येत्या १८ जानेवारी रोजी नाटय़छटाकार दिवाकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी होईल. शंभर वर्षांपूर्वी माणसांचं वास्तव जीवन घडविणारी नाटकं लिहून दिवाकरांनी एक प्रकारच्या उत्क्रांतीची सुरुवात केली होती. नाटय़ात्म आविष्काराबाबत प्रगल्भ जाणिवा असणारे व काळाच्या पुढे असलेले दिवाकर एक प्रतिभावंत लेखक होते.
१८ जानेवारी २०१४ रोजी नाटय़छटाकार दिवाकर यांची १२५ वी जयंती आहे. त्यामुळे २०१४ हे वर्ष दिवाकरांचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ‘नाटय़छटा आणि दिवाकर’ यांचं एक अतूट नातं आहे. १९११ साली दिवाकरांनी मराठीतली पहिली नाटय़छटा लिहिली आणि ‘नाटय़छटा’ या नवीन नाटय़ात्म प्रकाराची निर्मिती केली. या नवनिर्मितीमुळे मराठी साहित्याला दिवाकरांनी जे योगदान दिलं, त्यामुळे मराठी सारस्वतांमध्ये दिवाकरांचे अनन्यसाधारण असं स्थान आहे.
इंग्रजी कवी ब्राऊनिंग यांच्या नाटय़ात्म स्वगतांनी (मोनोलॉग्ज) प्रभावित होऊन दिवाकरांनी त्यांच्यासारखे पद्धतीनं लिहिण्यासाठी उद्युक्त झाले. मोनोलॉग्ज या मनोगत व्यक्त करणाऱ्या नाटय़ात्म पद्धतीच्या कविता होत्या. कविता करणं हा दिवाकरांचा पिंड नव्हता. म्हणून कवितेइतकाच बुलंद आणि तात्काळ परिणाम करणाऱ्या गद्य स्वरूपाच्या लेखन प्रकाराचा त्यांनी शोध घेतला आणि या त्यांच्या शोधातूनच ‘नाटय़छटा’ या प्रकाराची निर्मिती झाली.
दिवाकर स्वत: प्रामाणिक, विनयशील आणि सत्यनिष्ठ होते. त्यामुळे माणसांमधला खोटेपणा, दांभिकपणा, दुटप्पीपणा, अहंकार आणि स्त्रियांवर समाजाकडून होणारा अन्याय या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात राग आणि दु:ख होतं. माणसांमधल्या अशा विकृतींवर आपल्या उपरोधिक शैलीत दिवाकरांनी अतिशय समर्थपणे प्रहार केले. उपरोधिक शैलीमुळे त्यांच्या नाटय़छटेचा तोंडवळा विनोदी वाटत असला, तरीसुद्धा लोकांना अंतर्मुख करून, जीवनविषयक प्रश्नांचा गांभीर्यानं विचार करायला लावण्याची विलक्षण ताकद त्यांच्या नाटय़छटांमध्ये होती. जीवनविषयक सर्वच प्रश्नांबाबत त्यांना कुतूहल होतं आणि त्यातल्या त्यात जन्म-मृत्यूसारख्या गूढ विषयाबाबत तर ते अधिकच चिंतनशील होते. त्यांच्या ‘पाण्यातले बुडबुडे’सारख्या नाटय़छटेतून जीवनाची क्षणभंगुरता व्यक्त होते, तर ‘स्वर्गातले आत्मे’ या नाटय़छटेतून पृथ्वीवरील सुखदु:खमय अशा जीवनाची बहुरंगी बाजू व्यक्त होते.
नाटय़छटा आकारानं लहान व पाठांतरासाठी सोपी म्हणून शाळकरी मुलांनी नाटय़छटा पाठ करून, प्रेक्षकांसमोर धडाधडा म्हणून दाखवायच्या आणि शाबासकी मिळवायची, असा एक प्रघात सुरू झाला. त्यामुळे मुलांच्या अभिनयगुणांना वाव मिळण्यासाठी दिवाकरांनी नाटय़छटा लिहिल्या, अशी चुकीची समजूत रूढ झाली. वास्तविक पाहता प्रौढ, सुशिक्षित व शहाण्या माणसांच्या वर्तणुकीतील विसंगतींवर दिवाकरांनी नाटय़छटांमधून नेमकं बोट ठेवलं. शिवाय दिवाकरांच्या ठिकाणी असणाऱ्या प्रखर सामाजिक जाणिवा नाटय़छटांमधून व्यक्त होतात. जीवनविषयक विविध प्रश्नांबाबत सखोल गर्भितार्थ त्यांच्या नाटय़छटांमध्ये भरलेला असून, दिवाकरांच्या नाटय़छटांकडे तशा गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही आणि त्या दृष्टीनं या नाटय़छटांचं मूल्यमापनही झालं नाही, ही खेदाची बाब आहे.
