अजिंक्य कुलकर्णी

आपल्या भवतालाबाबत मानवाला असणारं कुतूहल हे आदिमकाळापासून आहे. याच कुतूहलापोटी मानवाने स्वत:च्या बुद्धिशक्तीच्या जोरावर संशोधनं केली. या संशोधनांच्या उपयोजनावर आपली भौतिक प्रगती साधली; पण ‘विश्वाचा हा सर्व पसारा नक्की आला कुठून?’ असा प्रश्न सतराव्या शतकात लायब्निझ या शास्त्रज्ञाने विचारला होता. सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन तर असे म्हणत की, ‘विज्ञानातील शोध म्हणजे, दोन व्यक्ती बुद्धिबळ खेळत असताना, एका तिसऱ्या व्यक्तीने ज्याला बुद्धिबळातलं काहीही माहीत नाही त्याने या दोघांना खेळताना पाहून बुद्धिबळाच्या खेळाचे नियम स्वत: समजून घेण्यासारखं आहे.’ विश्वाच्या उगमापासूनच्या इतिहासाचा आढावा ते विश्वाच्या अंताबद्दल आजचे प्रचलित सिद्धांत काय सांगतात त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न सुकल्प कारंजेकर यांनी केला आहे तो रोहन प्रकाशनतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आपले विश्व आणि त्याची नवलकथा’ या देखण्या पुस्तकात. या पुस्तकातील एकूण एकवीस प्रकरणांमधून विश्वशास्त्राच्या संशोधनाचा इतिहास तर समोर येतोच, सोबत महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचा, सिद्धांतांचा आणि संज्ञांचादेखील परिचय होतो.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Loksatta kutuhal Fear of misuse of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराची भीती

पुस्तकाच्या मांडणीत प्रामुख्याने दोन प्रवाह दिसतात. १) विश्वाच्या उत्पत्तीच्या भूतकाळात उत्पत्तीचा क्षण शोधणे. २) माणसाचं विश्वाबद्दलचं ज्ञान कसं समृद्ध होत गेलं? नवे सिद्धांत कसे मांडले गेले? या मांडण्यांमधून मानवाला विश्वाचं चित्र कसं गवसत गेलं? विश्वाला आधुनिकतेच्या चष्म्यातून समजून घ्यायचे असल्यास सापेक्षतावाद आणि पुंजवादाला समजावून घ्यावेच लागेल. या दोन्ही संकल्पनांच्या अभ्यासाशिवाय विश्व, विश्वाची उत्पत्ती हे समजणे कठीण जाईल. कुठल्या तरी एकाच संकल्पनेच्या माध्यमातून विश्वाचा अभ्यास करणं हे अपूर्ण आहे. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या संकल्पना समजायला किचकट असतात; पण कारंजेकरांनी पुस्तकात वापरलेले आलेख, तक्ते, आकृत्या आवश्यक तिथे उदाहरणे देऊन त्या सर्वसामान्य वाचकांनाही गुंतवून ठेवतील इतक्या सहज मांडल्या आहेत.

मानवाने पृथ्वीबाहेर राहण्याची कायमच इच्छा धरली आहे. अवकाश तंत्रज्ञानाची अवकाशभरारी म्हणजे ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ हे होय. तेथे काही अंतराळवीर कायम वास्तव्याला असतात. हे अंतराळ स्थानक म्हणजे पृथ्वीबाहेरील मानवाची वसाहत स्थापन करण्याच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल. त्यासाठी तेथे वास्तव्य करून आलेल्या अंतराळवीरांचे अनुभव समजून घेणं महत्त्वाचं असतं. पृथ्वीवरील तसेच अवकाशातील गुरुत्वाकर्षण कसे असते? याच गुरुत्वाकर्षणामुळे कृष्णविवरात काळ कसा मंदावतो? गुरुत्वाकर्षणाचा आणि अवकाशवक्रतेचा काय संबंध आहे? याबद्दलची रोचक माहिती ‘गुरुत्वाकर्षणाची गोष्ट’ या प्रकरणात वाचायला मिळते. अशा माहितीपूर्ण असलेल्या या पुस्तकात कारंजेकरांनी प्रत्येक प्रकरणात जागोजागी काही ठळक मुद्दे दिले आहेत. पुन्हा केव्हा तरी ते ठळक मुद्दे जरी आपण वाचले तरी आपल्याला त्या संकल्पनेची पुन्हा उजळणी होऊ शकते.

मूलकणांचा शोध ही घटना अणु-युगास प्रारंभ होण्यास कारणीभूत ठरली. १९२७ साली ब्रसेल्स इथे मोठमोठय़ा भौतिकशास्त्रज्ञांची परिषद भरली. या परिषदेत आईन्स्टाईनने पुंजवादात गृहीत धरलेल्या अनिश्चिततेवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र नील्स बोरच्या गटाने याची समर्पक उत्तरे दिली. या परिषदेमध्ये पुंजवादाचे जे निष्कर्ष काढले गेले ते आजही मानले जातात. या निष्कर्षांच्या चौकटीला ‘कोपनहेगन इंटरप्रीटेशन’ असे म्हणतात. मूलकणांच्या बाबतीत अशी विस्तारित माहिती ‘सूक्ष्म कणांची गोष्ट’ या प्रकरणात वाचायला मिळते. ‘ज्ञाताचा विश्व विस्तारलं’ हे तारे सूर्यमाला, खगोलीय गोष्टींच्या अतिशय रंजक, रोचक माहितीने भरलेलं प्रकरण आहे. एखाद्या ताऱ्यातून कोणत्या प्रकारच्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतोय? त्या प्रकाशाच्या तरंगलांबीचा अभ्यास केल्याने तो तारा कोणत्या मूलद्रव्यापासून तयार झालेला आहे, त्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती? त्या ताऱ्याची उत्पत्ती साधारण केव्हा झाली असेल, याचा अंदाज करता येतो.

पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे तारेसुद्धा मग एकमेव एकमेकांवर येऊन आदळत का नाही? या प्रश्नाने जसा न्यूटनला त्रास दिला होता तसंच विसाव्या शतकात त्याने आईन्स्टाईनलाहीदेखील डोकं खाजवायला भाग पाडले होते. यानंतर आईन्स्टाईन हा स्थिर विश्वाचा मार्गाने विचार करू लागला होता; पण विश्व अगोदर अस्थिर होतं आणि आता त्याची स्थिरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे, याच्या बरोब्बर उलटा निष्कर्ष उष्मागतीकी (थर्मोडायनॅमिक्स) हे शास्त्र मांडतं. उष्मागतीकीच्या ‘एंट्रॉपी’ संकल्पनेप्रमाणे विश्वाची ‘एंट्रॉपी’ म्हणजेच विस्कळीतपणा हा अधिकाधिक वाढत जात आहे. म्हणजे एकाच विश्वाकडे पाहण्याच्या दोन संकल्पनांचा दृष्टिकोन केवढा भिन्न आहे! विश्वाच्या निर्मितीचा कोडं उलगडण्यासाठी जसं जसं तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं तसतसं हे कोडं अधिकाधिक गुंतागुंतीचं होऊ लागलं आहे. म्हणजे कोणत्या तरी एका शाखेच्या अभ्यासाने किंवा वादाने हे कोडं उलगडणार नाही. अनेक शास्त्रांची, संकल्पनांची सांगड घातल्याशिवाय आणि विज्ञानाच्या विविध शाखांनी एकमेकांशी हातमिळवणी केल्याशिवाय आता विश्वोत्पत्तीचं कोडं सुटणार नाही. याचा अर्थ असा की, विश्वाच्या सुरुवातीच्या क्षणाला समजून घेण्यासाठी सापेक्षतावाद आणि पुंजवात यांची सांगड घालणं आवश्यक होतं. मात्र असा सिद्धांत शास्त्रज्ञांना मिळत नव्हता. त्यामुळे जोपर्यंत असा सिद्धांत मिळत नाही तोपर्यंत विश्वाची सुरुवातीची विशिष्ट परिस्थिती समजून घेणे शक्य नव्हतं. त्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण होत होते.‘विश्वाची विविध प्रतिमानं’ या प्रकरणात विश्व विस्तारण्याची अलेक्झांडर फ्रीडमन यांनी सांगितलेले तीन मार्ग यावर सविस्तर चर्चा आपल्याला वाचायला मिळते. १) विश्वाचा विस्तारण्याचा वेग किती? २) विश्व विस्तारण्याचा गुरुत्वाकर्षणावर काय परिणाम होणार.

