साधारणपणे १९३२ साली भारतीय सिनेमा बोलका झाला आणि संवादांबरोबर सर्व ध्वनिपरिमाणांची (आणि परिणामांचीही) जोड मिळत मूकपट बोलपटाच्या रूपानं अधिक प्रभावी होताना नाटकासह दृकश्राव्य लोककलांसारखाच त्यातही संगीताचा अत्यंत प्रभावी प्रयोग त्याला अधिक नाटय़मय, रंजक करता आला.. ध्वनिमुद्रण तंत्रातील नवनव्या संशोधनामुळे पूर्वध्वनिमुद्रित पाश्र्वसंगीत/ गाणी बोलपटाची रंगत वाढवू लागले.. चित्रपटातील गाणी चित्रिकरणाआधी ध्वनिमुद्रित करून त्याआधारे चित्रीकरण होऊ लागले.. याच टप्प्यावर विविध वाद्यांच्या एकल अगर संयुक्त आविष्काराचे प्रयोग व्हायला लागले.. आरंभीच्या काळात (संगीत रंगभूमीवर संगीत साथीला असणारा) ऑर्गन किंवा पियानो यांच्याभोवती सर्व वाद्यवृंद गुंफलेला असे.. ध्वनिमुद्रण करताना एखाद-दुसऱ्या मायक्रोफोनभोवती गायकांसह सर्व वाद्यवादक सहभागी होत.. त्यामुळे गाण्याच्या सुरुवातीचा आणि अंतऱ्यापूर्वीचा संगीतखंड बहुतांशी सर्व वादकांनी एकत्रितपणे वाजवलेला असे.. त्याला टुटी पीस असे म्हटले जाई.
त्या काळापासून अगदी आजपर्यंत पियानो हे वाद्य चित्रपट संगीतात अतिशय महत्त्वपूर्ण/ वैशिष्टय़पूर्ण सहभाग देत आले आहे. कुंदनलाल सैगल साहेबांच्या ‘दो नैना मतवाले तिहारे’ या गाण्यापासून पियानो हा गाण्याच्या तालासोबत सुरेल संवादी आघातपूर्ण संगतीबरोबरच दोन ओळींमधल्या छोटय़ा सुरेल लडीमधून गाण्याला सुंदर स्निग्धता देत आला. तसाच गाण्याच्या आरंभीच्या संगीतखंडात स्वराघात आणि अतिशय नाजूक, गतिमान स्वरांची आरोही-अवरोही वलये- यांची सुरेख गुंफण असलेल्या सुरावटीतून शब्दांच्याही पलीकडलं खूप काही सांगता झाला.. मग ते शंकर-जयकिशनचं ‘दोस्त दोस्त ना रहा’ असो किंवा ‘तेरा जाना’ (अनाडी) असो अथवा सज्जादसाहेबांचं ‘ऐ दिलरुबा नजरे मिला’ (रुस्तुम सोहराब) असो. संगीतकार हेमंतकुमारांनी स्वरबद्ध केलेल्या ‘अनुपमा’ चित्रपटातल्या ‘धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार’ या गाण्यात केवळ पियानोचा गाण्याच्या साथीबरोबरच आरंभीचा आणि अंतऱ्यापूर्वीचे संगीतखंड यात अतिशय सुंदर असा एकल आविष्कार आहे.. आणि नायिकेची आई पियानो वाजवत गाते आहे हे अत्यंत वास्तववादी शैलीत या गाण्यातून मांडले गेलेय.. पियानोपाठोपाठ की-बोर्ड कुटुंबातले आणखीन एक लोकप्रिय वाद्य म्हणजे पियानो अकॉर्डियन.. राज कपूरच्या आगमनापूर्वीही हे वाद्य प्रचारात होते, पण राजसाहेबांनी त्याला जी दृकश्राव्य लोकप्रियता मिळवून दिली त्याला तोड नाही.. पुढे संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या वाद्यवृंदाचा ते अविभाज्य घटक होऊन गेले.. अगदी ‘आजा सनम मधूर चांदनी में हम’ (चोरी चोरी)पासून ‘सब कुछ सिखा हमने’ (अनाडी), ‘ऐ मेरे दिल कही और चल’ (दाग), ‘हर दिल जो प्यार करेगा’ (संगम) अशा अनेक गाण्यांमध्ये पियानो अकॉर्डियनचा अप्रतिम प्रयोग शंकर-जयकिशन या जोडीनं केला आणि त्यांची वळणं मग त्यांच्या समकालीन संगीतकारांनी गिरवली.. कुठेही वाहण्यास सोपे आणि दिसायलाही राजबिंडे असे हे वाद्य पियानोसारखेच चित्रपटातल्या दृश्यात्मतेचा भाग बनून राहिले.. पुढे थोरल्या सचिनदेव बर्मनांनी ‘आराधना’ या