‘नाटय़छटा’ या प्रकारात रंगभूमीवर एकच पात्र बोलत राहतं आणि या पात्राच्या बोलण्यातून स्टेजवर प्रत्यक्षात उपस्थित नसलेली पात्रं तिथं उपस्थित आहेत आणि या सर्वाशी मुख्य पात्राचा संवाद चालू आहे असा आभास निर्माण केला जातो. सुमारे ६० वर्षांपूर्वी नवीन नाटय़तंत्र म्हणून एकपात्री प्रयोगांचं रंगभूमीवर आगमन झालं. या नाटय़तंत्रातसुद्धा स्टेजवर एकच पात्र बोलतं आणि प्रत्यक्षात तिथं उपस्थित नसलेल्या पात्रांची उपस्थिती जाणवावी अशी त्यातील संवादरचना असते. थोडा विचार केला, तर असं लक्षात येतं की, अलीकडे नवीन नाटय़तंत्र म्हणून आपण स्वीकारलेल्या एकपात्री नाटय़प्रयोगाची बीजं, १०० वर्षांपूर्वी दिवाकरांनी लिहिलेल्या नाटय़छटा या प्रकारात काही अंशी दडली आहेत. रंगभूमीवर एकच पात्र बोलत असलं तरी तिथं नसलेल्या पात्रांच्या उपस्थितीची व त्यांच्याशी संवाद साधण्याची किमया ते पात्र करू शकतं, हा विचार दिवाकरांना १०० वर्षांपूर्वी जाणवला होता. नाटय़ात्म लेखनाबाबत दिवाकर काळाच्या पुढचा विचार करणारे होते हेच यातून प्रतीत होतं.
काळाच्या पुढे पाहण्याची त्यांची दृष्टी त्यांनी लिहिलेल्या पाच एकांकिका व तीन नाटकं यातूनही दिसते. दिवाकरांच्या समकालीन किलरेस्कर, देवल, खाडिलकर व त्यानंतरचे गडकरी व कोल्हटकर अशा ख्यातनाम नाटककारांनी कल्पनारम्य जगात नेऊन लोकांचं घटकाभर मनोरंजन करण्यासाठी नाटकं लिहिली आणि अशा नाटकांची एक परंपराच निर्माण झाली. या नाटकांचे विषय मुख्यत: ऐतिहासिक व पौराणिक पाश्र्वभूमीतून आलेले होते. राजे, शूर सरदार, श्रीमंत सावकार किंवा ईश्वरावतार अशी पात्रं या नाटकांच्या केंद्रस्थानी असत. अर्थातच त्यांचं नेपथ्य दिमाखदार व पोशाखही भरजरी असत. पात्रांची भाषा अलंकारिक, वाक्यं पल्लेदार व संवाद भाषणबाजी करणारे असत. त्यामुळे ही नाटकं अत्यंत लोकप्रिय झाली, हे खरं असलं तरी सामान्य माणसांच्या जीवनाचं वास्तव दर्शन ही नाटकं घडवू शकली नाहीत, परंतु याच काळात दिवाकरांनी लिहिलेल्या एकांकिका व नाटकांतून कधी खर्डेघाशी करणाऱ्या कारकुनांची जीवनकहाणी आहे, तर कधी सुधारक, सुशिक्षित लोकांच्या दुटप्पी वर्तनाचं जीवन दर्शविलं आहे. त्यांच्या नाटकांची नायिका कधी अन्याय झालेली पीडित स्त्री आहे, तर कधी आंधळ्या लोकांची परिस्थिती त्यात व्यक्त झाली आहे. नाटकाची भाषा अलंकारिक असण्यापेक्षा, ती सहज सोपी व उत्स्फूर्त असायला हवी, याची जाणीव ठेवून दिवाकरांनी या नाटकाचं संवाद लेखन केलं आहे. शिवाय नाटकाच्या सादरीकरणाचा विचार करून रंगभूमीवर नेपथ्य कोणतं असावं, संवाद बोलत असताना पात्रांच्या हालचाली व हावभाव कसे असावेत, प्रवेशद्वार व खिडक्या कोठे असाव्यात, याचा सारा सूक्ष्म तपशील दिवाकरांनी नाटक लिहिताना दिला आहे; जो नाटकाच्या लेखनासाठी आवश्यक असतो. त्यांच्या नाटकांची ‘ऐट करू नकोस’ किंवा ‘आपण सारे हॅ: हॅ: हॅ:’ अशा प्रकारची शीर्षकं ही आजकालच्या प्रायोगिक नाटकांची शीर्षकं शोभतील अशी आहेत. एकूणच नाटकाचं तंत्र, मांडणी व विषय याबाबत त्यांनी बराच विचार केला होता असं दिसतं.
