नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात नाव कमावलेल्या अनेक गायक-गायिकांनी मराठी सुगम संगीतातसुद्धा मुशाफिरी केली आणि रसिकांच्या मनामध्ये प्रेमाचं स्थान मिळवलं. मागील एका लेखामध्ये विदुषी माणिक वर्मा यांच्या सुगम संगीतातील अजोड कामगिरीविषयी आपण विस्तृतपणे वाचलं आहे. ‘भारतरत्न’ पं. भीमसेन जोशी यांनीही ‘संतवाणी’च्या माध्यमातून अनेक अभंग रसिकांसमोर मांडले आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. पं. जितेंद्र अभिषेकी यांनीही मराठी नाटय़संगीतात अजोड कामगिरी केली आणि स्वत:ची एक छाप त्यावर सोडली, त्याविषयी आपण मागील लेखात वाचलं. परंतु कितीही म्हटलं तरी वरील सर्व संगीतकार आणि गायकांनी एका परंपरेला धरून आणि त्यात आपली स्वत:ची भर टाकून हे आविष्कार रसिकांसमोर मांडले. परंतु रचनेत आणि गायकीतही पूर्णपणे नवीन विचार मांडून  अत्यंत क्रांतिकारी कामगिरी करणारे दोन मोठे गायक आणि रचनाकारांच्या कामगिरीची दखल घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ही दोन नावे म्हणजे जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी किशोरी आमोणकर आणि पं. कुमार गंधर्व.

गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि पं. कुमार गंधर्व या दोघांनाही उच्च प्रतीची घराणेदार तालीम मिळाली होती. परंतु केवळ घराण्याच्या बंदिस्त वातावरणात राहून आपल्या कलेचा उत्कर्ष करणे दोघांनाही फारसे मान्य नव्हते. त्यामुळे जिथून मिळेल ते, ते ग्रहण करत आणि त्याचा उपयोग आपल्या गायनाविष्कारात करून एका निराळ्याच पद्धतीची गायकी दोघांनीही विकसित केली. असं म्हटलं तर वावगं ठरू नये की, स्वत:ची स्वतंत्र अशी घराणीच त्यांनी निर्माण केली.

किशोरीताईंचं संगीताचं शिक्षण प्रामुख्याने त्यांच्या मातोश्री मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे झालं. भेंडीबजार घराण्याच्या अंजनीबाई  मालपेकर यांच्याकडेही त्यांनी शिक्षण घेतलं. परंतु त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकल्या की मात्र जयपूर घराण्याची गायकी त्यांच्यामध्ये किती भिनली आहे याचं पुरेपूर प्रत्यंतर येतं. इतर गायिकांनी विलंबित एकताल, झुमरा व तिलवाडा यासारख्या तालांमध्ये बंदिशी गायल्या तशा किशोरीताईंनी गायल्या नाहीत. त्यांनी पारंपरिक पद्धतीने विलंबित तीनताल आणि क्वचित झपतालसारखे जयपूर घराण्याचे ताल सादरीकरण करण्याकरता वापरले. परंतु जयपूर- ग्वाल्हेर यासारख्या घराण्यांच्या गायकीमध्ये असलेला एक प्रकारचा अवजडपणा त्यांनी पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या शास्त्रीय गायकीला एक लालित्य प्रदान केलं. या लवचीक भूमिकेमुळे त्यांच्या कर्मठ जयपूर गायकीला एक निराळंच विलोभनीय रूप प्राप्त झालं.

