मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

मुंबईतील नामवंत पार्ले टिळक विद्यालयाचे शताब्दी वर्ष येत्या ९ जूनला सुरू होत आहे. त्यानिमित्ताने या शाळेच्या विशेषतेबद्दल..

परवा ९ जूनला मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयाचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे. १९५६ ते १९६४ ही र्वष मी या शाळेची विद्यार्थिनी होते. १९६४ ला तेव्हाची ‘अकरावी मॅट्रिक’ची परीक्षा देऊन मी आधी शाळेच्या, नंतर पाल्र्याच्या आणि पुढे मुंबईच्याही बाहेर गेले. म्हणजे गेली तब्बल पाच दशकं मी शाळेपासून दूर आहे. आता खूप वाढलेल्या पाल्र्यात जाणं, सहजपणे शाळेच्या परिसरात चक्कर मारणं, सर्वत्र आमूलाग्र बदल झालेले असताना जुन्या ओळखीच्या खुणा सापडणं मुश्कील वाटतं. तरीही शाळेविषयी बोलणारे माजी विद्यार्थी वा आजच्या शाळेतल्या कुणा विद्यार्थ्यांचे पालक भेटले की अचानक ती ‘आपली माणसं’ वाटायला लागतात. मन शोध घ्यायला लागतं, हा नुसताच नोस्टॅल्जिया.. स्मरणरंजन आहे की आपल्या शाळेचं खरोखरच काही वेगळेपण होतं?

या शताब्दीच्या निमित्ताने शाळेच्या रौप्य, सुवर्ण आणि अमृतमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध झालेल्या स्मरणिका चाळायला मिळाल्या. त्यातून असं जाणवलं की, या शिक्षणसंस्थेचा जन्मच मुळी वेगळ्या प्रकारे झालेला आहे. अनेकदा एखाद्या संपन्न उद्योगसमूहाकडून, एखाद्या ज्ञातीच्या उद्धाराच्या प्रेरणेतून किंवा एखाद्या सामाजिक आस्थापनेच्या विस्तार योजनेतून शिक्षणसंस्था सुरू होतात. मग साहजिकच आपले हितसंबंध जपण्याची धडपड होते. परंतु आमची ही शाळा पाल्र्याच्या गावकऱ्यांनी आपल्या मुलांच्या व गावाच्या अभ्युदयासाठी स्वयंप्रेरणेने सुरू केली आहे.

१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचं निधन झालं. ‘लोकसंग्रह’ आणि ‘लोकसेवा’ या दोन प्रेरणांचा त्यांनी जन्मभर पुरस्कार केला होता. पाल्र्यामध्ये ‘लोकमान्य टिळक स्मारक फंड कमिटी’ आणि ‘पार्ले सार्वजनिक मंडळ’ या संस्था तेव्हा कार्यरत होत्या. त्यांच्या आणि स्थानिक दानशूर मंडळींच्या मदतीने ग्रामस्थांनी आदर्श शाळा सुरू करण्याचं भव्य स्वप्न पाहिलं. ९ जून १९२१ रोजी दादासाहेब पारधी यांच्या बंगल्यात टिळकांच्या तसबिरीला हार घालून त्यांच्याच नावाने शाळा सुरू केली गेली. शाळेच्या मूळ घटनेमध्ये संस्थेचं ध्येय लिहिलेलं होतं- ‘मुलांना व मुलींना उत्तम बौद्धिक व औद्योगिक शिक्षण देणे!’

अवघ्या पाच विद्यार्थ्यांना घेऊन भास्कर गणेश भिडे यांच्या घराच्या माडीवर सुरू झालेल्या या शाळेला स्वत:ची पहिली एकमजली इमारत १९२३ साली मिळाली. पुढे लवकरच १९२८ आणि १९३३ मध्ये याच इमारतीला जोडइमारती उभाराव्या लागल्या. या विस्ताराचं कारण म्हणजे शाळा नेहमी काळाबरोबर राहिली. गरजेनुसार मराठीबरोबरच इंग्रजीचा समावेश शिक्षणात माध्यम म्हणून करणं, शाळेत औद्योगिक शाखा सुरू करणं, प्युपिल्स पार्लमेंट म्हणजे छात्र समिती नेमणं, विज्ञान प्रदर्शनं भरवणं, बालवीर-वीरबाला पथकं काढणं असे अनेक बदल होत गेले. एक जुने विद्यार्थी (आजचे वयोवृद्ध) सांगत होते की, शाळेत मागे एक पत्र्याची शेड होती. कोणा मान्यवराच्या निधनानिमित्त अचानक शाळेला सुट्टी द्यावी लागली तर प्रथम त्या शेडमध्ये एक विद्यार्थी सभा घेत. त्या दिवंगताने कोणतं मोठं कार्य केलं, कसं केलं याबाबतची माहिती दिली जाई आणि नंतरच मुलांना घरी सोडत. केवढा हा साक्षेप!

