सौमित्र kiishorkadam@gmail.com

तुझ्या जन्म-मृत्यूच्या तारखा एखाद्या अभद्र स्वप्नासारख्या

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
balmaifal article loksatta
बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक

सतत येतच राहतात कॅलेंडरमध्ये दरवर्षी अपरिहार्यपणे

बाकीचं सगळं तस्संच ठेवून फक्त या दोन तारखा

खोडून टाकता आल्या असत्या कायमच्या कॅलेंडरमधून तर

भूतकाळाचं ओझं थोडं तरी कमी झालं असतं इतका

आटापिटा चाल्लाय  सगळ्यांचा तू इतिहासातही नसावंस म्हणून

किती वेळा किती पद्धतीनं तुला मारायचा प्रयत्न केला

तरी मरतच नाहीस तू म्हटल्यावर द्वेषाची दारू भरून

पुन्हा पुन्हा निकामी झालेली काडतुसं जिवंत करताहेत

इतक्या वर्षांत सडून गेलेलं असत्याचं प्रेत पुन्हा पुन्हा

उकरून काढून सत्याला कधीचे नामोहरम करू पाहताहेत  

वास्तव व्हेंटिलेटरवर ठेवून जिवंतपणाचा आभास निर्माण करताहेत 

तू मात्र तुझं दीर्घ मौन जोपासत तुझ्या धोतरपंचा

काटकुळ्या पायांवर जिवंत उभा अजूनही काळाच्या छाताडावर

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> 

सत्याला चॉइसच नसतो नसण्याचा असत्याला पर्याय असतात

म्हणूनच तर कथाकादंबऱ्यापोथ्यापुराणं काय काय होऊ  शकतं त्यांचं

पण सत्याचं होऊच शकत नसतं फिक्शन हे कळल्यावर त्यासाठी

झगडणाऱ्या माणसांनाच मारून टाकून त्यांचं फिक्शन करू पाहताहेत

असत्य गाळून घेण्याची प्रक्रिया चालू आहे शतकानुशतकं

तरी हाती लागत नाही सत्य म्हणूनच तुझ्या जन्म-मृत्यूच्या

तारखांच्या आसपासच सगळे असत्याचे प्रयोग सुरू करताहेत

अजून अजून भरताहेत रांजण भरून उतू चाललेत तरी

 तेव्हा जन्मला नसतास तर आता तरी असतास का तू

आणि आता जन्मला असतास तर तेव्हा काय झालं असतं

अशा संभ्रमात वाटत राहतं तेव्हा जन्मलास म्हणूनच तर

तुला इतिहासात ढकलता आलं पटकन् आणि तूही तुझं

फेमस बोळकं निरागस हसू घेऊन वेळोवेळी चालत येऊ  शकलास

वर्तमानात तुझ्या त्या प्रसिद्ध काठीसकट काठीपेक्षा ताठ होऊन

आता काळाचं कुठलंही कॅलेंडर असलं तरी भूतकाळातून निघून तू

वर्तमानातून झरझर पावलं टाकत भविष्याच्या पार जाताना दिसतोस

हे काय कमी आहे.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> 

आताशा कुठल्या कुठल्या कारणांनी सतत आठवत राहतोस तू

तुझी गरज आज जास्त आहे की तेव्हा होती कळत नाही बापू

बापा आज्या पणज्या खापरपणज्या राष्ट्रपित्या महात्म्या

दूध पिऊन सप्लिमेंट्स खाऊन सिक्सपॅक केलेल्या आम्हाला

बकरीचं दूध पिऊन तू इतका शक्तिमान कसा झालास ते सांग

मुठभरच उचलून समुद्रकिनारी कसं केलंस जागृत लाखो करोडोंच्या

शरीरातलं मीठ सांग कशी आणलीस चव तुझ्या नुस्त्या चालण्याला

मानवतेच्या कुठल्या विश्वासाचं फूल घेऊन बेधडक शिरायचास

तू नंग्या तलवारी बच्र्छा लाठय़ाकाठय़ा घेतलेल्या दंगेखोरांमध्ये

कुणाच्याच द्वेषाचा उठणार नाही साधा ओरखडाही तुझ्या

अर्धनग्न त्वचेवर इतकं पोलादी कसं केलंस तुझं मुलायम शरीर

कशी शाबुत ठेवलीस तुझ्या बोळक्या हसण्यातली बालसुलभ

निरागसता इतक्या माणसांच्या महासागरात गोंधळात गदारोळात

निबिड काळोखातून झरझर पावलं टाकताना पलीकडे असेलच

प्रकाश कुठेतरी स्वागताला एवढा विश्वास कसा मिळवलास तू

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> 

मला कळला नाहीस तू कधीच बा’ला कळला असशील

आख्खाच्या आख्खा असं वाटतं तुला की ती फरफटत गेली

तुझ्या झंझावातात समजूतदारपणे सत्याला स्मरून खरं सांग

तू होतास की ती होती जास्त कणखर सहनशील तुझ्यापेक्षा

कधी कधी वाटतं मी एकटाच नाही आता आम्ही सगळेच

झालो आहोत हरिलाल तू न कळलेले तुला न समजलेले

माझ्यात निदान तुझं रक्त आहे म्हणून तू थोडा थोडा

जाणवलास तरी नंतर नंतर अपरिहार्यपणे पण सगळ्यांना

कधी कळणार आहेस तू कसा की तूच कळला आहेस

सगळ्यांना इतर कुणाहीपेक्षा जास्त म्हणून तुझ्या

मृत्यूच्या दिवशीच नथुराम जन्माला घातले जातात

बडवले जातात मोठमोठय़ाने समर्थनाचे ढोल

तुझी हत्या झालीये हे कळूनही वेगवेगळ्या मार्गानी

इतकंच काय तुझं मोठ्ठंसं पोस्टर छापून त्वेषाने ओरडत

पोस्टरवर जाहीर गोळीबार करून तू मेलाच नव्हतास

इतकी वर्ष काही केल्या हे पुन्हा पुन्हा सिद्ध करतात

इतकं होऊन तू मात्र फाटक्या पोस्टरमधूनही

निर्मळ हसतच राहतोस

कुणावर हसतोस

का खरं सांग

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> 

मला बापाचा कॉम्प्लेक्स होताच आधीपासून

आजच्याच दिवशी तुला मारलं गेलं हे सारं जग ओरडून

सांगताना मी गप्प तरी कसा राहू कसाही असलास तरी

माझा बाप होतास तू

आज तू असतास तर म्हणाला असतास

चल असहकाराची चळवळ उभारू

साऱ्या मानवजातीसाठी प्रार्थना करू

अहिंसक वागू प्रयोग करू करून बघू

आजकालच्या बेकार पोरांमध्ये जा ती

कुणाकुणाच्या बेहेकाव्यात येतायत नकळत

मी कळलो असेन जरा जरी तुला तर

त्यांना माझं म्हणणं पटवण्याचा प्रयत्न कर

आणि हो नथुराम असेल तुझ्या संपर्कात तर

त्यालाही जरा समजून सामावून घे आपल्यात

शेवटचा  श्वास सोडण्याआधी त्याला सांग

मी पाहिलं होतं त्याच्या डोळ्यात तेव्हा

आता जेव्हा केव्हा उल्लेख होईल माझ्या नावाचा

तो आसपासच असेल माझ्या कुठेतरी

खात्रीये मला कधीतरी तो माझ्या सोबत येईल

तेव्हा मी त्याला माझ्या सोबत नेईन मायेने

आपल्या कुटीतल्या मागल्या तळ्यात

उगवलेली स्वच्छ सुंदर कमळं दाखवायला

विचारीन त्याला तळ्याकाठी बसून

कोण म्हणतं माझी अहिंसा अहिंसा आहे

माझी अहिंसा अहिंसा नाही

हे तुला एकदा कळलं की मग आपण

हिंसा म्हणजे काय या चर्चेला सुरुवात करू

आठवतोय तो क्षण शेवटचा तुझ्याकडे पाहत

आश्चर्यचकित डोळे मिटताना माझ्या तोंडून

तूच सांग काय शब्द निघाले होते अखेरचे

आभाळ मोकळं होऊन तळ्यात पहुडलंय बघ

कमळपाकळ्यांवर टचकन् उगवून आलेत काही थेंब

या समजूतदार संध्याकाळी चर्चेआधी चल

आपण एकत्र अनुवाद करू या नितळ तळ्याचा..