डॉ. रावसाहेब कसबे डायमंड पब्लिकेशन्सतर्फे ‘फुले आंबेडकरी वाङ्मयकोश’या डॉ. महेंद्र भवरे संपादित वाङ्मयकोशाचे प्रकाशन उद्या (३० सप्टेंबर) होत आहे, त्यानिमित्ताने या ग्रंथाची ओळख…

‘कोश’ हा साहित्यप्रकार एकूणच वैश्विक साहित्य जगतात महत्त्वाचा मानला जातो. तो निव्वळ वाङ्मय या प्रकाराशीच संबंधित आहे असे नाही, तर मानवी समाज जीवनाशी संबंधित विविध ज्ञान शाखांशी त्याचा संबंध जुळणारा आहे. ‘कोशवाङ्मय’हे भाषा, साहित्य, समाज व संस्कृती यांचे परिशिलन करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. ‘कोशवाङ्मय’ हे त्या-त्या समाजाचे, तेथील समाजजीवन व संस्कृतीचे चिरस्थायी धन मानले जाते. कमीत कमी वेळात वाचक, अभ्यासक, संशोधक आणि संबंधित विषयाच्या ज्ञानाची गरज असणाऱ्यांना आवश्यक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे ‘कोश’.

कोश निर्मिती मागे त्या-त्या राष्ट्रानुसार वेगवेगळी प्रासंगिक किंवा भविष्यवेत्ती कारणेही असतात. समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या प्रकारची असते, त्यानुसार कालसापेक्ष कोशांची निर्मिती केली जाते. याकडे राष्ट्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक व भाषिक अवस्थेचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. अठराव्या शतकानंतर इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत ज्ञानकोश संपादन करण्याची परंपरा सुरू झाली. त्या शतकात सामाजिक क्रांतीच्या विचाराने प्रेरित होऊन फ्रेंच भाषेत बिदरो आणि त्यांचे सहकारी यांनी पहिला ‘ज्ञानकोश’ संपादन केला. त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीच्या महान घटनेला वैचारिक प्रेरणा मिळाली. हा कोश इ. स. १७५१ ते १७७२-७३ च्या दशकात तयार झाला. त्याचे एकूण ३५ खंड निर्माण झाल्याचे मानले जाते. त्या काळातील मानवी ज्ञानाचे व्यापक संकलन त्या कोशात आहे. त्याची विचारांची बैठक बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित होती.’

हे ही वाचा…खालमानेतले अनलिमिटेड

भारतीय मानस जेव्हा पाश्चात्त्य देशाशी संपर्कात आले, तेव्हा आपल्याकडील विविध ज्ञानाचे, माहितीचे कोश निर्माण करण्याची त्यांना ऊर्जा मिळाली. अनेक अभ्यासक स्पष्टपणे कबूल करतात की, ‘भारतात ब्रिटिशांची सत्ता आली, इंग्रजी विद्योला आरंभ झाला, त्यातूनच ग्रंथारंभ आणि कोश निर्मितीला चालना मिळाली.’आधुनिक काळात मात्र विविध कोश मोठ्या प्रमाणात लिहिले गेलेत. याचे संदर्भ ग्रांथिक रूपात आज आपणास अनुभवायला मिळतात. कोशवाङ्मयाच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्र आणि मराठी भाषा समृद्ध आहे. विविध शब्दकोशांसह विविधतेचे ज्ञान देणारे ‘कोश’ इथे निर्माण झाले आहेत.

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कोशांची निर्मिती करण्याचा पहिला प्रयत्न तत्त्वचिंतक, संशोधक डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी केला. पाश्चात्त्य देशात शिक्षण ग्रहण केल्यामुळे तेथील ज्ञानाशी केतकरांचा अधिक परिचय झाला. आपल्या मराठी भाषेतही त्याच पद्धतीचे ज्ञान देणारा कोश असावा याकरिता त्यांनी १९२० ते १९२७ या काळात ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशांची’ निर्मिती सुमारे २३ भागात केली. त्यामुळेच त्यांना ‘ज्ञानकोशकर्ते’ म्हणूनही निरंतर ओळख लाभली आहे. यानंतर पं. महादेव शास्त्री यांनी ‘भारतीय संस्कृती कोश’, प्रा. दे. द. वाडेकर यांनी ‘मराठी तत्त्वज्ञान कोश’, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ‘भारतीय चरित्रकोश निर्माण केले आहेत. स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या ‘विश्वकोश’निर्मिती मंडळाद्वारे एका महाप्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. आज ‘विश्वकोशा’चे एकूण २० खंड वाचक व अभ्यासकाधीन झाले आहेत. मराठीतील निव्वळ शब्दकोशांची संख्या ४०० च्या जवळपास असल्याचे मानले जाते. शब्दकोशच नव्हे, तर मराठी भाषा व साहित्याच्या संदर्भातही समाधानकारक कोश निर्मिती मराठी साहित्यविश्वात झाली आहे.