मराठीत संगीतकार म्हणून किशोरीताईंनी खूप कमी काम केलं. त्यातही बहुतेक सर्व गाणी या संतांच्या रचना होत्या. परंतु त्या सर्व रचनांमध्ये त्यांचा अत्यंत सौंदर्यवादी दृष्टिकोन प्रकर्षांने दिसून येतो. स्वर लावण्याची पद्धत, शब्द फेकताना केलेला ध्वनीचा चढउतार आणि शास्त्रीय बैठक असूनसुद्धा शास्त्रीय गायकांमध्ये क्वचित आढळणारा vibrato चा अतिशय मोजूनमापून उपयोग अशा सर्व गोष्टींमुळे त्यांच्या अभंगांमध्ये एक वैशिष्टय़पूर्ण असं माधुर्य ऐकू येतं. किशोरीताई या आत्ताच्या गायिकांच्या जवळजवळ तीन पिढय़ा अलीकडच्या गायिका; परंतु तरीही त्यांचा गाण्यातला आधुनिकपणा आजही आपल्याला अतिशय आश्चर्यमुग्ध करतो. त्यांचं कुठलंही गाणं ऐकलं की ते पूर्णपणे आजचं वाटतं. कुठलीही ओळ सोडताना ज्या पद्धतीने शेवटच्या सुराची आस त्या ठेवतात ते अतिशय विलक्षण आहे. बहुतेक शास्त्रीय गाणाऱ्या लोकांना एखादी गाण्याची ओळ संपताना volume fade out करत जाणं जमत नाही. एखादं बटण बंद करावं त्याप्रमाणे त्यांचा आवाज अचानक थांबतो. रसनिष्पत्तीकरता fade in आणि fade out ही फार परिणामकारक आयुधे आहेत, हे बऱ्याच जणांच्या गावीसुद्धा नसतं. परंतु जवळजवळ साठ-सत्तर वर्षांपूर्वी किशोरीताईंना हे उमगलं होतं आणि त्याच्या जोरावर त्यांच्या गायकीने एक अतिशय उत्तुंग परिणाम साधला होता याविषयी कुणाचंही दुमत असण्याची शक्यता नाही.

किशोरीताईंच्या सर्व रचनांमध्ये अतिशय ठळकपणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे त्या सर्व रचनांना मिळालेला एक अतिशय दमदार आणि सुरेल ठेका! काही गाण्यांमध्ये सतार व बासरी अशा वाद्यांची योजना केलेली आहे. परंतु केवळ मृदंगाच्या त्या ठेक्यामध्ये समोरच्याला खिळवून ठेवण्याचं जबरदस्त सामथ्र्य आहे. बाकी कशाचीही गरज नाही असं वाटतं. आणि या सर्व रचनांचा एक स्थायीभाव आहे, तो म्हणजे त्यातील शांतता. या अतिशय दमदार ठेक्याच्या पाश्र्वभूमीवर उंच आकाशात मनमुराद विहरणाऱ्या पक्ष्याप्रमाणे किशोरीताईंचा सूर आपल्याला देहभान विसरायला लावतो. या गाण्यांमध्ये कुठेही कुठल्याही प्रकारची घाई नाही. दोन ओळींच्या मध्येसुद्धा भरपूर विराम आणि त्यामध्ये ऐकू येणारा पखवाजाचा सुरेल नाद. ज्याला आपण Trance Music म्हणतो, त्याचं हे अभिजात भारतीय रूप! किशोरीताईंच्या गाण्यांमध्ये बऱ्याचदा दोन भिन्न राग एकत्र झाल्याचे आपल्याला दिसून येतात. ‘अवघा तो शकुन’ या गाण्यात देवगंधार आणि भूपेश्वरी या रागांचा झालेला रम्य संगम आणि ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ या अभंगात विभास आणि तोडी यांचा अत्यंत कल्पक वापर अत्यंत स्तिमित करणारा आहे. तसेच ‘या पंढरीचे सुख’सारख्या अभंगात यमन रागाचं जे दर्शन आपल्याला घडतं, तेसुद्धा कमाल आहे. किशोरीताईंची अत्यंत पकड घेणारी गायकी आपल्याला या गाण्यात दिसून येते. ‘अवघा रंग एक झाला’मधील भैरवीसुद्धा अशीच अद्वितीय! मराठीमध्ये भैरवी रागात ज्या ज्या रचना झाल्या त्यामध्ये निदान माझ्या तरी मते या गाण्याला अग्रमानांकन मिळेल. परंतु या सर्व गाण्यांमध्ये माझं सगळ्यात आवडतं गाणं म्हणजे ‘मी माझे मोहित.’ अतिशय चमत्कृतीपूर्ण आणि कुठल्याही एका रागाशी बांधिलकी न जपणारी ही चाल! परंतु त्यातसुद्धा इतका ठहराव आहे की सर्व विसरून हे गाणं फक्त ऐकत राहावं असं वाटतं. स्वत:च्या संगीतरचना सोडून किशोरीताईंनी इतर संगीतकारांकडेही फार अप्रतिम गाणी गायली. बाळासाहेब मंगेशकर यांच्याकडे ‘हे शामसुंदर’ आणि‘जाईन विचारीत रानफुला’ या तर सुगम संगीतातल्या बंदिशीच म्हणता येतील. तसंच ‘बिल्हण’ या संगीतिकेकरता पु. ल. देशपांडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी ‘सात समुद्रापलीकडुनी’सारखी रचनाही गायली. परंतु त्यांच्या स्वत:च्या रचनांमध्ये ज्या प्रकारचं सामथ्र्य आहे त्याला खरोखरच जवाब नाही. इतका शांतरस भरून राहिलेले अभंग आपल्याला खूप क्वचित ऐकायला मिळतात. किशोरीताईंनी हा आनंद आपल्याला भरभरून दिला यात काहीच वाद नाही.

