‘आत्मपॅम्फ्लेट’ अशा चमत्कारिक नावाचा एक चित्रपट दाखल झाला आणि प्रेक्षक थोडे गोंधळून गेले. याचा अर्थ काय, हा पाहायचा की नाही, हे त्यांना कळेनासं झालं. पण नावातली गंमत, ट्रेलर आणि पोस्टरमधून दिसणारी विक्षिप्त दृष्टी, चित्रपट बर्लिन महोत्सवात दाखवला गेल्याचा दाखला आणि पटकथेसाठी असलेलं परेश मोकाशी हे नाव पाहून एक वेगळा प्रेक्षक त्याकडे आकर्षित झाला. चित्रपट चालतोय वा नाही, हा विचार न करता त्यांनी स्वत:च हा अनुभव घ्यायचं ठरवलं . थिएटर्स रिकामी होती, पण पडद्यावर दिसलं ते त्यांना इतकं आवडलं की ते सोशल मीडियावर बोलायला लागले, चर्चा करायला लागले, दिसेल त्याला सांगायला लागले आणि हळूहळू चित्रपटाबद्दल मतं यायला लागली. फेसबुक पोस्ट्समधून लोक ‘सिनेमा पाहायलाच हवा’ हे इतरांना सांगायला लागले. एकत्र भेटून जायचं ठरवायला लागले आणि अचानक सिनेमा चालायला लागला. फार प्रसिद्धी झाली नाही, मार्केटिंग कमी पडले. तरी प्रेक्षकांनीच स्वत:च तो चालवण्याची जबाबदारी घेतली. मग निर्मात्यांचा प्रेक्षकांवरचा विश्वास सार्थ ठरला. हे असं होईल याची कोणाला कल्पना होती का? मुळात असा वेगळा सिनेमा करावा असं का वाटलं? आणि तो करण्याबाबत कर्त्यांना समाधान आहे का? याबाबत चित्रपटाच्या लेखकानेच लिहिलेले ‘आत्म-आर्टिकल’.

एखाद्याशी पहिली भेट का व कशी झाली होती हे अनेकदा आपल्याला आठवत नाही. माझा अंदाज आहे की, आशीष बेंडे हा मनुष्य एकदा असाच काही कारण नसताना संपर्कात आला असावा. आमची मैत्रीही अशीच काही कारण नसताना झाली आणि कुठल्याही विशेष कारणाशिवाय इतकी वर्ष टिकलीदेखील! कुणी अडीअडचणीला मदत केली म्हणून, कुणी कधी जीव वाचवावा म्हणून तर कुणी एखाद्या आकर्षक वाटणाऱ्या मुलीचे प्रेयसीत रूपांतर करायला मदत केली म्हणून मैत्री झाल्याची उदाहरणे अनेक आहेत. मात्र आशीष-परेशच्या परिचयाला आणि पुढच्या मैत्रीला असे कुठलेच भरभक्कम कारण नाही. सामान्य मनुष्यांची सामान्य मैत्री, या सामान्यत्वातूनच या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा जन्म झाला.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

हेही वाचा : ‘बीबी’चा मकबरा!

माझ्या नाटकात अभिनय करण्यापासून माझ्या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यापर्यंत अनेक कामे करत आशीष या जीवनसागरात गटांगळय़ा खात राहिला. मात्र इतक्या वर्षांत कधीही त्याच्या कुटुंबीयांनी कसलीही तक्रार माझ्याकडे केली नाही. ‘बघा ना त्याचे काही होईल का’, ‘जरा तुम्ही मनावर घ्या’ वगैरे बात नस्से ! अगदी साधे सभ्य कुटुंब. अशा कुटुंबात आशीष हे आपत्य म्हणून जन्माला येणे ही खरे तर त्या आईवडिलांवर आपत्तीच. पण हे मी कसे म्हणावे! माझे आईवडील आणि आता बायकोही, ‘मोठा झाल्यावर तू कोण होणार?’ हे अजून मला विचारत असतात. याच आत्मपरीक्षणातून ‘आत्मपॅम्फलेट’चा जन्म झाला.