सुमारे ५० वर्षांपूर्वी विजय तेंडुलकर आणि त्यानंतरच्या नाटककारांनी जुन्या पारंपरिक नाटकांची पठडी मोडून रोजच्या जीवनातील सामान्य माणसं केंद्रस्थानी ठेवून जीवनाचं यथार्थ दर्शन घडविणारी नाटकं लिहायला सुरुवात केली. हा काळ मराठी रंगभूमीचा उत्क्रांतीचा काळ समजला जातो आणि तसा तो खरोखरीच उत्क्रांतीचा काळ आहे. १०० वर्षांपूर्वी माणसांचं वास्तव जीवन घडविणारी नाटकं लिहून दिवाकरांनी अशा प्रकारच्या उत्क्रांतीची सुरुवात त्याकाळी केली होती. पण त्या वेळच्या पारंपरिक नाटकांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती, की, दुर्दैवानं दिवाकरांच्या नाटकांचं मूल्य अनेकांना समजलं नाही. त्यांची नाटकंदुर्लक्षित राहिली. मात्र असं असलं तरी नाटय़ात्म आविष्काराबाबत प्रगल्भ जाणिवा असणारे व काळाच्या पुढे असलेले दिवाकर एक प्रतिभावंत लेखक होते.
वयाच्या ४२ व्या वर्षी दिवाकरांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यामुळे दिवाकरांनी जेमतेम १९-२० वर्षेच लेखन केलं, पण या अल्पकाळात ते अनुभवाच्या नाटय़ात्म आविष्काराचा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेत राहिले. त्यामुळे नाटय़छटा, एकांकिका आणि नाटके याबरोबरच त्यांनी ‘मी- माझ्याशी’ हे ४६ आत्मसंवाद आणि दहा नि:पात्री संवाद लिहिले. अशा प्रकारचे वेगळे संवाद फक्त दिवाकरांनीच लिहिले. माणसाच्या मनात दुहेरी-तिहेरी विचारांचं किंवा भावनांचं द्वंद्व चालू असतं. सदसद्विवेकबुद्धी कधी मनाला फटकारत असते. असा ‘आपुलाचि संवाद आपणाशी’ व्यक्त करणारे चिंतनशील असे हे आत्मसंवाद आहेत.
त्यांचे नि:पात्री संवाद तर एकमेवाद्वितीयच म्हटले पाहिजेत. एकापेक्षा जास्त लोक एखाद्या विषयावर आपापली मतं व्यक्त करतात तेव्हा त्यांच्या परस्परसंवादाचं रूप म्हणजे नि:पात्री संवाद! यातील पात्रांना नावं नाहीत, तरीसुद्धा त्यांच्या बोलण्यातून त्या-त्या पात्राची ओळख पटत जाते. अशा संवादांमधून दिवाकर सामाजिक मानसिकतेचं दर्शन घडवतात.
दिवाकरांच्या नाटय़ छटांव्यतिरिक्त त्यांचं इतर लेखन अप्रकाशित राहिल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकलं नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्यांनी स्वत:ला आलेल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून सर्व लेखन केलं. त्यांनी कोणाचं अनुकरण केलं नाही आणि लोकप्रिय होण्याच्या दृष्टीनंही त्यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. वास्तव जीवनाशी त्यांच्या लेखनाचं कायम नातं राहिलं. त्यामुळे या लेखनाला कलात्मक मूल्य लाभलं आहे. प्रतिभावंत लेखक असून त्यांच्या काळात व त्यांनंतरही दिवाकर काहीसे उपेक्षितच राहिले. त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्तानं तरी त्यांना योग्य ते मानाचं पान मिळावं असं वाटतं.
एकमेवाद्वितीय नाटय़छटाकार
येत्या १८ जानेवारी रोजी नाटय़छटाकार दिवाकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी होईल. शंभर वर्षांपूर्वी माणसांचं वास्तव जीवन घडविणारी नाटकं लिहून दिवाकरांनी एक प्रकारच्या उत्क्रांतीची सुरुवात केली होती.
आणखी वाचा
First published on: 12-01-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Playwright diwakar