शाळेची आरंभीची प्रार्थना ‘जगज्जीवना परमेश्वराची’ दयाकृपा मागणारी आणि ‘हिंदमातेला वैभव प्राप्त होवो’ असं विनविणारी होती. पुढे प्राचार्य मा. सी. पेंढारकर यांच्या कारकीर्दीत तीत बदल होऊन सर्वप्रथम ‘ॐ सहनाववतु’ हा श्लोक, नंतर ‘या कुन्देन्दुतुषार’ हे सरस्वतीस्तवन आणि शेवटी राष्ट्रप्रेमाचं आवाहन असं दैनंदिन प्रार्थनेचं स्वरूप झालं. ‘या कुन्देन्दुतुषार’ची चाल पु. ल. देशपांडे यांनी लावली आणि जयवंत कुलकर्णी यांनी पहिल्यांदा त्या चालीवर ते स्तवन म्हटलं. ते दोघे शाळेचे माजी विद्यार्थीच होते.

काळाच्या ओघात परल वाढलं, शिक्षणाचे आयाम वाढले, तशी संस्थाही सातत्याने वाढत राहिली. बदलत्या काळाची आव्हानं पेलण्याचा कल मात्र जुनाच होता. म्हणून मग इंग्रजी माध्यम, आय. सी. एस. सी. अभ्यासक्रम, मॅनेजमेंटसारख्या उभरत्या शाखांना स्थान देणं असे त्यावेळचे अनेक नवे प्रयोग उत्तम जम बसवू शकले. आज मूळची शाळा आणि तिच्या सर्व संलग्न संस्थांमध्ये मिळून ‘केजी टू पीजी’ अशा र्सवकष शिक्षणाचा लाभ सुमारे २६,००० विद्यार्थी घेत आहेत. शाळा सुरू केली गेली तेव्हा पार्ले या गावची लोकसंख्या २६०० सुद्धा नसावी.

पण केवळ संस्था काढणं पुरेसं नसतं, तर संलग्न माणसं चांगल्या अर्थाने वाढली पाहिजेत, नाना क्षेत्रांमध्ये चमकली पाहिजेत. पार्ले टिळक विद्यालयाने गेल्या ९९ वर्षांमध्ये असे अनेक चमचमते तारे महाराष्ट्राला, देशाला दिले आहेत. पाल्र्यासह मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करणारे बाबुराव परांजपे, प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ पद्मभूषण शशिकुमार चित्रे, साहित्य क्षेत्रातील प. गं. सुर्वे, पु. ल. देशपांडे, वसुधा पाटील, विचारविश्वातील मे. पुं. रेगे, शरद जोशी, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर, कला क्षेत्रात सचिन खेडेकर, विनय आपटे, जयवंत कुलकर्णी, पं. नित्यानंद हळदीपूर, वैशाली सामंत, डॉ. अनिल बांदिवडेकर, उद्योगविश्वात दीपक घैसास, प्रवीण कडले, वैद्यक क्षेत्रात डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. अन्वय मुळे, ग्राहक चळवळीचे शिरीष देशपांडे, संरक्षण क्षेत्रात एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक, क्रीडा क्षेत्रात अजित पै, वीणा परब ही त्यापैकी काही नावं.. केवळ वानगीदाखल.

आयुष्यात यशाची एवढी उंची प्रत्येकालाच गाठता येत नाही; परंतु एक नीटनेटकं, मूल्याधिष्ठित आणि अर्थपूर्ण आयुष्य नक्कीच जगता येतं. शाळेने आपल्याला हे मूल्यभान दिल्याचा, काहीएक वयात बहकण्यापासून रोखल्याचा निर्वाळा आज जगभर पसरलेले शाळेचे विद्यार्थी देत असतात. स्वच्छता, प्रामाणिकपणा, सचोटी, शब्दाचं पावित्र्य राखणं, भाषेचा योग्य उपयोग अशा अनेक मूलभूत गोष्टी शाळेने विद्यार्थ्यांच्या गळी उतरवल्या. युनिफॉर्मचा सदरा पॅन्टमध्ये नीट खोचलेला नसणं, प्रार्थनेच्या वेळी एकमेकांकडे बघून उगाचच हसणं, नेमाने दररोज करण्याचं शुद्धलेखन एकाच दिवशी खरडून टाकणं, आजारपणाचं ढोंग करून कवायतीला न जाणं असल्या शालेय प्रमादांना योग्य वेळी कानपिचक्या मिळणं हे नक्कीच दूरगामी परिणाम करतं. एखाद्या ठिकाणी प्रवेशासाठी वा नोकरीसाठी मुलाखतीला गेलेली व्यक्ती पार्ले टिळक विद्यालयाची माजी विद्यार्थी आहे असं समजलं की तिच्याकडे आजही वेगळ्या स्वागतशील नजरेनं बघितलं जाणं हे याचंच द्योतक होय.

व्यक्तिश: मी जरा जास्तच भाषाप्रेमी, भाषावादी असल्याने शाळेने केलेले भाषिक संस्कार मला खूप मौलिक वाटतात. संस्कृत, मराठी या भाषांबाबतचा शाळेचा कटाक्ष, लेखी/ तोंडी शब्दांच्या  शुद्धतेचा आग्रह, सतत कानावरून, डोळ्याखालून चोख भाषा जाऊ देण्याचा आग्रह यामुळे अनेकांची भाषिक बैठक भक्कम झाली. साधा ‘लोकमान्य’ हा शब्द घ्या. ‘लोक्मान्य’ असा ‘क’ला ‘म’ जोडलेला उच्चार आम्हाला कोणीही करू देत नसे. ‘लोऽकमान्य’ म्हणावं, ‘लो’ला किंचित झोका देऊन पुढचा ‘क’ पूर्णच म्हटला पाहिजे, हे कानात व मनात पक्कं बसलं. वाचन, पाठांतर, भाषण, निबंधलेखन अशा सर्व प्रकारांनी भाषा वापरण्याच्या नाना संधी मिळत गेल्या. त्यामुळे सौष्ठवपूर्ण भाषा हे मोठं सुखनिधान असू शकतं, ही जाणीव लहान वयातच झाली. व्यक्तीचा भाषिक कोष, मातृभाषेचा स्कंद भक्कम असेल तर तिला पुढे कोणत्याही भाषेतून काहीही शिकणं तुलनेने सोपं जातं, हे आजच्या शिक्षणशास्त्राने मान्य केलं आहे. आमच्या शाळेने तर याबाबत फार पूर्वीपासूनच चोखंदळपणा ठेवला.

शाळेच्या शिपायांपासून मुख्याध्यापकांपर्यंत अनेकांच्या आठवणी यानिमित्तानं काढता येतील. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या वेगवेगळ्या असतील. त्यापैकी काहींना शताब्दीच्या स्मरणिकेत जागाही मिळेल. पण सर्वाच्या आठवणींमध्ये एक समान गोष्ट आल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणजे रोज शाळा भरण्यापूर्वी एखाद्या भजनाची, एखाद्या स्फूर्तिगीताची ध्वनिमुद्रिका लावण्याचा प्रघात! ही प्रथा प्राचार्य मा. सी. पेंढारकर यांनी सुरू केली. इतर कोणत्या शाळांमध्ये ही प्रथा होती किंवा आहे का, हे मला माहीत नाही; पण माझ्या आठवणीतली माझी शाळा गाण्याशिवाय सुरूच होत नाही. शनिवारी सकाळची शाळा असली की ‘घन:श्याम सुंदरा’, ‘उठी श्रीरामा..’ अशी एखादी भूपाळी लागे. एरवीच्या दिवशी पं. विष्णु दिगंबरांची, पं. ओंकारनाथ ठाकुरांची भजनं लावत. ‘ठुमकि चलत रामचंद्र’, ‘पायो जी मैंने रामरतन’, ‘जब जानकीनाथ सहाय’ अशा ध्वनिमुद्रिकांच्या सुरेल सुरावटी वातावरणात घुमायला लागल्या की समजे- आता वर्ग सुरू होणार! एखाद्या कर्कश्श शिट्टीने, एखाद्या कठोर आज्ञेने वर्गात मारूनमुटकून बसण्यापेक्षा अशा सुमधुर सूचनेवर लहरत वर्गात जाऊन बसणं मोठं सुखकारक वाटे. दिवसाची अशी सुरेल सुरुवात करणारी शाळा आपल्या प्रौढपणातल्या आयुष्याचीही सुरेल सुरुवात करू बघत्येय हे तेव्हा कळत नव्हतं.. आता कळतं. मनभर ती भजनं घुमायला लागतात.

‘वस्तु अमोलिक, मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो, भवसागर तर आयो, पायो जी मैंने..’ पंडित विष्णु दिगंबरांची ही भरदार, पण आर्त साद दर वेळेस नव्यानं मनाला भिडते. आयुष्यात फार मोठं नाम-धन मिळवता आलं असो-नसो; शाळा नावाची एक अमोलिक वस्तू नक्की आपल्यापाशी आहे, तिच्यापुरते आपण गर्भश्रीमंत आहोत, हा दिलासा कधीही न संपणारा असतो.

Story img Loader