणून नव्हे, तर सर्वाशीच ते तितक्याच आपुलकीने वागायचे. एखाद्या कलाकाराला यश मिळते त्यामागे त्याचे किती कष्ट असतात याची जाणीव गुरुजींकडे पाहिल्यानंतर होत असे. गायनामध्ये रसनिष्पत्ती नशिबाने होत नाही, तर त्यामागे कलाकाराचे अपार कष्ट आणि सततची कर्मसाधना असते. ‘रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे’ असे म्हटले जाते, ते गुरुजींना लागू होते. रसिक पं. जसराज यांच्यावर इतके प्रेम करतात त्यामागे त्यांची वर्षांनुवर्षांची मेहनत आहे याची प्रचीती सतत येत राहिली.

गुरू म्हणून शिकवताना ‘स्वरांवर प्रेम करा,’ असे ते नेहमी सांगायचे. ‘सुरों से प्यार करो, उनको सहलाओ, बहलाओ,’ हा त्यांचा संदेश असायचा. रागाच्या भावाशी एकरूप व्हायला ते सांगत. स्वरांना आपण कसे वश केले अशी भावना असता कामा नये. कला ही कलाकारापेक्षा मोठी आहे. त्यामुळे स्वरांनी कृपा करावी असे आवाहन करण्याची सूचना गुरुजी करत. गात असताना रागभावाचे अवतरण होते, तेव्हा ती जादू ही समर्पणभावातून येते याची प्रचीती गुरुजींच्या गायनातून येते. स्वर हे त्यांच्यासाठी ईश्वर होते. त्यामुळे स्वरांवर कुरघोडी करणारे नव्हे, तर दैवी स्पर्श घेऊन त्यांचे गाणे गळ्यातून यायच याचा प्रत्यय मी अनेकदा घेतला आहे.

गुरुजी वर्षांतून दोनदा महिनाभराची शिबिरे घ्यायचे. १९८५ मध्ये कर्जतजवळील नसरापूर, १९९१ मध्ये भोपाळ आणि १९९२ मध्ये वाराणसीला गंगेच्या किनारी झालेल्या शिबिरांमध्ये मी सहभागी झालो होतो. मैफिलीमध्ये धबधबा असलेल्या गुरुजींना शिकवताना झऱ्याचे रूप प्राप्त व्हायचे. गुरुजींच्या प्रतिभेने या झऱ्याचा धबधबा होतो याचा अनुभव मी मैफिलीमध्ये घेतला आहे. आपल्याला काय करायचे आहे याचा मापदंड गुरुजींनी घालून दिला. हॉटेलमध्ये, प्रवासामध्ये त्यांच्याशी चर्चा व्हायची. मधुरा वहिनी, दुर्गा आणि शारंगदेव यांनी शिष्यांना परिवाराचा भाग मानले. शिष्य ही आपली सांगीतिक मुले असल्याची गुरुजींची भूमिका घरच्यांनी मान्य करून आमच्यावर पुत्रवत प्रेम केले. ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’ या धर्तीवर गुरुजींचे गाणे माझ्याकडे वाहत आले. माझ्या गाण्याचा प्रकृतिधर्म त्यांच्या गाण्याशी जुळला. आमची गुरू-शिष्याची जोडी स्वर्गातच झाली असावी. त्यांचे गाणे माझ्यामध्ये वाहत प्रवाही झाले असेच मी मानतो.

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी