‘मी चिक्की खाल्ली नाही. मी कागद उचलणार नाही..’ महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री सुश्री पंकजाताईसाहेब मुंडे (ही तो आठ कोटी जन्तेची इच्छा! आता त्याला कोण काय करणार?) यांनी ही गर्जना केली आणि तुम्हांस lok01सांगतो, डोळ्यांच्या कडा ओलावल्या आमच्या! लोकमान्यच आठवले हो आम्हांला! डिट्टो तोच आत्मविश्वास! तोच करारी बाणा! फरक एवढाच की, लोकमान्यांनी शेंगदाण्यांच्या निमित्ताने अशी सिंहगर्जना केली होती. तेव्हा ते लहान होते. ताईसाहेबांनी शेंगदाण्यांच्या चिक्कीच्या निमित्ताने ही डरकाळी फोडली. त्या मात्र लहान नाहीत. किंबहुना त्या महानच आहेत! (हेसुद्धा आठ कोटी जन्तेचे म्हणणे! त्याला कोण काय करणार?)
‘पण ताईसाहेब, विरोधक म्हणतात तुम्हीच चिक्की खाल्ली..’ हे बोलताना आमचे मन शतश: विदीर्ण झाले होते. घशाला कोरड पडणे, हात थरथर कापणे, पाय लटपटणे, सर्वागास घाम फुटणे ही मन विदीर्ण झाल्याचीच तर लक्षणे आहेत. ताईसाहेबांसमोर उभे राहिल्यावर कोणाचे बरे मन विदीर्ण होत नाही. ताईसाहेबांचा दरारा आणि जरबच तशी आहे. अखेर कोटी कोटी जन्तेचे आशीर्वाद त्यांच्यामागे आहेत! आता त्याला कोण काय करणार?
‘कोण विरोधक? आं? घरभेदे म्हणा त्यांना घरभेदे.. त्या घरभेद्यांना चांगलं माहीत आहे मला लहानपणापासूनच चिक्की आवडत नाही ते. दातात अडकते हो ती. मग सतत टूथपिकने टोकरत बसावं लागतं. आता आपण राज्य चालवत असताना असं दात कोरणं का चांगलं दिसतं? कित्ती म्यानरलेस ना ते!’
‘शी: फारच वाईट ते,’ असे म्हणत आम्ही मुंडी हलवली. कोणत्याही वरिष्ठांशी बोलताना आम्ही पत्रकारितेतील हे एक तत्त्व आवर्जून पाळतो. याबाबत आमचे गुरू मुकेशजी. त्यांचे -‘जो तुम को हो पसंद वहीं बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहों रात कहेंगे’ हे राष्ट्रगान आमच्यासारख्या तमाम उपसंपादकांना अगदी वेदमंत्रांहून वंद्य! पण ते असो.
तिकडे ताई सांगत होत्या, ‘आता एवढं काम केल्यानंतर आराम करण्यासाठी कुठं लोणावळ्याला वगैरे जावं असं का मला वाटत नाही? पण मी अमेरिकेला जाते. लोणावळ्याला नाही. का? विचारा..’
‘का?’
‘तिथं चिक्की मिळते ना!’
‘होहोहो.. अरेच्चा! हे तर आमच्या ध्यानीच आलं नव्हतं.’ हेही आमचं पत्रतत्त्वच!
‘परवासुद्धा मी अशीच अमेरिकेला गेले होते. तर इकडं घरभेद्यांनी डाव साधला. त्यांना विचारा, लहान असताना सतत चिक्की कोण मागायचं ते? दरकरारानुसार आठाठ आण्याची पाकिटं एकटा हजम करायचा हो! आम्हाला आपली चॉकलेटंच मिळायची.’
बालपणीच्या आठवणींनी ताईसाहेबांच्या डोळ्यांत किंचित पाणी उभे राहिले. ताईसाहेबांच्या डोळ्यांत असे पाणी आले की आमच्या काळजाचे इकडे पाणीपाणी होऊन जाते. काळजाच्या कुहरात ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ या बाबागीताचे सूर रुंजी घालू लागतात. तुम्हांस सांगतो, महाराष्ट्रातील आठ कोटी जन्तेचेही असेच होत असणार. अगदी गॅरंटीने!
‘बघा ना, पक्षातील मंडळीसुद्धा तुमच्या पाठीशी नाहीत अशा वेळी..’ आम्ही विषयास वेगळी कलाटणी दिली. आम्हांस कुणाच्या मनीच्या वेदना सहन होत नाहीत. लताबाईसुद्धा बाळ आणि बाबांचे सूर लावू लागल्या की आम्ही च्यानेल बदलतो.
‘कोण म्हणतो असं?’ ताईसाहेब कडाडल्या, ‘सगळा पक्ष माझ्यामागे उभा आहे. महाराष्ट्रातीलच कोटी कोटी जन्ता माझ्यामागे उभी आहे. बाबांचे आशीर्वाद माझ्यामागे उभे आहेत. या जन्तेची सेवा करण्यासाठी काय वाट्टेल ते करावं लागलं तरी मी ते करीन. चिक्की मला आवडत नाही. एक रुपयाचीही चिक्की मी खाल्ली नाही. पण उद्या वेळ आली तर मी तेसुद्धा करीन.. कोण आहे रे तिकडं? आणा तो पुडा.’
आतून सेवकाने एक भलाथोरला पुडा आणून ठेवला. ताईंनी तो फोडला. वरचा कागद भिरकावून दिला. तर आत चक्क चिक्की.
‘त्या राष्ट्रवादीवाल्यांनी पाठवलीय. म्हणाले, खाऊन पाहा,’ बोलता बोलता ताईसाहेबांनी एक वडी आधी नाकाला लावली. मग तोंडात टाकली.
‘घ्या. पाहा. आम्ही चिक्की खाल्ली. माझ्या महाराष्ट्रातील शोषिक, कुपोषित जन्तेसाठी मी काहीही करीन..’
‘ताईसाहेब, ताईसाहेब, केवढं दिव्य केलंत हे! विरोधकांप्रमाणेच तुम्हीही चिक्की खाल्लीत!’
‘हो,’ त्या उठता उठता म्हणाल्या, ‘पण तरीही हा कागद मात्र मी उचलणार नाही!’
ताईसाहेबांच्याकडून आल्यापासून आम्ही आमचे लघु आणि गुरू असे दोन्हीही मेंदू शिणवत आहोत. पण त्यांच्या त्या गर्जनेचा अर्थ आम्हांस अजून काही लागलेला नाही!
balwantappa@gmail,com

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Supriya Sule on GOd
Supriya Sule : नवरात्रीचे नऊ दिवस उपवास अन् पांडुरंगावर भाबडं प्रेम; सुप्रिया सुळे श्रद्धेविषयी काय म्हणाल्या?
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा