स्वत:ला पुरोगामी आणि आधुनिक म्हणविणाऱ्या मराठी रंगभूमीचं ठसठशीत प्रतिबिंब राष्ट्रीय स्तरावर आज का दिसत नाही? भारतीय रंगभूमीच्या संदर्भात ती सध्या नेमकी कुठं आहे? तिच्या पीछेहाटीची कारणं काय, याचा शोध घेणारा लेख..
ज वळजवळ पावणेदोनशे वर्षांची प्रदीर्घ वैभवशाली परंपरा लाभलेली मराठी रंगभूमी राष्ट्रीय स्तरावर आज नेमकी कुठं आहे, तिचं स्थान काय, असा प्रश्न पडावा अशीच सध्या स्थिती आहे. एकेकाळी विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, गो. पु. देशपांडे, विजया मेहता, डॉ. जब्बार पटेल या मंडळींच्या नाटकांचा भारतीय स्तरावर प्रचंड दबदबा होता.. आजही तो आहेच. तेंडुलकरांचं नाव तर आघाडीच्या चार भारतीय नाटककारांमध्ये शीर्षस्थानी घेतलं जातं. परंतु त्यानंतर मात्र काही सन्माननीय अपवाद वगळता राष्ट्रीय स्तरावर मराठी नाटकं अभावानंच गाजताना दिसतात. नव्वदच्या दशकातील शफाअत खान, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दळवी, जयंत पवार, अभिराम भडकमकर, चेतन दातार, चंद्रकांत कुलकर्णी या मंडळींची काही नाटकं अन्य भारतीय भाषांमध्ये मंचित झालीही; परंतु अपवादात्मकरीत्या. अलीकडच्या काळात अतुल पेठे, मकरंद साठे, सचिन कुंडलकर, मोहित टाकळकर, अनिरुद्ध खुटवड, निपुण धर्माधिकारी, आलोक राजवाडे आदी नव्या, तरुण रंगकर्मीची नाटकं राष्ट्रीय नाटय़महोत्सवांतून अधूनमधून होताना दिसतात. याला त्यांच्या खणखणीत नाटकांबरोबरच राष्ट्रीय नाटय़महोत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, याची त्यांना असलेली माहिती जशी कारण आहे, तद्वत आपलं नाटक राष्ट्रीय महोत्सवांतून सादर करण्यासाठीची त्यांची धडपडही कामी येते, हे वास्तव आहे. परंतु या मोजक्या मंडळींच्या पल्याडही खूप मोठा मराठी रंगभूमीचा प्रदेश आहे; ज्याचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर बिलकूलच होताना दिसत नाही. त्यातही मुख्यत: व्यावसायिक रंगभूमीचं! राष्ट्रीय स्तरावर मराठी व्यावसायिक रंगभूमी मात्र सहसा बेदखलच राहिली आहे.
यामागची कारणं शोधू जाता अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत असं लक्षात येतं. अलीकडेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाटय़विद्यालयाच्या (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) जानेवारीत होऊ घातलेल्या भारतीय रंगमहोत्सवाकरिता विविधभाषिक नाटकांची निवड प्रक्रिया जवळून पाहण्याची संधी मिळाली. तीत यासंबंधात बऱ्याच गोष्टी जवळून समजून घेता आल्या. मुळात आपली मराठी रंगभूमी ही आत्ममग्न रंगभूमी आहे, ही बाब तिथे प्रकर्षांनं जाणवली. मराठी रंगभूमी ही देशातील अग्रगण्य व प्रगतीशील रंगभूमी आहे, हा आपला समज आपल्या नाटकांतील आशय-विषयाच्या दृष्टीनं रास्तच असला तरीही त्याचं राष्ट्रीय स्तरावर दर्शन घडत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. याला कारण पुन्हा- आपली आत्ममग्नता आणि धंदेवाईक दृष्टिकोन! आत्ममग्नता या अर्थानं, की आपण उत्तम नाटक सादर केलंय ना? मग राष्ट्रीय स्तरावर ते सादर करण्यासाठी आपणहून धडपड का करा? हवं तर ते आपल्याला सन्मानानं बोलावतील. नाहीच बोलावलं तर गये जहन्नम में! आपल्याला त्याची काहीएक गरज नाही. हा आपला भयंकर ताठा! दुसरं म्हणजे चुकूनमाकून कुणी एखादं मराठी नाटक दिल्लीत बोलावलंच, तर आपले लोक विचार करतात : दिल्लीला जाय-यायचे मिळून चार-पाच दिवस नक्कीच जाणार. तिथं एक प्रयोग सादर करून मिळून मिळून असं कितीसं मानधन मिळणार? कसाबसा प्रयोगाचा खर्च सुटला तरी नशीब! तेवढय़ा दिवसांत इथं महाराष्ट्रात दोन-तीन प्रयोग लावले तर त्याहून कितीतरी अधिक पैसा कनवटीला लावता येईल. त्यात आणखी नाटक, सिनेमा, सीरियल्समध्ये व्यग्र असलेले मराठी कलावंत एवढे दिवस केवळ एका प्रयोगाकरता दिल्लीत वा भारतात अन्यत्र यायला राजी होत नाहीत; ही समस्या आहेच. त्यापेक्षा आपल्या गल्लीपुरतं समाधान मानलेलं बरं! जणू काही यांच्याकरता कुणी तिथं पायघडय़ाच घातलेल्या आहेत!
