अनुवाद हा माझा अत्यंत आवडता लेखनप्रकार आहे. गंमत म्हणजे अनुवादलेखनाचा माझा पहिला प्रयत्न मी कवी म्हणूनच केला.. आणि तोही तब्बल चाळीस वर्षांपूर्वी. त्या प्रदीर्घ काव्यानुवादाचं शीर्षक होतं- ‘परछाईयॉं.’
आज एकूणच इंटरनेट नामक महाशक्तीमुळे जग खरोखरच लहान होत चाललं आहे. त्यामुळे सारे भलेबुरे सांस्कृतिक प्रवाह पाहता पाहता आपल्या देशाच्या पार कानाकोपऱ्यात क्षणार्धात पोचतात. पण ५० वर्षांपूर्वीची परिस्थिती खूप वेगळी होती. केवळ आपल्या मराठी विश्वापुरतं बोलायचं तर पुणे आणि मुंबई ही दोन प्रमुख केंद्रं सोडली तर बाकीचे प्रदेश सर्वच दृष्टीनं लौकिकदृष्टय़ा तरी मागासलेले असेच असायचे. मी अशा काहीशा मागासलेल्या प्रदेशातच लहानाचा मोठा झालो. त्यामुळे उर्दू शेरोशायरीचं अनोखं विश्व माझ्यापर्यंत पोचणं ही वरकरणी तरी अशक्यप्राय गोष्ट होती. अगदी सर्वत्र सक्तीची भाषा म्हणून पोचलेली हिंदी भाषासुद्धा. राष्ट्रभाषा परीक्षा नामक चाळणीतून आमच्यापर्यंत पोचायची. तिथं यह-वह-कहते है वगैरे शब्द जसे लिहितो तसे आणि तसेच उच्चारायचे, ही शुद्ध तुपात घोळून काढलेली उच्चारणपद्धती रूढ होती. दुसऱ्या टोकाला गावठी मिर्जी हिंदी (म्हणजे मिरज नामक गावी बोललं जाणारं) प्रचलित होतं. म्हणजे मय बोल्या, मय दौडय़ा अन् धपकन पडय़ा.. वगैरे. असल्या या धुरोळ्यातून वाट काढत, खानदानी उर्दू भाषेतील साहिर लुधियानवी नामक तालेवार शायर, माझ्यापर्यंत शालेय वयात असताना पोचावे आणि तेही त्यांच्या गैरफिल्मी उर्दू अदबी शायरीतून, ही अद्भुत घटनाच म्हणावी लागेल. साहिर माझ्यावर सर्वप्रथम गुदरले ते त्यांच्या ‘ताज’ नामक सुप्रसिद्ध कवितेतून..
ताज तेरे लिये इक मजहर-ए-उल्फतही सही
तुझ को इस वादी-ए-रंगी से अकीदत ही सही
..मेरे मेहबूब, कही और मिला कर मुझसे..
यातले निम्मेअधिक उर्दू शब्द मला ऐकूनही ठाऊक नव्हते. तिथं त्यांचा अर्थ समजणं ही तर दूरची गोष्ट, पण तरीही आश्चर्य म्हणजे शब्दार्थाचे अडसर ओलांडून त्या कवितेचा भावार्थ माझ्या अंत:करणाला खोलवर आणि थेट भिडला. कवी आपल्या प्रेयसीला सांगतो आहे की, ‘तुला हा ताजमहाल प्रेमाचं स्मारक वाटत असेल तर असो बापडा, इथलं रूपसौंदर्य तुला मोहवत असेल तर तेही असो. पण प्रिये, आपल्या भेटीसाठी हे संकेतस्थळ नको. कुठेही दुसरीकडे भेटू, पण इथे नको.’ ही जगावेगळी मागणी करण्याचं कारण काय ते पुढची कविता वाचताना हळूहळू उलगडत गेलं. आणि शेवटच्या चार ओळी वाचल्यावर तर त्या ऐतिहासिक वास्तूकडे पाहण्याचा हा कवीचा एक वेगळाच अनोखा दृष्टिकोन नव्यानं जाणवला..