कोश वाङ्मयाचे रचनेच्या दृष्टीने काही प्रकारही मानले जातात. उदाहरणार्थ- शब्दकोश, विश्वकोश, कोशसदृश्य वाङ्मय व सूचीवाङ्मय इत्यादी प्रकारात त्याची मांडणी केली जाते. एखादा लेखक स्वतंत्रपणे एकहाती यातील काही प्रकारचे लेखन – संपादन करतो, तर विश्वकोशासारखे व्यापक व बहुखंडीय कार्य इतरांच्या सहकार्याने पूर्ण केले जाते. त्यासाठी मुख्य संपादक हे आपल्या समवेत संपादक मंडळाच्या सहकार्याने कोश पूर्ण करतात. याच पद्धतीने कोशांच्या शृंखलेला अधिक परिपूर्ण करणारा एक महत्त्वाचा ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’सिद्ध झालेला आहे. मराठी साहित्याच्या प्रांतातील अत्यंत महत्त्वाचा वाङ्मय प्रवाह ठरलेले दलित साहित्य हे फुले – आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य आहे. या प्रवाहात ५० ते ६० वर्षांतच अफाट लेखन निर्माण झाले आहे. विविध वाङ्मयप्रकार यातील लेखकांनी हाताळले आहेत. तीन पिढ्या यासाठी झटल्या आहेत. अनेक नामवंत, ख्यातकीर्त कवी, लेखक, विचारवंत यात उदयाला आले आहेत. प्रथितयश असणाऱ्या अनेकांना वाङ्मयविश्व जाणिवेने ओळखत असले तरी अनेक अलक्षित, पण गांभीर्याने लेखन करणारेही लेखक या वाङ्मय प्रवाहात आहेत. सगळ्यांचाच परिचय वा ओळख समग्र वाङ्मयविश्वाला नसते. परिणामत: अशा सर्वच योगदात्यांच्या लेखनाची परिपूर्ण माहिती पुढील पिढ्यांना व्हावी, या उदात्त हेतूने पाचसहा वर्षांपूर्वी समीक्षक, संशोधक डॉ. महेंद्र भवरे यांनी एक संकल्प, महाप्रकल्प जाहीर केला होता. ‘फुले- आंबेडकरी वाङ्मयकोशाच्या’ निर्मितीचा हा संकल्प आज तडीस गेलेला दिसतो, त्यामागे चिकाटी आणि ध्यास आहे. एका ध्येयाने प्रेरित होऊन, प्रचंड मेहनत घेत एका ‘मिशन वर्क’प्रमाणे या कोशाचे संपादक डॉ. भवरे हे यासाठी अहोरात्र झटले आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करीत, कवी, लेखकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत, चर्चा – संवाद घडवून आणलेत. कोश निर्मितीमागील भावना व भूमिका सर्वांना पटवून दिल्या. त्यात फुले – आंबेडकरी चळवळीला प्रमाण मानणाऱ्या अनेकांचे त्यांना सहकार्य लाभले, अनेक जाणकार अभ्यासकांनी गांभीर्याने नोंदी लिहिल्यात आणि हा कोश सिद्ध झाला. आपल्या सोबतीला त्यांनी जे संपादक मंडळ घेतले, तेही लेखनाविषयी अत्यंत गंभीर, दक्ष, संशोधक, चिकित्सक तथा वाङ्मयीन जाण-भान असणारे आहेत. डॉ. भवरे यांचे अचूक संयोजन, कोश निर्मितीचा ध्यास, त्याची सुनियोजित आखणी व स्वत:ची व्यापक दृष्टी हे या कोश निर्मिती मागील महत्त्वाचे गमक आहे. त्यातच आपणही समाजाचे काही देणे लागतो, अशी त्यांची व सहकाऱ्यांची तळमळ यातूनही हा कोश सिद्ध झाला आहे.