नाटक माध्यमात जे व जितके नवे प्रयोग झाले तितके चित्रपट माध्यमात होत नाहीत. सर्वात जास्त प्रयोग लेखन माध्यमात होतात. कारण तिथे काय फक्त कागद-लेखणी किंवा सध्या लॅपटॉप. आर्थिक झळ नाही. हेही कारण असेल भारतातील साहित्य, इतर कलांपेक्षा अधिक समृद्ध असण्याचं. गेल्या वीस-बावीस वर्षांच्या देवाणघेवाणीत आशीषच्या आयुष्यातल्या गमतीजमती कळत होत्या आणि माझ्या आयुष्यातील त्याला कळत होत्या. प्रेमभंग, मैत्रिभंग, लग्नभंग, पगारभंग इत्यादी ‘भंग’ सर्वांच्याच आयुष्यात होतात. एकीकडे दादासाहेब फाळके, लोकमान्य टिळक, बालगंधर्व, प्रकाश आमटे या प्रचंड व्यक्ती चित्रपट-नाटकांचे विषय होत होत्या; न झाल्यास नवल. तर दुसरीकडे हेही मनात येऊन जात होते की बायोपिकांच्या या शेतात एखादी गवताची काडी तुमची आमची का असू नये? मुळात सामान्य माणूस चरित्रपटाचा विषय होऊ शकेल का? झाल्यास, त्याच्या आयुष्याला चरित्र, जीवनगाथा असे गंभीर शब्द शोभतील का? त्यातूनच शोभेल असा शब्द निघाला आणि ‘आत्मपॅम्फ्लेट’चा जन्म झाला.

हेही वाचा : आदले । आत्ताचे : नखललेलं काळीज..

हे शीर्षक कुणाला आवडेल का, कळेल का हा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. लिहितानाच, एक कुणी तरी ही गोष्ट सांगत आहे, म्हणजे एक सामान्य मनुष्य- आशीष ही गोष्ट सांगत आहे, अशा निवेदन पद्धतीने संहिता लिहिली. तशीच ती सुचली. यातील विनोद, व्यंग, वक्रोक्ती, अतिशयोक्ती आपोआप आली. ‘आता या ठिकाणी उपरोध टाकू या बरं!’ अशी योजना कधी आखली नाही. एकूणच आयुष्याकडे पाहण्याचा, आयुष्य घेण्याचा जो काही पिंड असतो, तो त्या कलाकाराच्या कलाकृतीत येऊन जातो म्हणतात ते खरे असेल. त्यातूनच आलेले हे शीर्षक! जे या प्रकारच्या लेखनाला साजेसे आहे असे वाटले म्हणून ठेवले. त्याच्या दुबरेधतेचा मुद्दाच चर्चेत आला नाही. मुळात अख्खा चित्रपटच बहुसंख्य जनतेला आवडेल की नाही हा विचार न करता लिहिला – केला आहे, तिथे शीर्षकाची काय कथा! आशीषही त्याच पिंडाचा. त्यानेही कुठलीच तमा न बाळगता तो चित्रित केला. मधुगंधाही तसलीच. तिनेही त्याच वृत्तीने चित्रपटाचे सर्व बाळंतपण केलं. मा फलेषु कदाचन..

जे सुचेल, जसे सुचेल व करावेसे वाटेल, ते करता येणे यासारखे सुख नाही. नाटकात असे वेगवेगळे प्रयोग होऊ शकतात, झाले आहेत, उचलून धरले आहेत! कारण आर्थिक गुंतवणूक तुलनेने कमी. म्हणूनच नाटक माध्यमात जे व जितके नवे प्रयोग झाले तितके चित्रपट माध्यमात होत नाहीत. सर्वात जास्त प्रयोग लेखन माध्यमात होतात. कारण तिथे काय, फक्त कागद-लेखणी किंवा सध्या लॅपटॉप. आर्थिक झळ नाही. हेही कारण असेल भारतातील साहित्य इतर कलांपेक्षा अधिक समृद्ध असण्याचं. ‘मृच्छकटिक’ हिट होते तसेच ‘बेगम बर्वे’ही हिट होते आणि ‘गारंबीचा बापू’ हिट होते तशीच ‘कोसला’ही हिट होते! चित्रपटात असे प्रयोग करता यायला हवेत. मात्र ते महाग माध्यम असल्याने कुणी त्या फंदात पडत नाही. कारण घातलेले पैसे परत न मिळण्याची भीती जास्त. हे असे का आहे याची चर्चा दुसऱ्या एका सखोल लेखाचा विषय. आत्ता यात ते सामील होऊ शकत नाही. आत्तापुरते इतकेच की ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’सारखा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हिट होऊ शकत नाही हे मला कळतं, मी ते स्वीकारलेलं आहे- अगदी आरामात. म्हणून या मुद्दय़ाच्या आरंभीच म्हटले की, हे जे सुचले, ते करायला मिळाले हेच खूप झाले. हा असा पिंड असायला लागतो. तो अनेकांकडे आहेही. आम्हाला ते प्रत्यक्षात करता आले इतकेच.

हेही वाचा : चौसष्ट घरांच्या गोष्टी: महाविक्षिप्त प्रतिभावंत 

अजून एक उदाहरण द्यायचे तर, हाच जो काही पिंड आहे, त्यामुळेच बायकोकडून तिच्या बालपणातील एक घटना कळली आणि अख्खा ‘एलिझाबेथ एकादशी’ डोळय़ासमोर आला. ती फक्त त्या बहीण-भावाची गोष्ट राहिली नाही. राहू शकली असती, चांगलीही झाली असती; पण जे सुचले त्यात अख्खे पंढरपूर आले. त्यातले धर्म, अर्थ, काम सगळेच आले. काहीच नियोजित नव्हते. ‘एकादशी’ सुचली तीच साध्या सरळ वास्तववादी शैलीत. या वेळी तसे झाले नाही. ‘आत्मपॅम्फ्लेट’ ही फक्त आशीषची किंवा त्याच्या प्रेमाची गोष्ट राहू शकली असती की! अगदीच. पण पिंड आड येतो- लोकप्रियतेच्या आणि बॉक्स ऑफिसच्या! असो. सुचतानाच प्रेमाच्या आड येणाऱ्या आणि प्रेमाला तारून नेणाऱ्या सगळय़ाच घटकांची, समाजाची ती गोष्ट बनली. पुढे तर ती राष्ट्रीय पातळीवर जाते, तिथून आंतरराष्ट्रीय पातळीवर जाते, तिथून आंतर आकाशगंगीय पातळीवर जाऊन पृथ्वीवासी आणि एलियन यांच्या प्रेमापर्यंत जाते.. वास्तव अवास्तवाचे मिश्रण होते. कुणाला समजणारी तर कुणाला न समजणारी पटकथा होते. आता हे असे सुचणे, हे जसे त्या वयात पाहिलेल्या असंख्य उत्तम चित्रपटांचे संस्कार असतात, तसे इतर कला प्रकारांचेही असतात. अनेकांना याचे श्रेय जाते.