ये चमन, जार, ये जमना का किनारा, ये महल
ये मुनक्कश दरोंदिवार, ये मेहराब, ये ताक
इक शहेनशाहने दौलत का सहारा लेकर
हम गरिबों की मुहब्बत का उडाया है मजमक..
..मेरे मेहबूब, कही और मिला कर मुझसे..
या एकाच कवितेनं मी साहिर लुधियानवी या कवी नामाशी कायमचा जोडला गेलो. साहजिकच साहिरमहाराजांचे दीवान (काव्यसंग्रह) पैदा करणं ओघानंच आलं. पुढे पौंगडावस्थेतून तारुण्यात येत असताना गुरुदत्तजींचा अतुलनीय ‘प्यासा’ भेटला. तो साहिरच्या कवितांतूनच विणला होता. मुख्य म्हणजे त्यातल्या पडद्यावर प्रभावी चित्रणातून साकार झालेल्या दोन दीर्घ कविता मला नव्या नव्हत्या. त्या पुस्तकातून आधीच आयुष्यात सामावल्या होत्या. ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहाँ है’ आणि ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’.. आणि याच वाचनमुशाफिरीत मला साहिर लुधियानवी यांचं खूप गाजलेलं एक अनोखं दीर्घकाव्य मिळालं.. त्यानं मी जणू झपाटलाच गेलो. त्या दीर्घ-प्रदीर्घ कवितेचं शीर्षक होतं- ‘परछाईयाँ’.
एक लख्ख पौर्णिमेची रात्र आसमंतात बहरली आहे. पण अत्याचार आणि निर्दय हिंसाचार यामध्ये आपलं आयुष्य होरपळवून उद्ध्वस्त झालेला हा खिन्नमनस्क कवी एकटाच दिशाहीन अवस्थेत फिरतो आहे. तेवढय़ात दूरवर त्याला दोन धूसर आकृती दिसतात. त्या मंतरलेल्या चांदण्यात आणि एकमेकांतही उत्कटपणे विरघळत चाललेलं ते एक प्रणयी युगुल आहे. ते पाहताना कवीला आपलं प्रेमजीवन, त्यांची अत्यंत उत्कट आणि तरीही दाहक कहाणी आठवू लागते. त्या ज्या यातना आपण भोगल्या त्या या समोर दिसणाऱ्या प्रेमी युगुलाच्या वाटय़ालाही न येवोत, या जाणिवेनं त्याचं मन कळवळून आक्रंदन करू लागतं आणि पाहता पाहता एक व्यक्तिगत कविता ही सामाजिक आक्रोशाचं रूप घेते. आपल्या देशाच्या फाळणीच्या हृदयद्रावक पाश्र्वभूमीवर साहिरना ही कविता सुचली असावी. पण जसा जसा काळ लोटतो आहे तसतसं त्या कवितेतलं भयानक वास्तव धूसर होण्याऐवजी अधिक प्रखर होत चाललं आहे; असं आज इतक्या वर्षांनीही त्या दीर्घ काव्याकडे पाहताना फार तीव्रपणे जाणवतं. तेव्हाच्या माझ्या कोवळ्या वयात तर तिचा जो असर माझ्या मनावर झाला तो शब्दांत सांगणं अशक्य आहे. त्या आशयाइतकाच वेधक होता त्या दीर्घकवितेचा रचनाबंध.. वर्तमान आणि भूतकाळ या दोन धाग्यांनी विणलेला तो जणू एक प्रत्ययकारी गोफ होता. त्यामुळे एक गोष्ट सलग सुसूत्र सांगण्याऐवजी केवळ विविध दृश्यप्रतिमांतून ती कविता उलगडत गेली होती. जणू चित्रपट माध्यमांतील एक वेगवान मोन्ताज.. आणि त्या विविध रूपप्रतिमांना सूत्ररूप ठरावी अशी एक ओळ पुन:पुन्हा समोर उमटत होती.. ‘तसव्वूरात की परछाईयाँ उभरती हैं..’