खरं तर मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे दिल्लीत आदरानं बघितलं जात नाही. तुम्ही मारे स्वत:बद्दल ‘प्रागतिक रंगभूमी’ म्हणून कितीही ढोल पिटले तरी इतरांनी ते मान्य करायला हवं ना? याचं कारण- ‘मराठी नाटक हे शब्दबंबाळ असतं!’ हा जो आक्षेप अन्यभाषिक मंडळी घेतात, त्याला आपल्याकडे काय उत्तर आहे? हा आपल्या नाटकांचा दोष आहेच. आणि तो नाकारण्यात काहीच मतलब नाही. भारतीय स्तरावर मराठी नाटक पोहोचण्यात हा एक मोठाच अडथळा आहे. पूर्वीचे नाटककार अखिल भारतीय स्तरावर पोहोचले त्याला त्यांच्या नाटकांचे पं. वसंत देव यांच्यासारख्या जाणत्या अनुवादकांनी केलेली सुसंवादी भाषांतरे जशी साहाय्यभूत ठरली, ती अन्यभाषिक अनुवादाची प्रक्रियाच आता जवळजवळ थांबली आहे. याचाही मोठा फटका मराठी नाटकं भारतीय स्तरापर्यंत पोहोचण्याला बसला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे- आपल्याकडे जे काही ‘प्रयोग’ होतात ते आशय-विषयाच्या अंगानं म्हणजे संहितेच्या अंगानंच होतात. सादरीकरणाच्या अंगानं आपण फारच क्वचित मळलेली वाट सोडताना दिसतो. मराठी नाटकाचं ‘दृश्यात्मक मूल्य’ काय असतं? पूर्वापार धरून ठेवलेला ‘स्थळ : दिवाणखाना’ आपण कधी सोडणार? आपले लेखकही शिवाजी मंदिर नाटय़गृहाचा रंगमंच डोळ्यांसमोर ठेवूनच आपली नाटकं लिहितात. कारण तिथं सादर होणारं नाटक अन्यत्र कुठल्याही नाटय़गृहांतून सादर होऊ शकतं. म्हणजे मुदलात लेखकाला विषय सुचण्यापासूनच मराठी नाटकाला ही अंगभूत मर्यादा पडते. शिवाय त्या नाटकाचे व्यावसायिक दौरे करायचे म्हटले की नेपथ्यापासून प्रकाशयोजनेपर्यंत मग केवळ तडजोडी आणि तडजोडीच कराव्या लागतात.. केल्या जातात. अशी परिस्थिती असतानाही प्रदीप मुळ्यांसारखा एखादा प्रतिभाशाली नेपथ्यकार या मर्यादा ओलांडत नेपथ्यातून आपल्या ‘प्रयोगशील’तेची उन्मेखून नोंद घ्यायला लावतो. तर मोहित टाकळकरांसारखा एखादा अपवादात्मक दिग्दर्शक आपल्या नाटकांतून दृश्यात्मकतेचं अनोखं सौंदर्यही खुलवताना दिसतो. वामन केंद्रेंसारखे दिग्दर्शक नाटकाच्या ‘फॉर्म’च्या गंमतीशी खेळताना दिसतात. ‘झुलवा’, ‘रणांगण’मधून दृश्यात्मक प्रयोग करून पाहतात. अतुल पेठेंसारखा रंगकर्मी या मर्यादेतही काही अनवट करू बघतो. पण हे सगळं अपवाद म्हणूनच होताना दिसतं. तो नियम होत नाही.
हा दोष केवळ व्यावसायिक नाटकांमध्येच नाहीए, तर प्रायोगिक म्हणविणाऱ्या मराठी नाटकांमध्येही तो आढळतो. प्रायोगिक नाटक करायचं तर ते आविष्कार सांस्कृतिक केंद्राच्या माहीम म्युनिसिपालिटी शाळेच्या खुराडय़ासारख्या कोंदट रंगमंचावर त्याचा प्रयोग होणार, ही बाब ध्यानी ठेवूनच ते बेतलेलं असतं. मग कशी येणार त्यात प्रयोगशीलता आणि कसलं काय? शिवाय आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नेपथ्य, लाइट्स आदी साधनसामग्रीतच तो ‘प्रयोग’ बसवायचा, तर मग ‘प्रयोग’ तरी कशात करणार? उरतो तो घटक फक्त ‘आशय-विषय’च! म्हणजे नाटकाला शब्दांशी खेळणं आलं! या दुष्टचक्रात मराठी नाटक अडकून पडलं आहे. याला काहीच का इलाज नाही?
आणि मग असं शब्दबंबाळी मराठी नाटक जेव्हा राष्ट्रीय नाटय़महोत्सवाच्या बहुभाषिक निवड समितीसमोर येतं तेव्हा भाषेच्या अडचणीमुळे मुदलात त्यांच्यापर्यंत ते पोचतच नाही आणि पहिल्याच पायरीवर ते बाद होतं. त्यातूनही एखाद् दुसऱ्या मराठी नाटकाची महोत्सवासाठी निवड होते ती त्याच्या ‘सिनॉप्सिस’मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे, किंवा मग ते सादर करणाऱ्यांच्या आधीच्या नाटकांच्या लौकिकाधारे! या अडचणीवर मात करायची तर महोत्सवाच्या निवड प्रक्रियेत मराठीभाषी नाटय़कर्मी असण्याची गरज असते. असा एखादा मराठी सदस्य असतोही. परंतु त्याचं त्या नाटकाबद्दलचं मत तो अन्यभाषिक समिती सदस्यांना पटवून देऊ शकला (आणि त्यांनी ते संवेदनशीलतेनं पटवून घेतलं तर..) तरच ते शक्य होतं. अन्यथा मराठी नाटक राष्ट्रीय महोत्सवांत दिसणं दुरापास्त होतं.
राष्ट्रीय नाटय़महोत्सवांच्या निवड प्रक्रियेत असलेला महत्त्वाचा घोळ म्हणजे या महोत्सवांतल्या नाटकांची निवड ही नाटकाचा ‘प्रयोग’ पाहून होत नाही, तर त्याची जी ‘ध्वनिचित्रफीत’ सादरकर्त्यांकडून पाठविली जाते, त्याआधारे होते. खरं तर चित्रपट हे माध्यम मुळातच नाटकापेक्षा संपूर्णत: भिन्न आहे. नाटकाचा ‘प्रयोग’ थ्री-कॅमेरा सेटअप वापरून ध्वनिचित्रबद्ध केलाय की वन-कॅमेरा सेटअप वापरून, यावरून त्या ‘नाटय़प्रयोगा’चं प्रदर्शनमूल्य ठरतं. शिवाय चित्रपटासाठीची प्रकाशयोजना आणि नाटकासाठीची प्रकाशयोजना यांत गुणात्मकच फरक असतो. त्यामुळे नाटकासाठी केलेली प्रकाशयोजना ध्वनिचित्रफितीत प्रभावी ठरत नाही. परिणामी अशा प्रकारे ‘सीडी’बद्ध केलेल्या नाटकाचा प्रभाव त्या सीडीच्या तांत्रिक दर्जानुरुपच पडणार. यामुळेही आधीच आर्थिकदृष्टय़ा व तंत्रदृष्टय़ाही कमकुवत असलेलं मराठी नाटक ‘सीडी’त आणखीनच प्रभावहीन होतं. याचा परिणाम व्हायचा तोच होतो. निवडीच्या पहिल्या टप्प्यातच ते बाद होतं. याउलट, बंगाली किंवा अन्य प्रांतांतील ‘एनएसडीयन्स’च्या नाटकांच्या सीडीज् पाहिल्या तर आपण एखादा उत्तम ‘चित्रपट’च पाहतो आहोत का काय, असं वाटतं; इतक्या त्या तंत्रदृष्टय़ा उच्चतम दर्जाच्या असतात. शिवाय सबटायटल्समुळे ते चित्रफीतबद्ध ‘नाटक’ आकळण्याच्या दृष्टीनंही सोपं जातं. त्यामुळे अशा नाटकांचा प्रभाव निवड समितीच्या सदस्यांवर स्वाभाविकपणेच पडतो आणि अशांची प्राधान्याने निवड होते. या फंडय़ात हल्ली मणिपुरी, आसामी व काश्मिरी नाटकंही अहमहमिकेनं उतरलेली दिसतात. बहुतांशी ती स्थानिक लोककलांवर आधारीत असल्यानं त्यांत रंगसौंदर्य, नृत्य-संगीतादी श्रुतीमधुर तसेच नेत्रदीपक घटक ठासून भरलेले असतात. या सगळ्याचा प्रभाव निवड समितीवर पडल्याविना कसा राहील? म्हणूनच ‘फोकाची फोडणी’ (हा खास शफाअत खानी शब्दप्रयोग!) दिलेली नाटकं राष्ट्रीय नाटय़महोत्सवांतून आधिक्यानं आढळतात, ती यामुळेच! मराठी नाटक मात्र संहितेशी खेळताना सौंदर्यपूर्ण दृश्यात्मकतेचा विचार करताना सहसा दिसत नाही. म्हणूनच वामन केंद्रे, काही अंशी चेतन दातार आणि अलीकडच्या काळात मोहित टाकळकर यांचा अपवाद करता रतन थिय्याम, कन्हैय्यालाल, बन्सी कौल, हबीब तन्वीर यांच्यासारखे स्वत:च्या रंगशैलीचा ठसा उमटविणारे दिग्दर्शक आपल्याकडे आढळत नाहीत. अर्थात त्याचबरोबर हेही खरंय, की रंगशैलीचा अतिरेक हा नाटकाचा आशय पातळ करतो. केंद्रे, दातार किंवा टाकळकर या आपल्याकडच्या दिग्दर्शकांनी मात्र नाटकाच्या आशयाला उठाव देणारेच रंगप्रयोग केलेले आहेत. म्हणूनच त्यांची नाटकं सर्वार्थानं परिपूर्ण वाटतात. केवळ चूस म्हणून बन्सी कौल यांच्यासारखं उठसूठ सरसकट सगळ्या नाटकांना ‘क्लाऊन थिएटर’सारख्या एकाच संकल्पनेत त्यांनी कोंबलं नाही. रतन थिय्याम यांच्याइतकी दृश्यात्मक सौंदर्याची जाण आपल्याकडे अभावानंच दिसते. त्यामुळे निवड समिती सदस्यांना भाषेविना नाटक कळण्याचं हे एक सशक्त ‘माध्यम’च मराठी नाटकं वापरीत नसल्यानं निवड प्रक्रियेत ती टिकत नाहीत.