रामायण महाभारत व इतर प्राचीन ग्रंथांचे संस्कार हा असाच एक दुर्लक्षित विषय. व्यास- वाल्मीकी फक्त गोड गोड गोष्टी सांगणारे आजोबा होत नाहीत; नायक, नायिका, खलनायक हा फिल्मी फॉर्मुलाही दाखवत नाहीत. सगळय़ांचेच योग्य-अयोग्य, न्याय- अन्याय, नीती-अनीती सगळेच आणतात ऐरणीवर. फक्त लांबीवर अवलंबून राहत नाहीत. लांबी गुणिले खोली, असे सगळेच क्षेत्रफळ उलगडतात. कुणीच ‘भव्य’ राहत नाही, कुणी ‘ढव्य’ राहत नाही. व्यास वाल्मिकींचा हा मोठा कलात्मक संस्कार आपण विसरत चाललो आहोत. आपल्या विश्लेषणात आजकाल त्यांची नावेही येईनाशी झाली आहेत. त्यांच्या लिखाणाचा प्रकार वेगळा, पण त्यातून सर्व कलाकारांना जे मिळाले आहे ते अद्भुत. या पुराणकथांवर आधारित चित्र-शिल्प पाहिली की प्राचीन ग्रंथांच्या आवढव्यतेची प्रचिती येते. साहित्य आणि दृश्य कला खरे तर खूप भिन्न. पण या साहित्याने किती आणि काय काय दिले आहे हे स्पष्ट दिसते. म्हणूनच हे संस्कार मान्य करून, वर शिवाय चित्रपट, नाटक किंवा कोणतीही कलाकृती करताना, त्या माध्यमाची म्हणून काही वैशिष्टय़े असतात हीसुद्धा जाणीव ठेवली पाहिजे. ती लक्षात घेऊन, त्या माध्यमातील काही कलाकौशल्य दिसले तर बरे. मी या गोष्टीचा चित्रपटच का केला, नाटकच का केले, लेख का लिहिला नाही, भाषण का दिले नाही याचा ऊहापोह व्हायला हवा. आपण पटकन फक्त विषय, गोष्ट, संदर्भ, इत्यादी चर्चेत गुरफटतो. सामाजिक, राजकीय भान असणे, समस्याप्रधान असणे, गंभीर, वास्तववादी असणे अशा गोष्टींना सवलत देऊन मोकळे होतो. चित्रपट बाजूला राहतो. ‘आत्मपॅम्फ्लेट’ लिहिताना आणि करताना आपण ‘चित्रपट’ करत आहोत या गोष्टीचा विचार आम्ही आमच्या वकुबानुसार केला. काहींना आवडला, काहींना नसेल आवडला. काहींना कळला, काहींना नाही कळला.. सगळय़ांचे स्वागत. असा ‘विचित्रपट’ परत कधी सुचेल किंवा करायला मिळेल माहीत नाही. पण सुचला तर करायला आवडेल नक्कीच. असेच चुकत-माकत, मागे जात, पुढे होत आमची चित्रपटीय अक्कल वाढणार आहे. चरैवेती चरैवेती..

हेही वाचा : जान.. जिंदगी.. आझादी..

यात वेगळे काय झाले?

बायोपिक आणि ‘बाई’पिकांनी भरलेल्या मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकवर्गाची अभिरूची अलीकडे ग्लोबल वगैरे झाली. मल्याळी चित्रपटांपासून स्पॅनिश मालिकांना आणि इस्रायली वेब-थरारांपासून जर्मन- फ्रेंचांच्या कलात्मक सिनेमांना ओरपता ओरपता त्यांच्यातील सिनेसाक्षरता वाढली. त्यामुळे शुकशुकाटात जेमतेम आठवडाभर चित्रगृहात साजरे होणे, हा मराठी चित्रपटांचा शिरस्ता बनला आहे. भल्या मोठय़ा जाहिराती झालेल्या आणि मार्केटिंगचे सारे तंत्र वापरलेल्या सिनेमांनाही प्रेक्षकांनी ‘फ्लॉप’ ठरविल्याची हल्लीचीच उदाहरणे आहेत. प्रदर्शनासाठी पुरेशी थिएटर्स उपलब्ध होत नाहीत, ही ओरड होत असताना मिळालेल्या थिएटर्समध्ये किमान सहा डोकीदेखील नसल्याने ‘शो’ रद्द होण्याचे प्रमाण अधिक, ही मराठी चित्रपटांची सद्य:स्थिती. या परिस्थितीत प्रेक्षकांनी दुसऱ्या आठवडय़ापासून घेतलेल्या भूमिकेमुळे ‘आत्मपॅम्फ्लेट’ वेगळा ठरत आहे.
pareshmokashi@hotmail.com