पं. कुमार गंधर्व यांच्यावर खयाल गायनाची एक वेगळी पद्धत मांडल्याबद्दल अनेक परंपरावादी लोकांकडून टीका झाली आणि रूढीप्रिय रसिकांना पण त्याचा सुरुवातीला थोडासा त्रासच झाला. स्वत: त्यांचे गुरू देवधर मास्तर यांनासुद्धा त्यांची ही गायकी मान्य नव्हती. परंतु कुमारजींनी या स्वतंत्र पद्धतीवर अतिशय सूक्ष्म अभ्यास केला होता आणि त्याच्या परिणामकारकतेविषयी त्यांच्या मनात कुठलीही शंका नव्हती. शारीरिक मर्यादांमुळे त्यांचा श्वास जास्त काळ टिकत नसे आणि त्यांच्या स्वराची पट्टीसुद्धा इतर गायकांच्या तुलनेत खूप वरची होती. जी कदाचित त्यावेळच्या खयाल गायनाला पोषक नव्हती असं म्हणता येईल. परंतु तरीसुद्धा या मर्यादांमध्येच त्यांना स्वत:ची ओळख सापडली आणि अत्यंत धाडसाने त्यांनी स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले.

तब्येतीच्या कारणास्तव कुमारजी देवासला राहायला गेले आणि तिथे त्यांच्यातला रचनाकार आकार घेऊ लागला. अत्यंत डोळसपणे त्यांनी संगीताचा आणि त्यातील सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केला. माळव्यातील लोकसंगीत त्यांच्या कानावर पडलं आणि त्यातून खास कुमार धाटणीच्या रचना निर्माण झाल्या. लगन गांधार, मधसूरजा, बीहडभैरव, संजारी आणि सहेली तोडी यांसारखे धूनउगम राग निर्माण झाले. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा मिलाफ याआधी झाला होता. परंतु तो उपशास्त्रीय ठुमरी- दादरा यापुरता मर्यादित होता. परंतु कुमारजींनी खयाल गायनावर या लोकसंगीताचे रोपण केले व एक निराळाच मेळ आपल्याला ऐकायला मिळाला.

या लोकसंगीतातील तालाचं तत्त्वसुद्धा त्यांनी आपल्या रचनांमध्ये समाविष्ट केलं. ‘लहानपण देगा देवा’ हे गीत आपण नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की त्याचा ठेका एका विशिष्ट प्रकारचा आहे. कुमारजींच्या बऱ्याच निर्गुणी भजनांमध्ये हा ठेका आपल्याला आढळतो. रूढार्थाने भारतीय संगीतात वापरल्या जाणाऱ्या ठेक्यांमध्ये सम आणि काल अशी रचना असते. परंतु या ठेक्यात दर चार मात्रांनंतर समच येते. या ठेक्यात खालीची जागाच नाही. लोकसंगीतातील कलावंत हे शास्त्रीय तालीम घेतलेले नसतात. निसर्गातून, रोजच्या जगण्यातून आणि आपल्या उपजत प्रतिभेतून निर्माण होणारं त्यांचं संगीत! सम-कालाच्या नियमांमध्ये ते बसत नाही. वरवर अशास्त्रीय आणि चुकीची वाटणारी ही गोष्ट कुमारजींना खूप मोहक आणि स्वाभाविक वाटली. आणि त्याच्यातील सौंदर्याने ते आकर्षित झाले. त्याच्यातला कच्चेपणा किंवा आजच्या भाषेत ज्याला आपण rawness असं म्हणतो, तो rawness कुमारजींना फार पूर्वीच दिसला होता. कुमारजींनी गायलेलं अजून एक भजन आहे. तुकाराम महाराजांचं ‘लक्ष्मीवल्लभा दीनानाथा पद्मनाभा..’ या अभंगातसुद्धा हाच प्रकार आपल्याला दिसतो.