चित्रपटातल्या ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याच्या सुरुवातीच्या सा ग प नी प ग.. अशी मायनर सेवेन्थ कॉर्डमध्ये योजलेली पियानो अकॉर्डियनची अतिशय मादक/आसक्त सुरावट गाण्याचा मूड बनवून जाते.. गाण्याच्या तालात अकॉर्डियनमधून अनाघातानं येणारे कुजबुजते सुरेल आघात आणि मग ‘भूल कहीं हमसे ना हो जाये’ या ओळीनंतर साक्सोफोनवर येणारी ‘गं रे सारेसानिसा’ अशी तारस्वरांतली हलकीशी घोगरी पण मधुर स्वरवेल उत्तेजना वाढवते.. अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडात सॅक्सोफोनच्या रासवट स्वरांना संवादी प्रतिसाद देणारी अकॉर्डियनवरची स्वरावली त्याच्या आणि तिच्या निकट क्षणाचं- त्यातल्या ओढीचं.. असोशीचं सुंदर वर्णन करते.. यापूर्वी इतक्या कल्पकतेनं या वाद्याचा कुणी उपयोग केला असेल असं मला वाटत नाही.. याच कुटुंबातलं आणखीन एक अत्यंत लोकप्रिय वाद्य म्हणजे हार्मोनियम.. आणि हार्मोनियम म्हटलं की हुस्नलाल भगतराम या संगीतकार जोडीच्या ‘चूप चूप खडम्े हो जरूर कोई बात है’ (बडम्ी बहन) पासून ओ. पी. नय्यर साहेबांच्या ‘लेके पहेला पहेला प्यार’ (सीआयडी) आणि ‘कजरा मोहोब्बतवाला’ (किस्मत) पर्यंत.. आदरणीय सुधीर फडकेंच्या ‘विकत घेतला श्याम’ (जगाच्या पाठीवर) पासून रोशनसाहेबांच्या ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ (दिल ही तो है) पर्यंत आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या ‘पायल की झनकार रस्ते रस्ते’ (मेरे लाल) पासून तर शंकर-जयकिशन यांच्या ‘चलत मुसाफिर मोह लिया रे’ (तिसरी कसम) या चित्रपट गीतांची स्मरणं मनात दाटून येतात.. वाद्यवृंद संयोजक शामराव कांबळे, सोनिक ऊर्फ मास्टरजी, उत्तमसिंगजी हे अप्रतिम हार्मोनियम वाजवणारे.. तर सगळ्यांचा शहेनशहा म्हणता येईल असा बाबुसिंग हा अत्यंत प्रतिभावंत वादक होऊन गेला.. हार्मोनियमवर पाऱ्यासारखी फिरणारी त्याची जादुई बोटंच केवळ नव्हेत तर हार्मोनियमच्या भात्याचा विलक्षण प्रयोग करून तो बोटांमधून झरणाऱ्या स्वरांना (भात्याच्या श्वासांची जोड देत) एक्स्प्रेशन्स देत असल्यानं त्याची हार्मोनियम ‘राधिका नाचे रे’ (कोनिहूर) मधली सतार कोण विसरू शकतो? (जिचं वादन प्रत्यक्ष पडद्यावर अभिनीत करताना नटश्रेष्ठ दिलीपकुमारजींनी सतारवादनाची रीतसर तालीम घेऊन गाण्याच्या ध्वनिमुद्रणात सतारीवर वाजलेले सर्व संगीतखंड प्रत्यक्षात आत्मसात करून नंतर ते चित्रीकरणाला सामोरे गेले.. त्यामुळे अवश्य पहा.. त्यांची सतारीवरून लीलया फिरणारी एका हाताची बोटं आणि दुसऱ्या हाताच्या तर्जनीवर चढवलेला मिजराब (तारेची नखी).. जे वाजतंय तेच आणि तसेच खुद्द दिलीपसाहेब छेडत असतात.. दुसऱ्या कुणाचे हात वापरून चीटिंग केलेलं नाहीय.. अशी कामावरची निष्ठा विरळाच..) असाच सतारीचा विलक्षण प्रयोग संगीतकार मदनमोहनजींनी आपल्या संगीतात अनेकदा केला.. मला स्वत:ला अत्यंत हृदयंगम असा वाटणारा त्यांचा प्रयोग म्हणजे ‘हंसते जख्म’ या चित्रपटातल्या ‘आज सोचा तो आंसू भर आये’ या गाण्यातला सतारीचा काळीज हेलावून टाकणारा सहभाग.. माझ्या मते हे सोलो गाणं नसून लतादीदी आणि सतारवादक रईसखानसाहेबांनी मिळून