हे ही वाचा…डेटाखोरीचे जग…

सुमारे साडेपाचशे कवी, लेखक व विचारवंत यांच्या नोंदी हे या कोशाचे वेगळेपण आहे. जवळपास १४२८ पृष्ठसंख्येने व्यापलेला हा कोश फुले- आंबेडकरी वाङ्मय प्रवाहातील मैलाचा दगड ठरणारा आहे. हा प्रकल्प सिद्ध करण्यास डॉ. भवरे यांचे संकल्पनातीत योगदान अवर्णनीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनात संपादक मंडळ, विविध ठिकाणच्या नोंदी लिहिणारे अभ्यासक यांचे योगदानदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळेच मराठी साहित्यविश्वाला परिपूर्णतेकडे घेऊन जाणारा ‘कोश’ या माध्यमातून सिद्ध झाला, हे कुणीही नाकारू शकणार नाही. या कोशाचा दुसरा विशेष हा की, कुठल्याही बाह्य आर्थिक सहकार्याशिवाय हा प्रकल्प सिद्ध झाला आहे. चळवळीची बांधिलकी म्हणून पदरमोड करून, संपादकांनी हे ध्येय गाठले आहे. गेल्या पाचसहा वर्षांमध्ये झालेल्या विविध ठिकाणच्या सभा, बैठका आणि चर्चेतून विविध नोंदीवर संस्कारही करण्यात आले आहेत. या नोंदींची पडताळणी व पुनर्मांडणी स्वत: डॉ. भवरे यांनी केली आहे. संपादकांनी निश्चित केलेले ध्येय आणि गत पाच-सहा वर्षातील मिशनवर्क प्रमाणे घेतलेली मेहनत याचे मोल आर्थिक गणितात मोजता येणार नाही. ती एक चळवळीप्रति कृतज्ञता आहे, हेच यातून सिद्ध होते. ही घटना जशी फुले – आंबेडकरी चळवळीसाठी, वाङ्मयासाठी आनंद देणारी आहे, तद्वतच ‘मराठी कोश’ व मराठी वाङ्मयासाठीही मोठीच मिळकत आहे.

हा कोश निव्वळ लेखक, कवींच्या नोंदीपुरता सीमित नाही. यातील कवी – लेखक एका ध्येयाने प्रेरित झालेले, चळवळीसाठी लेखन करणारे आहेत. त्यांच्या हातून निर्माण झालेल्या कलाकृती या व्यक्तिगत समाधानाच्या नसून, चळवळपूरक, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनासाठी प्रेरक ठरणाऱ्या आहेत. हा कोश अशा व्यक्तिमत्त्वांच्या नोंदी विस्ताराने अभ्यासक, संशोधक, विद्यार्थ्यांपुढे ठेवत आहे, जे काहीतरी ‘प्रयोजन’ घेऊनच लिहिते झाले आहेत. एका अर्थाने हा ‘कोश’ फुले-आंबेडकरी चळवळीसाठी सामाजिक, सांस्कृतिक दस्ताऐवज आहे. यात नोंद झालेले कवी, लेखक व विचारवंत हे सगळेच काही प्रथितयश नाहीत. परंतु आपल्या मगदुराप्रमाणे त्यांनीही फुले-आंबेडकरी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यातील अनेक अलक्षित, वंचित, कदाचित टाळले गेलेले, काही अंतर्मुख, काही प्रसिद्धी पराङ्मुख असेही लेखनकर्ते आहेत. त्यांचा परिचय ना समाजाला होता, ना वाङ्मयविश्वाला. अशा दूरवर असणाऱ्या परंतु निष्ठेने लेखन करणाऱ्या सर्वांनाच कोशकर्त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, हीदेखील या कोशाचे वेगळेपण सिद्ध करणारी बाजू आहे. फुले-आंबेडकरी विचारकक्षेत बसणाऱ्या सर्वांनाच कुठलाही भेद न बाळगता कायमचे अक्षरबद्ध केले आहे. फुले – आंबेडकरी वाङ्मयाच्या प्रवासाने सहा दशकांची वाटचाल केल्याने, लेखनही भरपूर झाल्याचे सर्वज्ञात आहेच. परिणामत: या सर्वांचे ज्ञान, आकलन होण्यासाठी एकत्रीकरणाची गरज होतीच. संपादक डॉ. भवरे यांच्या संकल्पनेतून या निमित्ताने ही उणीव भरून निघाली आहे. साठोत्तरी दलित, बहुजन, फुले – आंबेडकरी वाङ्मय विश्वात निर्माण झालेला हा अभिनव प्रकल्प आहे.