३) विश्व विस्तारण्याचा वेग हा गुरुत्वाकर्षणाला संतुलित कसे करणार? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला तेव्हा समजतील, जेव्हा विश्व विस्तारण्याचा अचूक वेग आपल्याला समजेल. हे सर्व वरील प्रकरणात मुळातूनच वाचायला हवे. आपल्याला वाटेल की, या क्षेत्रात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती की काय? विश्वाच्या पसाऱ्याचा अंदाज घेण्याच्या प्रवासात महिला शास्त्रज्ञांचे योगदानही मोठं आहे. उदाहरणार्थ दुर्मीळ ताऱ्याचा शोध लावणाऱ्या हेन्रीएटा लीव्हिट, विश्वाच्या रासायनिक गुणधर्माचा शोध लावणाऱ्या सिसिलिया पेन, तसेच विश्वाच्या वस्तुमानाचा शोधाचं श्रेय व्हिरा रुबीन यांना जातं. त्यांच्यासमोर केवळ विश्वाची कोडी उलगडणे हेच आव्हान होतं असं नाही, तर पुरुषप्रधान असलेल्या या क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी स्त्री म्हणून करावा लागणार संघर्ष यांनाही चुकला नाही. व्हिरा रुबीन यांना शिकताना अनेक वेळा लिंगभेदाचा सामना करावा लागला. त्यांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या विषयावरच्या प्रबंधाकडे दुर्लक्ष झाले होते.जगभरातील शास्त्रज्ञ हे विश्वातील कृष्णपदार्थ (डार्क मॅटर) शोधण्यासाठी जगभर प्रयत्न करत आहेत. यासाठी केला जाणारा एक महत्त्वाचा प्रयोग हा स्वित्र्झलडमधील सर्न

( CERN) या त्वरकाच्या (अ‍ॅसीलेटर) मदतीने केला जातो. सत्तावीस किलोमीटर अंतराच्या बोगद्यात मूलकणांची टक्कर घडवून आणली जाते. या धडकेत तापमान इतकं वाढतं की, मूलकणांचे क्वार्क्स कणांत विघटन होतं. यालाच ‘हिग्ज-बोसॉन’ कण किंवा देवकण असं आपण म्हणतो. हिग्ज-बोसॉन मूलकणांचा शोध हा विश्वोत्पत्तीची मूलतत्त्वे समजून घेण्याच्या दोन-अडीच हजार वर्षांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण होता. २०१५ साली हा प्रयोग यशस्वी झाला. त्या वेळी काही स्फुट लेखांतून मराठीत या विषयावर लिहिलं गेलं; पण त्यानंतर इथे काय घडलंय? देवकणांच्या शोधाने नक्की काय माहिती आपल्या हाती लागली हे विस्तृतपणे कारंजेकरांनी या पुस्तकात मांडले आहे. कॉफीटेबल आकाराच्या या पुस्तकात गरजेनुसार मजकुराच्या शेजारी रंगीत आकृत्या, तक्त्यांचा वापर केला आहे. या पुस्तकात वेगवेगळय़ा मार्गानी विश्वाच्या उत्पत्तीपासून तर त्याच्या भवितव्यापर्यंतचा वेध घेतलेला दिसतो. विश्वाबद्दल विविध संस्कृतींत असलेल्या पौराणिक कथा काय आहेत, त्यांच्यापासून मानवाने कशी प्रेरणा घेतली याचा रंजक इतिहास यात वाचायला मिळतो. लोकप्रिय विज्ञान (पॉप्युलर सायन्स) हे रंजक, उत्कंठावर्धक पद्धतीने सांगणं अपेक्षित असतं ती अपेक्षा हे पुस्तक चांगल्या प्रकारे पूर्ण करतं. किशोर वयातील मुलांपासून मोठय़ांपर्यंत ज्यांना विश्वाबद्दल कुतूहल आहे त्या सर्वानी हे वाचावं. मराठीमध्ये लोकप्रिय विज्ञान अशा सोप्या पद्धतीने रुजवण्याचा कारंजेकरांचा हा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे. पुठ्ठा बांधणीतील या पुस्तकाचा निर्मितीमूल्याचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्यात प्रकाशक यशस्वी ठरले आहेत.

‘आपलं विश्व आणि त्याची नवलकथा’,
सुकल्प कारंजेकर, रोहन प्रकाशन,
पाने- ३१९, किंमत- १०९५

ajjukul007 @gmail.com