खरं म्हणजे अशा प्रकारे सीडीज्च्या आधारे नाटकांची महोत्सवाकरिता निवड करणं हे नाटकांवर घोर अन्याय करणारंच आहे. परंतु वर्षांनुवर्षे हीच पद्धती वापरली जात असल्यानं तिच्यात तातडीने काही बदल होईल हे संभवत नाही. तसंच आपला उभा-आडवा खंडप्राय देश पाहता त्या- त्या प्रदेशांत जाऊन, तिथली नाटकं पाहून निवड समितीच्या सदस्यांनी महोत्सवासाठी नाटकांची निवड करणं, हीसुद्धा तितकीच अशक्यकोटीतली व अव्यवहार्य गोष्ट आहे. परंतु यावर एक मार्ग असू शकतो. त्या- त्या प्रांतांतील नाटकांची उत्तम जाण असलेल्या नि:पक्षपाती रंगकर्मीना वर्षभर सर्व नाटकं पाहायला सांगून त्यांना त्यांतून उत्तम वाटलेल्या नाटकांची नावे सुचवायला सांगायची आणि या चाळणीतून महोत्सव आयोजकांकडे आलेली नाटकं निवड समितीच्या सदस्यांनी त्या- त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहायची. आणि मग त्यातून महोत्सवाकरिता नाटकांची अंतिम निवड करायची! नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी या वर्षी प्रांतोप्रांतीच्या विविधभाषिक रंगकर्मीना निवड समितीचे सदस्य म्हणून पाचारण करून एनएसडीच्या राष्ट्रीय नाटय़महोत्सवातील नाटकांची निवड शक्य तितकी पारदर्शी व नि:पक्षपातीपणे करण्याच्या एक दिशेनं पाऊल उचलले आहे. वर्षांनुवर्षे केवळ एनएसडीयन्सचाच या महोत्सवावर असलेला वरचष्मा त्यामुळे काही अंशी का होईना, मोडीत निघाला. यामुळे आजी-माजी एनएसडीयन्स त्यांच्यावर डुख धरण्याची शक्यताही आहे. परंतु भारतीय रंगभूमीचं प्रतिनिधित्व करणारा नाटय़महोत्सव हा केवळ ‘एनएसडीयन्सचा नाटय़महोत्सव’ ठरू नये, ही त्यामागची त्यांची भूमिका योग्यच म्हणायला हवी. पुढील वर्षी प्रांतोप्रांतीच्या जाणकार रंगकर्मीना त्या- त्या प्रदेशातील वर्षभरातील उत्तम नाटकांची नावं सुचवायला सांगण्याचा त्यांचा मानस आहे. या पहिल्या चाळणीतून आलेली नाटकं, तसेच जिथं ही प्रक्रिया राबवणं शक्य नाही, तिथून सीडीज्च्या माध्यमातून आलेल्या प्रवेशिका यांतून महोत्सवातील अंतिम नाटकांची निवड व्हावी असा आपला प्रयत्न असेल, असे प्रा. केंद्रे यांनी सांगितलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष रतन थिय्याम यांनीही त्यांच्या या सूचनेस पाठिंबा दिला आहे. विविध प्रांतांच्या प्रतिनिधित्वाचा विचार करून नव्हे, तर केवळ आणि केवळ उत्तम नाटकाच्या निकषांवरच महोत्सवातील नाटकांची निवड करा, असं त्यांनी यंदाच्या निवड समितीला नि:संदिग्धपणे सांगितलं होतं. याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या नाटय़महोत्सवात दिसेल. तसंच पुढील वर्षीपासून एनएसडीच्या राष्ट्रीय नाटय़महोत्सवात जास्तीत जास्त पारदर्शीपणे नाटकांची निवड होईल अशी आशा करायलाही हरकत नाही. मराठी रंगकर्मीनीही आपल्यातले दोष काढून टाकून आणि आपला ताठा सोडून देऊन अशा महोत्सवांतून सहभागी व्हायला हवं. तरच मराठी रंगभूमी राष्ट्रीय स्तरावर प्रतििबबित होईल आणि तिचं खरंखुरं मूल्यमापन होईल. जेणेकरून पुढे जाऊन राष्ट्रीय पुरस्कारांपासून शिष्यवृत्त्यांपर्यंत मराठी नाटकांना आणि रंगकर्मीना डावललं जाण्याचंही आपसूकच थांबेल. मराठी रंगभूमीच्या प्रागतिकतेची योग्य ती दखल घेतली जाईल.
राष्ट्रीय स्तरावर मराठी नाटक कुठे आहे?
स्वत:ला पुरोगामी आणि आधुनिक म्हणविणाऱ्या मराठी रंगभूमीचं ठसठशीत प्रतिबिंब राष्ट्रीय स्तरावर आज का दिसत नाही?
आणखी वाचा
First published on: 29-12-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Place of marathi theatre in national scenario