बालरोगतज्ज्ञ म्हणून जगताना खूप काही अनुभवले. काही अनुभव माणसाचे मन उलगडून दाखविणारे होते. काही अनुभव शिकविणारे होते. काही अनुभव माझ्यातील हिणकस दाखविणारे होते, तर काही माझ्या
तो शनिवार होता. माझा सुट्टीचा दिवस. शनिवारचा राउंड हा इतर दिवसांच्या राउंडपेक्षा अनेक अर्थाने वेगळा असतो. बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने खालच्या मजल्यावर पूर्ण शांतता होती. मी जिना चढून वर आले. सारा वॉर्ड शांत होता. कोणाचेच माझ्याकडे लक्ष गेले नाही. नेहमी राउंड म्हटले की माझ्याबरोबर एक असिस्टंट डॉक्टर, दोन-तीन नर्सेस असा लवाजमा असतो, तो आज नव्हता. शिवाय मी आज नेहमीचा पांढरा एप्रनही घातला नव्हता. त्यामुळे मी राउंडला आल्याची कोणालाच जाणीव झाली नाही. मी वॉर्डमध्ये येऊन उभी राहिले. मी पाहत होते. कोणी बाळाला दूध पाजत होते, कोणी भात भरवत होते, दोघी-तिघी एकत्र येऊन हातवारे करून काही महत्त्वाचे बोलत होत्या. त्यांचा मूक अभिनय पाहताना मजा येत होती. मलाही हा क्षण सत्यजीत रे यांच्या शॉट्सप्रमाणे थोडा लांबवावा असे वाटले. अशामुळे होते काय, की मन अंतर्मुख होते. डोळे समोर दिसतंय त्याच्या पलीकडचे पाहू लागतात. हा क्षण पुरेसा लांबत असताना माझी नजर एका दृश्याने खेचून घेतली.
एक छोटी मुलगी पाळण्यात झोपलेल्या बाळाला हाताने झोका देत होती. बाळाची आई कॉटवर झोपली होती. तिला डुलकी लागली होती. पाळण्यातील बाळही झोपले होते. ती छोटी मुलगी स्वत:च्याच ओठांवर डाव्या हाताचे बोट धरून उजव्या हाताने पाळण्याला हलके हलके झोके देत होती. तिच्या चेहऱ्यावर असे भाव होते, की जणू तीच बाळाची आई आहे आणि बाळाची सगळी जबाबदारी तिच्यावरच आहे! जोपर्यंत बाळ झोपले आहे तोपर्यंत ती जणू तशीच हलका झोका देत राहणार होती. माझी चाहूल तिला लागली नव्हती. मीही तशीच तिच्याकडे पाहत उभी राहिले होते. एक-दोन मिनिटांतच बाळ उठले आणि गोड हसले. आता तिच्या चेहऱ्यावरचा गंभीर मुखवटा वितळून गेला. ती ‘आई’ एकदम ‘ताई’ झाली. खुद्कन हसली आणि धसमुसळेपणाने झोका देऊ लागली.
माझे मन पाखराच्या गतीने भूतकाळात गेले. मी आठवी-नववीत असेन. आमच्या इंग्रजीच्या पाठय़पुस्तकात एक कविता होती..
Hush-a-bye, baby, on the tree top,
When the wind blows the cradle
will rock;
When the bough breaks the cradle will fall;
Down will come baby, cradle and all.
अवघी चार ओळींची कविता! सुरुवातीला ही कविता वाचली तेव्हा ‘कविता’ म्हणून काहीही कळली नाही आणि भावलीही नाही. उलट ‘कसली ही कविता?’ असेच मनात आले. नंतर कवितेच्या तासाला आमच्या भागवत बाईंनी ही कविता इतकी सुरेख समजावली, की मी अगदी हलून गेले होते.
बाई सांगत होत्या, ‘‘या कवितेत तुमच्याएवढीच एक छोटी मुलगी आहे. ती आपल्या लहान भावंडाला पाळण्यात घालून झोके देत आहे. तिची आई नुकतीच काही कामासाठी बाहेर गेली आहे. जाताना तिने या बाळाची जबाबदारी छोटीवर टाकलीय. छोटीही उत्साहाने बाळाची आईच झाली आहे. पाळणा झाडाला टांगलाय. हळूहळू बाळाला झोके देत अगदी आईचा आव आणून ती म्हणते,
Hush-a-bye, baby, on the tree top,
When the wind blows the cradle will rock;
बाईंनी या ओळी अगदी हळू आवजात, आईच्या पोक्तपणे, सावकाश म्हटल्या. पुढे त्या म्हणाल्या, ‘‘झाडाच्या टोकाला पाळणा टांगलाय आणि आता जरा वारा सुटला की पाळण्याला छान झोका मिळेल. पण लहान मुले फार वेळ गंभीरपणाचा मुखवटा धारण करू शकत नाहीत. ही मुलगीसुद्धा काही क्षणांतच आपली आईची भूमिका विसरली आणि पुन्हा छोटी मुलगी झाली. अतिशयोक्ती करणे हा तर मुलांचा स्वभावच! तिला वाटले, ‘अय्या! जोरात वारा आला तर काय बरं होईल? जोरात वारा आला तर ही फांदीच मोडेल. मग बाळ आणि काय-काय सगळंच खाली पडेल. काय मज्जा होईल नाही!’’
बाईंनी आपला आवाज उंच नेत छोटी मुलगीच भाबडेपणाने ही गंमत अनुभवत असल्याच्या सुरात म्हटले,
‘When the bough breaks the cradle will fall;
Down will come baby, cradle
and all.’
एका छोटय़ा मुलीच्या मनात आईच्या भूमिकेपासून अवखळ मुलीच्या भूमिकेपर्यंतचा काही क्षणांचा हा प्रवास म्हणजेच ही छोटी कविता!’’
तो इंग्रजीचा तास माझ्या मनात कायमचा कोरला गेला. समोरची छोटी आणि पाळण्यातले ते बाळ पाहताना माझ्या मनात ही कविता उमलू लागली.
समोरचे बाळही आता ताईकडे पाहून जोरजोरात हसत होते. ती मुलगीही अवखळ ताई होऊन बाळाला जोरजोरात झोके देत होती. माझ्याही नकळत मी पुढे गेले आणि म्हटले, ‘अगं, अगं, पडेल की बाळ!’ ती छोटी चपापली. तिने पाळणा थांबवला. सगळेचजण आपापल्या जागी गेले आणि माझा राऊंड सुरू झाला..
मात्र हा अनुभव दिवसभर माझ्या मनात आनंदाचे तरंग उमटवत राहिला.
कविता
बालरोगतज्ज्ञ म्हणून जगताना खूप काही अनुभवले. काही अनुभव माणसाचे मन उलगडून दाखविणारे होते. काही अनुभव शिकविणारे होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-11-2014 at 01:16 IST
मराठीतील सर्व एक झाड, एक पक्षी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poem