अभंगांबरोबर कुमारजींनी फार अप्रतिम अशी भावगीते पण संगीतबद्ध केली. आणि त्यातही स्वत:चा एक विचार अत्यंत ठळकपणे त्यांनी मांडला. कवी अनिल यांचं ‘अजुनी रुसून आहे’ किंवा ‘आज अचानक गाठ पडे’ आपण जरूर ऐका. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की कुमारजी आपण नेहमी ऐकलेल्या रागाचे सूरसुद्धा वेगळ्याच पद्धतीने गाताहेत! म्हणजे स्वरांची स्थानेच पूर्णपणे वेगळी! उदाहरणार्थ- ‘आज अचानक गाठ पडे’ या संपूर्ण मालकंसमधील (काही जाणकारांच्या मते, हा  मध्यमापासून गायलेला भीमपलास आहे.) गाण्यात त्यांनी लावलेला कोमल गंधार हा आपण याआधी ऐकलेल्या कोमल गंधारापेक्षा इतका चढा आहे की क्षणभर आपण चक्रावून जातो. परंतु कुमारजींनी अत्यंत डोळसपणे आणि जाणूनबुजून तो तसाच वापरलेला आहे. आणि पहिल्यांदा पचनी पडायला जड गेलं तरीसुद्धा नंतर त्याची जादू आपल्याला कळायला लागते. राजा बढे यांनी लिहिलेल्या ‘कोणा कशी कळावी’ या गाण्यातसुद्धा कुमारजींनी बिनधास्तपणे शब्द मधेच तोडलेले आहेत! तसं करताना त्यांना काही वावगे वाटलेले दिसत नाही. फार लहानपणी Robert Herrick या कवीची ‘Delight in disorder’ ही कविता वाचली होती आणि ती खूप आवडली पण होती. भारतीय अभिजात संगीतातसुद्धा या लोकसंगीतातून प्रेरणा घेतलेल्या ‘Delight in disorder’ अतिशय सुंदर प्रयोग होऊ शकतो हे जाणणारे पं. कुमार गंधर्व हे पहिलेच असावेत. इतका क्रांतिकारी विचार एका अत्यंत घराणेदार तालीम मिळालेल्या गायकाने करणं हे खरोखरच अत्यंत विस्मयकारक आहे!

स्वत:च्या संगीतरचना सोडून कुमारजींनी वसंत देसाई या संगीतकाराकडेही काही अप्रतिम गाणी गायली. बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेले‘उठी उठी गोपाळा’ किंवा ‘ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी’ ही गाणी अतिशय श्रवणीय आहेतच, परंतु एवढेच नाही तर Volume Control आणि Dynamics या पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातून जन्म घेतलेल्या अस्त्रांचा अत्यंत सुंदर वापर कुमारजी त्यांच्या सर्व गाण्यांमध्ये करताना दिसतात. नटसम्राट बालगंधर्व यांच्या गायकीचासुद्धा त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केला आणि ‘मला उमजलेले बालगंधर्व’ ही मालिका रसिकांसमोर अर्पण केली. नुसते संगीतच नव्हे, तर उत्तम साहित्य, उत्तम स्थापत्यकला, उत्तम चित्रकला, शिल्पकला आणि अन्य अनेक क्षेत्रांमध्ये ते संचार करत. या सगळ्यातील सुंदर आणि मोहक गोष्टींचा अर्क आपल्या संगीतात मिसळून कुमारजींनी जो रस निर्माण केला त्याला खरोखरीच तोड नाही.

किशोरीताई आणि कुमारजी यांच्या शास्त्रीय गायकीबद्दल बऱ्याच लोकांनी लिहिलेले आहे. परंतु मराठी संगीतात त्यांनी दिलेलं योगदान हे इतर शास्त्रीय संगीतकारांपेक्षा खूप वेगळं आहे आणि खूप स्वतंत्र विचारांचं आहे. जेव्हा अतिशय तीक्ष्ण प्रज्ञेचे कलावंत आपला परीघ सोडून मुक्तपणे संचार करतात तेव्हा त्यांच्या आविष्कारांना एक निराळीच उंची प्राप्त होते. त्याच त्याच प्रथांमध्ये अडकलेल्या कुठल्याही कलेला तिच्या कक्षा विस्तारण्याकरता अत्यंत प्रतिभावान आणि भ्रमर वृत्तीच्या उत्तुंग माणसांची गरज असते. किशोरीताई आणि कुमारजी यांनी मराठीत केलेल्या कामाचा संख्यात्मक आवाका एवढा नसेल कदाचित; परंतु मराठी संगीतकलेला आज जी उंची प्राप्त झाली आहे, त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, हे मात्र शंभर टक्के सत्य!