अनेक अनिष्ट वाङ्मयीन संकेतांतून मराठी कादंबरीला मुक्त करणारे मराठीतील एक पहिले कादंबरीकार
ह. ना. आपटे यांच्या १५० व्या जयंती वर्षांची आज सांगता होत आहे. त्यानिमित्त-
म राठी साहित्याला प्रदीर्घ इतिहास लाभला आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून ते आजपर्यंत अनेक संतांनी अभंग, ओव्या, श्लोक अशा विविध साहित्य प्रकारांची निर्मिती केली. आद्यकवी केशवसुतांनी मराठी नवकवितेची पताका रोवली आणि ती आजपर्यंतच्या सर्व कवींनी काव्यरूपी साज चढवून उंचावली आहे. तसेच मराठी वाङ्मयात नाटक, ललित लेखन, स्फुट लेखन, विनोदी लेखन, कादंबरी असे अनेक प्रकारचे साहित्य शारदेच्या चरणी अर्पण करून असंख्य लेखकांनी आपले नाव अजरामर केले आहे. त्यापैकी एक म्हणजे ह. ना. आपटे.
हरि नारायण आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६५ रोजी जळगाव जिल्हय़ातील पारोळे या गावी झाला. त्यांचे lr13शालेय शिक्षण पुणे व मुंबईत झाले. शालेय जीवनात त्यांनी इंग्रजी व संस्कृत साहित्याचे विपुल वाचन केले. कालिदास आणि भवभूती यांच्या श्रेष्ठत्वासंबंधी ‘केसरी’ वृत्तपत्रातून त्या काळी चाललेल्या वादात कालिदासाच्या बाजूने त्यांनी लिहिलेले एक मार्मिक पत्र आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकावरून रचलेल्या ‘विकारविलसित’ यांची अभ्यासपूर्ण टीका या दृष्टीने लक्षणीय आहेत.
सन १८८८ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी त्यांची ‘मधली स्थिती’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. ही कादंबरी रेनल्ड्झच्या ‘मिस्टरीज् ऑफ ओल्ड लंडन’ या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीखेरीज त्यांनी इतर सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या हयातीत ‘पण लक्षात कोण घेतो?’ (१८९३), ‘जग हे असे आहे’ (१९०१), ‘यशवंतराव खरे’ (१९१३), ‘मी’ (१९१६), ‘गणपतराव’ (अपूर्ण) (१९१९), तर ‘कर्मयोग’ (१९२३), ‘आजच’ (१९२४), ‘मायेचा बाजार’ (१९२१), ‘भयंकर दिव्य’ (१९३०) या कादंबऱ्या त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाल्या.
हरिभाऊंच्या कादंबऱ्यांमध्ये मध्यमवर्गीय समाजातील स्त्री-पुरुष, विशेषत: स्त्रियांच्या समस्यांना विशेष स्थान प्राप्त झाले आहे. पुनर्विवाहाचा प्रश्न, सासरच्या छळामुळे पिचणाऱ्या सुना, अल्पवयातच त्यांच्यावर लादले जाणारे मातृत्व, कमावती होऊन स्वत:च्या पायावर उभी राहू पाहणाऱ्या स्त्रीला समाजाशी करावा लागणारा मुकाबला याचे प्रभावी चित्रण त्यांनी केले. तत्कालीन तरुणांच्या मनातील वैचारिक संघर्ष, त्यांनी जोपासलेली ध्येये, स्त्री-शिक्षणाला अनुकूल होऊ लागलेली त्यांची मनोवृत्ती, इ. विषयही त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून समर्थपणे मांडले. तसेच सत्त्वशून्य होऊन पराभूत मनोवृत्तीने जगणाऱ्या तत्कालीन समाजाचे चित्र त्यांच्या काही कादंबऱ्यांतून दिसते. त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी म्हणजे ‘म्हैसूरचा वाघ!’ मात्र, ती त्यांच्या निधनानंतर १९२५ साली प्रकाशित झाली. ही कादंबरी इंग्रजी लेखक मेडोज टेलर यांच्या ‘टिपू सुलतान’ या कादंबरीवर आधारित आहे. त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो?’ ‘यशवंतराव खरे’ , ‘गणपतराव’ या कादंबऱ्या मराठी साहित्याच्याा दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. ही कादंबरी त्यांनी आत्मकथन पद्धतीने लिहिली आहे. त्याचप्रमाणे ‘गड आला, पण सिंह गेला’ (१९०४), ‘चंद्रगुप्त’ (१९०५), ‘रूपनगरची राजकन्या’ (१९०९), ‘सूर्योदय’ (१९१७), ‘केवळ स्वराज्यासाठी’ (१९१८), ‘सूर्यग्रहण’ (१९१९) या काही आणखी सामाजिक कादंबऱ्या आहेत. ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या लेखनासाठी त्या त्या विषयासंबंधी उपलब्ध असलेल्या इतिहासाचा ते काळजीपूर्वक अभ्यास करीत. त्यांनी काही काल्पनिक व्यक्तिरेखाही निर्माण केला असल्या तरी, त्या ऐतिहासिक वाटाव्यात इतक्या जिवंतपणे रेखाटल्या आहेत. त्यांच्या कादंबरीने मराठी कादंबरीच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. अनेक अनिष्ट वाङ्मयीन संकेतांतून मराठी कादंबरीस त्यांनी मुक्त केले. तिला अद्भुत व असंभाव्य घटनांच्या पकडीतून सोडवून वास्तवतेच्या दृष्टीने विकसित केले.
हरिभाऊंनी १८९० साली ‘करमणूक’ हे साप्ताहिक काढले. त्यांच्या अनेक कादंबऱ्या या साप्ताहिकातून प्रसिद्ध होत असत. याशिवाय शास्त्रीय माहिती, इतिहासातील मनोरंजक कथा आरोग्यविषयक सल्ला, प्रवासवर्णने, कविता, नाटिका, प्रहसने, चुटके, व्यंगचित्रे या साप्ताहिकातून प्रसिद्ध होत असत. या साप्ताहिकातून त्यांनी लिहिलेल्या स्फुट गोष्टींनी मराठी लघुकथेचा पाया घातला. निव्वळ कल्पनेच्या विश्वात रमलेल्या गोष्टींना त्यांनी भोवतालच्या जीवनातील वास्तव शोधण्यास शिकवले. ‘काळ तर फार मोठा कठीण आला!’ ही कथा त्यांनी इंग्रजीत ‘रामजी- अ ट्रॅजिडी ऑफ इंडियन फेमिन’ या शीर्षकाखाली अनुवादित केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी काही नाटके व प्रहसनेही लिहिली होती. ‘संत सखुबाई’ (१९११), ‘सती पिंगला’ ही त्यांची नाटके. याशिवाय रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’चा त्यांनी गद्यानुवाद केला होता. ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ व ‘विदग्ध वाङ्मय’ या विषयावर त्यांनी दिलेली व्याख्यानेही प्रसिद्ध आहेत. शेक्सपिअर हा त्यांचा आवडता लेखक होता. त्याच्या साहित्याचा हरिभाऊंचा व्यासंग मोठा होता. त्यांचे शेक्सपिअरविषयक लेख त्या काळी ‘निबंध चंद्रिका’ या मासिकातून प्रसिद्ध होत असत.
१९१२ साली अकोला येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विपुल साहित्यनिर्मितीबरोबरच त्यांनी समाजसेवाही केली. पुणे येथील ‘नूतन मराठी विद्यालय’ व ‘केईएम रुग्णालय’ यांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. तसेच पुणे नगरपालिकेचे ते काही वर्षे अध्यक्ष होते.
३ मार्च १९१९ रोजी वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाले. एक प्रतिभावंत कादंबरीकार या मातीशी एकरूप झाला. त्यांनी साहित्यातील विविध प्रकारांत आपल्या लेखणीने स्वत:चे ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनानंतर ‘कालकूट’, ‘मध्यान्ह’, ‘उष:काल’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या.
‘ह. ना. आपटे यांच्यासारख्या मराठी कादंबरीच्या जनकास त्यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
अमेय गुप्ते