डॉ. आशुतोष जावडेकर
पवन नालट या कवीचे नाव महाराष्ट्राला एव्हाना चांगलेच परिचित आहे. तो अमरावतीचा असला तरी केवळ विदर्भाचा कवी नव्हता. अनेक कार्यक्रमांत, साहित्य संमेलनांत त्याला त्याची उत्तम कविता उत्तम तऱ्हेने सादर करताना बघत असे तेव्हा त्याचा कवितासंग्रह अद्याप न आल्याची बारीक रुखरुख वाटत असे. राजहंस प्रकाशनाने त्याचा ‘मी संदर्भ पोखरतोय’ या शीर्षकाचा सुंदर कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केल्याने अनेक रसिकांची ती रुखरुख नाहीशी झाली आहे. आजकाल अनेक नवे संग्रह अक्षरश: अध्र्या तासात चाळून दूर ठेवले जातात, इतके ‘प्रेडिक्टेबल’ असतात! त्यात कवितेहून अधिक मजकूर त्या कवितेची भलामण करणाऱ्या संदेशांचा असतो. त्याची प्रस्तावना साहित्य व्यवहारातील सर्व महत्त्वाच्या नावांना हुशारीने सामावून घेणारी असते आणि त्या संग्रहांना बरोब्बर पुरस्कारदेखील मिळतात. पवनची कविता मुळीच भाबडी नाही. ती हे सर्व जाणते आणि तरी त्यापासून लांब एकटी ताठ उभी राहते आणि तीच तिची फार मोठी शक्ती आहे. कधी ती कविता बाईच्या आयुष्याचे अनेक पदर बघते. ‘बाई भिजल्या डोळ्यांनी लिहू नकोस कविता/ चिंब भिजतो कागद/ पण सुकते कविता’ असं तालात, लयीत म्हणते. कधी मुक्तछंदात बाईचं जगणं दहा कवितांमध्ये दीर्घकवितेच्या रूपाने आणते. (आणि ते संवेदन बेगडी, कृतक नाही.) एका कवितेत त्याने म्हटलं आहे : ‘मी मंद्र सप्तकात गात होते/ तो तारसप्तकात ओरडत होता/ मी कोमल स्वरात विरघळत राहिले/ तो विरक्त स्वराने दूर जात राहिला..’ स्वत:ची लिंगओळख विसरून कविता लिहिणं हे सगळ्यांना साधत नाही. ते इथे पवनला साधलं आहे.
आणि मग येते धर्मचिकित्सा! कवितेमधून वैचारिक आणि तरी आत्मीय पातळीवर केलेली धर्मचिकित्सा माझ्या वाचनात सध्याच्या कवितांमध्ये आलेली नाही. ‘मिनार’सारख्या कवितेत कवी बंडखोर होतो आणि त्याच्या मनाचा झुकलेला मिनार मांडतो. पण त्याची ‘हम नफस : काही नोंदी’ ही कविता सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा दस्तावेज मानावी लागेल. त्या कवितेतल्या (आणि पुस्तकाच्या मलपृष्ठावर असलेल्या) ओळी विलक्षण आहेत : ‘मला माहीत होतं / थडग्यांवर जीव लावणारी माणसं / सर्वच धर्मात असतात/ माणसांवर जीव लावणारी माणसं / सापडत नाहीत कुठेही!’
चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ व आतील मांडणी ही त्यांच्या लौकिकाला साजेशीच आहे. हिरवा रंग आणि निळसर पक्षी काळा काळ पोखरताना असा.. पण मला मात्र या सगळ्या कविता वाचल्यावर दिसत राहिला राखाडी, शुष्क मातीचा, वाळलेल्या झाडाचा रंग! तो राखाडी रंग कधी धर्माला, कधी बाईच्या जगण्याला, कधी व्यक्तीच्या अस्तित्वाला आणि कधी अगदी वाळत चाललेल्या शिक्षणयंत्रणेला शब्दांत घेऊन उभा राहतो. त्याच्या शिक्षणव्यवस्थेवर लिहिलेल्या कविता या नुसते बोचकारे घेणाऱ्या नाहीत, तर त्यात आहे एक हताश भय.. आणि मग भयाचा कडेलोट झाल्यावर येणारा एक जहरी, कुणाला न जुमानणारा संताप.. पवनची एकूणच सारी कविता एका अशा बिंदूला उभी आहे, जिथून पुढे त्याला एक तर क्रांतीची वाट धरावी लागेल, नाही तर करुणेची. कवीचे भाकीत कुणी वर्तावे? पण तरी समीक्षक आपले भाकीत करीत असतात आणि काळ पुढे तपासायला असतो. आसपासच्या साहित्यव्यवहाराचा काठ मागे सोडून देऊन हा कवी आपली नौका इमानेइतबारे हाकीत वाढत्या वयाच्या प्रवाहांचे अनुभव घेत गेला तर पुढे टी. एस. इलियटच्या वेस्ट लँडसारखा प्रांत त्याला भेटेलदेखील कदाचित; आणि त्याहून अधिक शक्यता म्हणजे हा कवी अशा बिंदूला आहे की, त्याला त्याच्या मनातील खदखद एखाद्या दीर्घ कादंबरीमध्ये मांडावी लागेल. त्यानेच एका कवितेत म्हटलं आहे तसं- निर्मोही होत त्याला ते रस्ते धाडसाने शोधावे लागतील. चंद्रमोहन यांनी चितारलेला तो देखणा गडद निळसर पक्षी तेच सांगतो आहे! पवनच्या संग्रहाचे स्वागत आणि यापुढच्या दिशांसाठी त्याला शुभेच्छा!
‘मी संदर्भ पोखरतोय’- पवन नालट,
राजहंस प्रकाशन, पाने- १५६, किंमत-२८० रुपये
ashudentist@gmail.com