गायलेलं युगूल गीतच आहे.. सतारीसारखाच सरोदचाही अतिशय सुंदर एकल सहभाग असलेलं गाणं म्हणजे शंकर जयकिशन या जोडीचं ‘सीमा’ या चित्रपटातलं पुन्हा लता मंगेशकरांनीच गायलेलं ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’, भैरवी रागात बांधलेल्या या अप्रतिम गाण्यातलं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सरोदवादक अलीअकबर खांसाहेब यांचे भिजलेलं वादन.. ही केवळ अनुभवण्याचीच गोष्ट आहे.. असाच अत्यंत संयत विरागी भाव सरोदमधून मांडलाय संगीतकार रोशनसाहेबांनी ‘चित्रलेखा’ या चित्रपटातल्या महंमद रफीसाहेबांनी गायलेल्या ‘मन रे तू काहे न धीर धरे’ या गाण्यामध्ये.. वाहव्वा.. क्या बात है! पंडिता झरीन (दारूवाला) शर्मा यांनीही चित्रपट संगीतात दीर्घ काळापर्यंत आपल्या कुशल सरोदवादनानं असंख्य गाण्यांना समृद्ध केलंय.. सरोदचंच एक भावंडं असलेलं रबाब हे वाद्य संगीतकार सलीलदांनी (सलील चौधरी) ‘काबुलीवाला’ या चित्रपटाकरिता संगीतबद्ध केलेल्या मन्ना डे साहेबांच्या आर्त स्वरातल्या ‘ऐ मेरे प्यारे वतन.. ऐ मेरे बिछडे चमन’ या गाण्यात अशा खुबीनं वापरलंय की, काबुलीवाल्याच्या वतनाचा -अफगाणिस्तानाचा- माहोल स्वरातून साकारावा आणि अघातयुक्त तुटक स्वरावलीतून त्याच्या अंत:करणातली कासाविशीही.. संतूर हे काश्मिरी वाद्य पहिल्यांदा ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात पाश्र्वसंगीतात महान संगीतकार वसंत देसाई यांनी फार सुंदर वापरलं आणि पंडित शिवकुमार शर्मानी आपल्या संतूर प्रतिभेनं हिंदी चित्रपट संगीत व्यापून टाकलं.. किती किती गाण्यांचा उल्लेख करावा?.. तीच अवस्था पंडित हरिप्रसाद चौरासियांची.. त्यांच्यापूर्वी संगीतकार शंकर-जयकिशनच्या एका गाण्यात (‘मै पिया तेरी.. तू माने या ना माने’- चित्रपट- बसंतबहार) लताबाईंबरोबर पंडित पन्नालाल घोषांनी आपल्या बासरीच्या उत्कट वादनानं विलक्षण गहिरे रंग भरले.. आणि हाच वारसा पंडित हरीजींनी पुढे नेला.. त्यांचीसुद्धा किती किती गाणी सांगावीत? लक्ष्मीकांत-प्यारेलालजींच्या ‘शागीर्द’ चित्रपटातल्या ‘रूक जा ऐ हवा’ किंवा ‘आया सावन झुमके’मधल्या ‘सुनो सजना पपीहेने’मधल्या हरीजींनी बासरीवर वाजवलेल्या लकेरीकरिता मी त्यांची पारायणं केलीयेत.. आणि खर्जातली बासरी तर त्यांनीच वाजवावी! आर. डी. बर्मनच्या संगीतातल्या ‘अमर प्रेम’ चित्रपटातल्या ‘चिंगारी कोई भडके’ किंवा ‘कुछ तो लोग कहेंगे’ या गाण्यातली हरीजींची खर्जातली बासरी गाण्यातला विषाद अधोरेखित करत राहते आणि या सगळ्या प्रतिभावंत वादकांच्या योगदानाबद्दल संगीतकार यशवंत देवांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणावंसं वाटतं.. ‘त्यांची धून झंकारली गाण्यागाण्यातून..’
त्यांची धून झंकारली…
साधारणपणे १९३२ साली भारतीय सिनेमा बोलका झाला आणि संवादांबरोबर सर्व ध्वनिपरिमाणांची (आणि परिणामांचीही) जोड मिळत मूकपट बोलपटाच्या रूपानं अधिक प्रभावी होताना नाटकासह दृकश्राव्य
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 11-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Playback singing music recording and music instruments