हा ‘कोश’ म्हणजे वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळात शब्द, ग्रंथ, प्रेरणा व चळवळी यांपासून दूर चाललेल्या पिढीसाठीदेखील आपले गतजीवन व आपले जीवनानुभव दर्शविणाऱ्या साहित्याचा आरसा आहे. त्यामुळेच पारंपरिक विविध कोशांपेक्षा भिन्न आहे. यातून सिद्ध झालेले लेखक, कवी हे मनोरंजक, कल्पनारम्य, अज्ञानी, अधर्मी, अमानवी, मूल्यहीन, परंपरागत, बुद्धिहीन, वर्चस्ववादी लेखन करणारे नाहीत. ते वास्तव जीवनाचा आलेख दर्शविणारे आहेत. मानवतावादी, धर्मनिरपेक्ष, समतावादी व फुले – आंबेडकरी विचारांना अधिक रुजविण्यासाठी झटणारे आहेत. हेच विचार आजच्या विपरीत काळातही गरजेचे आहेत. मानवी जीवन मूल्यांसाठी झटणाऱ्या, मानवतावाद हेच अंतिम साध्य आणि सत्य मानणाऱ्या ध्येयप्रवण व्यक्तिमत्त्वांच्या नोंदींचा हा कोश आहे. पारंपरिक वाङ्मयकोशांमध्येही विविध नोंदी असतीलच! परंतु त्यांच्या केंद्रस्थानी समग्र ‘माणूस’ असेलच असे नाही. या कोशातील समग्र लेखनकर्त्यांच्या केंद्रस्थानी माणूस आहे, नवे ज्ञान आहे आणि विज्ञानही आहे. परंपरागत विचारांना फाटा दिला आहे. म्हणून हा कोश निव्वळ लेखनकर्त्यांचे मोठेपण, शब्दांचे अवडंबर निर्माण करणारा नाही, तर नवविचारी अशी स्वतंत्र परंपरा निर्माण करणारा आहे. एकूणच मराठी वाङ्मय व समग्र कोशवाङ्मयास समृद्धपणे परिपूर्णतेकडे घेऊन जाणारा कोश म्हणूनही याकडे पाहावे लागेल. या वाङ्मयकोशाची निर्मिती ही कुठल्याही प्रलोभनातून, आर्थिक मिळकतीसाठी किंवा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी झालेली नाही. चळवळीशी असलेली प्रामाणिकता, वैचारिक निष्ठा आणि याच चळवळीच्या बांधिलकीतून महत्प्रयासाने ती झाली आहे. म्हणूनच हा ‘कोश’ सर्वार्थाने भिन्न ठरणारा आहे. एकूणच फुले-आंबेडकरी चळवळीला आणि वाङ्मयविश्वाला चिरस्थायी करणारा आहे, यात शंका नाही.

फुले – आंबेडकरी वाङ्मयकोशाची निर्मितीकक्षा ही अमर्याद आहे. त्याची व्याप्ती दलित साहित्याप्रमाणे वैश्विक आहे. यातून फक्त फुले- आंबेडकरी विचारांच्या अभ्यासकांनाच ज्ञान, माहिती व साधन सामग्री मिळेल असे नव्हे, तर जागतिक पटलावरील कोणत्याही वाङ्मयप्रकार व प्रवाहातील संशोधक, अभ्यासक, लेखक, विचारवंत, समग्र चळवळी तथा समाजशील असणाऱ्या प्रत्येकालाच महत्त्वाची उपलब्धी देणारा हा कोश आहे. यात नोंद असणाऱ्या अनेक कवी, लेखकांनी यापूर्वीच वैश्विक स्तरावर आपली वाङ्मयीन नाममुद्रा उमटविली आहे. पर्यायाने या कोशाचे भारतीय परिप्रेक्ष्यातही भिन्न वाङ्मयमूल्य आहे. ज्या दलित साहित्याच्या प्रेरणेतून समग्र भारतीय दलित साहित्य निर्माण झाले, तद्वतच या कोशाच्या प्रेरणेतून समग्र भारतीय दलित साहित्याचे कोशही पुढे निर्माण होतील. कारण कोणत्याही चांगल्या कृतीची प्रथम सुरुवात ही फुले – आंबेडकरांच्याच भूमीला करावी लागली आहे. या कोशाच्या निमित्ताने हा प्रारंभ महाराष्ट्रात झाला आहे. मराठी वाङ्मयाला यामुळे जशी समृद्धी मिळाली आहे, तशीच समग्र भारतीय भाषेतील साहित्यालाही मिळेल हा विश्वासही यामागे आहे.

हे ही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पडद्यावरच्या तालमींचा अहवाल

संपादकाचा निर्धार, निष्ठा, ध्येय आणि समर्पणाच्या भावनेतून निर्माण झालेल्या या कोशाचे समग्र विचारशील मानवप्राणी स्वागत करेल यात शंका नाही. अभ्यासक, संशोधक आणि प्रागतिक चळवळीतील कार्यकर्ते, मराठी साहित्यविश्व या कोशाचे स्वागत करतील आणि या प्रकल्पाचे संपादक व त्यांच्या संपादक मंडळाप्रति कृतज्ञ राहतील याबद्दल मला खात्री वाटते. ही कोशनिर्मिती म्हणजे फुले – आंबेडकरी साहित्य चळवळीचे अक्षरबद्ध लेणे आहे!