अशा प्रकारे त्या कवितेच्या नाद-लय-भावांच्या तंद्रीत गुंगत आणि गुंतत काही काळ गेला. आणि त्या वर्षीच्या एका दिवाळी अंकाच्या जाहिरातीत एक वेधक घोषणा वाचनात आली. साहिर लुधियानवी यांच्या या दीर्घकाव्याचा के. नारायण काळे यांनी केलेला काव्यानुवाद प्रकाशित होणार.. मी चातकासारखा त्या दिवाळी अंकाची वाट पाहत राहिलो. ते काव्यरूपांतर प्रत्यक्षात वाचताना मात्र मन अंमळ खट्टू झालं. एकतर तो अनुवाद संक्षिप्त होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ती’ सूत्ररूप ओळ अनुवाद म्हणून मूळ अर्थाला अनुरूप असली तरी काहीशी गद्यप्राय झाली होती. उदा. ‘अन् पडछाया आठवणीच्या पडति कल्पना-फलकावरती..’ एखादी गोष्ट ‘अशी नको होती’ इतकं सांगून थांबण्यात अर्थ नसतो. काय हवं, त्याचा शोध घेणं हा तर कविमनाचा चिरंतन ध्यास.. त्या शोधाच्या गहिऱ्या धुक्यातूनच एके दिवशी एक काव्यपंक्ती उजळत आणि उमटत गेली..
‘मंत्रभारल्या मनांत हलती आठवणींच्या पडछाया’
दरम्यानच्या काळात मूळ पुस्तक आणि त्यातील ते दीर्घकाव्य कुठेतरी गहाळ झालं होतं. पण स्मरणवहीत ते पुरतं प्रतिबिंबित झालेलं होतं. त्यामुळे मूळ कवितेचा मनोमन वेध आणि तिचं मराठीत होणारं रूपांतरही एका परीनं मनोमनच, असा मजेदार खेळ सुरू झाला.
अगदी मोजक्या जागी काही शब्दांचा मूळ अर्थ ठाऊक नसल्यानं मी थोडा वेगळा व्यक्त झालोही असेन, पण मूळ भावाचा कुठेही विपर्यास होत नाही ना, हे माझं भान सदैव जागं होतं. ओघात वळणावळणावर आकृतिबंध बदलत होते, पण ते आटापिटा न होता सहजपणे प्रवाहित होत होते. मराठी कवितेला निदान त्या काळात तरी अपरिचित असलेल्या प्रवाही गद्यासारख्या लयाकृती आपसूक सामोऱ्या होत होत्या.
त्या संध्याकाळी कळले की
या बाजारी दुनियेमध्ये
अनघांचे निर्मळ मुग्ध हंसूही दमडीला विकले जाते..
त्या संध्याकाळी कळले की
सत्तांध पिपासूंच्या हाती
प्राणांची जिवलग मैत्रीही कवडीकरता दासी होते
अशी दमछाक करणारी थेट गद्मस्वरूप वाक्यं कविता होऊन वाहू लागली होती. वानगी म्हणून समारोपाच्या मोजक्या ओळी पुरेशा आहेत. ५०च्या दशकातली साहिरजींची मूळची कविता, तिचा १९६७ साली साकार झालेला हा मराठी अनुवाद.. पण आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर जाणवतं, की ‘नरेचि केला हीन किती नर’ हा क्षणोक्षणी प्रत्यय देणाऱ्या गचाळ मानवसमूहाला साक्षात मानवतेनं दिलेला हा निर्णायक इशारा आहे..
अत्याचारी वणव्यामध्ये मागे जळले जरी इमले
आता न जाणो त्यांत आहुती बनतील अत्याचारीही
धगधगत्या ज्वाळात एकदा पार्थिव देह जरी जळले
अता न जाणो भडाग्नीत त्या जळतील या पडछायाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा