प्रतिभा वाघ
अजंठय़ाच्या प्राचीन चित्रकृतींचा अभ्यास करून, त्या पद्धतीचे रंग बनवून तशा पद्धतीच्या कलाकृती चितारणाऱ्या दिवंगत चित्रकार गोविंद माधव सोलेगावकर यांचे सिंहावलोकन चित्रप्रदर्शन २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये भरत आहे. त्यानिमित्ताने..
‘निस्सीम कलेची भक्ती करा, कलेच्या विविध रूपांची आस धरा, ती तुम्हाला सर्वोच्च महानतेकडे घेऊन जाईल. तुम्हाला जाणवेल की सत्य आणि सौंदर्य एकच आहे. कलेचे सौंदर्य हे अंतिम सत्याचेच एक दैवी रूप आहे..’
हे विचार आहेत मुंबईचे पहिले आधुनिक चित्रकार अशी ओळख असलेले गोविंद माधव सोलेगावकर यांनी आपल्या डायरीत नोंदवलेले! १९५० ते १९८५ या काळातील त्यांच्या सुमारे २५ डायऱ्यांमध्ये चित्रांची रेखाटने, रचनांची कच्ची रेखाटने, चित्रविषयक कल्पनांची नोंद, भौमितिक आकारात चपखलपणे बसविलेल्या चित्ररचना, रंगसंगती, रंगमिश्रणे, विविध प्रयोगांची टाचणे, वाचनात आलेल्या काही आवडलेल्या नोंदी आढळून येतात. ते केवळ चित्रकारच नव्हे, तर तत्त्वचिंतक, भूमितीचे अभ्यासक, रंगनिर्मितीतले शास्त्रज्ञही होते. ते उत्तम शिक्षक होते. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी त्यांना आपले काम दाखवून मार्गदर्शन घेण्यासाठी येत. आपण कलावंत असल्याचा त्यांना जराही अहंकार नव्हता. त्यांच्या वागण्याबोलण्यात एकतानता होती. कलेची तादात्म्यता होती. भरपूर पगाराच्या नोकऱ्या केवळ विचार न पटल्यामुळे त्यांनी सोडून दिल्या आणि आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपले.
सोलेगावकरांचे वडील मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेले मध्य प्रदेशातील पहिले विद्यार्थी. ते आणि चित्रकार डी. डी. देवळालीकर हे समकालीन होते. तर एन. एस. बेन्द्रे आणि गोविंद सोलेगावकर हे समकालीन होते. गोविंद यांचा जन्म १९१२ मध्ये मध्य प्रदेशातील सिहोर येथे झाला. लहान वयातच त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. १९२८ साली वयाच्या १६ व्या वर्षी ऑल इंडिया फाइन आर्ट प्रदर्शनात त्यांच्या कलाकृतीला रौप्यपदक मिळाले. १९३२ मध्ये ते डिप्लोमाची परीक्षा पास झाले. या सुमारास म्युरल, मॉडेलिंग आणि पेंटिंग या कलाप्रकारांत त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. १९३४ ला पौराणिक वा ऐतिहासिक विषयावरील चित्रासाठी असलेले टोपीवाला पारितोषिक, १९३४ ला डॉली करसेठजी पहिले पारितोषिक, याच वर्षी फाइन आर्ट सोसायटी ऑफ सिमलाचे पारितोषिक, तसेच १९३४, ३५ ला लॉर्ड हार्डिंग्ज शिष्यवृत्ती मिळविली आणि मुंबईला फेलोशिपही मिळाली. १९५३ ला त्यांनी आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची ट्रॉफी पटकावली. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १९३५ सालच्या सुवर्णपदकाचा! कारण त्यासाठी केलेल्या ‘महियारी’ पेंटिंगमुळे ते प्रसिद्धीझोतात आले. या चित्रात त्यांनी भारतीय चित्रविषय आधुनिक पाश्चात्त्य शैलीत अंकित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
हे चित्र छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयाने विकत घेतले आहे. कलामर्मज्ञ कार्ल खंडेलवाला यांचे याविषयीचे विचार उल्लेखनीय आहेत. ते म्हणतात की, ‘‘चित्रात भारतीय चित्रकाराने भारतीय कलावैशिष्टय़े अबाधित राखून आधुनिक फ्रेंच चित्रकलेचा सिद्धांतही मोठय़ा खुबीने वापरला आहे. हे चित्र त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.’’
‘महियारी’ प्रियकराची प्रतीक्षा करीत आहे. पाश्र्वभूमीला मावळतीची सूर्यकिरणे असून तिच्या रंगीबेरंगी वस्त्रांवर त्यामुळे छायाप्रकाशाचा सुंदर खेळ चाललेला दिसतो. तिच्या डोळ्यांतली आतुरता आणि आशेचा किरण दाखविण्यात चित्रकार यशस्वी झाला आहे. चेहऱ्याला उठाव देण्यासाठी केलेला पांढऱ्या रंगाच्या फटकाऱ्यांचा वापर आणि ओढणीसाठी वापरलेले रंगलेपन हे घनवाद शैलीतील आहे आणि हाच फ्रेंच सिद्धांताचा वापर आहे. पारंपरिक बारकाव्यांपासून दूर जात, अनावश्यक तपशील त्यात गाळलेला आहे. ठसठशीत आणि आत्मविश्वासपूर्ण कुंचल्याच्या फटकाऱ्यांमुळे चित्राला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. चित्रातील आकारांची रचना, रंग, छायाप्रकाशाची योजना यातील कोणत्याही घटकाच्या सौंदर्याला बाधा न आणता अवकाशाचा योग्य वापर करून त्यांनी सुंदर रचना केल्या आहेत. ‘स्वतंत्र निर्मिती’ म्हणून या चित्राकडे पाहिले जाते.
चित्रकार सोलेगावकर यांच्या आरंभीच्या चित्रशैलीवर अजंठा आणि बाघ यांतील भित्तिचित्रांचा प्रभाव दिसतो. नव्या चित्रशैलीचा स्वीकार करताना भारतीय दृश्यकलेचा घाट (form) आणि रंगमेळ याचे अनेक प्रयोग त्यांनी केलेले दिसतात. पारंपरिक चित्रशैलीला नव्या संदर्भात नव्या दिशेने त्यांनी वळवले, हे त्यांचे वैशिष्टय़. चित्रघटकाचा आकार आणि अवकाश (मोकळी जागा) यांचे विशेष नाते अजंठा- बाघ कलापरंपरेपासून अगदी कांग्रा आणि पहाडी शैलीपर्यंत दिसते. नेमके हेच वैशिष्टय़ आपल्या चित्रांतून सोलेगावकरांनी आविष्कृत केले. त्यांना हे साध्य झाले ते त्यांच्या भारतीय चित्रशैलीच्या सखोल अभ्यासामुळे!
ही साधना केल्यावर १९५३ साली ते युरोपला गेले. तिथे अनेक ठिकाणी त्यांची चित्रप्रदर्शने झाली. या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या चित्रांतून व्यक्त होणाऱ्या भारतीय शैलीबद्दल, भारतीय भावनेबद्दल परदेशी चित्ररसिकांनी स्तुतीपर गौरवोद्गार काढले. चार वर्षांच्या युरोप वास्तव्यात त्यांच्या चित्रशैलीत आमूलाग्र बदल झाला. सोलेगावकरांचे काम काळाच्या पुढे जाणारे होते. त्यामुळे भारतात त्याचे रसग्रहण झाले नाही. त्यामुळे त्यांनी भारतातील प्रदर्शनांत भाग घेणे थांबविले आणि ‘कमिशन वर्क’ करण्यास प्रारंभ केला.
सोलेगावकर यांची चित्रे पाहिली तर त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांचा परमार्श घेता येतो. अॅकॅडमिक शैलीतील, भारतीय अलंकारिक शैलीतील, अमूर्त आणि केवल आकारातील त्यांच्या चित्रांमध्ये अवकाशीय अनुभव सहजतेने दिलेला जाणवतो. संपूर्ण आयुष्यभर निसर्गातले सौंदर्य त्यांनी टिपले व त्याची परिपूर्ण दृश्ये रंगविली. हिमालयातील निसर्गदृश्यांत याचा प्रत्यय येतो. सुलभ, साधे आकार, आनंददायी रंगसंगती, नैसर्गिक व मोजक्या रंगांचा वापर हे सारे त्यांनी बाघ गुंफा भित्तिचित्रांच्या प्रेरणेतून घेतलेले दिसते. टेंपरा रंगाचाही त्यांनी वापर केला. लघुचित्रशैलीप्रमाणे पारदर्शक जलरंगाचा वापर त्यांनी अपारदर्शक पद्धतीने केला- ज्याला ‘गोएश तंत्र’ (gouache Technique) म्हणतात. सोलेगावकर सरांचे विद्यार्थी चित्रकार तिरोडकर हेही याच पद्धतीचे तंत्र वापरतात.
त्या काळातील ज्येष्ठ कलासमीक्षक व्ही. आर. आंबेरकर सरांनी सोलेगावकरांच्या चित्रांबद्दल म्हटले आहे.. ‘‘सोलेगावकरांची चित्रे म्हणजे रंगांची स्वप्नमय सृष्टी! रंगांच्या, रचनेच्या आणि सौंदर्याच्या बाबतीत सोलेगावकरांचा हात धरणारा चित्रकार आपल्याकडे क्वचितच सापडेल.’’
सोलेगावकरांची चित्रे त्यांच्या रंगतंत्रामुळे वेगळी उठून दिसतात. पार्लमेंटमधील ४१ क्रमांकाचे पॅनल ‘भोजराजा विथ भोजाशाला’मध्ये हत्तीच्या आकृतीसाठी वापरलेला गडद राखाडी, मनुष्याकृतीसाठी वापरलेल्या विविध तपकिरी रंगछटा, ध्वज, घरे, वस्त्रे यांसाठी वापरलेला भगवा रंग फारच सुंदर परिणाम साधतो. जवळजवळ ५० मनुष्याकृती आणि हत्ते, घोडे यांच्या आकृतींचे हे सुंदर रचनाचित्र आडव्या आकारात आहे. त्याची कौशल्यपूर्ण रचना आणि हत्तींचे सुळे, इमारती यासाठी वापरलेला पांढरा रंग चित्रात वेगळीच मजा आणतो.
पोर्ट्रेट हा विषयही त्यांनी यशस्वीपणे हाताळला आहे. त्यांनी सुलभीकरणाचे तंत्र वापरून केलेली व्यक्तिचित्रे या विषयावरील त्यांची हुकमत असल्याचे दाखवतात. ‘स्ट्राँग मॅन’ या पोटेर्र्टमध्ये त्यांनी दृष्टीपातळीच्या खालील कोन घेतला आहे. या चित्रात उत्स्फूर्तपणे मारलेल्या रेषा भरीवपणाचा आभास निर्माण करतात. ‘मृगजळ’ चित्रातील हरणे त्यांचा प्राण्यांचा अभ्यास दर्शवतात. त्यांची पेन्सिल रेखाटनेही त्या माध्यमावरील त्यांचे कौशल्य दाखवतात. त्यांच्या ‘लव्ह पिलग्रिमेज’ चित्रातील शिव-पार्वतीचे रेखाटन अजंठा शैलीची आठवण करून देते. त्यातली रंगसंगती एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते. सोलेगावकरांनी सुलभ आकारात केलेले गांधीजींचे व्यक्तिचित्रही उल्लेखनीय आहे. सोलेगाकरांनी भारतीय मूर्तिशिल्पाचा सखोल अभ्यास केला होता. त्रिमूर्ती, लक्ष्मी, समुद्रमंथन या चित्रांमध्ये मूर्तिशिल्पाची शुद्धता, कोमलता आणि लयीचा प्रत्यय येतो. पाश्चात्त्य पद्धतीची व्यक्तिचित्रे आणि जाहिरात कलेतील ‘पोस्टर’ या प्रकारातही त्यांचा हातखंडा होता. अजंठाचे त्यांनी केलेले पोस्टर खूप गाजले. अजंठा गुहांमध्ये जाऊन सोलेगावकरांनी तिथल्या चित्रांचा अभ्यास केला. त्यावेळी अजंठय़ातील चित्रकारांनी आपली स्वाक्षरी न केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे सोलेगावकरांनीही चित्रांवर स्वाक्षरी केली नाही. दरवर्षी १ जानेवारीला सोलेगावकर अजंठय़ाला जात. अनेक चित्रकार व कलेचे विद्यार्थी तिथे जमत. प्रात्यक्षिके, चर्चासत्रे होत. हा कार्यक्रम अनेक वर्ष सुरू होता. याचे कुणालाही आमंत्रण नसे, परंतु तरीही न चुकता कलाप्रेमी त्या दिवशी अजंठय़ाला एकत्र येत. सोलेगावकरांनी केलेली रंगमिश्रणे व प्रयोग इतके अभ्यासपूर्ण होते की ते यशस्वी होणारच हा आत्मविश्वास त्यांना असे आणि तो खराच ठरला. मातीतून रंग तयार करून मातीचे सोने करणाऱ्या या चित्रकाराला शतश: अभिवादन!
plwagh55@gmail.com